ती रात्र आठवतेय क्षुल्लक कारणाने झोपमोड साली
जेव्हा चौथ्या माळ्यावरचा म्हातारा गेला
चाळीतल्या मुलांचा उत्साह दांडगा अशा बाबतीत
वेळ मोडणार बुर्जीपाव चापून यावा शिस्तीत
तयारी मसणघाईच्या जोशात सुरु
मावा,सिगरेटची देवाणघेवाण लोक लागले करु
"म्हातार्यान नेमका रविवार पकडलान"
"पनवेलहून कोणी नातेवाईक येताहेत फोन केलेला"
"एऽऽ अमितची शलाका वर्हांड्यात दिसत नाय रे"
"#$%^*नो हसू नका जोरात तात्या बघताहेत"
"पुढचा नंबर रम्याच्या बापाचा काय राहिलं नाही तब्येतीत"
"छे ते अख्ख्या चाळीला खांदा देतील"
"बापाने बांधलेली अशी आण इकडे"
काम, गप्पा, टिंगलटवाळी सारं काही रंगात होतं
असलं इव्हेंट मॅनेजमेंट प्रत्येकाच्या पक्कं भिनलं अंगात होतं
रडण्याच्या आवाज अचानक वाढायचा
रडगाण्याला नवा कोरस लाभायचा
अनुभवी कार्यकर्ते समजून जायचे
त्यांचे अंदाज बरेचदा खरे व्हायचे
पहा वर्षानुवर्षे न फिरकलेल्या भावाच्या ह्रदयाला पडलीय भेग
ही तर दिर्घ आजारपणातही न फिरकलेली बिझी बापडी शोकाकूल लेक
किळस वाटते, कठीण होतं रोजचं हगणंमुतणं काढणं
त्यापेक्षा हे बरं आपल्या सोईने हंबरडा फोडणं, आणि गळे काढणं
मध्यरात्र उलटली तरी कोणीतरी नातेवाईक यायचाच असतो
आणि कितीही नको म्हटलं तरी सिगरेट, तंबाखू, चा घ्यायचाच असतो
हारांच्या ऑर्डरीचं निमित्त वेळेला येत धावून
मग प्रत्येक टोळकं बाहेर पडत एकच निमित्त घेऊन
आंघोळ पांघोळ घालून पहाटे एकदाची कवटी फुटते
म्हातार्याला लाखोल्या वाहून कार्यकर्त्यांची जत्रा उठते
बिझी लेक सकाळीच ऑफिस गाठते
भावाभावांची तेराव्यालाच घरावरून जुंपते
हारापाठच्या फ्रेममधला म्हातारा खदाखदा हसतो,
म्हणतो एवढं मनोरंजन झालंच नसतं जर आज मी जिवंत असतो
-प्रसाद