नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शुक्रवार, २६ जून, २००९

भ्रमणध्वनी

माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि मोबाईल. होय मोबाईलसुद्धा. नाही ही अतिशयोक्ती नाही. मोबाईल हा जणू प्राणवायूच बनत चालला आहे. मोबाईल ही काळाची गरज आहे, प्रवासात सोईचा आहे मान्य. पण बर्‍याचदा लोकांना मोबाईलचा वापर कसा करावा हेच कळत नाही. उदाहरणार्थ, जर शेजारी बसलेल्या माणसाला सतत कॉल्स येत असतील तर काहींचा स्वतःच्या मोबाईलशी चाळा सुरु होतो. अशा वेळेला नुसते वरवर रिंगटोन्स चाळून यांना कोण समाधान मिळतं देव जाणे. बर कपाळावरच्या आठीने यांच्या निर्विकार चेहर्‍यावरची माशीदेखील हलत नाही. फोनवर बोलतांना नेमकी आवाजाची पातळी काय असावी याची बर्‍याचजणांना जाणीव नसते. आपला आवाज आपल्या फोनच्या रिंगटोनपेक्षा तिपटीने मोठा असावा असा त्यांचा जणू नियमच असतो.

मागे एकदा एका मित्राबरोबर मी एका रेस्टॉरेंटमध्ये गेलो होतो. बार कम रेस्टॉरेंट होतं, पण रेस्टॉरेंट कम बार वाटत होतं. सहाजिकच हिरवळ नव्हती सोमरसाचे दरवळ मात्र होते. रापलेल्या चेहर्‍याची खप्पड माणसं, त्यांच्या समोर भरलेले ग्लास आणि खाद्य. एक गुजराथी शेटजी पाकीट घरी विसरल्यासारखा चेहरा करुन एकटेच पापलेट फ्राय चिवडत बसले होते. कुठे आगरी बांधवांच्या तोंडावर सरस्वती नाचत होती. एकटे वेटर सोडले तर कोणीही त्या रेस्टॉरेंटच्या इंटेरिअरला साजेसा वाटत नव्हता. नाना तर्‍हेची माणसं होती, आता माणसं होती म्हणजे मोबाईलच अस्तित्व जाणवल्याखेरीज थोडीच राहणार. एक तळीराम बर्‍यापैकी जमिनीपासून फूट-दिडफूट वर अधांतरी तरंगत होते. वेटरची भांडून झालेल्या या तळीरामांना बहुतेक आमचं आणखी मनोरंजन करायचं होतं. "हॅलोऽऽऽ" सगळ्यांना ऐकू जाईल इतक्या मोठ्यांदा ते बोलत होते, आणि कहर म्हणजे मोबाईल लाऊडस्पीकर मोडवर होता. "नॅऽऽऽय नो ... ऍक ..ऍकोन घे माआ लेत होयेल .. तू झोप.." "पुरे करा आता" एक थंड संवेदनाहीन आवाज, काही रोजच्या ऐकण्यातले आवाज असतात, जसा दार बंद केल्याचा "खट्ट" आवाज, किंवा चहाच्या कपावरचा चहाचा ओघळ टेबलावर सांडू नये म्हणून कप किंचीत बशीला घासून उचलतानाचा आवाज, असाच आणखी एक रुळलेला, थंड .. निर्जीव आवाज ऐकल्यासारखं वाटलं. "जास्त नाय ... बाबू झोप तू .. झोऽऽ हां .." "या बघू आधी थांबवा आता, टॅक्सी करा रात्र ..." "अरेऽऽ कॅ लहान हाय काय? .. झोप ना गप... साली ... कॅ .. ए कॅ ..कॅ बघतो तू ?" माझ्या डोक्यात साली शब्द घुमत होता. तळीरामांचं एव्हाना उरकलं आणि त्यांच विमान हेलकावे खात निघालं. फोन नंतरही बराच वेळ वाजत होता पण त्याच्या लेखी तो सायलेंट होता. थोड्यावेळाने त्याने आठ्या पाडत, भुवया ताणून अंदाज घेत फोन उचलला, पुन्हा मघाचचाच थंड आवाज. इतक्या थंड या कशा काय राहू शकतात. सहनशीलता, सोशिकतेचा कहर होती साली.

मला स्वतःला गाणी ऐकायला फार आवडतं. मी लोकसंगीत, भावगीत, नाट्यसंगीत, चित्रपटगीत अशा कुठल्याही प्रकारच्या गाण्यांचा आस्वाद घेऊ शकतो , पण कुठल्याही वेळेला मात्र नक्कीच नाही. विशेषतः जेव्हा बॉसने मला फैलावर घेतलेलं असतं. म्हणजे त्याचं होतं असं की बॉस माझ्या IQ पासून COMMONSENSE पर्यंत सगळ्याचं दुकान चव्हाट्यावर मांडतो. मी हे सगळं सहन करून राग गिळून कसाबसा बसमध्ये बसतो, आणि माझ्या बाजूचा इसम नेमका 'पहेले तो कभी कभी गम था' बसला ऐकू जाईल अशा आवाजात लावतो. अरे राजा तुला अल्ताफ राजाची भक्ती करायचीय तर खुशाल हेडफोन लावून कर की, आणि हेडफोन घ्यायचेच जर वांधे असतील तर मोबाईल तरी वापरत जाऊ नकोस. यांना काय बोलावं हेच कळत नाही, एकदा तर छशिट पासून वडाळ्यापर्यंत एका दर्दीने 'सात समंदर पार मे तेरे' हे गाण एक सात आठ वेळा तरी लावलं, पुढे पुढे तर पुढचं कडवं मलाच म्हणावसं वाटत होतं की "ओ जुल्मी मेरी जान तेरे कदमोंके नीचे आ गई" , कधी कधी प्रश्न पडतो की यांना ही गाणी खरच आवडतात की लोकांचा अंत पाहण्यासाठी ही असली गाणी लावतात? एकदा एकानं असचं तार स्वरात गाणं लावलं होतं, मी कधीचं ठरवलेलं की असा कोणी भेटला की त्याला झाडायचा. माझ्यातला angry young man जागा होत होता. "बॉस हेडफोनपे सुनोगे तो अच्छा होगा" असं म्हटलं अगदी शांतपणे. पण वारंवार सांगून त्यानं ऐकलं नाही. उलटपक्षी "तेरेको क्या प्रोब्लेम है?" असं आठ्या पाडून विचारलं मला. शाब्बास म्हणजे त्रास होतोय सगळ्यांना आणि याचा चेहरा असा की जणू त्याला लाखभर रुपयांचं मी देणं लागतो. लोक पूर्वी वैतागले की इंग्रजी झाडायचे, आता मराठीत पेटतात, thanks to Raj, "प्रॉब्लेम म्हणजे स्वतःचं बघितलं म्हणजे झालं, तुझी enjoyment होतेय रे पण इतरांना त्याचा त्रास होतोय त्याचं काय?" त्यानं निमूट गाणं बंद करून मोबाईल खिशात घातला. अख्खी बस माझ्याकडे बघत होती. म्हणजे नेहमी कोणी आवाज चढवल्यावर होतं तसच काहींचा मूक पाठींबा, काहींचे आगाऊ आहे कार्ट लुक्स, काही निव्वळ बघे शी काय यार आता आता कुठे मजा यायला लागली होती हे अजून चालायला हवं होतं निदान माझा स्टॉप येईपर्यंत असं म्हणणारे, काही फक्त समंजस प्रवासी जणू काही झालच नाही अस भासवणारे. मोबाईलचा त्रास कमी म्हणूनकी काय खोब्रागडेंनी बसमध्ये दूरदर्शन बसवलेत त्या दूरदर्शनच्या टुकार जाहिरातींमुळे हल्ली मला बस लागण्याची भीती वाटते.

माझी एक मैत्रिण तर मोबाईललाच चिकटलेली असते. अगदी घरातून निघाल्यापासून ते पुन्हा घरी पोहोचेपर्यंत तिच्या प्रियकराला सगळी माहीती पुरवत असते. म्हणजे ट्रेन मिळाली, बस पकडतेय, कॅन्टिनात चहा झाला, लेक्चर ऑफ आहे, वही विसरले, भूक लागली, सरांनी झापलं, पाऊस पडतोय, मित्र केक कापतोय, कावळा उडाला, कुत्रा भुंकला, च्युइंगम थुंकला, पेपर्स मिळाले, नखं कुरतडली, चप्पल लागली, भांडणं झाली, ती अशी बोलली, तो शहाणा आहे, पाणी साचलं, आईशी वाजलं, अय्या गंमत सांगायचीय राहिली, मी फोन ठेवतेय आता. असं अनाकलनीय, अवर्णनीय वगैरे काहीतरी चालू असतं. बरं फोन चालू असतांना एकीकडे आमच्याशीही बोलत असते. कसं काय जमत यांना बुवा आम्ही तर अजून लॅंडलाईनलाही तितकेसे रुळलो नाही. "हलाव कोन मंगता हय रे? नाय नाय येधर नाही रयताय? नंबर जरा देख के घुमाव ना" असे संवाद आता आता पर्यंत आमच्या तोंडी दिसत असत. नाही म्हणायला कधी कधी ही मैत्रिण काहीतरी 'महत्त्वाचं' मुलींच्या भाषेत 'तसलं' बोलायला रेंज नाही अस दाखवून एकटी थोडी दूर जाते. असं झालं की आम्ही तिची जाम खेचतो, संवादही ही आमचेच, कलाकारही आमचेच आणि दादही आम्हीच देतो. तिने जर हा ब्लॉग वाचला तर माझी काही खैर नाही, हा तिच्या प्रियकराची काही मिनिटांसाठी सुटका केल्याचं पुण्य मात्र नक्कीच पदरात पडेल.

माझा मोबाईल साधासा, जवळजवळ लॅंडलाईन. ना बिचारा गाणी गुणगुणत, ना रेडिओ लावत, ना फोटो काढत, ना शूटिंग करत, नाही म्हणायला साप आहे त्यात खेळायला. मित्रांना वाटतं माझा मोबाईल माझ्यासारखाच आहे म्युझियममध्ये ठेवायच्या लायकीचा. मीही ऐकून ऐकून घेतलं आणि सांगितलं त्यांना की एकदा चांगल्या पगाराची नोकरी मिळूदेत असा फोन घेईन ज्याला सरकता येईन पुढेमागे (slice का काय ते तसलं), ज्याची मानगुट पिळता येईल, ज्याला वहीसारखं उघडता येईल, जो मोठ्यांदा गळे फाडेल, तुमच्या लग्नाचे फोटो, विडिओ शूट, एवढच काय नाचायला लाऊडस्पीकर, हॅलोजनसुद्धा तो एकटाच बनेल, फंक्शन्स तर त्याचे एवढे असतील की जर वाजलाच चुकून तर पाच-सात मिनीटं मलाच समजणार नाही की तो उचलायचा कसा? आत्ता बोला

आरती अंतिम टप्प्यात असतांना घालीन लोटांगणला कोणाची कोंबडी पळावी, काव्य संमेलनात कोणाचा नगारा वाजावा, इतकच काय लेक्चर्स चालू असतांना कुणाचं खट्याळ बाळ हसावं, नाटक ऐन रंगात असतांना यांना रेतिवाला हवा व्हावा, कोणाच्या अंत्यविधीला तुतारी वाजावी, मुलगी बघायला जाताना काही ठरण्याअगोदर 'हाताला धरलया' म्हणत फोननं भावनाविवश व्हावं हे आणि असे अनेक किस्से आहेत एकट्या मोबाईलचे, ... आलोच वाजला बहुतेक ...

११ टिप्पण्या:

 1. प्रसाद,
  मस्त लिहिलयस रे. आवडल.
  अरे ह्या मोबाईल्चे किस्से एकत्र केले तर १ जाडजूड पउस्तक होईल. असेच किस्से समस (SMS)चे सुदधा होतील. समस मधले shortcuts हा १ प्रबंधाचा विषय आहे. Ph.D. सहज होईल त्यावर.

  अनिकेत वैद्य

  उत्तर द्याहटवा
 2. अरे हो समस आहे की कसं सुटलं मझ्या तावडीतून?
  sms चे shortcuts त्यांना तर माझा कोपरापासून.
  तुमच्याशी मी 100% सहमत आहे.

  आता बघा एकदा रात्री 9.30 ला मला sms आला "tom lec @ 10" दुसर्‍या दिवशी सकाळी 10 ला मित्राचा फोन "अजून झोपतोयस ?? sms मिळाला नाही का??" म्हणजे लेक्चर होतं तर शाब्बास मला वाटलं ह्या इंग्रजाळलेल्या मुलांना त्या Tom Cruise चं भारी वेड त्याचा एखादा चित्रपट रात्री 10 वाजता बघ म्हणून सांगणारा sms होता तो.

  ब्लॉगला दाद दिल्याबद्दल धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 3. 'जबरदस्त आणि अ..प्र..ती..म' असे मी या चुरापावच्या पोस्टचे वर्णन करीन. सोलिड निरिक्षण आहे रे तुझे. मग ते बस, ट्रेन नाहीतर होटेल असो.. ट्रेन मध्ये जोराने गाणी ऐकाणाऱ्या (आणि दुसऱ्यान्ना गरज नसताना ऐकवणाऱ्या) अनेकांना मी जाम फाडलाय... काही वाक्ये पुन्हा पुन्हा वाचली... जशी की...

  "नॅऽऽऽय नो ... ऍक ..ऍकोन घे माआ लेत होयेल .. तू झोप.."

  'सात समंदर पार मे तेरे' हे गाण एक सात आठ वेळा तरी लावलं, पुढे पुढे तर पुढचं कडवं मलाच म्हणावसं वाटत होतं की "ओ जुल्मी मेरी जान तेरे कदमोंके नीचे आ गई" ... हे एकदम फाडू होतं. :D

  आणि शेवटी त्या पोरीची बडबड ---> कावळा उडाला, कुत्रा भुंकला, च्युइंगम थुंकला .. वगैरे..वगैरे.. शोल्लिट एकदम.

  उत्तर द्याहटवा
 4. धन्यवाद रोहनजी,
  मला जाम राग येतो असं मोठ्याने गाणं लावणार्‍यांचा, त्याहून राग येतो ते गप्प राहून सहन करणार्‍यांचा, त्रास तोंडावर दिसतो सगळ्यांच्या पण बोलून वाईटपणा कोण घेणार? अतिच होतं तेव्हा तुमच्या माझ्यासारखे झापतात पण म्हणून हे प्रकार पुन्हा होत नाहीत असं नाही.

  पोरींची बडबड खरंच मला दया येते त्यांच्या प्रियकरांची बिच्चारे प्यार के मारे, एक तर ऐकत तरी असतात नाहीतर explanations तरी देत असतात

  उत्तर द्याहटवा
 5. लय भारी !!

  "ओ जुल्मी मेरी जान तेरे कदमोंके नीचे आ गई" आणि त्या पोरीची बडबड तर जब-या आवडली.. मस्त लिहिलंय!!

  उत्तर द्याहटवा
 6. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद हेरंब :)

  उत्तर द्याहटवा