नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

आव्हान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आव्हान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ जानेवारी, २०१७

मनात माझ्या

मनात माझ्या कालवाकालव
मनात बधीर शांतता
भावनांचे .. घटनांचे धागेदोरे
विचारांचा गुंता
मनात ओरखडे
मनात पापुद्रे
मनात भेगा
मनात रेघा
असंख्य रेघा
उभ्या आडव्या तिरप्या दिशाहीन ...
मनात असंख्य रेघांचे अगणित छेदबिंदू
मनात धुळीचा राप
भितीची धाप

मोजमाप आणि शिव्याशाप ...
मनात आरशाचा फुटका तुकडा
त्यात दिसणारी देहाची लक्तरं
थरथरणारे ओठ
खपाटीचे पोट
मनात कुसकं नासकं कधीचं बरच काही
शर्टाची निर्धाराने दुमडलेली बाही
आणि हळूवार अंगाई ...
बाळा जो जो रेऽऽ
मनात स्वच्छ शुभ्र दिव्य प्रकाश ...



- प्रसाद साळुंखे 



शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०१०

आव्हान
















सूर्य माझा पाठलाग करतोय कधीचा
भांग विस्कटलाय, चेहरा रापलाय
पाठीला स्पर्श जाणवतोय ओघळणार्‍या घामाचा,
त्यांनी दिलय कधीही पूर्ण न होणारं टारगेट
आव्हान नावाचं झगझगीत लेबल लावलय त्याला
रोजीरोटी टिकवायचाच वैताग आहे साला
महिना अखेरीला पगार हवाय आव्हान पूर्ण करा
बॉसच्या तावडीतून सुटायचय आव्हान पूर्ण करा
मॅनेजर व्हायचय आव्हान पूर्ण करा
विदेशात जायचय आव्हान पूर्ण करा
अगदी श्वास घ्यायचा असेल तरी आधी आव्हान पूर्ण करा
टारगेट अचिव्ह केल्याशिवाय मरायचीही उसंत नाही
हार्बर-वेस्टर्न-सेंट्रल फिरतोय दिशा दाही

आज मोजमाप झालं सार्‍यांचं
घामाच्या .. अश्रूच्या प्रत्येक थेंबाचं, आणि लोकलच्या वार्‍यांचं
मर मर मरून टारगेट पूर्ण होता होता राहिलं
प्रत्येकाने मिळेल त्यामध्येच स्वत:चं हित पाहिलं
सहनशक्ति संपल्यावर थोडा आवाज चढा झाला
भुवया उंचावल्या, ओठ थरथरले आणि मोठ्ठा राडा झाला
आमच्या टारगेट मधून बॉसही त्याच्या नावावर काहीतरी खपवतो
साला आम्ही फुकट झक मारतो नि रक्त आटवतो
तरीही त्यांना हवी होती प्रत्येक मान खाली
माझी मात्र चीड बोलण्यातनं व्यक्त झाली
काम साधून झाल्यावर सगळ्यांदेखत लाथाडलं
नोकरी गेली वर क्रेडिटही ओरबाडलं
म्हणून इथे बसलो येऊन
हातात थंड बियर आणि डोळ्यात जळते निखारे घेऊन

एक सीप . . .

इथे कठड्यावर जाणवतोय फणफणारा वारा
कित्येक दिवसात असा निवांत बसलोच नाही
सतत कसलं तरी टेन्शन, सतत कुठे तरी पोहोचायची घाई
एक सीप

अजून दारु पिताना आठवतो आईने देवाजवळ लावलेला दिवा
अगरबत्त्यांची उद, आणि धूर
तोच धूर दिसतोय आता, .. इथे?
आता डोळे भरून रडावंसं वाटतंय ..
एक सीप

नोकरी लागली तेव्हा उड्या मारलेल्या आनंदात
त्या उड्यांचंच कर्ज झालंय जणू
नोकरी गेलेल्याकडून कर्ज फेडण्याची आशा?
एका उडीत फिटेल कर्ज आयुष्यभरचं ..
एक सीप

आईचा निरांजनाने उजळलेला चेहरा,
बाबांची आरामखूर्ची,
ताईचे कानातले, टिकल्या ..
एक सीप

केरसुणी, किचनमधले पितळेचे तीन डबे
माळ्यावरची धुळीत पडलेली बॅट
कपाटावरची फुलांची नक्षी
मोराचा पडदा ..
एक सीप

कुंडीतली सदाफुली,
घरामागचा पारिजात
मोडकी सायकल
सगळं डोळ्यासमोरून गेलं ..
आवडीच्या काही जागा, काही माणसं, काही घटना आठवून पाहिल्या
आयुष्याला काही भाग मुद्दाम वगळला या द्श्यपटलातून ..
शेवटचा जळजळीत सीप

टिन भिरकावला
कठड्यावर उभा राहिलो
काही सेकंदांसाठी गरुडाचं बळ जाणवलं पडलेल्या खांद्यांना
पण आता पूर्वीसारखी आकाशाची ओढ नव्हती
उलट समोरची खोल दरी जवळची वाटत होती
आता फक्त दरीतल्या थंड काळोखात निजायचं होतं शांतपणे
आज समजलं
आयुष्य नावाचं आव्हान संपलं ...

-प्रसाद 

बुधवार, ९ डिसेंबर, २००९

बंद मूठ







बंद मूठ घेऊन ती त्याच्या जवळ आली
'हे काय नवं?'
'काय असेल नवं? ओळख बघू?'
'कोडी घालत बसू नकोस सांगून मोकळी हो'...
आवाज चढलेला
चेहरा रडवेला
पटकन पकडतात माणसं
सॉरी ... जवळची माणसं

पण तिही मोठ्या हिमतीचीच
समजावण्याची पद्धत जगावेगळी
तिने नाही विचारलं झालंय काय?
भूतकाळ उगाळणं हा नसतो उपाय
मनात काही ठरवून ती हसत सुटली
अशा या वागण्याने स्वारी आणखीच चिडली

निमूट उठला
चालत सुटला
तिचं अस्तिव नाकारून
तिनेही दिले त्याचे सारे राग झुगारून

त्याच्या डोळ्यात थोडी थोडी दिसू लागली आग
पण हिला नव्हता उरला कुठलाच धाक

'रागावलास?
माझ्यावर की माझ्या हसण्यावर???
रागात भलताच दिसतोस गोड'
त्याचं उत्तर 'वाट सोड'

'जाता जाता मूठीत काय आहे ते तर सांग?'
'काय? काय आहे मूठीत?' वाक्यावाक्याला राग
'असं होतं माणूस रागात असेल तर
मूठभर सुखही दिसतं चिमूटभर
मूठीत माझ्या आहे
मुंगीची जिद्द जगण्यासाठी
वासराची धडपड चालण्यासाठी
अल्पायुषी फुलपाखराचं टवटवीत मन
घरट्यात साठवलेला एक एक कण
ही सगळी माणसं नाहीत त्यांना नाहीत दोन हात
म्हणून दु:ख कुरवाळत बसत नाहीत दिसरात
दिसतं का कुणी त्यातलं एकलकोंडं बसलेलं?
सगळ्यांच्यात असूनसुद्धा सगळ्यांच्यात नसलेलं?
त्यांना दु:ख असणारच पण ते सुख शोधत फिरतात
म्हणून थोडे जगले तरी ते पुरेपूर जगतात
आपण मरणाला टेकलो की वाटतं अरे जगायचं राहिलं
खूप वेळ शोक करण्यात गेला हे बघायचं राहिलं
ते पहायचं रहिलं'
त्याला पटलं चेहरा हसला थोडा
राग झाला शांत
ती शिरली त्याच्या मिठीत
पाहत बसले दोघे बूडता सूर्य निवांत

-प्रसाद