त्यादिवशी कितीतरी दिवसांनी वेळ काढून मरीन ड्राईव्हला गेलो. रटाळ दिनक्रम थोडा रंजक करायची लहर आली. कॅमेरा बॅगेत होताच ऑफिसमधल्या सरांच्या फेअर वेल चे फोटो काढायला घेतलेला. तीला फोन केला आणि सात वाजेपर्यंत चर्चगेट गाठण्याचं कबूल केलं.
संध्याकाळ होती आणि वातावरण ढगाळलेलं होतं. फणफणणारा वारा, उधाणलेला समुद्र आणि गच्च भरलेलं आभाळ. अशावेळी उगाचच आयुष्यातली खुसपटं काढून उगाळत बसायची बहुतेक जणांची सवय असते. पण सूर्योदयाच्या वेळी समोरचं सारं बघता बघता बदलतं. क्षणा क्षणाला समोरच्या नजार्यात आणि स्वत:च्या नजरेतही बदल होत जातात. सारं धुरकट, अस्पष्ट ... थोडं अंधुक होत जातं. तास दोन तास बसलात पण नक्की पाहिलत काय? असं कोणी विचारलं तर काहीच सांगता येणार नाही. "बसलो होतो .. मस्त वाटलं .. शांत वाटलं" असं तुटक तुटक काहीतरी सांगावं लागेल. म्हणून मी जराही वेळ न दवडता कठड्यावर बसायच्या आधीच या बदलांचे फोटो क्लिकायला सुरवात केली. या कठड्याचंही वेगळंच तंत्र. लांबच्या लांब आहे हा कठडा, माणसांनी फुललेला असतो संध्याकाळचा. या कठड्यावर समुद्राच्या दिशेने तोंड करून पाय मोकळे सोडून बसायचं आणि पाठ करायची मागच्या रस्त्याकडे, गोंगाटाकडे, घटनांकडे, दिवसांकडे, आठवड्यांकडे, महिन्यांकडे, वर्षांकडे, सार्या जगाकडे. फार प्रयत्न करावे लागत नाहीत, ह्या सलग एकसंध कठड्याने तुमच्यापुरता वेगळा भाग राखलेला असतो तुमच्यासाठी, मोठ्या मायेने. तुम्ही एकटेच असता मग कठड्यावर सगळ्यांपासून दूर. वार्याचा झोत केसांतून, चेहर्यावरून जात असतो. काहीही न बोलता मन हलकं होत असतं. दूरवरची कुठलीतरी एक लाट नजरेत पकडून ठेवावी, आणि नजरेनेच तिचा पाठलाग सुरू करावा, एका लयीत वरखाली होणार्या सळसळत्या पांढर्या फेसाळ तिने थेट डोळ्यासमोराच्या खडकाला घट्ट आलिंगन देईपर्यंत. मेडीटेशनच म्हणा ना एक प्रकारचं, पण ते डोळे बंद वगैरे करणं नाही, दिर्घ श्वास घेणं नाही की "कसलाही विचार नकोय, शांत .. हम्म ... शांत" असं मनाला कृत्रिमपणे बजावणंही नाही. पण इफेक्ट काहीसा तसाच.
सुरुवातीला इथे थोडं विचित्र वाटतं, अठरापगड जातीची माणसं बघून, प्रेमी युगुलांचे चाळे बघून, फेरीवाले, आणि मेणचट कपड्यातले भिकारी बघून, डोक्यावर हात ठेवणारे "बाबा/बेबी मा बाप का नाम रोशन करना" असं म्हणणारे छक्के बघून, पण नंतर या कठड्याचा लळा लागतोच. इतकी वाईट नसतात भोवतालची माणसं. कधी कुणी श्रीमंत तरूणी आपल्या राजबिंड्या कुत्र्याला फिरवत असते, एखादं मध्यमवर्गीय कुटुंब मोठ्या हौसेनं मरीन ड्राईव्ह बघायला आलेलं असतं, कॉलेजच्या पोराटोरांचा ग्रुप मनसोक्त बागडत असतो, कधीकधी आजी आजोबाही वॉक घेत असतात, आजोबांच्या जाड काचेच्या चष्म्यामागचं 'सुहास्य तुझे मनास मोही' माझा चष्मा चटकन टिपतो. थोडक्यात एक वेगळी संध्याकाळ अनुभवायला मिळते. थोडं मळभ असेल तर ही 'कठडा मैफल' तास दिड तास सहज रंगते. मग हळूहळू चमचमती चंदेरी रात्र या केशरीच्या कुशीत शिरु लागते, बेमालूम मिळते. मिणमिणत्या दिव्यांच्या नाजूकसा क्विन्स नेकलेस दिसू लागतो. मोठमोठ्या इमारती दिमाखात दिव्यांच्या रोषणाईचा साज लेवून समुद्राच्या थरथरणार्या आरशात आपलं प्रतिबिंब न्याहाळत, आपल्या उजव्या भुवईवरची एक अल्लड बटींची लड आपल्या चाफेकळी बोटांनी हलक्या लटक्या तोर्यात उलगडत उभ्या असतात. समुद्राच्या लाटा मंदावतात. आकाशही आवासून पाहत असतं. कुठेतरी पियानो वाजतो खरा आणि लाटांचा बॉलडान्स सुरु होतो. रात्र अधिक गडद होत जाते तसतसे नवनवे रंग मिसळत जातात. गर्दी तुरळक होत जाते शेवटी समुद्राला, रस्त्याला, आकाशाला, इमारतींना, दिव्यांना एकांत हवाच ना?
तीन किलोमीटर लांब समुद्रकिनारा असलेला हा मरीनड्राइव्हचा हा भाग जगातल्या महागड्या भागांपैकी एक आहे. इथल्या आर्ट डेको बिल्डिंगस या भागाची शोभा द्विगुणीत करतात. पारशांनी 1920 सालाच्या आसपास त्या बांधल्या आहेत आणि अमेरिकेच्या मियामी शहरानंतर इतक्या मोठ्या संख्येने आर्ट डेको बिल्डिंगस असण्याचं भाग्य या भागाला लाभतं. आणि अशा भागात माझ्यासारख्या चाकरमान्याची हक्काची जागा ... हक्काचा कठडा असण्याचं मला फार अप्रूप वाटतं.
तो चणेवाला आहे ना तिथेच कठड्यावर मी बसलो होतो. दुपारचे साडे अकरा झाले होते. या बाजूला काही काम निघालं की माझ बूड मरीन ड्राइव्हला टेकलंच समजायचं. साडे दहाचा इंटरव्हू होता. फार बेसिक प्रश्न विचारले त्यांनी ज्यांची मी धड उत्तरंही देऊ शकलो नाही. पुढच्या वेळी (?) नीट होईल सगळं असं मनाला बजावायचो. आतासा मनाला समाजावूनही वीट आला होता. "we will let you know" चा अर्थ माझ्यासाठी एकच होता. डोक्यातल्या गुंत्याप्रमाणेच टायची गाठही सुटता सुटत नव्हती. टाय जोर लावून ओढला गाठ लहान लहान होत गेली, टायचे दोन टाके तुटल्याचा कटकट असा आवाजही झाला. शेवटी वैतागून गळ्यातनं तो चुरगळलेला टाय काढून बॅगेत कोंबला. मला कॉलर नीट करायचंही भानही नव्हतं. मान आणि खांदे खाली गेलेल्या माणसाने कॉलर ताठ ठेवून चालणं फार विचित्र दिसतं. मणामणाची चार पावलं चालल्यावर कॉलर नीट केली. सगळं आतल्याआत दाबून चेहरा गर्दीतला एक करून घेतला, आणि या कठड्यावर येऊन बसलो. दुपारचे साडे अकरा वाजले होते. तो चणेवाला आहे ना तिथल्याच कठड्यावर भूतासारखा समुद्राकडे थंड नजरेने पाहत बसलो होतो. त्याने दखल घेतली नाही की विचारलंही नाही काय झालं? त्याने विचारलं नाही मग मीही सांगितलं नाही. मला हेच तर हवं होतं कोणी काही विचारू नये ना आता ना नंतर, ना इंटरव्हूबद्दल, ना नोकरीबद्दल, करियर किंवा फ्यूचर बद्दलही .. कशाबद्दलही. एक एक लाट माझ्याजवळ येऊ लागली, वारा चुचकारू लागला. "Sympathy दाखवतायत साले, गप गुमान तुमचं काम करा साल्यांनो, काय भिकेला लागणार नाहीए मी" असं काहीबाही मनातल्यामनात किंचित ओठांची थरथर करत पुटपुटलो. मात्र त्यांनी त्यांचं काम चोख केलं. माझा राग, निराशा सगळं कमी होत गेलं काही मिनिटांत. आयपॉडवर दोन एक गजल्स ऐकल्या बेफिकिरीच्या मूडमध्ये. घरी कॉल करून सांगितलं की " 'बरा गेला' नंतर कळवू म्हणतायत, दिड पर्यंत येईन जेवायला." पाकीट तपासलं. फाऊंटनला घासाघीस करून एक दोन पुस्तक घेण्याइतपत होते. निघायला हवं. त्या हरामखोरांना जाता जाता थॅंक्स म्हणालो. Sympathy दाखवत होते साले.
इथे आलं की आठवणींच्या लाटा मनाच्या दारावर आदळत राहतात, तसं दार उघडून जुनं उगाळत बसायची आपली सवय नाही :) पण लाटही किती हट्टी तेवेढ्यातल्या तेवढ्यात दाराखालच्या फटीतून येऊन हळूच पायाचे तळवे भिजवून जातेच, आता भिजलोच आहे तर येऊ देत दुसरी लाट. येण्यार्या लाटेची चाहूल जाणवतेय, पायाची बोटं लाट येण्याआधीच अंग मागे सारत हुळहुळण्याची पूर्वतयारी करताहेत, आक्रितच पाय लाटेच्या वाटेकडे डोळे लावून बसलेत जणू.