एकटं म्हणजे वैताग, कंटाळवाणं असं काही नसतं. चुकीच्या संकल्पना आहेत त्या. मी खरेदीला सुद्धा एकटा जातो. खरेदीचेही खूप किस्से आहेत. कॉलेजच्या काळात दुर्दैवाने (त्याच्या) माझ्याबरोबर दिवाळीच्या खरेदीला आलेल्या मित्राला मी असा तोंडघशी पाडलेला की त्याने आजतागायत खरेदी हा शब्द माझ्यासमोर काढला नाही. घ्यायचं काय तर एक टी शर्ट. मला पसंतच येईना कुठला. आलाच पसंत तर मापाचा मिळेना. सुरूवातीला तो "चल सोड दुसरीकडे पाहू" असा उत्साही. नंतर नंतर "ते काय वाईट होतं" "तुला नक्की घ्यायचं नं" " पुढच्या आठवड्यात येऊया यार साडेदहा वाजले घड्याळ्यात" असा कुरकुरायला लागला. तीन तास फिरून स्टेशनच्या मेन मार्केटपासून बर्याच लांब शेवटी माझ्या पसंतीचं टी शर्ट मिळालं. ते मी बरीच वर्ष वापरलं. माझं आवडतं टी शर्ट होतं ते. अजूनही आहे खणात. नायलॉनचं असल्याने त्याचं पायपुसणं झालं नाही. काय एक एक नशिब घेऊन येतं टी शर्ट.
जरा मध्ये मध्ये विषयाचं नाव वाचायला लागतं. काय आमची नाव एकदम भरधाव वहावत जाते कुठेही भरकटते. लोकांच्या सहनशक्तीचा वेळीअवेळी अंत पाहून लोककल्याणास्तव मी एकटं खरेदीला जायला लागलो. लागते कशाला सोबत मला कळत नाही. एकटं जावं मस्त खरेदीला पसंत पडेल ते पसंत पडेल तिथनं उचलावं "हे?" "इथनं!!" असं खवचटपणे विचारणारं कुणी नसतं. किंवा "हे घे" "मी तिथनंच घेतो" "FS ला अर्ध्यात पडला असता सेम" असे सल्ले देणारं कुणी नसतं. होतं काय की सोबतचा तशी मदतच करत असतो पण कधी कधी त्याने बाजूला शॉर्टलिस्ट केलेले तीन चार आपण शॉर्टलिस्टलेले चार पाच यातनं नेमकं काय निवडावंचा पुरता गोंधळ उडतो मग राहू दे तिच्याआयला मग कधी तरी घेऊ म्हणायची वेळ येते. ही दिव्य पार करूनही काही निवडलत तरी होणार्या समाधानाची कधी कधी काशी होते, म्हणजे "एश है बाबा, शौक बडी चीझ है" "मोठ्या बापाचा" "प्याकेज किती भेटतो" " तुमच्या त्या जागेचं भाडं किती येतं?" असलं काही कॅश काउंटरच्या रांगेत ऐकावं लागत नाही. तुम्हालाही "कॉर्पोरेट डिसकाउंट मिलेगा ना यही के ग्रूप का एम्प्लोई हय मय" "फटेगा तो ? निस्ता मुंडी मत हलवो वापस लेके आयेंगा काय समजलास?" "मग काय फायदा दोन घेऊन" "लाश्टका फायनल बोलो" "साले थोडा तो कम कर रिक्षा का छुटे" "इतनाही है जेब चेक कर" असं काहीही बोलून घासाघीस करायला काहीही वाटत नाही. मागे वुडलॅंड च्या शोरूम मध्ये मी "अरे ओरिजिनल है ना?" असं विचारलं होतं.
माझी हापिसातली मैत्रिण म्हणाली की मोठमोठे लेखक लोक गप्पिष्ट असतात. त्यांना संवादाची भूक असते. त्यातून त्यांना कॅरेक्टर्स मिळत जातात. मी म्हटलं पहिली गोष्ट मी लेखक वगैरे नाही हौशी ब्लॉगर आहे फक्त (ओर ये लगा सिक्सर.) आणि आपापल्या श्टायली असतात गो. एक अब्ज़र्वर राहूनही कॅरेक्टर्स मिळतात. मी तर म्हणतो एक वेळ बोलून इतका खुलणार नाही माणूस जितका गाफील असतांना खुलतो. म्हणून इज्जतवाडीमध्ये मुलाखत वगैरे घेतली तर डिप्लोमॅटिक बोलणारे स्टिंग ऑपरेशनात असते दृष्ट लागण्यासारखे खुलतात.
प्रवासाचंच बघा. एकटं दुकटं प्रवास करावा फोर्थ सीट पदरात पडायचे चान्सेस असतात. मस्त पुस्तक काढून वाचा, गाणी ऐका, हिरवळ पहा, नाक कान साफ करा, भांग पाडा. सुहाना सफर ओर ये मोसम हसी ( मुंबईत आहे यंदा, ४ करोडला पडला … असो ) तर अगदी मनासारखा प्रवास करा. नाही तर सोबत असतं कुणीतरी सीट रिकामी झाली की "तू बस नाही ओके तू बस, बस रे" असं बसवाबसवी खेळता खेळता तिसराच तंगडं स्ट्रेच करून घुसून बसतो. किंवा "तो पक्का नीच आहे, जाम डोक्यात गेला माझ्या " "यावेळेचं अप्रेज़ल बोंबलणार बघ" "मी तर सरळ केलं त्याला , सरळ सांगितलं बरोबर ना? तू बोल तुला काय वाटतं बोल " काय घंटा बोल, तू तुझी इतकी लाल का करतो? आत्मचरित्र लिही ना सरळ 'स्वघोषित - लालबादशहा' 'सरळकर' वगैरे नावाचं मला का पकवतो? एक तर हा पंखा चालत नाही तरी स्टेशन गणिक कोणीतरी त्याच्या पात्यात पेंनच घाल, फणीच घाल, पिन, कागदी सुरनळी, विज़िटिंग कार्ड सगळं घालून मला धुळीचा अभिषेक घालतो, आणि हॅ हॅ करत दात काढत मलाच "बंद है क्या?" विचारत खात्री करून घेतात. त्यात या सोबत्याचं "ते सोड मी काय म्हणतो बर नाही केलं तेव्हा म … " सुरूच. अरे क्व्याय. ऑफिस पॉलिटिक्स वगैरे कशाही वरून या रोतलूंचा डोक्याला निस्ता शॉट. सकाळचं एकवेळ ठीक आहे. पण संध्याकाळी हपिसचं रटाळ काम संपवून घरी एक कप चहापर्यंत पोहोचेपर्यंत एकटं सोडावं माणसाला. मी एकटा नसतो. अपना एक पंटर है. तो ऑफीस डिस्कशन नाही करत प्रवासात. आम्ही मक्याचे दाणे खात माफक टिंगलटवाळ्या करत प्रवास करतो. पण कधी कधी पंटरचापण कंटाळा येतो. कधी कधी स्वत:चापण.
क्रमश: