नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०२२

याला काय म्हणावे?

ती समोरून येताना
धडधड धडधड व्हावे
मनमोराने 
मनमुराद
थुईथुईसे नाचावे
कुणीतरी गोमट्या
भामट्याने
करावी थोडी लगट
तीनंही लगेच द्यावी साथ
स्वतःशीच हसत
मग काय?
उपटसुंभाने मनमोरास पुरते भादरावे
याला काय म्हणावे?

ट्रेन रिकामी दिसता 
आम्ही घ्यावे जरा शिरून
स्वतःलाच देत दाद
बसावे पसरून
वातावरण हवेशीर
फर्स्ट क्लास व्हावे
निवांतपणाचे जरा उरात दोन श्वास भरावे
ब्यागेतून
सहजसोपे पाडगांवकर निघावे
मग काय?
कारण नसता ट्रेनने उलटे यार्डाकडे सुटावे
याला काय म्हणावे?

पाकीट असता अशक्त
दिसावी सेलची पाटी
सगळे ब्र्यांडेड कपडे 
अन् अनब्र्यांडेड माणसांची दाटी
हवाहवासा नग मिळायला 
सोफेस्टिक झटापटी
साईज आणि किमतीच्या सांभाळत खटपटी
आपणही आठशेचे शर्ट चारशेत पटकवावे
मग काय?
सहाशेच्या छत्रीस रिक्षेत सपशेल विसरून यावे
याला काय म्हणावे?

देवळातल्या देवाशी मग बोलावे थोडे
आमच्याच बाबतीत असे का 
हे नेहमीचेच कोडे
देवाने तक्रारी ऐकून खो खो हसावे
हसताना मुखकमल मोठे प्रसन्नसे भासावे
चालायचेच म्हणत सारे आपणही मग विसरावे
मग काय?
नेमके माझेच चप्पल देवळासमोरून गायब व्हावे
याला काय म्हणावे?

- प्रसाद साळुंखे

सोमवार, १८ जुलै, २०२२

तू जुनी जुनीशी

तू 
जुनी जुनीशी
आठवू लागलो
नवी नवी
जशी
छबी तुझी
भासवू लागलो

गार वारा
पान माझे
पावसाळी
भान माझे
रंग ओलेकंच
चेतवू लागलो
नवी नवी 
जशी 
छबी तुझी
भासवू लागलो

तो किनारा
लोटलेला
रोखलेला
श्वास माझा
घाव हे मखमली
कातरू लागलो
नवी नवी
जशी
छबी तुझी 
भासवू लागलो

थेंब पाचू
या सरीचा
वाजे वेणू
अंतरीचा
हवीहवीशी स्पंदने
थोपवू लागलो
नवी नवी
जशी
छबी तुझी 
भासवू लागलो

मेघ काळा
व्यापलेला
ताणलेला
वेडचाळा
गुंतूनी गुंतणे
सोडवू लागलो
नवी नवी
जशी
छबी तुझी 
भासवू लागलो
तू 
जुनी जुनीशी
आठवू लागलो

- प्रसाद साळुंखे

सोमवार, १७ जानेवारी, २०२२

'मध्यरात्रीनंतरचे तास'

'मध्यरात्रीनंतरचे तास'
मूळ लेखिका - सलमा
मराठी अनुवाद - सोनाली नवांगुळ

' साहेब हे न्या, साहित्य अकादमी मिळाला आहे याला ' असं त्यांनी सांगितलं. काहीतरी सोपं द्या वाचायला असं म्हणत आपल्या अभिरुचीवर शंका घेण्याचं समाधान देण्यापेक्षा ती कादंबरी मी साशंक मनाने विकत घेतली.

' मध्यरात्रीनंतरचे तास ' या कादंबरीच्या मुखपृष्ठावरून काहीतरी गंभीर असणार हे निश्चित होतं. सुरुवातीलाच प्रस्तावना वाचली माझ्या आवडत्या लेखिका कविता महाजन यांची, या कादंबरीला उत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार आहेच, पण कविता ताईंच्या प्रस्तावनेनंतर मनाला पटलं की दर्जाच्या बरोबरीने धगधगता जाळ असणार या पुस्तकात.

कादंबरीत तामिळ लेखिका सलमा पुरुषप्रधान मुस्लिम संस्कृतीतल्या उणिवा बेपर्दा करतात. तामिनाडूमधील एका गावात कथेची सुरुवात होते. वेगवेगळ्या वयाची मुस्लिम स्त्री पात्र कादंबरीतून आपल्याला भेटतात. मग अगदी शाळकरी राबिया, मदिना पासून तरुण वहिदा, फिरदौस ते थेट वयस्कर नुराम्मा पर्यंत. पण सगळी पात्र म्हणजे जवळपास एकाच ताग्यातून विणलेले वेगवेगळ्या मापाचे कपडे. यांच्यावरची सामाजिक बंधनं, पुरुषसत्ताक समाजाने लादलेले नियम बऱ्याच प्रमाणात साधर्म्य साधणारे. पण प्रत्येकाची या सगळ्याला सामोरं जाण्याची पद्धत वेगळी, काहींनी निमूटपणे अत्याचाराला शोषणाला आदर्शवाद मानलं तर काहींनी बंडखोर वृत्तीने आपल्या आतल्या आवाजाला सारी बंधनं झुगारून प्रतिसाद दिला. काव्यात्मक गुलाबी आशावाद टाळून विखारी वास्तव मांडण्याचा प्रयत्न खरोखर स्तुत्य आहे. या साऱ्या कोलाहलात एक मन विषण्ण करून टाकणारी शांतता आहे. ही शांतता कादंबरी पूर्ण होता होता अधिकाधिक गडद होत जाते. 

माणूस हा समाजप्रिय प्राणी असला तरी शेवटी प्राणीच, आणि एकदा समाज प्रिय झाला तर मन काय म्हणतंय हे दुय्यम होत जातं. लोक ठरवतात आपल्या जगण्याची चाकोरी. लोक म्हणजे तरी कोण, तर पुढे पुढे करणारी चार पाच टाळकी, कुचाकळ्या करणारे काहीजण. देवाच्या वतीने माणसं बोलू लागली की गल्लत होते, मग एखादीला चूक की बरोबर असं तोललं जातं, गुन्हाला शिक्षा दिली जाते आणि बंड थोपवलं जातं, बहुतेकदा ती चूकच असते, स्त्री म्हणून विशिष्ट समाजात जन्म घेतल्याची चूक, कारण इथे देवही पुरुष आणि बडवेही. 

या नकारात्मक परिस्थितीतही या साऱ्याला न जुमानता प्रेमाचे अंकुर फुटतात. प्रेम हेही या विस्तावातलं वास्तवच की. या वास्तवाच्या पुण्याईने धर्माचा विटाळ झाकोळला जातो काही क्षण. पण काही जात्यातले काही सुपातले हा न्याय कादंबरीभर आपल्याला दिसतो. स्त्री विरोधी वागण्याला मिळालेली समाजमान्यता, तसंच स्त्री आणि पुरुष यांची तथाकथित पापं मोजण्याच्या भिन्न फूटपट्ट्या बघून चीड आल्यावाचून राहवत नाही. 

लेखिका सलमा यांच्या पहिल्याच कादंबरीने हे सारं यशस्वीरीत्या पेललं आहे. बऱ्याचदा नुसतं मत मांडून चालत नाही काही विषय जसं की धर्म वगैरे हे फार नाजूक असतात, त्या विषयी मत मांडायचं तर एक वेगळी हातोटी एक वेगळं कौशल्य लागतं, जसं की या कादंबरीत धर्माबद्दल जे काही प्रश्न वाचकांना पडतात ते इथे लहानग्या राबियाच्या तोंडी आहेत, आणि एका प्रसंगात वयस्कर नुराम्माच्या तोंडीही. त्यामुळे या प्रश्नांना पात्रांची मांडणी लक्षात घेता पात्रांबद्दल केवळ आकस किंवा पूर्वदुषितग्रह न ठेवता केवळ प्रश्न म्हणून पाहणं सोपं जातं. हा तोल लेखिकेने मस्त साधला आहे. सोनाली नवांगुळ यांनीही कादंबरीचा मूळ बाज सांभाळत उत्तम मराठी अनुवाद केला आहे, त्यामुळे कादंबरी वाचताना त्या भावविश्वाचा भाग होणं सोपं जातं. कांदबरी वाचल्यावर काही पात्र आणि त्यांच्या भावभावनांचे, अनुभवांचे निखारे डोक्यात कोंदटवाणे धुमसत राहतात हेच या कादंबरीचं यश आहे. 

- प्रसाद साळुंखे

सोमवार, ३ जानेवारी, २०२२

रारंगढांग - प्रभाकर पेंढारकर

प्रभाकर पेंढारकरांनी लिहिलेलं 'रारंगढांग' वाचलं. नावापासूनच या पुस्तकाचं वेगळेपण जाणवतं. उंची पाहून तोल जावा असा अजस्त्र, बलदंड हिमालय, आणि त्याच्या तोडीस तोड जिगर असलेली सैनिकी खाक्या मिरवणारी बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन मधली माणसं यांच्यातल्या संघर्षाची ही कहाणी. हा संघर्षही वेगवेगळ्या पातळ्यांवरचा. कधी निसर्गाशी, कधी माणसांशी, कधी माणसाच्या आतल्या भावनांशी, मूल्यांशी. हे वैचारिक खटके कधी कधी हिमालय भेदणाऱ्या सुरुंगापेक्षाही स्फोटक आणि असहनीय. पहाडी इलाक्यात क्षणार्धात वातावरण बदलतं. एखाद्या निसर्गचित्रासारखी झुळझुळ वाहणारी सतलज आणि धुक्यात हरवलेली शांततेशी हितगूज करणारी हिमशिखरं, पापणी लवते न लवते तोच रौद्र रूप धारण करू शकतात, आणि इथलं निसर्गचित्रही लहरी कच्च्या ओल्या रंगाचं, कधी पुसलं जाईल आणि त्यातल्या कुठला फटकारा आयुष्याला कायमचा एक पक्का गडद गहिरा रंग देईल हे सारंच अनाकलनीय. 

अशा या हिमालयाला तासून त्यात रस्ता तयार करण्याचं काम एका तरुणाला मिळतं. हिमालयात रस्ता करणं म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे. एकतर पहाडी भागातलं उंचावरचं काम, विरळ ऑक्सिजन, कच्चा माल, यंत्र सामुग्री यांची जुळवाजुळव करायची धडपड, मिनिटभर मागे पुढे होण्याची शक्यता नसलेली कामाची सैनिकी डेडलाइन, शिवाय भूस्खलनासारखी नैसर्गिक संकटं, त्यात  नोकरी नवी, सैनिकी औपचारिकता आणि शिस्तीची ओळख नवी, हिमालय नवा, आव्हानं नवी. पण हा तरुण टिकेल हे आपल्याला जाणवतं कारण, या तरुणाचे विचारही नवे असतात, रुळलेल्या पायवाटेने जाणं त्याला अमान्य असतं. त्याला आणि त्याच्या कृतींना विचाराशी प्रामाणिक रहायला झगडावं लागतं. त्याची भोवताल पाहण्याची दृष्टीही नवी असते त्यामुळेच तो तरुण हाताखालच्या कामगारांना माणूस म्हणून पाहतो, आसपासच्या गावातील लोकांना त्यांच्या भावविश्वासकट समजून घेतो. असा हा हळवा माणूस आणि प्रसंगी निष्ठूर होणारा हिमालय आणि बॉर्डर रोडचे अधिकारी यांची ही कथा अत्यंत रंजक आहे. 

प्रभाकर पेंढारकरांनी केलेली वर्णनं वाचली की खरोखरीच शब्दन् शब्द जिवंत झाल्यासारखे वाटतात, हिमालय, सतलज, सैनिकी शिस्तीचे करारी अधिकारी, कामगार, गावकरी सारे डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहतात. रोड कन्स्ट्रक्शन सारख्या विषयावर कहाणी असली तरी कुठे अकारण क्लिष्ट तपशील देऊन लांबवली नाहीये, त्यामुळे रंजकता अबाधित राहते. हिमालयाच्या पर्वतरांगांमधील आव्हानांचा अस्सल अनुभव पेलायला हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे.

- प्रसाद साळुंखे

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

पडघवली - गो. नी. दाण्डेकर

प्रत्येक गावखेड्याला एक इतिहास असतो. काही अख्यायिका असतात. गावचं रक्षण करणारे राखणदार असतात. ग्रामदेवता असतेच पण इतरही देव असतात, मग तो एखादा जुनाट वृक्ष असेल, जलाशय असेल, किंवा नुसतं वळण असेल. गाव म्हटलं की जसं गावात राहणाऱ्या माणसांची मन राखणं आलं, तसंच या जागांबद्दल आदरभाव वा भितीभाव बाळगणं आलंच. बऱ्याचदा आपल्याला त्या त्या जागांमागची कथाही धड माहीत नसते पण पिढ्यानपिढ्या लोक श्रद्धेनं नमस्कार करत आले म्हणून आपणही या श्रद्धेचा मान राखतो. अशी कथा सांगणारं कोणी म्हातारं माणूस भेटलं तर आपण जीवाचे कान करून ऐकतो. विश्वास अविश्वास या पलीकडे त्यांना या जागांबाबत असणारा पूज्यभाव, पूर्वजांच्या पराक्रमाचा अभिमान, त्याचरोबर त्यांच्या चूकांची प्रांजळ कबूली सारं आपल्याला त्या डोळ्यात दिसतं. हेच तर गावाचं सार, हे सारं काढलं तर उरतं काय?

पडघवली ही अशाच एका दाभोळ जवळच्या कोकणी खेड्याची कथा. सुरुवात होते ते अंबावहिनीच्या लग्नाच्या गृहप्रवेशाच्या आठवणीपासून. ही खोतांची मोठी सून. लहान वय असल्यामुळे कधी माहेर कधी सासर असा तिचा खुशालचेंडू कारभार. मग ती सासऱ्यांच्या आजारपणात सासरी येते. सासरे निवर्तल्यावर सासरीच राहते, आणि हा डोलारा सांभाळायचा प्रयत्न करते. ती पडघवली बद्दल, पूर्वजांबद्दल थोरा मोठ्यांकडून ऐकते. पडघवली सारखं शांत, सुखकर, निसर्गाने नटलेलं छोटं खेडं कसं वसवलं गेलं आणि तिने पाहिलेल्या नारळी, पोफळी, कलमं आणि बागेत अखंड खेळणारं पाणी या वैभवापर्यंतचा अनेक पिढ्यांचा प्रवास याची कहाणी अंबावहिनीच्या तोंडून उलगडत जाते. भरल्या घरांचं नि ओल्या मनांचं पडघवली ती पाहते, पण पुढे याच पडघवलीच्या बदलत्या रूपाचाही ती साक्षीदार होते, प्रसंगी मूक साक्षीदार तर प्रसंगी मोठ्या खोतीणीच्या करारीपणे ठाम उभी राहून विरोधही दर्शवते. ही कादंबरी म्हणजे तिनेच सांगितलेल्या पडघवलीच्या बदलत्या रुपाची कहाणी, कारण तिची पिढीच तर असते पडघवलीच्या या बदलत्या दोन रूपांना जोडणारा दुवा.

ही फार रंजक कादंबरी आहे. फक्त २५६ पानांची असल्यामुळे कधी संपते कळत नाही. अंबावहिनीकडून आपण कथा ऐकतोय अशा शैलीत लिहिल्यामुळे कंटाळवाणी होत नाही. ही शैली फार सुंदर आहे, म्हणजे अंबुवहिनी एखाद्या पात्राचा उल्लेख करेल, आणि त्याच्यामुळे भविष्यात असं होईल याची कल्पनाही नव्हती अशा आशयाचं काहीतरी सांगेल, ज्यामुळे आपली उत्सुकता अधिक ताणली जाते. बायकांच्या मानसिकतेचा मस्त वापर कादंबरी लिहिताना केला आहे, त्यामुळे प्रसंगी आपल्याला वाटतं की आपण बायकी स्टाईलने हळू आवाजात खुसपूस करत खिदळत गॉसिप ऐकतोय, तर कधी वाटतं वहिनी खरोखरीच मनाचा हळवा कोपरा विश्वासाने उलगडून दाखवताहेत. कादंबरीचा वेग उत्तम ठेवण्यासाठी ही शैली मस्त वापरली आहे. एकाच गावातल्या माणसांच्या वेगवेगळ्या भाषा या कादंबरीत वापरल्या आहेत म्हणजे खोतांची ब्राम्हणी हेल असलेली बोली वेगळी, कुळवाड्यांची रांगडी बोली वेगळी, मुस्लिम हैदरचिच्याच्या भाषेचा लहेजा वेगळा. या भाषेतल्या वेगळेपणामुळे कादंबरीची पात्र पक्की लक्षात राहतात, आणि नाट्य चांगलं रंगतं. पात्रांचा अभ्यास करतांना कोकणी खेडेगावात दिसणाऱ्या माणसांचा अभ्यास उत्तम केला आहे, मग ते स्वार्थी गोडबोले गावगुंड असतील, गतिमंद तरुण असेल, सोशिक गृहिणी असतील, घरासाठी झटणारे कुटुंबाचा भाग असणारे घरगडी असतील, जातिभेदाचा पातळ पडदा असला तरी माणुसकीचा बंध जपणारे गावकरी असतील सारं कुठेतरी कोकणात पाहिलेलं त्यामुळे सवयीचं आपलंस वाटतं.

गाव म्हटलं की मी दोन प्रकारचे लोक पाहिलेत, एक म्हणजे गावाबद्दल भरभरून बोलणारे, दुसरे विकून टाका संपवून टाका विषय म्हणणारे व्यवहारी, पिढ्यानपिढ्या जपलेला ऋणानुबंध एका पिढीत आधुनिकतेची व्यावहारिक धार चढलेल्या कात्रीने तोडणारे. या दोघांनाही हे पुस्तक आवडेल. एकाला आपण काय जपलं, का जपलं ते कळेल, दुसऱ्याला आपण काय लोटलं ते कळेल.

पुस्तक १९५५ च आहे. त्यावेळी चित्र इतकं अंतर्मुख करणारं असेल तर आताची ती काय गत. वाडीत साताठ घरं आणि त्यातही बहुतेक म्हातारी कोतारी माणसं, २०२१ पर्यंत हे चित्र अजून भयाण होत गेलं यात शंका नाही. आता कोकण कात टाकतोय खरा पण मुख्यत्वे हमरस्ता आणि समुद्रकिनाऱ्यालगतचा. तरीही मूळ घराला सेकंड होम म्हणत हफ्ताभर यायचं आणि परक्या शहरातला सुखसोयीयुक्त फ्लॅट आपला म्हणत आयुष्यभर हफ्ते फेडत रहायचे, असा विरोधाभास सगळा. कधी कधी वाटतं ही पुस्तकं वाचणारी, त्याबद्दल भरभरून बोलणारी, लिहिणारी ही आपली शेवटची पिढी बहुतेक.

बदलत्या खेड्याचं वर्णन करणारी ही कादंबरी नक्की वाचा आणि तुमचे गावाबद्दल त्याच्या बदलत्या रुपाबद्दल, या पुस्तकाबद्दलचे अनुभव नक्की प्रतिक्रियेत लिहा.


- प्रसाद साळुंखे

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम - कविता महाजन

'ब्र' आणि 'भिन्न' वाचून आवडलं तरी माझ्या आवडत्या लेखिकेच्या या कादंबरीच्या वाट्याला जायला एवढा वेळ का लागला हे कळलं नाही. 'ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम' या कादंबरीत कविता महाजन कहाणी उलगडतात पद्मजा सप्रेची. बरीच कहाणी पद्मजा सप्रेच्या प्रथम पुरुषी निवेदनाच्या ढंगाने जाते. मग आपल्याला कळतं की पद्मजा ही सिनेमा - नाट्य क्षेत्रातली एक अभिनेत्री आहे,  व्यावसायिक नाटकं करून थोड्या अनुभवानंतर आता सिनेमातल्या दिखाऊ आईच्या वगैरे भूमिका करते. रीतसर पात्र परीचयाद्वारे पद्मजा सप्रेच्या आयुष्यातली माणसं कळतात. वाटतं पद्मजा सप्रे समजली आपल्याला. मग कादंबरीत तिने लिहिलेलं आत्मचरित्र वाचतो आपण, ज्याचं नाव 'कळसूत्र'. हो या कादंबरीत आपण पुस्तकाच्या आत पुस्तक वाचतो तेही अगदी कलात्मक मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावरच्या संक्षिप्त परिचयासकट. ही शैली मला अफलातून वाटली. तर हे 'कळसूत्र' नावाचं पद्मजा सप्रेचं आत्मवृत्त वाचून होतं, मग खात्रीशीर वाटतं आता पद्मजा पुरेपूर कळली. 

पद्मजा आईच्या मायेच्या दोन शब्दांसाठी कायम आसुसलेली राहिली. दोन लग्न आणि काही प्रियकर आयुष्यात येऊन गेले पण आयुष्याला स्थैर्य असं नाही. कदाचित मनसोक्त वाहत जाणं हा तिचा स्थायिभाव होता. हळूहळू नात्यांची एक्सपायरी डेट तिलाही कळू लागते. तिच्या आयुष्यात मर्यादेसकट आलेले सारे मर्यादित पुरुष, त्यांच्याबरोबर घालवलेल्या धुंद क्षणांची स्वप्निल वर्णनं, लैंगिक सुखाचे साक्षात्कार, वयाबरोबर बदलत चाललेली अभिरुची आणि तिची या प्रत्येक नात्याविषयीची, तिच्या भावनिक गरजांविषयीची स्पष्टता, त्याबद्दलचा दृष्टिकोन पाहतांना आपण नितीमत्ता, व्यभिचार वगैरेच्या पलीकडे जाऊन प्रेमाच्या नात्यांचा विचार करतो, कधी कधी तिच्या उत्स्फूर्त जगण्याला, वागण्याला दादही देऊन जातो. तिचं एकतरी नातं यशस्वी व्हावं असं आपल्याला मनोमन वाटू लागतं. तर एक मन म्हणतं कसलं होतंय नातं यशस्वी, बोलूनचालून फिल्मी माणसं ही, सदा चंचल, त्यांचंत्यांचं धूसर चंदेरी जग, कला, बदलणाऱ्या भूमिका, बेडगी प्रेमं, व्यसनं, लोकप्रियतेची नशा, यामुळे कल्पना आणि सत्याच्या धूसर क्षितिजावर रेंगळल्यागत आयुष्य जगणारी ही माणसं.

पात्र परिचय आणि 'कळसूत्र' वाचून आपल्या मनात कादंबरीच्या पात्रांचे चांगले आणि वाईट असे दोन गट पडतात. इथून पुढे सुरू होते खरी जादू.

आत्मचरित्र म्हटलं तर काही गोष्टी हाताच्या राखून लिहीणं आलं. स्वतःवर स्तुतिसुमनं वाहणं, काही प्रसंगात बापुडवाणं दाखवणं आलं. कित्येकदा वाटतं आत्मचरित्रा पलिकडचा सच्चा माणूस कळायला हवा. इथे ही संधी मिळते, ती पद्मजाने आत्मचरित्रात न लिहिलेल्या गोष्टी वाचून. पद्मजा कळतेय कळतेय असं वाटत असताना आपल्याला कळून चुकतं की नाण्याला दुसरी बाजू आहे, प्रत्येक जण त्याच्या जागी योग्य आहे किंवा जितका दाखवला आहे तितका वाईट नाही. पद्मजा सापडली सापडली म्हणता म्हणता ती निसटते आणि पुन्हा नव्याने भेटते, ही आहे या शैलीची जादू. प्रिझम सारखं, प्रत्येक ठिकाणाहून तोच घटनाक्रम वेगळ्या पद्धतीने पाहणं हाही जादुई अनुभव आहे.

मग म्हटलं आता आत्मचरित्र झालं, त्यात न लिहिलेल्या गोष्टी झाल्या आता पद्मजा काय करेल? सेलिब्रिटीज सारखी आयुष्याच्या उत्तरार्धात खचून व्यसनाच्या आहारी जाईल, निर्माती वगैरे बनण्याच्या नादात दिवाळखोर होईल, राजकीय पक्षात अपयश आजमावून बघेल, सारी इंडस्ट्री सोडून अध्यात्माची कास धरेल, का सौ चुहे खाकर सापडेल कोणीतरी सच्चा प्रियकर फिल्मी आयुष्याचा हॅपी एंड करायला या साऱ्या शक्यता मनात डोकावतात. आणि इथे तुमच्या कल्पनांना लेखिका सुरुंग लावते. तो नेमका काय धक्का असतो. पद्मजाचं पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी नक्की वाचा.

का कोण जाणे बऱ्याच वाचक ग्रुपस् मध्ये 'ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम' या कादंबरीविषयी फारसं काही लिहिलेलं आढळलं नाही. वाचकांनी वाचन अधिक समृध्द करण्यासाठी दर्जेदार लोकप्रिय पुस्तकांसोबत अशी वेगळ्या धाटणीची पुस्तकंही आवर्जून चाळावीत.

कादंबरीच्या तसंच पुस्तकातल्या पुस्तकाचं म्हणजे 'कळसूत्र'  च्या मुखपृष्ठावरील शुभा गोखले यांची चित्रं कादंबरीला वेगळं गहिरेपण देतात, कादंबरीत इतर ठिकाणीही शुभा गोखलेंची चित्रं दिसतात, ती रंगीत असती तर माहोल जाम भन्नाट झाला असता. म्हणून  मुखपृष्ठ म्हणजे  कादंबरीच्या अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कादंबरी मस्त पकड घेते. शैली वेगळी आहे पण अनाकलनीय नाही, त्यामुळे वाचतांना आपण भरकटत नाही. थोडी बोल्ड निश्चित आहे, पण पद्मजाचं जगणं अधोरेखित करायला ती तशी असण्याची गरज होती. एकेका पुरुष पात्राची ठराविक पानानंतर नायिकेशी शारीरिक झोंबाझोंबी इतका उथळ अर्थ कादंबरीच्या शीर्षकातून व्यक्त होण्याची शक्यता आहे, पण एक तर लेखिका कविता महाजन आहेत त्यामुळे कादंबरी दर्जा असणार यात शंका नाही आणि दुसरं कादंबरीचं शीर्षक ठकी आणि तिचे पुरुष असं न ठेवता, 'ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम' ठेवण्यामागे काही अर्थ जरूर आहे, जो आपल्याला कादंबरी वाचल्यावर नक्की सापडेल.


- प्रसाद साळुंखे

मंगळवार, १६ मार्च, २०२१

असा घडला - पं. ग. रा. सावंत

मालवणी भाषा म्हणजे कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय. या पुस्तकाच्या नावाखालीच 'मालवणी भाषेतील एक ज्वलंत सत्यकथा' असं लिहिलं आहे, त्यामुळे हे पुस्तक वाचण्याची फार उत्सुकता होती. 

ही पं. ग. रा. सावंत यांची आत्मकथा आहे, ज्यात ते त्यांच्या संघर्षाची यशोगाथा सांगतात. कणकवलीतल्या गरीब कुटुंबात लेखकाचा जन्म होतो. तिथून ते मुंबईला येऊन कसे तग धरतात याची ही सत्यकथा आहे. दारिद्र्य त्यांना आप्तस्वकीयांचे खरे चेहरे दाखवतं. मग ते गावच्या लोकांनी मोलकरणीचा लेक म्हणून हिनवणं असो, पैशाअभावी गावच्या दुकानदाराने दुकानातून शिव्या घालून हाकलून देणं असो, की मुंबईला काही पूर्वकल्पना न देता नातेवाईकांनी घरातून अपमानित करून हाकलून देणं असो. या कठीण प्रसंगातही लेखकाची देवावरची आणि मेहनतीवरची श्रद्धा ढळत नाही. याचंच फळ म्हणून की काय त्यांना कष्टाळू, सोशिक, स्वाभिमानी आणि धीट अशी सहचारिणी लाभते. हे दोघे मिळून लहान भावंडांच्या लग्नापर्यंतच्या जबाबदाऱ्या, आणि गरिबीत ओढवलेली कर्ज फेडायचा प्रयत्न करतात. हा संघर्ष वाचण्यासारखा आहे. पुस्तकाची भाषा फार अलंकारिक नसली तरी लेखकाला काय म्हणायचं ते आपल्याला कळतं. बरेचसे संवाद मालवणी भाषेत असल्यामुळे या पुस्तकातून  कोकणच्या लाल मातीचा गंध अनुभवायला मिळतो. 

जातीयवाद आजही आपल्याला जाणवतो, मग १९६५ च्या सुमारास तर चित्र किती कठीण असेल. पण लेखकाला या बाबतीत वेगळे अनुभव आलेत, लेखक पटेल समाजाचे पण त्यांना मुंबईत जाऊन नोकरीला लाव अशी विनवणी करायला आई जाते जातीने महार असलेल्या मानलेल्या भावाकडे. तोही आपल्या या भाच्याला न्यायला आनंदाने तयार होतो. नुसता सांगकाम्या किंवा जुलमाचा रामराम म्हणून नेत नाही तर सबंध प्रवासात लहान लेखकाची काळजी घेतो, त्याला चहा, जेवणखाण देतो, आणि मुंबईत आल्यावरही चड्डी, बॉडी, अंगावरचे एक जोडी कपडे, चादर लेखकाला विकत घेऊन देतो, आणि वर रुपयाचं नाणं लेखकाच्या खिशात टाकतो, सुरुवातीच्या काळात होणाऱ्या खर्चासाठी.  त्यामुळे लेखकाला या समाजाबद्दल खरोखर आदरभाव मनात आहे. हा प्रसंग वाचतांना, किंवा लेखकाला त्या काळी जे जे मदत करतात ते वाचतांना लेखकासोबत आपणही गहिवरून जातो. जगातल्या वाईटपणाचा जसा राग येतो, तसा या लेखकाच्या वाट्याला आलेल्या अपवादात्मक चांगुलपणाच्या गोष्टी आपलं मन प्रफुल्लित करतात, आणि माणसाच्या चांगुलपणावरचा विश्वास वाढतो.

गावावरून मुंबईत येणाऱ्या पहिल्या पिढीचा संघर्ष हा आताच्या पिढ्यांनी खरोखर समजून घ्यावा. खिशात दमडा नसलेल्या अवस्थेत आपण रहात असलेल्या ठिकाणापासून काही तासांच्या अंतरावर आपल्याला सोडलं तर घरी कसे परतू या विचाराने आपण पुरते कासावीस होतो. आणि ही मंडळी अशा कफल्लक अवस्थेत मुंबई गाठत, स्थिर आसरा नसे, उधार उसनवार करून मर मर कष्ट काढत, मुंबईत पुढच्या पिढीला हक्काचं राहतं घर करेपर्यंत यशस्वी वाटचाल ज्या आत्मविश्वासाने करत त्याला खरोखर सलाम. लेखकाचा संघर्ष वाचताना आपल्याला मुंबईत स्थायिक होऊ पाहणाऱ्या पहिल्या पिढीचा संघर्ष समजतो, आणि त्याबद्दल एक कृतकृत्य भाव मनात जागतो. 'हे मी मिळवलं' म्हणताना तीन पिढ्यांचा संघर्ष त्या मागे आहे याची जाणीव आपल्याला होते, अन्यथा विकासाची स्वप्न बघण्याऐवजी मूलभूत गरजांची पूर्तता करण्यातच जन्म संपला असता. 

हे पुस्तक जरूर वाचा, आणि घरातल्या थोरा मोठ्यांना ते मुंबईत स्थायिक झाले त्यावेळच्या आठवणी नक्की विचारा. अनुभव सांगताना म्हाताऱ्या डोळ्यात दैवाचं कौतुक, हसण्यात समाधान, सुरकुत्यांमध्ये संघर्ष, आणि रापलेल्या चेहऱ्यात करारी तारुण्य नक्की दिसेल. आलेले अनुभव प्रतिक्रियांमध्ये लिहायला विसरू मात्र नका.


- प्रसाद साळुंखे