नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

वादळ वारा झुळूक फुंकर


एक वादळ थांबलं
आणि बातमी वार्‍यासारखी पसरली  
कित्येक उसासे हुंकार हवेत शांत विरून गेले

एक वादळ थांबलं 
पालापाचोळा लांब चेहरा करून पडून राहिला
गतिहीन दवाचा गहिरा बोजडपणा उरी घेऊन

एक वादळ थांबलं 
आणि खिडक्या अस्तित्वहीन झाल्या 
आता कसलीच आदळाआपट होत नाही

एक वादळ थांबलं 
आणि झुळुक ही हळवी झाली 
फुंकर विरून गेली थरथरणार्‍या ओठांत

एक वादळ थांबलं
त्या वादळाचं आत्मचरित्र कोणी धरून बसलं 
न फडफडणार्‍या निर्जीव पानांत वादळ बंदिस्त करण्याचा वेडा अट्टाहास

एक वादळ थांबलं 
त्याला आता खूप दिवस झाले 
तरी वादळाचे भास अवतीभोवती घोंघावत असतात

एक वादळ थांबलं 
कोणाला त्याचा विशेष फरक पडला नाही
कुठेतरी दूरवर कुणीतरी आतून समूळ हललं एवढं मात्र खरं 

एक वादळ थांबलं 
मग पुन्हा सुरू झालं वादळ .. आठवणींचं 
उरली उगाचची ओली घुसमट 

एक वादळ थांबलं
आणि ते थांबणारच होतं कधीतरी
पण इतक्यात उद्ध्वस्त व्हायची तयारी नव्हती मनाची

एक वादळ थांबलं
तोच सुरु झाला एका वायुहीन पोकळीतला अगम्य प्रवास 


प्रसाद साळुंखे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा