नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

फुसकूल्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
फुसकूल्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १० जानेवारी, २०१७

ती सध्या काय करते ?




















पमा - अरे ती दिसली होती

दुमा - कोण ती?

पमा - अरे ती रे ती (डोळा मिचकावत )

दुमा - आयवा काय बोलतो, ती तीच होती ? तीच ती होती ?

पमा - मला वाटलंच तू पागल होशील, हो तीच ती तीच ती, ती तीच

दुमा - ती तीच आणि तीच ती ते कळलं , आता तिचं पुढे काय ते सांग ना

पमा - सांगतो रे असा मस्तपैकी शनिवार होता, सुंदर ऊन पडलं होतं, थोडा गारवा .. थोडं ऊन. म्हटलं एक रपेट मारून येऊया. मस्त वातावरण "सुहाना सफर और ये मौसम हसी, हमे डर है हम खो ना जाए कही"  गुणगुणत ...

दुमा - एक मिनिट मला हे सगळं ऐकावं लागणार आहे का गाणं वगैरे ?

पमा - अर्थात (हसत हसत )

दुमा - माझी मानसिक तयारी नाही, तेव्हा तू टु द पॉईंट बोल, डायरेक्ट विषयाला हात घाल 

पमा - अरे पण जरा वातावरण निर्मिती 

दुमा - बोडक्याची वातावरणनिर्मिती, तू काही "सुहाना सफर" वगैरे गात नाहीस, तू ते 'अंदमान' असं लिहिलेलं फिकट झालेलं गुलाबी ढगळ टीशर्ट, आणि प्रत्येक सहलीला वापरतोस ती थ्री फोर्थ फार फार तर रविवारी  धुवायची असेल तर काल हापिसात घातलेली जीनची पॅन्ट घालून, ती बाटाची गुळगुळीत वर्षानुवर्षांची स्लीपर घालून घालून पचाक पचाक आवाज काढून पायऱ्या उतरला असशील. आणि काही रपेट बिपेट नाही "हला जागचे" म्हणत बायकोने साखर किंवा दळण टाकायला पिटाळलं असेल. तेव्हा मूळ विषय घे  

पमा - ती दिसली 

दुमा - हा पुढे 

पमा - ओळखलं म्हणजे, हसली 

दुमा - हास्यास्पदच आहेस तू त्यात तिचा काय दोष म्हणा   

पमा - ए चल मी जातो

दुमा - अरे असं काय करतो, काय दिसते, कशी दिसते, कुठे दिसली ते सांग ना दिसली हसली हे असं सांगतात का ?

पमा - मार्केटात दिसली, मी म्हणालो काय वाहिनी ओळखलंत का? लास्ट बेंचवर बसायचो तुमच्या ह्यांना खेटून, माझा अर्धा पॉकेटमनी तुमच्या खादाडीवर, फ्रेंडशिप बँडस, ग्रीटिंग्स आणि गिफ्ट्स वर जायचा. त्या आर्चिज वाल्याने माझ्याच पैशात बाजूचा गाळा विकत घेतला होतं त्या काळी.

दुमा - गप रे , तुझं ना नेहमी हे टोक नाही तर ते टोक, नीट सांग ना भाई 

पमा - मी सांगेन तसं ऐकायचं असेल तर मी सांगतो          

दुमा - ओका काय ते तुमच्या शैलीत 

पमा - आता कस्स, तर असं मस्त वातावरण , मी रपेट मारायला जातो. बंटीच्या टपरीवर डनहिल घेतली आणि मस्त झुरका घेतला "मैन जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं मै उडाता चला गया "

दुमा - परत गाणं च्यायला, आता पुढे? (रागात)

पमा - पुढे मला प्रेशर आलं

दुमा - कसलं प्रेशर ?

पमा - डनहिल ओढल्यावर मला प्रेशर येतं, नाही मला डनहिल ओढल्यावरच प्रेशर येतं, माझी संपली होती म्हणून सकाळ सकाळ बंटीकडे गेलो   

दुमा -  शी

पमा - हो आधी डनहिल, मग प्रेशर,  मग शी,  मग फ्लश ... निवांत 

दुमा - हागऱ्या फिरकी घेतोय ना माझी तू? नीट सांग दिसली होती कि नाही?

पमा - सांगतोय ना, तू मध्ये मध्ये डिस्टर्ब् केलंस तर असाच मी कुठून कुठेही जाईन    

दुमा - च्च ... बोल 

पमा - तर असा झुरके घेत उभा होतो, धुरांचे एक एक ढग हवेत सोडत, आजूबाजूला धुकं धुकं वाटत होतं. तेवढ्यात समोरून कोणीतरी येत असल्याचं मला दिसलं. ती व्यक्ती जसजशी जवळ येत होती तसतसं धुकं विरळ होत होतं. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझी पहिली होती. थोडी सुटली होती, पण अदा त्याच, मार्केटमध्ये नाकाला रुमाल लावून तिचं चालणं पाहून खात्रीच पटली तीच ती.

दुमा - ओह हो, जिगरी है भाई तू मेरा, पुढे बोल 

पमा - ती चकचकीत गेली 

दुमा - ए 

पमा - ती चक्क चक्कीत गेली, पिठाच्या

दुमा - अच्छा 

पमा - सगळं पीठ पीठ भरून राहिलं होतं, त्यात ती अधिकच गोरी दिसत होती. हाफपॅण्ट घातली होती. 

दुमा - मॉड झाली रे 

पमा - नाही, भैय्याने हाफ पॅन्ट घातलेली, खांद्यावर गमजा आणि चक्की बरोबर त्याच्या तोंडाचा पट्टा चालू होता.  मग ती तणतणत निघून गेली 

दुमा - हॅट साला, या भैयाला ना एकदा कानफटवला पाहिजे, लय बोलतो साला. आता ती  पुन्हा कधी दिसेल? 

पमा - अरे नाही ती तिथेच होती, आधीची बाई तणतणत निघून गेली तिला वाटलं भैय्याने पीठ मारलं म्हणून आता हिच्या दीड किलो दळणात भैय्या या काय मारणार डोंबल 

दुमा - ती बाई मरो, तिच्याबद्दल सांग ना ?

पमा - हो हो धीर धर, मस्त दिसत होती ती, अगदी त्या पावडरीच्या आणि साबणातल्या जाहिरातीतल्या मॉडेलसारखी फ्रेश फ्रेश. पायजमा आणि टीशर्ट, केसात चॉपस्टिक घुसडलेली, केसांना बांधायचा बॅण्ड उजव्या हातात घातलेला, अधनंमधनं फोनशी चाळा सुरु होता. रात्रीची झोप ओसरलेले तिचे नितळ डोळे, भूवयांची कोरीव कमान, पापण्यांची लाडिक उघडझाप आणि कोणाचं लक्ष नाही पाहून मध्येच तिने तोंडाचा चंबू ...

दुमा - अरे ए, अरे काय चुंबनदृश्य ऐकवतोय, तोंडाचा चंबू काय?

पमा - नाही तसं नाही तोंडाचा चंबू करून पिठाच्या चक्कीवर एक सेल्फी घेण्याचा निरागस प्रयत्न केला   

दुमा - सेल्फी वा, हिचा व्हॉट्सअप नंबर मिळवला पाहिजे

पमा - बाजूच्या  न्हाव्याला रेडिओ गाणं गुणगुणत होता 

दुमा - "चेहरा है या चांद खिला है जुल्फ घनेरी छांव है क्या, सागर जैसी आँखोंवली ये तो बता तेरा नाम है क्या"   

पमा - नाही हे नव्हतं "तुने मुझे बुलाया शेरावालिये , मैंने आया मैंने आया शेरावालिये, ओह जोता वालिये , ओह लट्टा वालिये , ओह मेहरा वालिये , तुने मुझे भुलाया शेरावालिये , मैंने आया मैंने आया शेरावालिये" हे लागलेलं मस्त 

दुमा - हे असं असतं काय कधी? हे गाणं कसं असेल ? 

पमा - त्या न्हाव्याला काय तुझं कॉलेजमधला झंगाट माहितीये, जे रेडियो ऐकवेल ते तो सगळ्या मार्केटला ऐकवायचं काम करतो बिचारा  

दुमा - आता बरी नाही करत वातावरणनिर्मिती, मघापासून थापा ठोकतोयस, डनहिल ओढतो म्हणे डनहिल, गोल्ड फ्लॅक सुपरस्टार फुंकणारे तुम्ही ते पण उधारीवर,   तरी ऐकलं ना  तुझं?  वातावरण निर्मितीसाठी खपलं  ना ?   तसं काहीतरी सिच्युएशनल बोल ना

पमा - भाई सिच्युएशनलच आहे, शेरावलीएचं गाणं का लागावं? त्या शेरावलीएचा आशीर्वाद आहे तुला मर्दा, आता सुसाट जा तू , कोजागिरीला मंडळाच्या वतीने गच्चीत गरबा घेतल्याचं पुण्य आहे रे आपल्या गाठीशी दुसरं काही नाही

दुमा - तुझं कॉउंटरी बाकी आहे कोजागिरीचं

पमा - ह्म्म्म देतो रे, कोणाचं दिलंय ते तुझं ठेवेन, तू ऐक ना, एव्हाना त्या पिठाच्या चक्कीचं व्यासपीठ झालं होत, पिठाची चक्की हा त्या  मार्केटचा केंद्रबिंदू झाला होता. ती पाच सात मिनिटं काय उभी राहिली असेल, तर चहाच्या टपरीवाल्याच्या च्या प्यायला आलेल्या गर्दीचं लक्ष तिच्याकडे, न्हाव्याच्या गिऱ्हाईकांच्या माना वस्तऱ्याला न जुमानता चक्कीच्या दिशेने वळत होत्या, सायकलवाला अस्लम गेली पंधरा मिनिटं टायर बुचकळून तिच्याकडे पाहत पंक्चर काढत होता, आता त्या टायरला मोड येतील कि काय असं झालं होतं, मॊर्निंगवोक करून आलेले जेष्ठ नागरिक वृत्तपत्राच्या आडूनआडून ते नयनसुख मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेल्या  डोळ्यात साठवत होते, येणारे जाणारे कधी नव्हे ते भैयाला "क्या कैसा हय?" वगैरे विचारपूस करून जात होते, तेवढ्यात तिचे गुलाबाच्या पाकळ्यांचे नाजूक ओठ अलगद विलग होऊन एक रेशमी ठसक्याचा आवाज बाहेर आला  "भैया हुआ क्या?"  हाय हाय तेच मार्दव. भैय्याच्या तर सर्वांगाला कंप सुटला, चक्कीच्या पट्ट्याच्या बाजूला उभा असल्यामुळे फार कोणाला जाणवला नाही इतकंच, "बस पांच मिनटं, आपहिका डाला हू" हे नेहमीचं वाक्य त्याने फेकलं, पण नेहमीची सहजता त्यात नव्हती. संधी हेरून चारपाच जण भैयाला झापून आले "रोजका है तेरा पटपट हात चलाव" वगैरे दम देऊन तिच्याकडे ओझरतं पाहत निघून गेले 

दुमा - कॉलेजलाही असंच व्हायचं, रोझ क्वीन आहे बाबा आपल्या काळातली. तशी अवतीभवती बागडणारी फुलपाखरं बरीच होती, पण म्हणतात ना फॉर्म इज टेम्पररी,  क्लास इज पर्मनंट    

पमा - मग काय, सौंदर्य  ते सौंदर्य

दुमा - किती वेळ होती उभी?

पमा - एक सात आठ मिनिटं होती, मग भैय्याने ती दळणाची पिशवी तिच्या स्वाधीन केली तिनेही वीस रुपये भैयाला टेकवले आणि दळण तोलून मापून सांभाळत ती तोल सावरत, खड्डे चुकवत चालू लागली, ती निघून गेली आणि अख्ख मार्केट चुकचुकलं, न्हाव्याकडे वेटिंगला बसलेले निषेध म्हणून दाढी न करता निघून गेले, चहाच्या टपरीवर शुकशुकाट झाला, जेष्ठ नागरिकांचे बसून बसून गुडघे अचानक दुखू लागले त्यांनीही काढता पाय घेतला, अस्लमला पंक्चर सापडलं एकदाचं

दुमा - याच एरियात राहते तर?

पमा - नाही तीन स्टॉप पुढे राहते फक्त दळण इथे टाकते 

दुमा - बरोबर  तिथे चक्की नसणार 

पमा - मूर्ख आहेस का, अरे याच एरियात राहते  

दुमा - बरं पुढचा प्लॅन सांग, आगेकूच कशी करायची ?

पमा - सिम्पल रे चक्कीवाल्याकडे जायचं आणि विचारायचं शलाका परब कुठे राहते ?

दुमा - का ?

पमा - का म्हणजे ?

दुमा - शलाका परब का विचारायचं ? तुला रोझ क्वीन ऋतुजा म्हात्रे दिसली होती ना?

पमा - नाही शलाकाच दिसली होती, तुला म्हटलं ना ती दिसली होती 

दुमा - ती ती काय मग ऋतुजा म्हात्रे  काय तो आहे का? (रागात )

पमा - अरे तुला शलाका आवडायची ना?

दुमा - आवडायच्या सगळ्याच रे पण ऋतुजा म्हात्रे खास 

पमा - खास पण हमखास नव्हती 

दुमा - थोडक्यात तू हगला आहेस, तेही डनहिल न ओढता

पमा - तू शलाका बरोबर फिरायचास ना? सगळे तुला चिडवायचेही 

दुमा - फिरायचो म्हणजे मैत्रिण होती माझी , मी दर वेळी सांगायचो तसं काही नाही, तर तुम्हाला वाटायचं मी मस्करी करतोय आणि खरंच काहीतरी लपवतोय, एवढा रोझ क्वीन, रोझ क्वीन म्हणतोय तरी त्या उसाचं चिपाड शलाकाची स्टोरी सांगत बसलास   

पमा - आपली आपली प्रत्येकाला रोझ क्वीनचं वाटते मला वाटलं तसंच असेल तुझंही

दुमा - नशीब अजून काही घोळ नाही घातलेत 

पमा - घोळ वरून आठवलं, ऋतुजाने एकदा मला विचारलेलं तुझ्याबद्दल 

दुमा - म्हणजे?

पमा - म्हणजे हेच जनरल तुझ्या आवडी-निवडी, तुझं कोणी आहे का वगैरे ?

दुमा - म्हणजे तिला माझ्याशी? माझ्यावर ? आय न्यू इट. पण हिंमत का नाही केली वेडीने

पमा - कारण मी सांगितलं 

दुमा - काय ?

पमा - कि मला वाटलं कि यु अँड शलाका आर सिंग इच अदर  

दुमा - काय? 

पमा - मला तेव्हा तसं वाटायचं 

दुमा - शलाकात नि तिच्यात, विस्तव का जायचा  नाही, याचं वास्तव आता समोर येतंय.  मला तेव्हा का नाही सांगितलं हे    

पमा - सांगणार होतो तो पर्यंत महेश आणि ती क्लोज आले होते

दुमा - महेश कुठनं आला मध्ये ?    

पमा - तिला तुझं कळलं नि तिचं भांडण झालं शलाकाशी, मग ती शांत राहायला लागली, मग महेश नि मी तिला चियर अप करायला जायचो, महेशने डाव साधला. मग पुढे पुढे तो एकटाच तिला चियर अप करायला जायला लागला   

दुमा - धन्यवाद माझ्या पहिल्या वहिल्या प्रेमप्रकरणात माझ्या प्रिय मित्राने अशी महत्वाची भूमिका बजावली तर, मंडळ आभारी आहे

पमा - सोड ना तुझं काय वाईट झालं, वहिनी बँकेत चांगल्या पोस्टवर आहेत, जेवणही रुचकर बनवतात अजून काय हवं 

दुमा - ती सध्या काय करत असेल रे? 

पमा - काही तुझ्या आठवणींनी हळवी वगैरे होतं नसेल, तिला तिची कामं आहेत आणि तुला तुझी. वहिनींनी येताना  दळणाचा डबा चक्कीतुंन आणायला सांगितलाय, नाहीतर त्या काय करतील याचा नेम नाही 

दुमा - बरी आठवण केलीस ती सध्या तेल लावत जावो, सध्या मला दळण नेणं महत्वाचं, जातो लगेच नाहीतर पाच मिनिटात फोन घुरघुरेल. तू भेट सवडीने संध्याकाळी हिशेब करायचाय जरा तुझा.

शनिवार, २८ जुलै, २०१२

फर्स्टक्लास पमा






दुमा: तर पम्या सगळं लक्षात आहे

पमा: होय दुमा आज ट्रेनमध्ये 'दुमा'कूळ .. आपलं धुमाकूळ घालू

दुमा: धुमाकूळ? अजिबात नाही आज तुझा फर्स्टक्लासचा पहिला दिवस, आज मी तुला ट्रेन मधल्या फर्स्टक्लास प्रवासाची ओळख करून देईन, ट्रेन यायला अवकाश आहे, चालायचेच, राजाने मारले आणि ट्रेन लेट झाली तर तक्रार कोणाकडे करायची (पमा मख्ख) इथे हसणं अपेक्षित आहे, आजच्या पुरता मी तुझा शिक्षक आहे, आणि शिक्षकाच्या आणि बॉसच्या विनोदाला नेहमी हसून दाद द्यावी, जोक किती पानचट असला तरी, कळला नसेल तरीही टिपेच्या स्वरात हसायचं

पमा: हॅहॅहॅहेहेहे (मोठ्याने तोंडाचा आ वासून विचित्र पद्धतीने हसतो)

दुमा: ए ए ए अरे (आजूबाजूला बघून) अरे नय म्येरे सात नय हय .. अरे फर्स्टक्लास जवळ उभा आहेस जरा सुसंस्कृतपणे हसत जा की, बरं सांग आता पर्यंत आपण काय शिकलो?

पमा: सॉरी हा तूच म्हणालास टिपेच्या स्वरात आणि लोच्या मारला मी, तू मला आतापर्यंत बरच काही शिकवलंस, म्हणजे तिकीट खिडकीसमोर लोक रांगेत उभे असताना उसन्या आत्मविश्वासाने खिडकीसमोर जायचं, रांग लावायची नसते आपणं, मग पाठच्या गर्दीकडे शूद्र लुक द्यायचा, पाकीटातून हजारची करकरीत नोट काढायची, मन डगमगू द्यायचं नाही पास काढायचा हे पक्क झालंय ना? कंफर्टसाठी तीन पट दिले तर काय बिघडतं, दिर्घ श्वास हम्म्म ओके वगैरे ..., "फर्स्टक्लास सीसटी पर्यंत किती होतात ओ? मग डॉकयार्डपर्यंत? अच्छा चिंचपोकळीपर्यंत? बरं टू वे किती होतात?" असे निरर्थक प्रश्न विचारायचे आणि आधी ठरवलेला घर टू ऑफीस पास घ्यायचा, मग पासची ऑफीसमध्ये फुकटात झेरॉक्स काढायची आणि आणि त्वरित रिईम्बर्समेंटसाठी रिसेप्शनिस्ट मेरीला द्यायची, मेरी एखाच्या चुकल्या शुक्रवारी सुरकुत्यांचा गुलाबी टॉप घालते तेव्हा कसली दिसते ... गुड मॉर्निंग म्हणावं तर तिनेचं तिच्या तोंडाच्या चंबूतून निघालेल्या गुडमॉर्निंगने खरचं मोहरून जातो मी, वाटतं आता नोकरी सोडावी फिक्ड डिपोसिट तोडावं पीफ खरवडावा आणि हिला घेऊन गोव्याला टुमदार घरात ...

दुमा: अरे ए, काय शिकवलं तेवढं सांग म्हटलं तर तिकीटकाऊंटर वरून मेरीला उचलून थेट गोव्याला?

पमा: हेही कालचं शिकवलंस की

दुमा: तेवढं बरोबर लक्षात राहिलं? आधी फर्स्टक्लास झेपवा, मग पाहू मेरी झेपतेय का? ती बघ ट्रेन आलीच, घाई करू नको घाई नको अरे धक्का

पमा: दबाव दबाव ओ जा की आत किती जागा पडलीस बघतो काय असा ए?

दुमा: काय? काय करतोयस? सोड ना

पमा: अरे सु ... सु .. सुटली हीही गेली? साला जरा आत जातो तर आणि जागाही होती माहितीय

दुमा: फर्स्टक्लास आहे रे असं धक्का देऊ देऊन चढत नाहीत लोक, आणि आतले खेटूनच उभे राहतात असं करणं म्हणजे पैसा वसूल करणं वाटतं त्यांना, तीन पट पैसे देऊन कंफर्ट मिळाला नाही तर काय फायदा नाही का?

पमा: मग आपल्या कंफर्टचं काय? चार ट्रेन सोडल्या आपण इतक्यात कुर्ल्यापर्यंत पोहोचलो असतो

दुमा: जा मग जा सेकंड क्लासने जा (रागात)

पमा: रागावतो काय असा? बरं तू म्हणशील तसं .. आता सुसंस्कृतपणा सोडूयात की ट्रेन सोडूयात सुसंस्कृतपणे?

दुमा: मिळेल रे धीर धर, चल चल चल एक्सुज मी .. थॅंक्स बॉस (सुसंस्कृत पद्धतीने ट्रेनमध्ये चढतात)

पमा: मिळाली बाबा एकदाची, नोकरी मिळाल्यावरही एवढा खूष झालो नव्हतो जितका आज होतोय

दुमा: फर्स्टक्लासचा अनुभवच वेगळा असतो रे, ती चेंगराचेंगरी नाही घामाचा वास नाही

पमा: का? फर्स्टक्लासमधल्या लोकांच्या केसातून काखेतून अत्तराचे पाट फुटतात की काय गरम व्हायला लागल्यावर?

दुमा: तसं नाही रे, पण पफ्यूम्स वगैरे मारून येतात महागडी शर्ट वगैरे व्यवस्थित धुतलेले डिसेंट असतात रे लोक

पमा: आपण आत जाऊया का?

दुमा: नको इकडे असं दोन सीट्सच्या मध्ये उभे राहत नाही लोक

पम: ओहो कंफर्ट नाही का? लक्षात नाही माझ्या? च्यामायला या कंफर्टच्या? (तोंडात पुटपुटत)

दुमा: काय?

पमा: काही नाही राहूया की इथेच राहूया उभे (पमा खुणेने काहीतरी विचारायचा प्रयत्न करतो)

दुमा: काही विचारायचंय का?

पमा: (हळू आवाजात) ए अरे तो माणूस आपल्याकडे असा काय बघतोय? बायकांनी एखादीची नवी साडी वरूनखालून पाठूनपुढून न्याहाळावी तसा?

दुमा: (हसून) ते होय, अरे ह्याला फेमस फर्स्टक्लास लुक म्हणतात, म्हणजे इथे प्रत्येकाला वाटतं की त्याच्याजवळच तिकीट आहे आणि बाकीच्यांजवळ नाहीए

पमा: मग आपल्याकडे नाहीच आहे तिकीट (अख्खा डबा त्यांचाकडे 'कुठून कुठून येतात?' असा बघतो)

दुमा: कशाला लाज आणतोयस? पास आहे ना?

पमा: हा हा आहे आहे आहे पास आहे म्हणजे तेच ना तिकीट नाहीए ना?

दुमा: चल जागा झाली बसून बोलूया (लाजिरवाण्या प्रसंगातून हुशारीने काढता पाय घेत)

पमा: इथे चार सहज मावतील नाही? उगाच उभे राहिलो इतका वेळ?

दुमा: इथे फोर्थसीट बसत नाहीत

पमा: अं ... कंफर्ट?

दुमा: हो .. तेच

पमा: बरं मघाचंसारखं कोणी न्याहाळत असेल तर काय करायचं?

दुमा: ते अर्धच राहिलं नाही का? असं कोणी न्याहाळायला लागलं की तुझ्या खिशातला ब्लॅकबेरी बाहेर काढायचा, किंवा आयपॉडच्या हेडफोनशी उगाचच चाळा करायचा?

पमा: आणि असले प्रकार तुमच्याजवळ नसतील तर?

दुमा: तर सरळ बॅगेतनं इकोनॉमिक टाईम्स काढायचा

पमा: का?

दुमा: त्यांना पुरावा मिळाल्याशी कारण, त्यांना वाटलं पाहिजे की तू फर्स्टक्लासच्या लायकीचा आहेस

पमा: का चेहर्‍यावरून वाटत नाही?

दुमा: कदाचित

पमा: पुढच्यावेळी पासंच दाखविन त्याला?

दुमा: हा कपाळावर चिटकवून घे एक कॉपी, अरे तो काय टीसी आहे का पास दाखवायला?

पमा: मग तिकीट आहे की नाही याची त्याला काय पडलीय?

दुमा: स्वभाव असतो एकेकाचा, आपण वेगळे आहोत, आपला वरचा दर्जा आहे, सगळ्यांना फर्स्टक्लास परवडत नाही असा काहीतरी गैरसमज असतो त्यांचा

पमा: पण इथे साधे लोकही आहेत की सगळे कुठे टिपटॉप आहेत

दुमा: तेच ते कंपनी पास देते म्हणून येतात असा त्यांचा समज

पमा: शी म्हणजे स्वत्:चं डोकं प्रवासभर पोखरायचं आणि दुसर्‍यालाही न्याहाळत राहून अनकन्फर्टेबल करायचं

दुमा: सोड ना, पेपर वाचणार?

पमा: नको पेट्रोल म्हणा गॅस म्हणा काहीतरी वाढलेलं असेल, किंवा कुठला तरी मोठा घोटाळा असेल संध्याकाळी वाचेन निवांत उगाच दिवसाची सुरुवात आणखी खराब नको

दुमा: आणखी खराब म्हणजे?

पमा: सोड आता कुर्ला येईल उतरायचयं आपल्याला (कुर्ला येतं आणि पमा दुमा उतरतात)

दुमा: श्या किती गर्दी आहे नाही

पमा: गर्दीतली माणसं आपण गर्दी किती वेळ स्वत्:पासून दूर ठेवणार नाही का? म्हणजे बघ आत मारे आपण फर्स्टक्लासवाले, की पॅसेजमध्ये उभं रहायचं नाही, फोर्थसीट बसायचं नाही, पण उतरतो स्टेशनवरच ना? प्लॅटफोर्म एकच ब्रीज एकच, नुसतं आपलं मनाचं समाधान की प्रवास कंफर्टेवल झाला का तर बॅगेत प्लॅस्टिकचा कव्हरात जपून ठेवलेला फर्स्टक्लासचा पास आहे म्हणून


दुमा: बरं ऑफिसला जायचंय ना का इथेच उभा रहाणारेस? संध्याकाळी भेटू फर्स्टक्लासजवळ

पमा: नाही मी नाही येऊ शकत मी सेकंडक्लासनेच जाईन बाबा, मिळाला तेवढा कंफर्ट पुरे

दुमा: मर साल्या गर्दीतच मर

पमा: परफ्यूम, लॅपटॉप्स टॅबलेट यांच्यासोबतच्या प्रवासापेक्षा गर्दीतली घुसमट परवडली, दारावर कोणीतरी लटकलं आहे म्हणून आत भांडण करणारे आम्ही, 'हमको क्या पडी है?' ऍटिट्यूड पटतही नाही आणि पचतही नाही, एकमेकांना सांभाळून घेत प्रवास करतो आम्ही, हो भांडणं होतात ना अगदी तोंडी लावायला शिव्याही असतात कधीकधी, पण खेळीमेळीच्या वातावरणात सारं खपून जातं, कधी चिवड्याचं पाकीट उघडतं, कधी वाफाळत्या भज्यांची मेजवानी, कधी बुवांचं भजन, कधी दहावी-बारावीच्या निकालाचा पेढा तोंडात पडतो, म्हणूनच आमच्याकडे आयपॉड नाही की टॅबलेटस् नाहीत, गप्पाच इतक्या रंगतात की स्टेशन कधी येत कळत नाही, तीन च्या जागी चार बसतात शिवाय दोन बाजूने दोघांना मांडीवर घ्यायची तयारी, काय करू मला माझा कंफर्ट तिथेच गवसतो .. म्हणजे तो प्रवासाचा अनुभवच फर्स्टक्लास आहे यार

दुमा: ठिक आहे यार जशी तुझी मर्जी मी उगाचच तुला भरीला घातलं, पण मी फर्स्टक्लासनेच जाईन .. हा हवाबदल म्हणून करत जाईन डबाबदल अधूनमधून, चल चल यार उशिर होतोय, (दोघेही पादचारी पुलावर चढण्याच्या तयारीत, पुलाच्या पायर्‍यांवर बरीच गर्दी चेंगराचेंगरी) चलं ना भाय पाठी नको बघू, दे धक्का च्यामारी ह्यांच्या, ब्रीज चढतोय का @# *$>% ए

पमा: अब आया औकाद पे (दोघेही हसतात)


शनिवार, २३ ऑक्टोबर, २०१०

'खो'च्या आयचा घो

सर्वप्रथम अपर्णाने दिलेला खो मी गांभीर्याने घेतल्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो (मला हायपर लिंकही जमतं, पण कशाला उगाच एखाद्याचे हिट्स वाढवा.) कुठला खो? अहो तो नाही का इ.स.पू.1245 साली दिलेला, हसू नका तारखेचे पुरावे आहेत माझ्याकडे. त्यांना पुरा इकडे बघा काय तोडलेत आम्ही.

भाषांतराचा हा खो म्हणजे माझ्या ब्लॉगची गोगलगाय दौड रोखायचा एक कट होता (आरोपी अपर्णा हाजीर हो) माझ्या भाषांतराची कुर्‍हाड कोणत्या दुर्दैवी कविवर कोसळतेय याची मलाही उत्सुकता होती. पण सगळे सुखरूप आहेत. तरी एक कविता कचाट्यात सापडलीच. ही जॉनी जॉनी लहानपनी तुमच्यातल्या बर्‍याच कोनी कोनी ऐकली असेलच? म्हणूनच मुद्दाम मूळ कविता मी पोस्ट करत नाही.

लहानपणी जॉनी जॉनी ऐकताना वाटायचं यांचा बाप जाम शॉलेट हाये. खोड्या पचवायची सहनशक्ती हल्लीच्या पालकांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त दिसते. असो तर ही कविता आपल्याइथे काही घरांत कशी झाली असती ते मांडायचा मी प्रयत्न केलाय. आता पुरेशा प्रमाणात बडबड झालेली आहे, पण थांबा इतक्यात जांभई देऊ नका भाषांतर संपायला अवकाश आहे राखून ठेवा शेवटच्या कडव्यापर्यंत.


मराठी जॉनी जॉनी:
गणू गणू


गणू गणू
हो बाबा

साखर खाल्लीस?
नाय बाबा

खोटं बोलतोस?
नाय बाबा

उघड पाहू तोंड
आ आ आ
गधड्या शिंच्या रांडेच्या या वयात ही थेरं
.... (बाबा गणूचं मारून मारून गोणपाट करतात)

गणू !! गणू?
ऊं बाबा

... सुजलास का रे?
उ .. उ .. ब .. भ्म्हाSSSSSSSSSSSSSSऽ :(

- साद

रविवार, ३१ जानेवारी, २०१०

रिंग रॉंग रिंग

पमा - पहिला माणूस आणि दुमा - दुसरा माणूस यांच्यातला एक काल्पनिक संवाद

रविवार दुपार.
बोंबिल, जौला, मांदेलीचं सार भात खाऊन कोचावर बडिशेप चघळत झोपायच्या तयारीत पमा. तेवढ्यात फोन वाजतो. रिंग रॉंग रिंग रॉंग (रॉंग नंबरची रिंग अशी वाजते)
आळसावलेल्या अंगाने पमा फोन उचलतो.


पमा - हॅलो (ऐकणार्‍याला हॅलो ऐकल्याक्षणीच जांभई यावी असा हॅलो)
दुमा - हॅलो (विरुद्ध टोकाचा उत्साही हॅलो)
पमा - हॅलो (काही न सुचल्यामुळे म्हटलेलं हॅलो)
दुमा - हॅलो? (पहिला हॅलो ऐकू गेला नसेल किंव मघाचचा पलिकडून आलेला हॅलो हा भास असावा असं समजून केलेला, थोडक्यात confused hello)
पमा - हा हा हॅलो पुढे बोला (त्रासिक आवाजात)
दुमा - करपे आहेत का?
पमा - कुठला नंबर हवाय?
दुमा - नंबर नकोय करपे हवेत.
पमा - इथे करपे राहत नाही
दुमा - म्हणजे?
पमा - काय म्हणजे? मराठी कळत नाही का? करपे नय हय घरपे
दुमा - मी त्यांचा मित्र बोलतोय घाटकोपरहून ... ते अं पेस्ट कंट्रोलचं थोडं काम होतं ... त्यांनीच नंबर दिलाय, केर ऑफ नंबर दिलाय .. तर तुम्ही करपेंना बोलवाल का प्लीज?
पमा - अरे कोण करपे? (चढलेल्या आवाजात, प्लीजचा उपयोग शून्य)
दुमा - सदानंद करपे शिडशीडीत काळसावळेशे आहेत
पमा - तुम्ही कुठला नंबर फिरवलाय?
दुमा - मी मोबाईलवरून बोलतोय.
पमा - नाही नाही नंबर कुठला फिरवलात विचारलं?
दुमा - अहो तेच सांगतोय मोबाईलवर नंबर फिरवतात की दाबतात?
पमा - बरं कुठला नंबर दाबून माझं फिरवताय
दुमा - काय?
पमा - अरे नंबर कुठला दाबलास (आवाज शेवटला फाटतो सूफी गायकांसारखा)
दुमा - तुम्हाला तुमचा नंबर नाही माहिती मोबाईल एक दहा आकडी असतो, घरचा तरी पाठ हवा .. (शांतता) हॅलो?
पमा - झालं तुमचं? तुम्ही कुठला नंबर फिरव.. दाबलात ते सांगा मग मी तो चूकीचा की बरोबर ते सांगेन
दुमा - अरे वा नंबर चूकीचा म्हणणारे तुम्ही कोण? आणि करप्यांसारखा देव माणूस चूकीचा नंबर देईलच का?
पमा - अरे चू ..
दुमा - ओ
पमा - अरे चूक नंबर लिहून घेतांनाही होऊ शकते चूकीचं ऐकून, अपूर्ण ऐकून? आता केलंत तसं?
दुमा - पण त्यांनी कगदावर लिहून दिलाय
पमा - तुम्ही आणि करपे काय ते बघून घ्या, मी फोन ठेवतोय (वैतागून पमा फोन आपटतो)

(दुसर्‍या मिनिटाला परत फोन वाजतो)

पमा - हॅलो
दुमा - हॅलो
पमा - हं बोला
दुमा - सदानंद करप्यांशी थोडं ...
पमा - (दुमाचं वाक्य मध्येच कापत) अहो परत तुम्ही मलाच फोन केलात
दुमा - मी काय हौसेनं फोन करायला वर्गमैत्रिण आहे का तुमची? मला दिला तोच लावतोय माझी काय चूक?
पमा - मग माझी तरी काय चूक? कोण कुठला तो सदानंद करपे का ढरपे ..
दुमा - नाही नाही ढरपे नाही करपेच
पमा - कोणी का असेना तो तिकडे दुपारचा छान तंगड्या पसरुन झोपला असेल, आणि फुकटचा आम्हाला त्रास
दुमा - एवढे का वैतागताहात इनकमिंगला पैसे नसतात ना?
पमा - म्हणूनच फुकटचा त्रास म्हणालो ना? करपे इकडे नाहीत कळलय??? पक्क करून घ्या .. हा नंबर फिरवायचा
दुमा - मोबाईल आहे
पमा - दाबायचा नाही
दुमा - हॅलोहॅलोहॅलो ... हॅलो?
पमा - बोला (कंटाळवाण्या स्वरात)
दुमा - जरा नंबर तपासूयात का? दोन सात सहा
पमा - दोन सात सहा हा पुढे बोला
दुमा - दोन सात सहा दिड
पमा - दिड?
दुमा - दिड लीटर आहे, तीन पिशव्या फ्रिजमध्ये आहेत, नको आणूस अजिबात .. हॅलो सॉरी हं जरा .. हा दोन सात सहा तीन पाच दोन
पमा - पुढे?
दुमा - नकोय लवकर ये .. हा सॉरी बोला
पमा - नंबर सांगत होतात, पुढे सांगा
दुमा - कुठे होतो?
पमा - शेवटी दोन .. दोनच्या पुढे?
दुमा - दोनच्या पुढे सात, सातच्या पुढे सहा, सहानंतर पाच, पाच? नाही नाही पाच कसं असेल? पाच तीन नंतर आहे, त्याआधी सहानंतर तीन आहे.
पमा - अहो अहो दोन सात सहा तीन पाच दोन सात सहा तीन एवढा मोठा नंबर?
दुमा - माफ करा पुन्हा सांगू का? दोनच्या पुढे सात, त्याच्यानंतर सहा, सहानंतर पाच
पमा - राहूदेत
दुमा - राहूदेत कसं? दोनशे शहात्तर
पमा - तुम्ही शांत रहाल का प्लीज? मी माझा नंबर विसरेन
दुमा - तात्पुरता लिहून ठेवा बाजूला मग निवांत तपासून सांगा, मी करतो हवं तर पाच मिनिटांनी
पमा - तेवढं करू नका काय ते आत्ताच मिटवा .. तुम्ही असं का नाही करत?
दुमा - कसं?
पमा - करप्यांना उद्या भेटून पुन्हा नंबर घ्या?
दुमा - शक्य नाही, त्यांनी पेस्टकंट्रोलच्या कामासाठी सुट्टी घेतलीय, आज अक्चूली मी घर पहाणार होतो
पमा - मग पत्ता असेल ना तुमच्याजवळ?
दुमा - पत्ता आहेच ओ पण वेळ हवा ना?
पमा - म्हणजे घर पहायला वेळ नाहीये का तुम्हाला?
दुमा - नाही वेळ आहे पण दुपारचं असं लोकाच्या घरी जाणं प्रशस्त वाटतं नाही ना? तेवढी त्यांच्या सोईची वेळ विचारली असती फोन करून
पमा - केवढी काळजी
दुमा - नाही ओ नोकरदार माणसं, रविवरची एक सुट्टी, त्यात नेमकं दुपारचं आपण जा बरोबर वाटत नाही ना?
पमा - मग तिच काळजी थोडी आमच्याही बाबतीतही दाखवलीत तर
दुमा - मी काय आमंत्रणं धाडली होती का माझ्याशी बोला म्हणून?
पमा - एक मिनिट .. फोन तुम्हीच केला होतात
दुमा - मग उचललात का?
पमा - उचललात का म्हणजे? वाजू द्यायचा होता का? माझा फोन मी तो उचलेन, आपटेन, फिरवेन, दाबेन, जाळेन, बुडवेन काहीही करेन तुला काय करायचय त्याच्याशी?
दुमा - ही तुमची बोलायची पद्धत
पमा - रॉंग नंबरशी बोलायची पद्धतच नाहीये आमच्यात, एवढं बोललो ते नशिब समजा
दुमा - करप्यांना भेटून मी सांगणार आहे, चूकीचे नंबर देता तर निदान सुसंस्कृत आणि सुशिक्षित चूकीच्या माणसांचे नंबर देत चला
पमा - तेही चूकीचेच मागा, तुम्हाला बरोबर नंबर कोणी मागूनही देत नाही का? करप्याचा नंबर मिळाला तर आधी मला दे साल्याला रविवारी अडीज-तीनलाच फोन करतो.
दुमा - तुम्हीही पेस्ट कंट्रोलवाले?
पमा - असतो तर माझ्या डोक्याचं आधी केलं असतं, निदान माझ्या डोक्याला अशा मुंग्या आल्या नसत्या, ठेवा आता फोन (पमा फोन आपटतो)



संध्याकाळच्या सुमारास पमाचा फोन पुन्हा खणखणतो रिंग रॉंग रिंग रॉंग रिंग रॉंग रिंग रॉंग

पमा - हॅलो
दुमा - मी जाधव
पमा - कोण जाधव का? हा हा जाधव ... अं .. कोण जाधव?
दुमा - मघाशी दुपारी फोन केलेला?
पमा - करप्यांचा जाधव? अहो करपे नाहीयेत इकडे तुम्ही का अंत पहाताय?
दुमा - नीच माणूस
पमा - काय?
दुमा - करपे एकदम नीच माणूस, रेट काढला आणि काम दुसर्‍याला दिलं, झालेला व्यवहार ..
पमा - नंबर मिळाला म्हणजे बरोबर?
दुमा - नाही घरीच गेलो त्याच्या, काम चालू होतं पाहिलं डोळ्यांनी, हे परप्रांतीय लोक ..
पमा - इथे फोन करण्याचं प्रयोजन?
दुमा - नाही जरा त्रास दिल्याबद्दल
पमा - असू दे चालायचच
दुमा - सॉरीबिरी अजिबात म्हणणार नाही नंबर चूकीचा दिला त्यात माझी काय चूक? तुम्ही ते मुंग्यांचं काहीतरी बोलत होतात?
पमा - डोक्याच्या मुंग्यांचं ते त्रास, वैताग अशा अर्थी
दुमा - डोक्यात मुंग्या? काहीतरीच काय उवा असतील?
पमा - तुम्हाला कधी रॉंग नंबर आलाय का ओ?
दुमा - नाही
पमा - तुमचा नंबर द्या मला, मी रेल्वेच्या डब्यात ज्यूली, स्वीटी खाली तुमचा नंबर लिहून रॉंग नंबरची सोय करेन, मग तुम्ही ठरवा डोक्याला येतात त्या मुंग्या का उवा ते? Useless (फोन आपटतो)