नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०१४

वाघ्या आणि बघ्या






लोक आरडाओरडा करत होते
जीवावर बेतणारा प्रत्येक सेकंद शूट करत होते
वाघ बिचारा पेन्शनर माणसासारखा शांत
त्याने पाहुण्याला चाचपडलं
लोकांनी दगड भिरकावले
वाघ संभ्रमित
तरी शांत पाहत बसला
एव्हाना लोकांचा आवाज वाढला
लाठ्याकाठ्यांचे आवाज घुमू लागले
'हा अशा माणसांचा प्रतिनिधी असेल तर  आपल्याला नक्की गोत्यात आणणार'
वाघाने धोका ओळखून
निमिषार्धात विषय संपवला
सारं काही रॉयल
आपण आपला  भिकारचोटपणा जागृत ठेवत  त्या चित्रफिती दिवसभर पाठवत बसलो
उत्साहाने
उसासे टाकत
कल्पनाशक्तीला ऊत देत
तरी बरं वाघाचा 'बाईट' प्रसारमाध्यमांना मिळाला नाही
वाघाने वाघपण जपल्याचं वाईट काय वाटायचं
माणसांची माणूसकी हरवल्याला जमाना झाला आहे
ईश्वर मृतात्म्यास शांति आणि इतरांना सदबुद्धि देवो


 - प्रसाद साळुंखे  

६ टिप्पण्या:

  1. अगदी बरोब....वाघाची बाजू किमान काहिनातर समजते हे बघून बर वाटल.

    उत्तर द्याहटवा