नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

रविवार, १९ जुलै, २००९

मॅडम

जमेल गंजलेल्या गजांचा घ्यायला आधार?
जमेल खंगलेल्या देहाचा मांडायला बाजार?
रोज कोणी नवा येईल
कधी शेठजी
कधी मजूर
कुणी अट्ट्ल बेवडा
कुणी नुकताच मिसरूड फुटलेला पोर अंगठ्याएवढा
छत न्याहाळत पडून रहायचं
वखवख संपेपर्यंत अंगावर घ्यायचं
बोटं फिरू द्यायची
वेळ सरू द्यायची
गिर्‍हाईक म्हणेल ते करावं लागेल
कारण भूक भागली तरच भूक भागेल
मॅडम म्हणते safe sex चं महत्त्व असल्या बाजारू बायकांना समजावं लागतं
पण या सगळ्या नादापायी गिर्‍हाईकही गमवावं लागतं
बिछान्याखाली सरकवलेली तान्हुली जेव्हा टाहो फोडते
तेव्हा सगळी सगळी बंधनं मी स्वतःहून तोडते
परिस्थितीशी सौदा करून निमूट घेते माघार
धावते पुन्हा घ्यायला गंजलेल्या गजांचा आधार
तुमची संघटना, तुमचं चकचकीत ऑफीस
आणि या आमच्यासारख्यांच्या बकाल वस्त्या
दोन-चार फोटो काढाल
कचर्‍याच्या ढिगाचे,
गटाराचे,
तुंबलेल्या संडासाचे,
गर्दुल्ल्या माणसांचे,
लुतभर्‍या कुत्र्यांचे,
उगड्यानागड्या पोरांचे,
फार फार तर सहानभुतीपर लेख
चहाबरोबर तोंडी लावायला,
गाळात उतरून साफसफाई करशील?
रुतलेल्या एकेकीचा हात खंबीर धरशील?
सुटेल का सगळ्यांच्या आयुष्याचा तिढा?
उचलशील का खर्‍याखुर्‍या समाजसेवेचा विडा?
बोलशील ते ऐकू
म्हणशील ते पटेल
पण तुला हे जमेल ? ..
पण तुला हे जमेल ? ...
मॅडम थांबा निघालात कुठे ??

-प्रसाद 

१२ टिप्पण्या:

 1. गिर्‍हाईक म्हणेल ते करावं लागेल
  कारण भूक भागली तरच भूक भागेल

  टोकदार परिस्थितीवर टोकदार भाष्य!

  उत्तर द्याहटवा
 2. चुरापाव चाखल्याबद्दल आणि दाद दिल्याबद्दल धन्यवाद
  मनात भिती होती कविता अश्लिलतेकडे झुकेल की काय
  पण तुमची दाद वाचून धीर आला

  उत्तर द्याहटवा
 3. चुरापाव,
  अश्लीलतेमागे आशय असेल तर अश्लीलता डाचत नाही.
  अर्थात्‌, हे अवघडही तितकंच आहे!

  उत्तर द्याहटवा
 4. नमस्कार आल्हाद,
  खरय तुमचं, म्हणजे फक्त तो मागे दडलेला आशय शोधणारी नजर हवी. पण तुमच्यासारखे वाचक असताना मला बाकीच्या वर्णनात मूळ आशय न पोहोचण्याची भिती बाळगण्याचं काहीच कारण दिसत नाहीए. पुन्हा एकदा धन्यवाद एक नवा विचार दिल्याबद्दल.

  उत्तर द्याहटवा
 5. मला ही कविता कुठेही अश्लील वाटली नाही. नाहीच आहे मुळात तर वाटावीच का? सत्य परिस्थिती वर भाष्य करणारी आणि डोळ्यात सणसणीत अंजन घालणारी अशी एक जबरदस्त कविता. मानत कुठेतरी खोलवर एक विचार सोडून गेली...

  उत्तर द्याहटवा
 6. धन्यवाद रोहनजी,
  कविता प्रकाशित करतांना अगदी सुरुवातीला मनात भिती होती, आता कविता तिच्या आशयासकट नीट पोहोचतेय म्हणून आनंद झाला. धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 7. अरे तू रोहन'जी' काय लावले आहेस ??? मी 'जी' इतका मोठा नाही आणि मोठा करू पण नकोस रे बाबा. उगाच वय वाढल्यासारखे होते... :D

  उत्तर द्याहटवा
 8. ठीक आहे रोहनजी, तुम्हाला दुखवायचा हेतू नाहीए रोहनजी.

  उत्तर द्याहटवा
 9. प्रसाद, तुझ्या दमदार लिखाणातली मला भावलेली अजून एक कविता

  उत्तर द्याहटवा