नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

आयुष्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयुष्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ जानेवारी, २०१७

मनात माझ्या

मनात माझ्या कालवाकालव
मनात बधीर शांतता
भावनांचे .. घटनांचे धागेदोरे
विचारांचा गुंता
मनात ओरखडे
मनात पापुद्रे
मनात भेगा
मनात रेघा
असंख्य रेघा
उभ्या आडव्या तिरप्या दिशाहीन ...
मनात असंख्य रेघांचे अगणित छेदबिंदू
मनात धुळीचा राप
भितीची धाप

मोजमाप आणि शिव्याशाप ...
मनात आरशाचा फुटका तुकडा
त्यात दिसणारी देहाची लक्तरं
थरथरणारे ओठ
खपाटीचे पोट
मनात कुसकं नासकं कधीचं बरच काही
शर्टाची निर्धाराने दुमडलेली बाही
आणि हळूवार अंगाई ...
बाळा जो जो रेऽऽ
मनात स्वच्छ शुभ्र दिव्य प्रकाश ...



- प्रसाद साळुंखे 



शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

वादळ वारा झुळूक फुंकर


एक वादळ थांबलं
आणि बातमी वार्‍यासारखी पसरली  
कित्येक उसासे हुंकार हवेत शांत विरून गेले

एक वादळ थांबलं 
पालापाचोळा लांब चेहरा करून पडून राहिला
गतिहीन दवाचा गहिरा बोजडपणा उरी घेऊन

एक वादळ थांबलं 
आणि खिडक्या अस्तित्वहीन झाल्या 
आता कसलीच आदळाआपट होत नाही

एक वादळ थांबलं 
आणि झुळुक ही हळवी झाली 
फुंकर विरून गेली थरथरणार्‍या ओठांत

एक वादळ थांबलं
त्या वादळाचं आत्मचरित्र कोणी धरून बसलं 
न फडफडणार्‍या निर्जीव पानांत वादळ बंदिस्त करण्याचा वेडा अट्टाहास

एक वादळ थांबलं 
त्याला आता खूप दिवस झाले 
तरी वादळाचे भास अवतीभोवती घोंघावत असतात

एक वादळ थांबलं 
कोणाला त्याचा विशेष फरक पडला नाही
कुठेतरी दूरवर कुणीतरी आतून समूळ हललं एवढं मात्र खरं 

एक वादळ थांबलं 
मग पुन्हा सुरू झालं वादळ .. आठवणींचं 
उरली उगाचची ओली घुसमट 

एक वादळ थांबलं
आणि ते थांबणारच होतं कधीतरी
पण इतक्यात उद्ध्वस्त व्हायची तयारी नव्हती मनाची

एक वादळ थांबलं
तोच सुरु झाला एका वायुहीन पोकळीतला अगम्य प्रवास 


प्रसाद साळुंखे

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०१०

आव्हान
















सूर्य माझा पाठलाग करतोय कधीचा
भांग विस्कटलाय, चेहरा रापलाय
पाठीला स्पर्श जाणवतोय ओघळणार्‍या घामाचा,
त्यांनी दिलय कधीही पूर्ण न होणारं टारगेट
आव्हान नावाचं झगझगीत लेबल लावलय त्याला
रोजीरोटी टिकवायचाच वैताग आहे साला
महिना अखेरीला पगार हवाय आव्हान पूर्ण करा
बॉसच्या तावडीतून सुटायचय आव्हान पूर्ण करा
मॅनेजर व्हायचय आव्हान पूर्ण करा
विदेशात जायचय आव्हान पूर्ण करा
अगदी श्वास घ्यायचा असेल तरी आधी आव्हान पूर्ण करा
टारगेट अचिव्ह केल्याशिवाय मरायचीही उसंत नाही
हार्बर-वेस्टर्न-सेंट्रल फिरतोय दिशा दाही

आज मोजमाप झालं सार्‍यांचं
घामाच्या .. अश्रूच्या प्रत्येक थेंबाचं, आणि लोकलच्या वार्‍यांचं
मर मर मरून टारगेट पूर्ण होता होता राहिलं
प्रत्येकाने मिळेल त्यामध्येच स्वत:चं हित पाहिलं
सहनशक्ति संपल्यावर थोडा आवाज चढा झाला
भुवया उंचावल्या, ओठ थरथरले आणि मोठ्ठा राडा झाला
आमच्या टारगेट मधून बॉसही त्याच्या नावावर काहीतरी खपवतो
साला आम्ही फुकट झक मारतो नि रक्त आटवतो
तरीही त्यांना हवी होती प्रत्येक मान खाली
माझी मात्र चीड बोलण्यातनं व्यक्त झाली
काम साधून झाल्यावर सगळ्यांदेखत लाथाडलं
नोकरी गेली वर क्रेडिटही ओरबाडलं
म्हणून इथे बसलो येऊन
हातात थंड बियर आणि डोळ्यात जळते निखारे घेऊन

एक सीप . . .

इथे कठड्यावर जाणवतोय फणफणारा वारा
कित्येक दिवसात असा निवांत बसलोच नाही
सतत कसलं तरी टेन्शन, सतत कुठे तरी पोहोचायची घाई
एक सीप

अजून दारु पिताना आठवतो आईने देवाजवळ लावलेला दिवा
अगरबत्त्यांची उद, आणि धूर
तोच धूर दिसतोय आता, .. इथे?
आता डोळे भरून रडावंसं वाटतंय ..
एक सीप

नोकरी लागली तेव्हा उड्या मारलेल्या आनंदात
त्या उड्यांचंच कर्ज झालंय जणू
नोकरी गेलेल्याकडून कर्ज फेडण्याची आशा?
एका उडीत फिटेल कर्ज आयुष्यभरचं ..
एक सीप

आईचा निरांजनाने उजळलेला चेहरा,
बाबांची आरामखूर्ची,
ताईचे कानातले, टिकल्या ..
एक सीप

केरसुणी, किचनमधले पितळेचे तीन डबे
माळ्यावरची धुळीत पडलेली बॅट
कपाटावरची फुलांची नक्षी
मोराचा पडदा ..
एक सीप

कुंडीतली सदाफुली,
घरामागचा पारिजात
मोडकी सायकल
सगळं डोळ्यासमोरून गेलं ..
आवडीच्या काही जागा, काही माणसं, काही घटना आठवून पाहिल्या
आयुष्याला काही भाग मुद्दाम वगळला या द्श्यपटलातून ..
शेवटचा जळजळीत सीप

टिन भिरकावला
कठड्यावर उभा राहिलो
काही सेकंदांसाठी गरुडाचं बळ जाणवलं पडलेल्या खांद्यांना
पण आता पूर्वीसारखी आकाशाची ओढ नव्हती
उलट समोरची खोल दरी जवळची वाटत होती
आता फक्त दरीतल्या थंड काळोखात निजायचं होतं शांतपणे
आज समजलं
आयुष्य नावाचं आव्हान संपलं ...

-प्रसाद 

बुधवार, ४ ऑगस्ट, २०१०

सुख





















... मी येतो म्हणत डोळ्यासमोरून सुख गेलं निघून
निरोप देताना सुखाला मन आलं भरून
सुखाला म्हटलं जा सांभाळून जा नीट घरी
हसत रहा सुखात रहा निदान तू तरी
माझ्याबरोबर तू अगदी विसंगत वाटायचास
मी कारणाशिवाय चिंतातूर तू विनाकारण हसायचास
सुख सोबत असलं की आपली दुःख वाटतात मोठी
तरी सुखात आहोत अशी समजूत घालतो खोटी
तुझ्या सोबत असण्याने काही मनात सुख पाझरणार नाही
तुझ्या हसण्याने काही मी माझ्या दुःखाची कारणं विसणार नाही
काल तुला पायर्‍यांवर रडताना पाहिलं
हसणं कानात शिरलं नसेलही पण रडणं मला लागलं
थोडं विक्षिप्त आहे माझं वागणं
पण मला जगू दे माझं जगणं
तू हरलास मला सुखी ठेवायला असं समजू नकोस
खरं तर मीच हरवलेत असे बरेच क्षण माझ्या हातून
तू जा निघून कारण सुखी व्हायचंच नाहीए मला
मी रिचवत राहीन एकटा हा फसफसणारा प्याला
जा निघून नाहीतर उगाच गुंतत जाशील
धड सुखात नाही
धड दुःखात नाही
असा फसफसणारा प्याला बनून राहशील

-प्रसाद 

बुधवार, ९ डिसेंबर, २००९

बंद मूठ







बंद मूठ घेऊन ती त्याच्या जवळ आली
'हे काय नवं?'
'काय असेल नवं? ओळख बघू?'
'कोडी घालत बसू नकोस सांगून मोकळी हो'...
आवाज चढलेला
चेहरा रडवेला
पटकन पकडतात माणसं
सॉरी ... जवळची माणसं

पण तिही मोठ्या हिमतीचीच
समजावण्याची पद्धत जगावेगळी
तिने नाही विचारलं झालंय काय?
भूतकाळ उगाळणं हा नसतो उपाय
मनात काही ठरवून ती हसत सुटली
अशा या वागण्याने स्वारी आणखीच चिडली

निमूट उठला
चालत सुटला
तिचं अस्तिव नाकारून
तिनेही दिले त्याचे सारे राग झुगारून

त्याच्या डोळ्यात थोडी थोडी दिसू लागली आग
पण हिला नव्हता उरला कुठलाच धाक

'रागावलास?
माझ्यावर की माझ्या हसण्यावर???
रागात भलताच दिसतोस गोड'
त्याचं उत्तर 'वाट सोड'

'जाता जाता मूठीत काय आहे ते तर सांग?'
'काय? काय आहे मूठीत?' वाक्यावाक्याला राग
'असं होतं माणूस रागात असेल तर
मूठभर सुखही दिसतं चिमूटभर
मूठीत माझ्या आहे
मुंगीची जिद्द जगण्यासाठी
वासराची धडपड चालण्यासाठी
अल्पायुषी फुलपाखराचं टवटवीत मन
घरट्यात साठवलेला एक एक कण
ही सगळी माणसं नाहीत त्यांना नाहीत दोन हात
म्हणून दु:ख कुरवाळत बसत नाहीत दिसरात
दिसतं का कुणी त्यातलं एकलकोंडं बसलेलं?
सगळ्यांच्यात असूनसुद्धा सगळ्यांच्यात नसलेलं?
त्यांना दु:ख असणारच पण ते सुख शोधत फिरतात
म्हणून थोडे जगले तरी ते पुरेपूर जगतात
आपण मरणाला टेकलो की वाटतं अरे जगायचं राहिलं
खूप वेळ शोक करण्यात गेला हे बघायचं राहिलं
ते पहायचं रहिलं'
त्याला पटलं चेहरा हसला थोडा
राग झाला शांत
ती शिरली त्याच्या मिठीत
पाहत बसले दोघे बूडता सूर्य निवांत

-प्रसाद 

बुधवार, १० जून, २००९

साधी माणसं

राजकारण हा माझा प्रांत नव्हे असं सगळेच म्हणतात. पण काहीजणांनी साळसूदपणाचा उसना आव आणून असं काही म्हटलं की यांना अजून तिकीट कसं मिळालं नाही याचं आश्चर्य वाटतं. आपल्या आजूबाजूला अशी बरीच संधीसाधू मंडळी असतात. डोळ्यासमोर येणारा प्रत्येक नवा चेहरा यांचा नवा मदतनीस असतो. बरेचदा यांची साधी तोंडओळख यांच्या गरजेनुसार मैत्रीत बदलते. बघावं तेव्हा साखर पेरतांना दिसतात. यांच कुठल्याच गोष्टीवर ठाम मत नसतं आणि कोणाशी मतभेदही नसतात. हे कुठल्याच गोष्टीचा निषेध करीत नाहीत, बंड पुकारीत नाहीत. शांत राहून आपण किती आदर्शवत (?) आहोत हे दाखवतात. म्हणजे म्हणाल तर तटस्थ भूमिका म्हणाल तर मूक पाठिंबा. यांची मस्केबाजी मैत्री, आदर, संस्कार यांच्या वेष्टनात इतक्या बेमालूमपणे गुंडाळलेली असते की आपल्याला गुंडाळलं जातय याची शंकाच कुणाला येणार नाही. कुठल्याच गोष्टीची सरळ, मुद्देसूद चर्चा यांना मान्य नसते. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा गुंता तयार होतो. सगळे धागेदोरे माहित असूनही जाणीवपूर्वक गुंता सोडवला जात नाही. 'गुंतूनी गुंत्यात सार्‍या पाय यांचा मोकळा' असतो. यांचं आयुष्य म्हणजे योजनांची निव्वळ आखणी असते. यांच्यासाठी माणसं म्हणजे पायर्‍या ... दगडाच्या .... भावनाहीन, संवेदनाहीन. हे आपल्यासारखेच इतरांना समजतात. सगळी माणसे देवाने एकाच साच्यातून काढलीत असं यांच ठाम मत असतं. आपल्या संकुचित विचारांचा यांना अभिमान वाटतो, इतकच नव्हे तर सगळ्यांचे विचार असे असावेत असा त्यांचा अट्टाहास असतो. यांची यशाची व्याख्या म्हणजे साखर पेरण्यातील चातुर्य आणि त्या जीवावर मारलेल्या उड्या. अशी माणसं बघितल्यावर पटतं की आयुष्यात शिकण्यासारखं खूप आहे.

रविवार, ७ जून, २००९

धूळ ...

अशी सरली वर्षे जसा उडावा कापूर ...
फडफडली काही पाने झटकली धूळ ...

आज सुका चाफा तरारला पुरेपूर
सुरुवात होते अशी नष्ट म्हणता समूळ

हा रुमाल फुलांचा नेतो तिथे दूर
ते भातुकलीचे घर .. शेंगदाणा थोडा गूळ

काही लिहायचे मीही, थोडे छेडायचे सूर
तेव्हा भरायचा ऊर .. आता वाटे सारे खूळ

होता नजरेत माझ्याही नव्या आशांचा पूर
आता उरले फक्त हे डबके गढूळ ...

केव्हा? कधी ? कसा? सारा पालटला नूर
दृष्ट लागली अशी की झाले आयुष्य मचूळ ...

तुझ्यामाझ्यामध्ये होता भकास तो धूर,
भरधाव सुटली ती ... मागे डायरीची धूळ . . .

-प्रसाद