विचारांची कारंजी उसळतात
शब्द शाई फासून स्वैर पळतात
प्रत्येक शब्दात जादू दडते
प्रत्येक ओळ चपखल पडते
पण काही तरी अडतं बुवा
बाकी असतं सगळं फाईन
श्या !! but what about next line???
अरे ये ना नेमक्या कुठल्या कुठल्या कोपर्यात शिरलायस?
मन डोकं खणून खणून दमलो अजून किती खोल रुतलायस?
आयला खरच असा अडून राहिलास तर मी पुरता थकून जाईन
हाड !! कागदाचे बोळे ... कपाळाला आट्या
god knows what about next line?
हो मघाशीच काहीतरी सुचलं होतं नेमकं तेव्हा फोन वाजला
अडलेला शब्दाची मिजास वाढली मग तो भलताच माजला
कानातोंडात अडकून पेन आता पाठ खाजवायला धावलं
पेनानेच पाठ दाखवली जेवढं लिहिलं तेवढं व्हावलं
आणखी किती वेळ हा आता असे नखरे दाखवत राहिल?
यार now what? nothing? then what about next line?
शब्द थोडे पुढे मागे घेऊन बघूयात काही जमतं का?
थोडासा ब्रेक घेऊन बघूयात वादळ थांबतं का?
घ्या पेनाचं टोपणही तुटावं?!! अजून किती वेळ जागा राहिन?
काय चाललंय काय? what about next line?
मिजासखोर अडून राहतात मग झोपायला उशिर होतो,
परिणामी रुमाल विसरतो,ट्रेन सुटते ..
आणि बॉसच्या बोलण्याने कान बधिर होतो
सुचला की मग कविता पुन्हा वाचाविशी वाटते
मनाच्या केबिनवर टकटक करून चक्क ऑफीसातही उभी ठाकते
ते डोळ्यातलं हसू, खुललेला चेहरा गैरसमज पसरवतात
लोकांचे कटाक्ष उगाचचं फुकटच्या पाकट लाजवतात
हे वेड जणू आता आयुष्यभर असंच छळत राहिलं
सारं एका प्रश्नापायी what about next line?
आहा!! शाब्बास बरा सापडलास, सुचलं बाबा पेन कुठंय?
कागदाचं चिटोरं? ते .. अ .. तिकडे? उडालं बहुतेक
रद्दी तपासली ..
वह्या चाळल्या ..
तात्पुरतं या औषधाच्या बिलावर लिहूयात,
बाकी कवितेचं चिटोरं काय आजउद्यात मिळून जाईलं
नाही मिळालं तर?
तर काय हाच प्रश्न कायम की what about next line?
-प्रसाद