राजकारण हा माझा प्रांत नव्हे असं सगळेच म्हणतात. पण काहीजणांनी साळसूदपणाचा उसना आव आणून असं काही म्हटलं की यांना अजून तिकीट कसं मिळालं नाही याचं आश्चर्य वाटतं. आपल्या आजूबाजूला अशी बरीच संधीसाधू मंडळी असतात. डोळ्यासमोर येणारा प्रत्येक नवा चेहरा यांचा नवा मदतनीस असतो. बरेचदा यांची साधी तोंडओळख यांच्या गरजेनुसार मैत्रीत बदलते. बघावं तेव्हा साखर पेरतांना दिसतात. यांच कुठल्याच गोष्टीवर ठाम मत नसतं आणि कोणाशी मतभेदही नसतात. हे कुठल्याच गोष्टीचा निषेध करीत नाहीत, बंड पुकारीत नाहीत. शांत राहून आपण किती आदर्शवत (?) आहोत हे दाखवतात. म्हणजे म्हणाल तर तटस्थ भूमिका म्हणाल तर मूक पाठिंबा. यांची मस्केबाजी मैत्री, आदर, संस्कार यांच्या वेष्टनात इतक्या बेमालूमपणे गुंडाळलेली असते की आपल्याला गुंडाळलं जातय याची शंकाच कुणाला येणार नाही. कुठल्याच गोष्टीची सरळ, मुद्देसूद चर्चा यांना मान्य नसते. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा गुंता तयार होतो. सगळे धागेदोरे माहित असूनही जाणीवपूर्वक गुंता सोडवला जात नाही. 'गुंतूनी गुंत्यात सार्या पाय यांचा मोकळा' असतो. यांचं आयुष्य म्हणजे योजनांची निव्वळ आखणी असते. यांच्यासाठी माणसं म्हणजे पायर्या ... दगडाच्या .... भावनाहीन, संवेदनाहीन. हे आपल्यासारखेच इतरांना समजतात. सगळी माणसे देवाने एकाच साच्यातून काढलीत असं यांच ठाम मत असतं. आपल्या संकुचित विचारांचा यांना अभिमान वाटतो, इतकच नव्हे तर सगळ्यांचे विचार असे असावेत असा त्यांचा अट्टाहास असतो. यांची यशाची व्याख्या म्हणजे साखर पेरण्यातील चातुर्य आणि त्या जीवावर मारलेल्या उड्या. अशी माणसं बघितल्यावर पटतं की आयुष्यात शिकण्यासारखं खूप आहे.
नमस्कार दोस्तांनो,
चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.
तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...
पुन्हा भेटूच ...
बुधवार, १० जून, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा