नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शनिवार, २८ जुलै, २०१२

फर्स्टक्लास पमा


दुमा: तर पम्या सगळं लक्षात आहे

पमा: होय दुमा आज ट्रेनमध्ये 'दुमा'कूळ .. आपलं धुमाकूळ घालू

दुमा: धुमाकूळ? अजिबात नाही आज तुझा फर्स्टक्लासचा पहिला दिवस, आज मी तुला ट्रेन मधल्या फर्स्टक्लास प्रवासाची ओळख करून देईन, ट्रेन यायला अवकाश आहे, चालायचेच, राजाने मारले आणि ट्रेन लेट झाली तर तक्रार कोणाकडे करायची (पमा मख्ख) इथे हसणं अपेक्षित आहे, आजच्या पुरता मी तुझा शिक्षक आहे, आणि शिक्षकाच्या आणि बॉसच्या विनोदाला नेहमी हसून दाद द्यावी, जोक किती पानचट असला तरी, कळला नसेल तरीही टिपेच्या स्वरात हसायचं

पमा: हॅहॅहॅहेहेहे (मोठ्याने तोंडाचा आ वासून विचित्र पद्धतीने हसतो)

दुमा: ए ए ए अरे (आजूबाजूला बघून) अरे नय म्येरे सात नय हय .. अरे फर्स्टक्लास जवळ उभा आहेस जरा सुसंस्कृतपणे हसत जा की, बरं सांग आता पर्यंत आपण काय शिकलो?

पमा: सॉरी हा तूच म्हणालास टिपेच्या स्वरात आणि लोच्या मारला मी, तू मला आतापर्यंत बरच काही शिकवलंस, म्हणजे तिकीट खिडकीसमोर लोक रांगेत उभे असताना उसन्या आत्मविश्वासाने खिडकीसमोर जायचं, रांग लावायची नसते आपणं, मग पाठच्या गर्दीकडे शूद्र लुक द्यायचा, पाकीटातून हजारची करकरीत नोट काढायची, मन डगमगू द्यायचं नाही पास काढायचा हे पक्क झालंय ना? कंफर्टसाठी तीन पट दिले तर काय बिघडतं, दिर्घ श्वास हम्म्म ओके वगैरे ..., "फर्स्टक्लास सीसटी पर्यंत किती होतात ओ? मग डॉकयार्डपर्यंत? अच्छा चिंचपोकळीपर्यंत? बरं टू वे किती होतात?" असे निरर्थक प्रश्न विचारायचे आणि आधी ठरवलेला घर टू ऑफीस पास घ्यायचा, मग पासची ऑफीसमध्ये फुकटात झेरॉक्स काढायची आणि आणि त्वरित रिईम्बर्समेंटसाठी रिसेप्शनिस्ट मेरीला द्यायची, मेरी एखाच्या चुकल्या शुक्रवारी सुरकुत्यांचा गुलाबी टॉप घालते तेव्हा कसली दिसते ... गुड मॉर्निंग म्हणावं तर तिनेचं तिच्या तोंडाच्या चंबूतून निघालेल्या गुडमॉर्निंगने खरचं मोहरून जातो मी, वाटतं आता नोकरी सोडावी फिक्ड डिपोसिट तोडावं पीफ खरवडावा आणि हिला घेऊन गोव्याला टुमदार घरात ...

दुमा: अरे ए, काय शिकवलं तेवढं सांग म्हटलं तर तिकीटकाऊंटर वरून मेरीला उचलून थेट गोव्याला?

पमा: हेही कालचं शिकवलंस की

दुमा: तेवढं बरोबर लक्षात राहिलं? आधी फर्स्टक्लास झेपवा, मग पाहू मेरी झेपतेय का? ती बघ ट्रेन आलीच, घाई करू नको घाई नको अरे धक्का

पमा: दबाव दबाव ओ जा की आत किती जागा पडलीस बघतो काय असा ए?

दुमा: काय? काय करतोयस? सोड ना

पमा: अरे सु ... सु .. सुटली हीही गेली? साला जरा आत जातो तर आणि जागाही होती माहितीय

दुमा: फर्स्टक्लास आहे रे असं धक्का देऊ देऊन चढत नाहीत लोक, आणि आतले खेटूनच उभे राहतात असं करणं म्हणजे पैसा वसूल करणं वाटतं त्यांना, तीन पट पैसे देऊन कंफर्ट मिळाला नाही तर काय फायदा नाही का?

पमा: मग आपल्या कंफर्टचं काय? चार ट्रेन सोडल्या आपण इतक्यात कुर्ल्यापर्यंत पोहोचलो असतो

दुमा: जा मग जा सेकंड क्लासने जा (रागात)

पमा: रागावतो काय असा? बरं तू म्हणशील तसं .. आता सुसंस्कृतपणा सोडूयात की ट्रेन सोडूयात सुसंस्कृतपणे?

दुमा: मिळेल रे धीर धर, चल चल चल एक्सुज मी .. थॅंक्स बॉस (सुसंस्कृत पद्धतीने ट्रेनमध्ये चढतात)

पमा: मिळाली बाबा एकदाची, नोकरी मिळाल्यावरही एवढा खूष झालो नव्हतो जितका आज होतोय

दुमा: फर्स्टक्लासचा अनुभवच वेगळा असतो रे, ती चेंगराचेंगरी नाही घामाचा वास नाही

पमा: का? फर्स्टक्लासमधल्या लोकांच्या केसातून काखेतून अत्तराचे पाट फुटतात की काय गरम व्हायला लागल्यावर?

दुमा: तसं नाही रे, पण पफ्यूम्स वगैरे मारून येतात महागडी शर्ट वगैरे व्यवस्थित धुतलेले डिसेंट असतात रे लोक

पमा: आपण आत जाऊया का?

दुमा: नको इकडे असं दोन सीट्सच्या मध्ये उभे राहत नाही लोक

पम: ओहो कंफर्ट नाही का? लक्षात नाही माझ्या? च्यामायला या कंफर्टच्या? (तोंडात पुटपुटत)

दुमा: काय?

पमा: काही नाही राहूया की इथेच राहूया उभे (पमा खुणेने काहीतरी विचारायचा प्रयत्न करतो)

दुमा: काही विचारायचंय का?

पमा: (हळू आवाजात) ए अरे तो माणूस आपल्याकडे असा काय बघतोय? बायकांनी एखादीची नवी साडी वरूनखालून पाठूनपुढून न्याहाळावी तसा?

दुमा: (हसून) ते होय, अरे ह्याला फेमस फर्स्टक्लास लुक म्हणतात, म्हणजे इथे प्रत्येकाला वाटतं की त्याच्याजवळच तिकीट आहे आणि बाकीच्यांजवळ नाहीए

पमा: मग आपल्याकडे नाहीच आहे तिकीट (अख्खा डबा त्यांचाकडे 'कुठून कुठून येतात?' असा बघतो)

दुमा: कशाला लाज आणतोयस? पास आहे ना?

पमा: हा हा आहे आहे आहे पास आहे म्हणजे तेच ना तिकीट नाहीए ना?

दुमा: चल जागा झाली बसून बोलूया (लाजिरवाण्या प्रसंगातून हुशारीने काढता पाय घेत)

पमा: इथे चार सहज मावतील नाही? उगाच उभे राहिलो इतका वेळ?

दुमा: इथे फोर्थसीट बसत नाहीत

पमा: अं ... कंफर्ट?

दुमा: हो .. तेच

पमा: बरं मघाचंसारखं कोणी न्याहाळत असेल तर काय करायचं?

दुमा: ते अर्धच राहिलं नाही का? असं कोणी न्याहाळायला लागलं की तुझ्या खिशातला ब्लॅकबेरी बाहेर काढायचा, किंवा आयपॉडच्या हेडफोनशी उगाचच चाळा करायचा?

पमा: आणि असले प्रकार तुमच्याजवळ नसतील तर?

दुमा: तर सरळ बॅगेतनं इकोनॉमिक टाईम्स काढायचा

पमा: का?

दुमा: त्यांना पुरावा मिळाल्याशी कारण, त्यांना वाटलं पाहिजे की तू फर्स्टक्लासच्या लायकीचा आहेस

पमा: का चेहर्‍यावरून वाटत नाही?

दुमा: कदाचित

पमा: पुढच्यावेळी पासंच दाखविन त्याला?

दुमा: हा कपाळावर चिटकवून घे एक कॉपी, अरे तो काय टीसी आहे का पास दाखवायला?

पमा: मग तिकीट आहे की नाही याची त्याला काय पडलीय?

दुमा: स्वभाव असतो एकेकाचा, आपण वेगळे आहोत, आपला वरचा दर्जा आहे, सगळ्यांना फर्स्टक्लास परवडत नाही असा काहीतरी गैरसमज असतो त्यांचा

पमा: पण इथे साधे लोकही आहेत की सगळे कुठे टिपटॉप आहेत

दुमा: तेच ते कंपनी पास देते म्हणून येतात असा त्यांचा समज

पमा: शी म्हणजे स्वत्:चं डोकं प्रवासभर पोखरायचं आणि दुसर्‍यालाही न्याहाळत राहून अनकन्फर्टेबल करायचं

दुमा: सोड ना, पेपर वाचणार?

पमा: नको पेट्रोल म्हणा गॅस म्हणा काहीतरी वाढलेलं असेल, किंवा कुठला तरी मोठा घोटाळा असेल संध्याकाळी वाचेन निवांत उगाच दिवसाची सुरुवात आणखी खराब नको

दुमा: आणखी खराब म्हणजे?

पमा: सोड आता कुर्ला येईल उतरायचयं आपल्याला (कुर्ला येतं आणि पमा दुमा उतरतात)

दुमा: श्या किती गर्दी आहे नाही

पमा: गर्दीतली माणसं आपण गर्दी किती वेळ स्वत्:पासून दूर ठेवणार नाही का? म्हणजे बघ आत मारे आपण फर्स्टक्लासवाले, की पॅसेजमध्ये उभं रहायचं नाही, फोर्थसीट बसायचं नाही, पण उतरतो स्टेशनवरच ना? प्लॅटफोर्म एकच ब्रीज एकच, नुसतं आपलं मनाचं समाधान की प्रवास कंफर्टेवल झाला का तर बॅगेत प्लॅस्टिकचा कव्हरात जपून ठेवलेला फर्स्टक्लासचा पास आहे म्हणून


दुमा: बरं ऑफिसला जायचंय ना का इथेच उभा रहाणारेस? संध्याकाळी भेटू फर्स्टक्लासजवळ

पमा: नाही मी नाही येऊ शकत मी सेकंडक्लासनेच जाईन बाबा, मिळाला तेवढा कंफर्ट पुरे

दुमा: मर साल्या गर्दीतच मर

पमा: परफ्यूम, लॅपटॉप्स टॅबलेट यांच्यासोबतच्या प्रवासापेक्षा गर्दीतली घुसमट परवडली, दारावर कोणीतरी लटकलं आहे म्हणून आत भांडण करणारे आम्ही, 'हमको क्या पडी है?' ऍटिट्यूड पटतही नाही आणि पचतही नाही, एकमेकांना सांभाळून घेत प्रवास करतो आम्ही, हो भांडणं होतात ना अगदी तोंडी लावायला शिव्याही असतात कधीकधी, पण खेळीमेळीच्या वातावरणात सारं खपून जातं, कधी चिवड्याचं पाकीट उघडतं, कधी वाफाळत्या भज्यांची मेजवानी, कधी बुवांचं भजन, कधी दहावी-बारावीच्या निकालाचा पेढा तोंडात पडतो, म्हणूनच आमच्याकडे आयपॉड नाही की टॅबलेटस् नाहीत, गप्पाच इतक्या रंगतात की स्टेशन कधी येत कळत नाही, तीन च्या जागी चार बसतात शिवाय दोन बाजूने दोघांना मांडीवर घ्यायची तयारी, काय करू मला माझा कंफर्ट तिथेच गवसतो .. म्हणजे तो प्रवासाचा अनुभवच फर्स्टक्लास आहे यार

दुमा: ठिक आहे यार जशी तुझी मर्जी मी उगाचच तुला भरीला घातलं, पण मी फर्स्टक्लासनेच जाईन .. हा हवाबदल म्हणून करत जाईन डबाबदल अधूनमधून, चल चल यार उशिर होतोय, (दोघेही पादचारी पुलावर चढण्याच्या तयारीत, पुलाच्या पायर्‍यांवर बरीच गर्दी चेंगराचेंगरी) चलं ना भाय पाठी नको बघू, दे धक्का च्यामारी ह्यांच्या, ब्रीज चढतोय का @# *$>% ए

पमा: अब आया औकाद पे (दोघेही हसतात)


८ टिप्पण्या:

 1. हाहाहा.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या !

  उत्तर द्याहटवा
 2. सहीच... गड्या आपला सेकंड क्लास बरा. नेहमीप्रमाणे मस्त लिहिलंयस.

  आणि हो जरा वारंवारता वाढव रे पोस्टची :) :)

  उत्तर द्याहटवा
 3. @ सुहास, हो यार निदान सकाळच्या वेळेत तरी सेकंडक्लासच बरा वाटतो, डबेही जास्त असतात .. आणि लोक आत घुसतातही चुपचाप मिजास दाखवत नाहीत, वारंवारता? ते काय असतं? हाहाहा :) काळजी नसावी लिहित राहिन :)

  उत्तर द्याहटवा