नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २ जुलै, २०२०

हद्दपार - श्री. ना. पेंडसे

श्री. ना. पेंडसे यांची ' हद्दपार' ही कादंबरी वाचली. लेखक प्रस्तावनेत म्हणतात आमच्या मास्तरांच्या विद्यार्थ्यांत बऱ्यापैकी लेखनकला असलेला मीच; यामुळे प्रस्तुत कथेच्या लेखनाची जबाबदारी माझ्यावर आली. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे मास्तरांचा जीवनप्रवास या कादंबरीतून हळूहळू उलगडत जातो. 

या मास्तरांच्या पूर्वजांनी त्यांच्या काळात पराक्रम केलेला, आणि त्यामुळे गावात त्या घराण्याला मानमरातब होता, वचक होता, श्रीमंती होती. अशा घराण्यात मास्तरांचा जन्म झाला, पण त्यांची जन्मपत्रिका पाहून सारे चक्रावले. हा कूळ बुडविल, शुद्रपणे अर्थार्जन करील, आणि मुख्य म्हणजे घराण्याचा निर्वंश करील असं चमत्कारिक त्यांच्या पत्रिकेत होतं. खरं तर लेकाने शानशौकिने इनामदारी करावी नि सुखासीन आयुष्य जगावं असं मास्तरांच्या वडिलांना वाटत राहिलं. पण मास्तर कुणब्यांच्या पोरांत मिसळून खेळले, नंतर मास्तरकीची इतरांदेखी शूद्र नोकरी धरली, इतकेच काय आंतरजातीय विवाह सुद्धा केला. 

वडील गेल्यानंतर काही दिवसांतच हा श्रीमंतीचा मुलामा वरवरचा आहे हे मास्तरांना कळलं, कर्जाचा डोंगर वाढला होता, परिस्थिती बेताची बनली होती. नोकरीमुळे ते कसाबसा तग धरून होते. मास्तरांना वडिलांना अपेक्षित राजेपण वठवणं जमलं नसलं तरी त्यांनी आपली नोकरी प्रामाणिकपणे केली. त्यांचा आपल्या विद्यार्थ्यांवर फार जीव. त्यांनी अर्थार्जन दुय्यम मानलं, पैसे कमावण्यापेक्षा माणसं कमावली. यशस्वी विद्यार्थी घडवले. एक वेगळा आदर गावात मिळवला. गाव म्हटल्यावर होतं ते जातीपातीचं राजकारण त्यांच्या वाट्यालाही आलं. प्रसंगी बायकोचे बोचरे बोल त्यांना परिस्थितीमुळे ऐकावे लागले. पण विद्यार्थ्यांच्या प्रगतीत ते सुख मानू लागले, कष्ट आणि दारिद्र्य भोगलेल्या आयुष्याला तेवढं एक समाधान पुरेसं होतं.

१९५० साली कादंबरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. पण यातलं शेवटचं प्रकरण दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी काढून टाकलं. अशी कबुली श्री. ना. पेंडसे प्रस्तावनेत देतात. ते शेवटचं प्रकरण काय असावं याची उत्सुकता मनाला लागते. वाचकांपैकी कोणाकडे मूळ आवृत्ती आणि शेवटचे प्रकरण असल्यास मला नक्की कळवा. अन्यथा ही कादंबरी राजेमास्तर दुर्गेश्र्वराला अखेरचं वंदन करतात इथे संपते अशी मी नाईलाजाने कशीबशी समजूत करून घेईन.

बाकी ही कादंबरी वाचताना आपल्या आवडत्या शिक्षकांची आठवण आल्याखेरीज राहत नाही. नक्की वाचावी अशी ही कादंबरी

- प्रसाद साळुंखे

रविवार, ३१ मे, २०२०

'जागते रहो' १९५६



"जागते रहो" अशी आरोळी पूर्वी रात्रीच्या वेळी दिली जायची. लोकांनी भुरट्या चोरांपासून सतर्क रहावं यासाठी. पण चोराची नेमकी व्याख्या काय? आणि लोक समाजातल्या सगळ्याच चोरांवर दंडुका उगरतात की केवळ प्रतिकाराची अपेक्षा कमी असलेल्यावर दमदाटी, मारहाण करणं सोपं जातं. नेमके हेच विचार आले 'जागते रहो' हा सिनेमा पाहून.

कथा-पटकथा-दिग्दर्शन शंभू मित्रा, अमित मित्रा या जोडगोळीची. कथा या सिनेमाचा प्राण आहे. एक गरीब खेडूत तरुण कामाच्या शोधात मुंबई गाठतो. रात्रीच्या वेळी या तरुणाला तहान लागते, इथपासून ते त्याला पाणी मिळण्याच्या पर्यंतच्या प्रवासावर हा सिनेमा आहे. ही गोष्ट आहे फक्त त्या एका रात्रीची. हा तरुण राज कपूर यांनी अप्रतिम साकारला आहे. विरलेला कोट आणि धोतर परिधान करणारा भाबडा गरीब माणूस साकारावा केवळ राज कपूर यांनीच, एवढी निरागसता, निर्व्याज भाव चेहऱ्यावर आणणारे अभिनेते हिंदी सिनेइंडस्ट्रीत फार कमी आहेत. तर या गरीब तरुणाला एक दोघांकडून दमदाटी झाल्यावर त्याचा पाण्याचा शोध त्याला सज्जनांच्या पांढरपेशा वस्तीत आणतो. पण त्याचवेळी त्याला इमारतीत शिरताना पाहून बाहेर आवई उठते की इमारतीत चोर शिरला आहे. मग हा कधी लपतो, कधी पळतो, या गडबडीत या सज्जंनाच्या मुखवट्यापल्याडच्या बऱ्याच गोष्टी, बरीच काळी गुपितं त्याला कळतात. बघायला गेलं तर तसा गंभीर विषय पण मांडलाय मात्र नम्र विनोदी पद्धतीने, सिनेमाच्या रंजकतेला जराही धक्का न लावता. यातल्या विनोदाला सौम्यशी कारुण्याची झालर आहे. दिग्दर्शकाने सगळी आव्हानं लीलया पेलली आहेत. मग ते दोन भिन्न जगातला विरोधाभास दाखवणं असो, की इमारतीला नाना तऱ्हेच्या माणसांचा गोंधळ आणि गमतीजमती, सारे प्रसंग मस्त रंगवले आहेत, आणि त्याच वेळेला दिग्दर्शनाने गाण्यांना शब्द-सूरांचं भान राखत पडद्यावर सुंदर पद्धतीने जीवंत केलंय. काही काही फ्रेम्स तर कमाल सुंदर वाटतात, विशेष करून 'जागो मोहन प्यारे' आणि 'जिंदगी ख़्वाब   है' या गाण्यातल्या.

चित्रपटाचे संवाद आहेत के अब्बास यांचे, फार शब्दबंबाळ संवादाच्या प्रेमात न पडता परिस्थितीला साजेसे संवाद लिहिले आहेत. त्यामुळे सिनेमाचे प्रसंग बटबटीत किंवा कृत्रिम वाटत नाहीत, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी वाटतात. राज कपूर यांच्या वाट्याला मोजके संवाद आहेत, ज्यात सिनेमाचं सार सामावलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.  म्हणूनच असे संवाद जास्त सांभाळून लिहिणं महत्वाचं.

राज कपूर व्यतिरिक्त लक्षात राहतात ते सहकलाकार म्हणजे मोतीलाल ज्यांनी अट्टल दारूड्याची व्यक्तिरेखा मस्त साकारलीय, आणि मुकेश यांच्या 'जिंदगी ख़्वाब है' या गाण्याला त्यांनी न्याय दिलाय. डेसी इराणी यांनी धिटुकल्या लहान मुलीची व्यक्तिरेखा मस्त साकारलीय. इतर सहकलाकार प्रदीप, प्राण, नेमो, नाना पळशीकर, सुमित्रा देवी, सुलोचना चॅटर्जी यांनीही आपापल्या भूमिका मस्त साकारल्या आहेत. चित्रपटाच्या शेवटी नर्गिस यांची छोटी भूमिका आहे.  नर्गिसनी राज कपूर बॅनर खाली केलेला हा शेवटचा सिनेमा. 'जागो मोहन प्यारे' सारखं एक सुरेख गाणं नर्गिसवर चित्रित झालंय, ज्याने सिनेमाचं सौंदर्य अजून खुललं आहे. या गाण्याच्या शेवटचे नर्गिस आणि राज कपूर यांचे चेहऱ्यावरचे भाव मनाला शांत समाधानी करतात. प्रेक्षकांना एज ऑफ द सीट आणणं हे जसं कठीण तसंच भोवतालच्या जगाचा विसर पाडून आपल्या सीटवर रेलून अभिनयात शांत गुंग करून ठेवणं, टाळ्या शिट्यांचा विसर पाडून पडद्यावरचं क्षणिक सौंदर्य केवळ डोळ्यांनी अधाशासारखं टिपायला भाग पाडणंही कठीणच. म्हणून या सिनेमाचं, या सर्व कलाकारांचं विशेष कौतुक वाटतं.

या चित्रपटाची गाणी सुंदर आहेत. सलील चौधरी यांनी मस्त संगीतबद्ध केलीत. सिनेमाच्या सुरुवातीलाच मुकेशजींच्या आवाजातलं 'जिंदगी ख़्वाब है' कानातून थेट मनात झिरपतं. या गाण्यात शैलेंद्र यांनी शब्दांची जादू केली आहे. हा अंतरा पहा.

एक प्याली भर के मैने
गम के मारे दिल को दी
जहर ने मारा जहर को
मुर्दे में फिर जान आ गयी
ज़िन्दगी ख़्वाब है
ख़्वाब में झूठ क्या
 
असले जादुई शब्द मुकेशजीं शिवाय कुठला जादूगार गाऊ शकतो. दारूवर गाणं आहे म्हणून आवाजात उगाच कसला बोजडपणाचा खोटा आव नाही, नाटकी उचक्या वैगेरे नाहीत. हवेत कापसाची म्हातारी उडत जावी अगदी तसं सहज, बेफिकीरी मूड मध्ये गायलेलं हे गाणं ऐकत रहावंसं वाटतं. हे गाणं आधी मन्नाडेंच्या आवाजात रेकॉर्ड झालेलं. राज कपूर यांनी मुकेशजींच्या आवाजात ते रेकॉर्ड करायला भाग पाडलं. मन्ना डेंच्या आवजातलं गाणं you tube वर आहे. मन्ना डे सूरांचे पक्के आहेत, पण या गाण्याला रियाजापेक्षा सहजता, मूड पकडणं अपेक्षित असल्यामुळे, आणि राज कपूर यांच्या मुकेशच्या आवाजावरील प्रेमापोटी केलेल्या हस्तक्षेपामुळे मुकेशजींनी गायलेलं गाणं सिनेमात ठेवण्यात आलं.

त्या शिवाय राग तिलक कामोद मधलं शैलेंद्र लिखित आशा ताईंनी गायलेलं 'थंडी थंडी सावन की पुहार' असो की, अस्सल पंजाबी उडत्या ढंगातलं प्रेम धवन यांनी लिहिलेलं रफी आणि बलबीर यांनी गायलेलं 'तें की मैं झूठ बोलया कोई ना' असो सारीच गाणी केवळ अप्रतिम.  या पंजाबी गाण्यातली रफी साहेबांची वरच्या पट्टीतली गायकी पायाचा ठेका घ्यायला भाग पाडते. संध्या मुखर्जी यांनी गायलेलं, शैलेंद्रजींनी शब्दबद्ध केलेलं उडत्या चालीचं मस्तीभरं 'मैने जो ली अंगडाई' गाणंही मस्त आहे.

एवढं पुरे की काय उरलासुरला प्राण घालवायला शेवटचं राखीव स्वर्गीय रेशमी अस्त्र म्हणजे शैलेंद्र यांनी लिहिलेलं आणि लता दिदींचा परीसस्पर्श लाभलेलं भैरव रागामधलं 'जागो मोहन प्यारे', हे गाणं सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. प्रेक्षकांच्या मनावर या गाण्याचं गारूड सिनेमा संपल्यानंतर ही बराच काळ राहतं. पण दुर्दैव सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेला हा राज कपूर बॅनरचा एकमेव सिनेमा आहे. शंकर-जयकिशन हे राज कपूर यांचे आवडते संगीतकार. सलील चौधरी स्वतः एका मुलाखतीत म्हणाले की राज कपूर यांच्यासोबत आणखी एक सिनेमा करायची योजना होती पण कदाचित राज कपूर यांना शंकर-जयकिशन यांच्याकडून दडपण आल्यामुळे ती सफल झाली नाही. सलील चौधरी म्हणतात आधी एक बंगाली अभिनेता हा सिनेमा करणार होता आणि राज कपूर फक्त दिग्दर्शन करणार होते, त्याच सुमारास शंभू मित्रा यांनी राज कपूर यांच्याबरोबर माझी ओळख करून दिली, मी त्यांना माझ्याकडे असलेल्या चाली ऐकवल्या आणि त्यांनी लगेच मला या सिनेमासाठी साईन केलं. पुढे शंभू मित्राने सिनेमा दिग्दर्शित केला आणि राज कपूर यांनी नायकाची भूमिका साकारली. याच बंगाली संगीतकाराने वर उल्लेखलेला अस्सल पंजाबी ढंगातला भांगडा या सिनेमात राज कपूर यांच्या सांगण्यावरून आणला, ते या पंजाबी गाण्याचं बरचसं श्रेय मात्र नि:संकोच त्यांचा मित्र गीतकार प्रेम धवन यांना देतात. 

हा सिनेमा हिंदी आणि बंगाली या दोन्ही भाषेत बनला. बंगाली सिनेमाचं नाव होतं 'एक दिन रात्रे'.  दोन्ही भाषेत कथानक सारखं होतं. या सिनेमाला कार्लोवी वरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये क्रिस्टल ग्लोब ग्रँड प्रिक्स अवॉर्ड मिळाला होता. राज कपूर यांना फिल्मफेअरचं नामांकन मिळालं होतं. रशियात राज कपूर यांच्या लोकप्रियतेमुळे हा सिनेमा तुफान चालला. भारतात चवथ्या नॅशनल अवॉर्ड मध्ये मेरिट सर्टिफिकेट या सिनेमाला मिळालं होतं. 

अवॉर्डसनी होतं ते कौतुक, पण सिनेमा क्लासिक बनतो तो कलाकारांच्या जमून आलेल्या उत्तम भट्टीमुळे. ही माहिती आणि मतं या सिनेमाबाबत. आता कथानकातला हा तरुण त्या इमारतीत रात्रभर कसा टिकाव धरतो? त्याला पाणी मिळतं का? लोक त्याला चोपतात का? पोलिस त्याला पकडतात का? वगैरे माहितीसाठी हा सिनेमा नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर लिहा. तुमचा सिनेमा पाहून पूर्ण होत नाही तोपर्यंत.


जागते रहो

सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

ट्रेनमधली अनोख्या शैलीतील फलंदाजी




ट्रेन मध्ये इतकी वर्ष प्रवास करतोय.  पण माणसं काही कळत नाहीत मला.  त्यांच्या डोक्यात काय रसायन भरलेलं असतं ते मला  न सुटलेलं कोड आहे.  त्यातही फर्स्ट क्लास असेल तर बोलायची सोय नाही.  असं वाटतं ही सारी मंडळी वकील व्हायची सोडून कारकून झाली. असे एक एक arguments  करतील की आपली मति भ्रष्ट व्हावी
      
परवाचंच उदाहरण पहा ना.  मला हापिसातून घरी जायचं होतं. अंधेरी-पनवेल ट्रेन लागलेली. मी वडाळ्याला फर्स्टक्लासला चढलो.  मी त्या मधल्या व्हरांड्यात उभा. ट्रेन सुरु झाली, गर्दी कमी होती, मस्त वारा सुटला होता, हायसं वाटलं. आज बहुतेक मला सुखद धक्के द्यायचे हे देवाने ठरवलेलं.  साक्षात टीसी माझ्यासमोर उभा "हां तिकीट" म्हणाला. लहान  मुलाने पहिला शब्द उच्चारल्यावर त्याचे आईबाप ज्या कौतुक मिश्रित आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असतील, तसा मी  टीसीकडे पाहू लागलो. माझ्या दोन-अडीज हजाराच्या पासासोबत उभ्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.  हाच तो क्षण.  उर भरून आला.  माझी छाती दोन इंच वाढली. जास्त फुटेज खाल्ल्यामुळे "बरा सापडला" असं टीसीच्या डोळ्यात अंधुकसं लिहिलेलं पाहिलं.  मग मात्र जास्त वेळ न दवडता माझ्या पांढऱ्या फटक पडलेल्या केविलवाण्या फोटोच्या ओळखपत्रासकट मी पास दाखवला. "हं ओके" एवढं बोलून त्याने पास परत केला. ओळखपत्र पाहिलंच नाही ते एका अर्थी बरंच झालं.  

मला नेहमी एक भिती असते.  कधी या प्रवासात  घात केलाच तर पासने नाही, तर पास असूनही ओळखपत्रावरचा विद्रुप फोटो मला दंड भरायला भाग पाडेल. या फोटोपुढे आधार कार्डावरच्या फोटोला मी सहज डोळे झाकून अप्रतिम असा शेरा देऊ शकतो.  असो नकारात्मक दृष्टिकोन का ठेवावा उगीच.  इथेच आपलं नडतं,  एवढी सकारात्मक ऊर्जा असताना आपण दुखी होतो ते त्या दहा-बारा वर्षांपूर्वीच्या फोटोपायी. शतकापूर्वीच्या चुका (फोटोग्राफरच्या) आता उगाळण्यात काय अर्थ आहे.  तसा किती सकारात्मकतेने घेरलेला होतो पहा.  म्हणजे अगदी बसायला मिळालं नाही तरी आरामात उभं  राहिण्याइतपत ट्रेन रिकामी, त्यात मस्त वारा सुटलेला, एकही पंखा 'तर्रर्रर्रर्रकट्कटकट' करत नव्हता, एकाही मजनूने 'प्रेमी पागल आवारा' छाप गाणी लावली नव्हती, एकही भजनी मंडळ नव्हतं, एकही टोळकं ट्रेनचा पत्रा ढम्बटक ढम्बटक बडवून  "मै सांस लेता हूं, तेरी खुशबू आती है" असं वातावरणाशी पूर्णपणे विसंगत गाणं शिवडीसारख्या सुवासिक स्टेशनापासून फाजील आत्मविश्वासाने दोनतीनदा स्वतःच स्वतःला दाद देत विव्हळत आलेलं नव्हतं. माझ्या डब्यात चपाती उरली असती तर या डब्याची दृष्ट काढली असती. 'स्वर्गद्वार' अशी पाटी या डब्यावर ठोकून घ्यावी असंही वाटलं. 

आता या सगळ्यावर कळस म्हणून माझ्यासमोरच्या जाळीमागे ते तिघं बसले होते त्यातल्या नेमक्या मधल्याला टीसीने उठवलं. त्याच्याकडे तिकीट नव्हतं. टीसी त्याला घेऊन व्हरांडयात आला, तो इसमही आधी विनावणीच्या  स्वरात,  मग नाईलाजाने पाकीट बाहेर काढत आला.  जागा रिकामी झाली  म्हणून मी  आत शिरलो. 
आणि  त्या बाकड्यावरच्या बाहेरच्या माणसाला म्हटलं, 
"जरा आत सरकता का?" 

तर तो माणूस चेहरा थंड ठेवून म्हणाला "वो पेनल्टी भरके आ रहे है" 

यावर काय बोलावं कळेचना. मला तर थेट सिंहासनावर राम येईपर्यंत त्याच्या पादुका ठेवणारा भरत आठवला. ह्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही पाहून मीच पुढाकार घेऊन, आत शिरून, माझा बुडाकार रिकाम्या जागी टेकवला.  भाग्य तर साथ सोडत नव्हतं. जागा तर मिळालीच आणि वर  मला एका जुन्या मैत्रिणीचा फोन आला आणि मी गप्पा मारत राहिलो.  दोन पाच मिनिटं होतात तोच खिडकीजवळ बसणार इसम मला म्हणाला, 
"सुनिये  वो पेनल्टी भर रहे थे इसी लिये उन्हे जाना पडा, तो आप उन्हे जगह दे दिजिये"  

आता पर्यंतच्या माझ्या सगळ्या भाग्यावर हा बोळा फिरवणार हे मी ताडलं. तिसऱ्या जागेवर बसल्याचं थंड उत्तर आधीच मला गरम करून गेलं होतं. त्यात याने याच परंपरागत बाष्कळ बडबड करणारं तोंड खुपसलं.  निदान माझं फोनवरच बोलणं पूर्ण व्हावं हेही सौजन्य नाही.  अर्थात अशा अपेक्षा यांच्याकडून करणं म्हणजे हनी सिंग कडून 'घेई छंद मकरंद' ची अपेक्षा करणं होतं.  

मी ही शक्य तितक्या निरागसतेने उत्तर दिलं "रिजर्वेशन था क्या?" 

त्याला पहिली दोन तीन मिनिटं काही कळेचना. मग आता बघ कसं उत्तर देतो तुलाच्या आवेशात "नही रिजर्वेशन नही था, ह्युमिनेटरी ग्राउंड था"  

इंग्रजी ऐकून माझे कान तृप्त झाले, त्याच्या चेहऱ्याचा अंदाज घेत मी नेहमीची वाक्य त्याच्या तोंडावर शिताफीने फेकली 

"First of all, its between him and me, and its none of your business, so keep your mouth shut." स्वतःच स्वतःच्या पाठीवर शाबासकी दिली. एवढ्या मोठ्या आवाजात म्हणालो कि समोरचे सेकंड क्लास वाले बंधूही लक्ष घालण्यासारखा कायतरी म्याटर ए म्हणून डोकावू लागले. बहुतेक त्या  'ह्युमॅनिटरी ग्राउंड' वाल्याचं सारं इंग्रजी माझ्या तुफान बोलांनी अंडरग्राउंड झालं. 

"मैं बस कहे राहा था वो बैठे थे, जस्ट पेनल्टी भरने गये थे तो आप अभी उन्हे जगह दे दिजीये. पेनल्टी भर रहे है बेचारे मुसीबतमे है" 

मी मागे हटणार नव्हतो "वो समझ गया मैं, पर मेरे पास पास है, जगह खाली थी, तो बैठने के लिये आपकी परमिशन क्यो लुंगा? " 

"आपसे उम्मीद करना बेकार हैं, आप बडे बत्तमीज हो" 

मी "हां हून" 

"आप सेल्फिश है"  

मी "अच्छी बात है, लाईफ मे तरक्की करुंगा"  

"आपको शरम करनी चाहिये"  

मी मजा घेत "हा बिलकूल मेरे जैसे पास निकालने वाले ने शरम करनी चाहिये, और आपके दोस्त जैसे पेनल्टी भरने वालोंको शरम नही करनी चाहिये" 

"वो मेरा  दोस्त नही है, जस्ट ह्युमिनेटरी ग्राउंड के लिये" 

ह्याची बौद्धिक दिवाळखोरी पाहून मी खवळलो. 

"क्या कबसे ह्युमिनेटरी ग्राउंड, ह्युमिनेटरी ग्राउंड लगाया है, एक काम करो तिलकनगर आ राहा है प्लॅटफॉर्मपे उतरो और जोर जोरसे चिल्लाओ ह्युमिनेटरी ग्राउंड ह्युमिनेटरी ग्राउंड और भरदो सारा डिब्बा" महत्प्रयासाने आवेशात तोंडातून निघणाऱ्या अपशब्दांना मी आवर घातला.  

"वेसी बात नही है, कल आप पर भी ऐसा टाइम आयेगा तो आप क्या करोगे?"  

मी  "पहेली बात तो ऐसा टाइम आयेगाही नही, मैं बिना पास के जाताही नही ट्रेनमे और मान लीजिये गलतीसे पेनल्टी की नौबत  आभी जाती,  तो डिब्बेसे उतरकर सेकंड क्लास का तिकट लेके मैं उस डिब्बेमेसे चला जाता" 

यावर शांत.  

पुन्हा एक झटका आला  

"उनको देखिये,  वो आयेगा तो टीक पाओगे क्या?"  

अरे!  हा बहुतेक मला कुस्ती खेळायला लावणार आता. तसं युगंधर वगैरे वाचून माहितीय बहुकंटक वगैरे, पण ट्रेनमध्ये कसं दिसेल ते, आणि बूड जागेवरून  न हलवण्याची जी मी भीष्मप्रतिज्ञा करून बसलोय त्याचं काय? 

त्याचं आपलं सुरूच "क्या टीक पाओगे क्या?"   

मी शांतपणे "आने तो दो उन्हे भी देख लेंगे, कायदा कानून है के नही? वो बेचारे  कुछ नही केह रहे, आप बेकार मे उन्हे घसीट रहे हो" 

मी आता वाद मिटवण्याचा पवित्र्यात गेलो "देखो सर, फायनल बोल रहा हून  मेरे पास पास था, जगह खाली थी मैं बैठ गया, क्या गलती हुई मेरी? instead of supporting me, you are supporting wrong practices."        

तोही मोठ्याने  "No वो तो गलत  है, I am not supporting him. its just जाने दो मैने आपसे बातही नही करनी चाहिये थी, आप बैठो" 

मी त्याला परत डिवचत "वो तो बैठूंगाही आपकी परमिशन नही चाहिये, बात करनी चाहिये थी या नही करनी चाहिये थी वो तो आपने मुह खोलने से पहले सोचना चाहिये था " 

विजयी धाव मिळवून मी बॅट उंचावली.  कमालीचं सातत्य, मेहनत, आत्मविश्वास, चिकाटी यांच्या बळावर आत्मसात  केलेलं हे कौशल्य आहे. उगाच नाही. असो. 


तो हेडफोन्स लावून बसला.  आणि मी विजयी मुद्रेने खिडकीबाहेर पाहत बसलो. 

वाशीची खाडी आली.   तिचा तो रानूस हिरवट वास आला. चला आमची उतरण्याची वेळ झाली. शक्य झालं असतं तर सीट सोबत घेऊन उतरलो असतो मग घाबरतो का  काय? पण आपल्या मर्यादा पाहून केवळ हाफिसात न्यायची बॅग घेऊन उतरलो. 

उतरण्याआधी त्या पेनल्टीवाल्याचा आणि माझ्याशी जो भांडला त्यांच्यात काहीसा असा  संवाद झाला. 

"आओ अंदर आओ" 

पेनल्टीवाला "नही ठीक है, आजही भूल गया यार,  टॅक्सीसे जाता तो सातसौ रुपये होते थे, ट्रेन मे चारसौ का पेनल्टी हुआ बस" 

बसलेला महाभाग "तुमने आयकार्ड नही दिखाया टीसी को ?" 

"दिखाया पर माना नही वो" 

"ठीक है अंदर तो आयो" हा भावकातर अदबशीर स्वरात म्हणाला. 

माझं स्टेशन आलं तसंही त्यांचं यापुढचं अपेक्षित युगुलगीत, चुंबनदृश्य किंवा तत्सम काही पाहण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नसल्यामुळे कदाचित मी उतरणं पसंत केलं.  

कसला दुटप्पी माणूस एरव्ही यांना गर्दीत यांना धक्का  लागला की मारे  डोळे वटारतात, आणि लोकांकडून माणुसकीच्या अपेक्षा. आधी माणूस तर व्हा म्हणावं.

जाऊ दे ना ट्रेन आपल्या ट्रॅकने निघून गेली. मी माझ्या रुटीन ट्रॅकवर परत. 


- प्रसाद साळुंखे

शुक्रवार, १८ एप्रिल, २०१४

एकटा जीव सदाशिव - भाग ३





मी गणपति विसर्जनालाही एकटा जातो गिरगावात.  म्हणजे बाकी सगळे पोहोचायच्या आधी मी साडेपाच सहा पासून गिरगावात हजर.  मी आणि कॅमेरा बस (बाकी क्या मेरा क्या तेरा . . .  असो ).  मस्त सगळी मंडळं आपली.  अगदी कोणाकडूनही  फुटाणे , खोबरं, केळं, शिरा, अण्णा गणपति असेल तर गुळ-पोह्याचा चांगला मूठदोनमूठ प्रसाद घ्यावा. ठेंगण्या ठुसक्या गोडुल्या गोजिरवाण्या गणपतीपासून ते भव्य अवाढव्य मुर्त्यांचे फोटो काढता काढता दोन अडीज तास कसे जातात काही काळत नाही.  आला आला  खेतवाडीचा आला, चंदनवाडीचा आला, वरदविनायक आला, चिंतामणी आला एकामागून एक सुरूच.  एकटं कसं काय ते वाटतच नाही.  बाकीच्या वेळी माणसं रांगेत उभे राहून गणपति पाहतात, पण इकडे गणपतीच रांगेत येतात आणि माणसांचा निरोप घेतात. " तुमची ती नवसाची रांग नको , VIP पास नको, मुखदर्शनाचा फार्स नको, भक्त आणि कार्यकर्त्यांची ढकला ढकली  नको , माझे भक्त आणि मी काय ते बघून घेऊ, मला घटकाभर भक्तांमध्ये सोडा बस्स … POP च्या मांडवातून , AC च्या कृत्रिम ताजेपणापासून सुटका करून मोकळा श्वास घेऊ द्या "  असं जणू बाप्पा सांगत असावा म्हणून तर वेगळंच तेज असतं विसर्जनाला.  कावरे बावरे फॉरिनर्स, चाटवाले, सॅंडविच, समोसे, चहावाले  आणि हवशा नवशा गवशा भक्तांची नुसती गर्दी गर्दी गर्दी.  पण या गर्दीचा राग नाही येत.  उलट एक वेगळीच उर्जा जाणवते.  बाकी एवढ्या गर्दीत एकटा फिरणारा बहुतेक मी आणि बाप्पाच.

ट्रेकला जाताना मुद्दाम मागे मागे रहायचं. फक्त शेवटचा माणूस नजरेच्या टप्प्यात ठेवायचा.  माझा अनुभव सांगतो (मी तो काय अनुभव तो किती पण भारी वाटत) तर माझा अनुभव सांगतो गर्दी असली कि निसर्ग बोलत नाही माणसंच बोलतात.  पण असली नसती थेरं कोणी करू नयेत, नाही तर निसर्गाचं ऐकायच्या नादात एक वळण असंही येतं की गर्द रानराईत आपण एकटे आणि पुढे पायवाटेला दोन फाटे फुटलेले … गड्या डावा की उजवा? फोनला रेंज असली तर नशिब नाही तर द्या हाकारे हुकारे आणि खा शिव्या.  "कोणीही मागे मागे रेंगाळू नका , फोटो काढायच्या नादात एकटे पडू नका (तुमचं नाव ) काय हं … नाहीतर (अगोदरच्या  हाकारे हुकारे पराक्रम केलेल्या  ट्रेकचं ठिकाण )  सारखं कराल …  तेव्हा  हं (धमकीवजा 'हं' )" असं पुढच्या प्रत्येक ट्रेकला ऐकावं लागेल. मला डोंगरमाथ्यावर एकटं उभं रहायला आवडतं, कारण तिथे माणसं नसली तरी एकटं वाटत नाही.

बहुतेक कलाकारांना बाथरूममध्ये वगैरे सुचतं.  म्हणजे गायकीतली नवी जागा, नवीन कविता, चाल, नाटकाचा शेवट असा नविन साक्षात्कार बाथरुममध्ये वगैर होतो.  एकटं  असताना.  न्यूटन माहितीय? तो एकटाच होता म्हणे झाडाखाली, सफरचंद सुद्धा म्हणे एकटंच पडलं खाली. असो इतक्या चिंधी मॅटरला कशाला मोठ्यांचे रागरतन हवेत.  सांगायचा प्वाइन्ट असा की एकटं असतांना आपण जास्त जागरूकतेने आणि लक्षपूर्वक कामं करतो. अपवाद हापिस.

ओशो बाबा म्हणतो The aloneness is total and complete. Not loneliness but aloneness. Loneliness is always concerned with others; aloneness is concerned with oneself'  अलोन म्हणजे ओशोच्या भाषेत परिपूर्ण.  एक म्हणजे पूर्णांक. १ म्हणजे १.   १ म्हणजे  ०.५ नव्हे.  ही परिपूर्णता मी अनुभवतो.

त्यादिवशी विचार करत होतो सालं एकटं असणं इतकं रंजक असेल तर त्यापुढची स्टेज गाठायला हवी.  छे आत्महत्या नाही.  म्हणजे बघा एकटेपणाच्याही पल्याड जाता यायला हवं. स्वत:लाही स्वत:पासून वेगळं ठेवता यायला हवं.  स्वत:च्या अस्तित्वाची कापसाची म्हातारी करून हवेत सोडावी.  स्वत:च्या अस्तित्वाच्या पलिकडचं काहीतरी अनुभवावं.  हे नेमकं काय ते शब्दांत मांडणं, समजावणं कठीण.  परवा वायोलिन वाजवतांना राग बाजूला पडून काहीतरी वाजू लागलं …  वेगळं.  चांगलं वाईट माहित नाही.  पुढे पुढे तर वाटत होतं बो आपोआप सरकतोय , बोटं आपोआप पडताहेत, आपोआपच  वाजतंय आणि मी फक्त ऐकतोय. एक क्षण असा आला की वायोलिन तर वाजतंय पण मी नाहीसा होत गेलो हळू हळू .  फ्फुल्ल तंद्री.  दारावर टकटक "जेवायला ये किती हाका मारायच्या,  ठेव ते आता तुनतुनं , जेवण थंड झालं" आई मला कधी एकटं पडू द्यायची नाही.                             
 


समाप्त
                                                                

शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४

एकटा जीव सदाशिव - भाग २





एकटं म्हणजे वैताग, कंटाळवाणं असं काही नसतं. चुकीच्या संकल्पना आहेत त्या.  मी खरेदीला सुद्धा एकटा जातो.  खरेदीचेही खूप किस्से आहेत.  कॉलेजच्या काळात दुर्दैवाने (त्याच्या) माझ्याबरोबर दिवाळीच्या खरेदीला आलेल्या मित्राला मी असा तोंडघशी पाडलेला की त्याने आजतागायत खरेदी हा शब्द माझ्यासमोर काढला नाही.  घ्यायचं काय तर एक टी शर्ट.  मला पसंतच येईना कुठला.  आलाच पसंत तर मापाचा मिळेना. सुरूवातीला तो "चल सोड दुसरीकडे पाहू" असा उत्साही.  नंतर नंतर "ते काय वाईट होतं" "तुला नक्की घ्यायचं नं"  " पुढच्या आठवड्यात येऊया  यार साडेदहा वाजले घड्याळ्यात" असा कुरकुरायला लागला.  तीन तास फिरून स्टेशनच्या मेन मार्केटपासून बर्‍याच लांब शेवटी माझ्या पसंतीचं टी शर्ट मिळालं.  ते मी बरीच वर्ष वापरलं.  माझं आवडतं टी शर्ट होतं ते.  अजूनही आहे खणात.  नायलॉनचं असल्याने त्याचं पायपुसणं झालं नाही.  काय एक एक नशिब घेऊन येतं टी शर्ट.  

जरा मध्ये मध्ये विषयाचं नाव वाचायला लागतं.  काय आमची नाव एकदम भरधाव वहावत जाते कुठेही भरकटते.  लोकांच्या सहनशक्तीचा वेळीअवेळी अंत पाहून लोककल्याणास्तव मी एकटं  खरेदीला जायला लागलो.  लागते कशाला सोबत मला कळत नाही.  एकटं जावं मस्त खरेदीला पसंत पडेल ते पसंत पडेल तिथनं उचलावं "हे?"  "इथनं!!" असं खवचटपणे विचारणारं कुणी नसतं.  किंवा "हे घे"  "मी तिथनंच घेतो" "FS ला अर्ध्यात पडला असता सेम" असे सल्ले देणारं कुणी नसतं.  होतं काय की सोबतचा तशी मदतच करत असतो पण कधी कधी त्याने बाजूला शॉर्टलिस्ट केलेले तीन चार आपण शॉर्टलिस्टलेले चार पाच यातनं नेमकं काय निवडावंचा पुरता गोंधळ उडतो मग राहू दे तिच्याआयला मग कधी तरी घेऊ म्हणायची वेळ येते. ही दिव्य पार करूनही काही निवडलत तरी होणार्‍या समाधानाची कधी कधी काशी होते, म्हणजे "एश है  बाबा, शौक बडी चीझ है"  "मोठ्या बापाचा"  "प्याकेज किती भेटतो"  " तुमच्या त्या जागेचं भाडं किती येतं?" असलं काही कॅश काउंटरच्या रांगेत ऐकावं लागत नाही.  तुम्हालाही "कॉर्पोरेट डिसकाउंट मिलेगा ना यही के ग्रूप का एम्प्लोई हय मय"   "फटेगा तो ? निस्ता मुंडी मत हलवो वापस लेके आयेंगा काय समजलास?"   "मग काय फायदा दोन घेऊन"    "लाश्टका फायनल बोलो"   "साले थोडा तो कम कर रिक्षा का छुटे"    "इतनाही है जेब चेक कर" असं काहीही बोलून घासाघीस करायला काहीही वाटत नाही. मागे वुडलॅंड च्या शोरूम मध्ये मी  "अरे ओरिजिनल है ना?" असं विचारलं होतं.      

माझी हापिसातली मैत्रिण म्हणाली की मोठमोठे लेखक लोक गप्पिष्ट असतात.  त्यांना संवादाची भूक असते. त्यातून त्यांना कॅरेक्टर्स मिळत जातात. मी म्हटलं पहिली गोष्ट मी लेखक वगैरे नाही हौशी ब्लॉगर आहे फक्त (ओर ये लगा सिक्सर.) आणि आपापल्या श्टायली असतात गो. एक अब्ज़र्वर राहूनही कॅरेक्टर्स मिळतात. मी तर म्हणतो एक वेळ बोलून इतका खुलणार नाही माणूस जितका गाफील असतांना खुलतो. म्हणून इज्जतवाडीमध्ये मुलाखत वगैरे घेतली तर डिप्लोमॅटिक बोलणारे स्टिंग ऑपरेशनात असते दृष्ट लागण्यासारखे खुलतात.     
        
प्रवासाचंच बघा.  एकटं दुकटं प्रवास करावा फोर्थ सीट पदरात पडायचे चान्सेस असतात.  मस्त पुस्तक काढून वाचा, गाणी ऐका, हिरवळ पहा, नाक कान साफ करा, भांग पाडा.  सुहाना सफर ओर ये मोसम हसी ( मुंबईत आहे यंदा, ४ करोडला पडला …  असो )    तर अगदी मनासारखा प्रवास करा.  नाही तर सोबत असतं कुणीतरी सीट रिकामी झाली की "तू बस नाही ओके तू बस, बस रे"  असं बसवाबसवी खेळता खेळता तिसराच तंगडं स्ट्रेच करून घुसून बसतो.  किंवा "तो पक्का नीच आहे, जाम डोक्यात गेला माझ्या "  "यावेळेचं अप्रेज़ल बोंबलणार बघ"    "मी तर सरळ केलं त्याला , सरळ सांगितलं बरोबर ना? तू बोल तुला काय वाटतं बोल "  काय घंटा बोल, तू तुझी इतकी लाल का करतो? आत्मचरित्र लिही ना सरळ  'स्वघोषित - लालबादशहा'  'सरळकर'  वगैरे नावाचं मला का पकवतो? एक तर हा पंखा चालत नाही तरी स्टेशन गणिक कोणीतरी त्याच्या पात्यात पेंनच घाल, फणीच घाल, पिन, कागदी सुरनळी,  विज़िटिंग कार्ड  सगळं घालून मला धुळीचा अभिषेक घालतो, आणि हॅ हॅ करत दात काढत मलाच "बंद है क्या?" विचारत खात्री करून घेतात. त्यात या सोबत्याचं "ते सोड  मी काय म्हणतो बर नाही केलं तेव्हा म … " सुरूच.  अरे क्व्याय. ऑफिस पॉलिटिक्स वगैरे कशाही वरून या रोतलूंचा डोक्याला निस्ता शॉट.  सकाळचं  एकवेळ ठीक आहे. पण संध्याकाळी हपिसचं रटाळ काम संपवून घरी एक कप चहापर्यंत पोहोचेपर्यंत एकटं सोडावं माणसाला.  मी एकटा नसतो.  अपना एक पंटर है. तो ऑफीस डिस्कशन नाही करत प्रवासात.  आम्ही मक्याचे दाणे खात माफक टिंगलटवाळ्या करत प्रवास करतो.  पण कधी कधी पंटरचापण कंटाळा येतो. कधी कधी स्वत:चापण.

          
क्रमश:                                                                               

रविवार, ६ एप्रिल, २०१४

एकटा जीव सदाशिव - भाग १



"तू एकटा कसा काय पिक्चर पाहू शकतोस?" शक्य तितक्या त्रासदायक आवाजात तिने माझ्या तोंडावर प्रश्न चक्क फेकला.  मला तर कसले एक एक चू असतात जगात हे तिने मनात म्हटलेलंही ऐकू आलं. तो पर्यंत एकटं सिनेमाला जाणं मला नॉर्मल वाटत होतं.  आता मलाही ते उगाचचं अबनॉर्मल वाटायला लागलं. पण अशी प्रतिक्रिया मी मारी बिस्कीट कोणी मटणाच्या रश्श्यात बुडवून खाल्लं असतं तरी नसती दिली.  मला ते हेही इतकं अबनॉर्मल वाटत नाही. मागे एकदा कल्याणच्या मेट्रो जंक्शन मॉलमध्ये मॅकडोनाल्डचं आइस्क्रीम  पैजेखातर सॉस बरोबर खाल्लेलं.  काही पोटंबिटं बिघडत नाहीत. सगळ्या अंधश्रद्धा आहेत.   सगळं ठीक म्हणजे सगळं नॉर्मल. 

पण तरी असं का म्हणावं तिने.  असं म्हणजे 'असं' अशा पद्धतीने.  जनता आपसे जबाब चाहती है असं वाटायला लागलं राव.  आता लोकांना जे चित्रपट आवडतात ते त्यांना का आवडतात ते मला कळत नाही आणि मला जे सिनेमे आवडतात ते मला का आवडतात ते (मला आणि ) लोकांना कळत नाही म्हणून लोकंलोकं वेगळे जातात आणि मी अनोळखी लोकांबरोबर एकटा सिनेमा पाहतो. 'लय मोट्टा शाना हायिस' टाइप प्रतिक्रिया कोणी कितीही देऊ देत पण हे खरं आहे.  म्हणजे मी कुठला सिनेमा पहायचा हे लोक ठरवणार का? आणि ठिकाय ठरवू देत, पण लोकांचं ठरतं कुठे? ठरल्याप्रमाणे होतं कुठे? कोणी हाफिसच्या कामाने  दिल्लीला जातो, कोणाच्या मावशीच्या मुलाचं लग्न, कोणाची नव्याने सुरु झालेली ccd वारी, कोणाचा ब्रेकअप, कोणी जन्मजात कंटाळलेला. सिनेमेही पूर्वीसारखे आठवडेच्या आठवडे राहत नाहीत. ठिक आहे ठरवू देत जाऊ पुढच्या आठवड्यात असं म्हणण्याची मुभा नसते.  यांचे प्लान्स होइहोइस्तोवर सिनेमा थेटरातून निघून गेला काय घ्या. त्यातही सर्वानुमते टुकार सिनेमा ठरवायचा. आणि आपण काही सुचवलं तर हे बघ सिनेमा पाहणं महत्वाचं नाहीये सर्वांनी भेटणं महत्वाचं.  अरे मग मॉल आणि हॉटेलं कशासाठी आहेत. यावर,  नाही हॉटेलातही जायचं पण सिनेमा संपल्यावर.  एक ना धड.  त्यात एक  कोणीतरी महाभाग सिनेमा सुरु होऊन वीस मिनिटं झाली तरी उगवणार नाही.  ना मेसेज ना कॉल. आता येत नाही बहुतेक असं वाटत  असताना नेमका फोन खणखणार "आरे जरा बाहेर ये ना"  मग तिकटी कोणाकडे आहेत शोधा.  चुळबूळ चुळबूळ करा. मग एकदाच्या सापडल्यावर excuse me excuse me करत लोकांच्या चपला तुडवत महाभागाला शोधायला बाहेर या.  "किती मिस झाला?" "हे ते गाणं गेलं काय रे?" "टॉयलेट कुठे आहे?" अशा प्रश्नांना सामोरे जा. म्हणून एकटं जाणं कधीही ब्येष्ट.  तुमच्या सोयीचा सकाळचा स्वस्तातला शो. मस्त सायीदार चहा बनपाव घरी मारावा आणि सकाळचा शो पाहून दुपारच्या कोलंबीचा रस्सा, फ्राय पापलेटच्या तुकडीच्या जेवणाला घरी हजर. वहावत गेलं यांचं ते प्लानिंग नि गेटटुगेदर. 

मुळात एकट्याने  सिनेमा पाहताना तुम्ही सिनेमा पाहता. तुमच्या हृदयाचा पावभाजीचा तवा करणारी (गजहब का काय ते ढाणे म्हणतात नं  ते तसलं) ती असा मस्तपैकी अनारकली घालून मात्र तुमच्यापासून चार पाच खुर्च्यांचा अंतर राखून बसलेल्या माजोरड्या फर्स्टक्रशच्या नादात सिनेमाचा विचका होत नाही.  उगाच आपलं चार पाच मिनटांनी 'तिरपा कटाक्ष भोळा' च्या अपेक्षेने पहावं तर या  आपल्या आपल्याआपल्यातच. खिखी खुखू कानगोष्टी सगळं चालू पण तुम्ही आपले बघे.  भो मध्ये गेला पिच्चर लय झालं आता हे चार खुर्च्यांचं अंतर नाय इंटरवलात पास केलं ना … अशा विचारात असतानाच इंटरवल होतो.  आणि आमची नेमकी कॉर्नर सीट असल्याने पॉपकोर्न, सामोसे, कोक आणायला आम्हाला पिटाळलं जातं. ज्याचं कधी कोंट्री मिळतं कधी नाही.  आणि तिच्यासमोर सालं मागुही शकत नाही.  now talk logic for a change जर चार खुर्च्यांचं  अंतर ठेवून अशी फजिती होणार असेल तर एकटं गेलेलं काय वाईट.  सिनेमा चांगला असला तर पाहू नाहीतर क्राउड चांगली आहे का ते पाहू.  अगदीच काही नाही तर खुर्च्यांची अंतरं कमी होतील खात्रीलायक , लिहून घ्या.  तसंही तिरपे कटाक्ष न मिळाल्यास मिळतील ते कटाक्ष तिरपे मानण्यात यावेत असा नियम आहेच.  खरंच.  अग्निपथमधल्या  अमिताभ सारखं तिरपं बसल्याने पण फायदा होतो.  खरंच.          


मुळात एकटं सिनेमाला जाणं म्हणजे खर्च कमी.  चुकूनमाकून कोरीव भुवया ( ललनांच्या बरं)  तुमच्याकडे वळल्याच तर हाताची घडी घालून उजव्या मुठीचा हनुवटीला रुबाबदार टेकू देऊन किंचित आठ्या पाडून सिनेमा पाहतांना आपण किती अभ्यासपूर्ण वगैरे पद्धतीने सिनेमा पाहतो असा खोटा आव आणता येतो.  सिनेमा चांगला असेल की  नाही याबद्दल साशंक असल्यास स्टेरवेच्या बाजूला इनमिन एका रांगेत तीनचार सीट्स असतील असा एक छोटा चौकोन असतो तिथली जागा पटकवावी.  सिनेमा चांगला असेल तर सिनेमा पहा नाहीतर बाजूला 'भिगे होठ तेरे' रिपीट सोंग मोडवर सुरूच असतंच.  इंटरवलला "च्च . . . " "श्या .. " ऐकायला येतं (त्यांच्याकडून)   कधी कधी त्यांच्याकडे थोड्या थोड्या वेळाने बघत राहिलं तर काही अपवाद वगळता  ते अनकंफर्टबल होतातही, तेव्हा दुनियेला अनकंफर्टबल करणार्‍यांना आपण दोन एक सेकंद का होईना अनकंफर्टबल केलं या विजयी मुद्रेने मी पुन्हा सिनेमा पाहतो.                 



क्रमश:                                                                        

शनिवार, २९ मार्च, २०१४

आठ्या


कुर्ल्याला उतरलं की गर्दी टाळायला GTB ला उलट जायचं. फार काही नाही होत दोन स्टेशनांपुरती गर्दी टळते.  समानसुमान वर टाकून हॅंडल गच्च धरून गर्दीचा सामना करण्यासाठी तुम्ही टिपिकल फर्स्टक्लासी पवित्र्यात उभे. पण आवडतं एकेकाला दोनेक स्टेशनं मागे जात रमतगमत प्रवास करायला. मित्राचा पास कुर्ल्यालाच संपतो आणि गेल्या वर्षभर तो कुर्ल्यालाच संपतोय. आता हा पास मागत नाही की रेल्वे याला कुर्ल्यापुढे जाऊ देत नाही या खोलात न शिरता मी आपली ड्यूटी  इमानेएतबारे करतो. तसं GTB ला नसतो टीसी तरी ट्रेन प्लॅटफॉर्मला लागेपर्यंत कोणी नाहीयेना याची खात्री करत 'येरे' म्हणायचं. हा काही पास काढत नाही माझं आपलं रोजचं ये रे माझ्या मागल्या. जनरली उतरताना पाठचा उतावीळ होऊन 'चल उतर चल' करतो. आमचं उलटच. आम्ही स्टेशन आल्यावर मागे वळून 'ये रे ये' करतो. मंग नया हय हम. 

त्या दिवशीही असेच सुमडीत उतरलो. या GTB स्टेशनात एक रांडेचा indicator कधी चालू नसतो. ज्या ट्रेन मधून उतरलो ती CST ची ट्रेन सुरु झाली. आणि एकच गलका. ट्रेन पकडतांना त्या माणसाचे दोन्ही पाय कसे काय ते ट्रेन आणि प्लॅटफोर्मच्या मध्येच अडकले. वरच्याने धिटाईने त्याचा हात धरलेला. हो धिटाईच. कुठे काय जर्क बसला काय सांगा दोघेही जायचे सायन हॉस्पिटलात. हा लटकलेला माणूस तर अजून अजून आतच जाई. जवळपास छातीपर्यंत पोहोचला. लागले भेन्चोद कर्माने गेला. अंगावर सर्रकन काटा आला. याची फरफट आता रात्रभर डोळ्यांसमोर दिसत रहाणार. तेवढ्यात मोटरमॅनने अपवादात्मक प्रसंगावधान राखून ट्रेन थांबवली. लोकांनी त्याला वर काढला.  अर्धमेला बेशुद्ध महत्प्रयासाने काहीतरी बडबडत होता. हातपाय धड शाबूत होते.  चेहर्‍याने गर्दुल्ला दिसत होता.  काहीही असो वाचला ते महत्वाचं.

जर निगरगट्ट कातडीचे राजकारणी जगताहेत, अरबोंचे घोटाळे करणारे व्यावसायिक उजळ माथ्याने जगताहेत, गुन्हेगारी प्रवृत्तिची माणसं पॅरोलची सुरनळी घेऊन पार्ट्या करून कायद्याचा पोरखेळ करताहेत, तर केवळ गर्दुल्ला म्हणून याने का मरावं? जग तिच्यायला. अल्लाह मेहेरबान तो गधा पहेलवान. 

हे गर्दीत उभं राहून 'व्यसन वाईट,  व्यसन वाईट'  साच्याचं बोलणं सोप्पं असतं. त्याला पाहून कसा का तो थेट 'सलाम बॉम्बे'च आठवला. सालं कुठनं कुठनं मुंबई शहरात यायचं. इथे ना आई … ना बाप … ना कुटुंब … ना धड शिक्षण ना बर्‍यावाईटाची समज. नुसते काबाडकष्टच आणि दुखण्याखुपण्याला व्यसनांचा आधार. मनगट पोलादी होईपर्यंत, उठता लाथ बसता बुक्की आणि कसकसल्या प्रकारचे अत्याचार होतात देव जाणो.  भरल्या पोटी अपेक्षा करायला आपल्या बापाचं काय जातं? निर्व्यसनी असण्याची अपेक्षा … संस्काराची अपेक्षा … सचोटीची अपेक्षा … पांढरपेश्या मुलांसारखं वागण्याची अपेक्षा … एरव्ही साला यांच्या सेकंड हॅण्ड कारच्या धुळकट काचेवरच्या काळवंडलेल्या हाताच्या एका बोटाच्या साध्या ठश्याने आतल्या मालकाच्या डोक्यात तिडीक जाते. मात्र अपेक्षा अपेक्षा खेळतांना हे बेमालूम विसरायचं. मुलं ही समाजाचीच तर प्रतिबिंब. मातीच्या गोळ्यांना समाजच तर देतो आकार. उद्या हे गायक क्रिकेटर संशोधक पुढारी वगैरे  बनले की मारे छाती पुढे करून आमच्या गावाचा आमच्या प्रदेशाचा आमच्या मातीतला. गर्दुल्ल्याला कोण वाली? हर फिक्र को धुएमे उडाता … तरी ठीक होतं.  दबलेला जाळ वेगळ्या मार्गांनी निघतो तेव्हा खरी कीव कोणाची करावी? बलात्काराचं  पण काहीसं … असो मला दिसतंय पुन्हा तेच, फक्त त्याच्या जागी मी, आत आत शिरत जातोय, खेचला जातोय,  एक निर्णायक झटका बस्स … आणि बघ्यांच्या तोंडावर निव्वळ आठ्या गपगुमान सोडावी ट्रेन तर कशाला नसते स्टंट्स … सोयीचं उत्तर 'सोडून दे रे …'

हे वाचले तरी आमच्या झोपेचं खोबरंच  


                                                    
              

बुधवार, १६ जानेवारी, २०१३

सगरी लफरी त्येच्याएला






सात दिवसाचा गणपती. मंगळवारी विसर्जन, तर मित्राला सांगितलं बाबा बुधवारी रजा घेतो म्हणजे विसर्जनाला कितीही उशिर झाला तर लफडा नाही दुसर्‍या दिवशी मस्त आराम करायचा. तर यावर "नाही नाही एडा  मंगळवारी घे रात्री भजन करू." भजन रात्र भर डोळे लुकलुकले. मनात लाडू फुटला. लगेच रजा टाकली. बॉसही राजी झाला.  आता डोळे तारवटून नरडा ताणून भजन. मंडळाच्या गणपतीचं हे 25वं वर्ष. त्यामुळे उत्साहाचं वातावरण. सोमवारी एक छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम गच्चीवर पार पाडला त्यानंतर सहभोजनाचा बेत होता. त्या निमित्ताने सोसायटीतल्या जुन्या नव्या रहिवाशांची भेटीगाठी होत होत्या. 

सहभोजनाचा कार्यक्रम उरकला. मूड बनवायला पहिलं स्टेशनला आईस्क्रिम खाल्लं आणि मघई पानं तोंडात कोंबली. येता येता आर के स्टुडिओचा गणपती क्लिकला. सोसायटीत आलो. ढोलकीवाला मित्र ढोलकी घेऊन तयार होता. मंडळाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी आपला 'कसिनो रोयाल' आवरला. हॉलभर चटया चादरी अंथरून बैठक तयार केली.  वातावरण भक्तिमय करण्यासाठी दोन अगरबत्त्या जास्त लावल्या. काहीजण दम मारायला गेले.

बोला पुंडलिका वरदे हरी विठठल 
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
हरीहर महादेव.  

आता ही टाळकी खरंच भजन करणार आहेत याची सोसायटीला खात्री पटली. 'गजानना श्री गणराया' ने सुरवात झाली. बरं जमलं.  त्यामागोमाग 'रुप पाहता लोचनी', 'तुका म्हणे हेचि सर्वसुख', 'या विठूचा गजर हरी नामाचा', 'हे भोळ्या शंकरा', 'हरी भजनी मोर नाचतो अंगणी', 'पायी हळू हळू चाला' वगैरे भजनं जोरदार केली. भजनांचा स्टॉक संपत आला. अरे हे गाणं घे ते घे असं चालू होतं.  'देव देव्हार्‍यात नाही' आठवलं.   म्हटलं.   सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर .. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार .. आलं तेवढं जमेल तसं अर्धमुर्ध भारुड म्हटलं. नंतर 'देहाची तिजोरी' म्हटलं. 

दिड वाजता ब्रेक घेतला, लोक दम मारायला बाहेर गेले.  ढोलकीवाल्याने ढोलकीला ठाकेठोके दिले. पीठ लागलेल्या बाजूने पाण्याचा हलका हात लावला. आम्हीही पाणी प्यायलो फुटाणे खाल्ले. आम्ही ब्रेकनंतर गवळण त्यानंतर फिल्मी गाणी गातो. 'यमुनेच्या तिरी काल पहिला हरी' घेतलं. नंतर आता भक्तिरसाचं अजिर्ण व्हायच्या आत ट्रॅक चेंज करूयात असं ठरलं.  'तुमतो ठेहरे परदेसी' करत साक्षात अल्ताफ राजाच आमच्या नरड्यात उतरला. मध्येच 'गणा धाव रे' कोणी तरी म्हटलं.  'शहेरमे हूं मे तेरे आके जरा देख तो ले, दे ना तू कुछ मगर आके मेरा दिल तो तू लेले जाना' रॉकस्टारच्या या गाण्यावर ढोलकीवल्याला तारे दिसू लागले.  "काय डोंबल वाजवू?" हशा आणि एकमेकांची थट्टामस्करी. पण झोपायचं मात्र कुणाच्याही मनात नव्हतं.  उद्या आपल्या बाप्पाचं विसर्जन. आज रात्र जागवायचीच. फर्माईश.  मध्येच कोणीतरी मला म्हटलं अमर अकबर ऍंथोनीमधलं 'पर्दा है पर्दा' घे.  मी खाकरलो. ढोलकीवाल्याला एक लूक दिला. शून्यात बघत कसलातरी सूर मनातल्या मनात हेरला.  मग ओरिजिनल सूर आणि मनातला सूर सोडून भलत्याच टिपेच्या सूरात सुरु झालो. 

"शबाबपर मै जरासी
शराआआआआआआआआआआआब फेकूंगा
किसी हसीं की तरफ 
ये गुलाब ...."  

म्हणत दरवाज्याकडे मान गेली आणि गुलाब कुस्करला.  दोन कॉन्स्टेबल्स हात मागे घेऊन टिपीकल पोलिसी पोझमध्ये उभे. म्हटलं बाप्पा मला आजच उचलणार बहुतेक. माझे तमाम पंखे इयत्ता सातवी ते बारावी खिकीखिकी करून कॉन्सटेबल समोर हसत होते. माझ्या मित्राने प्रसंग सावरला.  "दर्शन घ्या, ए प्रसाद घे रे, उद्या विसर्जन आहे ना तर ही लहान मुलं म्हणाली भजन करुयात" यावर कॉन्सटेबल "नाही पण आवाज?" "नाही आता थांबवतच होतो आम्ही ए झोपा रे घरी जाऊन सगळे" मुलं खिकीखिकी.  कॉन्सटेबलला घेऊन मित्र बाहेर पडला (का कॉन्सटेबल मित्राला?? जाऊ दे .. ते बाहेर पडले, हे महत्वाचं)  माझ्या मित्राला "तुम्ही अध्यक्ष का?" "नाही अध्यक्ष वयस्कर आहेत ते आता झोपलेत" "अं परवानगी???" "आहे ना आहे ना लेटर दिलंय" काही वेळ शांतता "दिलंय ना?" "हो हो दिलंय दिलंय दिलंय" मान डोलावत इलेट्रॉनिक आयटम्सच्या सेल्मनसारखं उत्तर दिलं म्हणजे " हो हो बिनधास्त घ्या वॉरेंटी आहे-वॉरेंटी आहे-वॉरेंटी आहे" बहुतेक एक गोष्ट तीनदा सांगितल्या समोरच्याचे कन्विंस होण्याचे चान्स तिप्पट होत असावेत. "कंपलेट आलीय, पन आता ल्हान मुलांवर काय कारेवाई करनार? आत तर नाय टाकून चालनार" "नाही बंदच करत होतो आम्ही" ढोलकीवाला बहुतेक उठून गेला, बाकी पोरं दरवाजातून अंदाज घेत खिकीखिकी करत होती "नाही म्हना गानी, पन टाळ वगैरे कशाला वाजवता, आपलं हळू आवाजात म्हना" मध्येच आत बघत "ए झोपा रे काय चाललंय, तिकडे तेल बघ समईत, सॉरी हं साहेब तुम्हाला जरा त्रास झाला" बरंच बाबापुता केल्यावर मामा लोक गेले एकदाचे. हुश्श "अरे येडXX नो हवालदारांसमोर काय हसता? येड्या XXX साले, टाकला असता तर आतमध्ये?"  खिकीखिकी "मी नाय हा" "गप ना" "जा ना" खिकीखिकी. 

हवालदार निघून गेले. माझे मित्र आणि मी बाहेर येऊन चर्चा करू लागलो.  साला 25 वर्ष भजन करतोय तर कोण नाय आलं आणि इथे दोन नाही वाजले तर कॉन्सटेबल हजर. कंप्लेंट केली कोणी?  वेगवेगळे अंदाज निघाले.  हा नाही करणार रे, त्याच्या मस्ती आहे तो पक्का करेल, मागे गरबाही थांबवलेला. आजूबाजूचे बिल्डिंगवाले जळतात.  चर्चेचे आवाज चढू लागले.  कोणीतरी शंका व्यक्त केली ते परत आले तर? हळूहळू कार्यकर्त्यांची गर्दी विरळ झाली. साले शेपूटघाले. आम्ही चारपाच टाळकी गणपती बसतो त्या जागी आलो सतरंज्या अंथरल्या, केळी खाल्ली. मी मित्राला म्हटलं ज्याने कोणी कंप्लेंट केली असेल त्याची उद्या पक्का जळेल, दणका करू विसर्जनाला. 

सकाळी माझ्या डोळ्यावर झोपेचा अंमल असताना "हा इथे काय करतोय?" "आम्ही झोपलेलो रात्री" संवाद ऐकून उठलोच. मखर ..गणपती .. अच्छा सोसायटीतच आहोत. सकाळचे आठ वाजले होते.  आमचे पंटर्स लवकर उठून घरी जाऊन ढाराढूर पंढरपूर झाले होते. मी लोळत पडलो होतो. सकाळी ऑफीसला जाणारे गणपतीच्या सुबक मूर्तीच्या पाया पडत, मग अस्ताव्यस्त झोपलेल्या माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत निघून जात. वैतागून उठलो एकदाचा "ए काय यार सगळे कल्टी साल्यांनी उठवलं पण नाय, जाम भूक लागलीय यार" "हम्म चल" मित्राच्या रिक्षातून स्टेशनला येऊन मिसळपाव चापला, ट्रेन पकडली, नेहमी ट्रेन डुलते मी फ्रेश असतो, आज ट्रेन धडधडधड ताजीतवानी होती आणि मी तिच्यात बसून सावध डुलक्या घेत होतो. घरी आलो.  दिवसभर झोपलो. विसर्जनाचा कुर्ता पायजमा कडक इस्त्री होऊन आला होता.  ताईच्या लग्नातले फेटे शोधून काढले आणि बॅगेत कोंबले. मंडळाचं 25 वं वर्ष असल्याने वेगळाच उत्साह होता. सगळ्यांना मंडळाच्या वतीने पिवळा कुर्ता दिला होता, छोटे मोठे पोरं पोरी सगळे पिवळे, काहींच्या मते तो शेंदरी होता, काहींच्या मते तो भगवा होता, पण होता पिवळाच. फेटे आणले खरे पण बांधता कोणालाच येईनात. आम्हीच मग फेट्यासारखं काहीतरी दिसेल अशा हिशेबात फेटे डोक्याला गुंडाळले. बाहेर वाजप तालीम करत होतं.  टेंपो झावळ्यांनी, झेंड्यांनी, फुलांनी, फुग्यांनी सजवला.  मंडळाचा बॅनरही लावला. गणपतीची आरती म्हणताना प्रत्येकाचा कंठ दाटून आला होता. निर्माल्याच्या पिशव्या मागे टाकल्या, पाण्याची टाकी चिल्लीपिल्ली बायकापोरं टेंपोत ढकलली. बाप्पा टेंपोत आसनस्थ झाले. आणि नाचायला सुरुवात झाली.

दहा मिनिटांनंतर नाच रंगात आला.  जोगव्यातल्या गाण्यावर तर धमालच आली, हे गाण खरंच अंगात भिनतं.  ज्याने कोणी तक्रार केली त्याला ऐकू जाईल एवढ्या मोठ्यांदा आम्ही ओरडत होतो.  मग सोसायटीतल्या जोडप्यांना फुगड्या घालायला लावल्या.  तेवढ्यात मित्र म्हणाला ते बघ ते कालचे कॉन्सटेबल्स. हाहाहा आज आम्ही शेर होतो (निदान मंडळाने लावलेल्या दोरखंडाच्या अल्याड तरी) आम्ही अजून जोशात नाचलो. अडवून दाखवा असंचं जणू सांगायचं होतं. तीन चार तास नाचतच होतो मध्येच थांबलो वडापाव आणि थंडा प्यायलो. नंतर पुन्हा 'चलाओ न नैनो से बाण रे' वर नाचायला सुरुवात. आमची मस्ती नडली. 10.15 ला पुन्हा पोलिस आले बंद करा , म्हणून निघून गेले. बेंजोवाल्यांनी आवरतं घेतलं मग शेवटचं दहा मिनटंच वगैरे गयावया केली तेव्हा वरिष्ठ कार्यकर्ते राजी झाले आणि वीस मिनिटं नाचलो. नंतर मात्र खरोखर बंद केलं विसर्जनाच्या तलावाकडे जाताना पहिला लेफ्ट पकडला. आम्ही गप्प कसले बसतोय बेंजो थांबवला ना "ए बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया"  फूल्ल नारेबाजी.  मध्ये पोलिस येऊन आता इथे वाजवा चालेल म्हणाले, पण बेंजोपार्टी केव्हाच गेले होते. 


तलावाजवळ आलो तर काही मंडळांचं मस्त वाजवणं नाचणं सुरु होतं.  तळपायाची आग मस्तकात गेली.  पोलिस लोक तर डोक्यातच गेले होते. जरा सभोवताली नजर टाकली. बरीच गर्दी होती.  इथे पोलिस नसते तर काय झालं असतं याची कल्पना करवत नाही.  हसतमुखाने एका कॉन्सटेबलला प्रसाद घेताना बघितलं.  म्हटलं याच्या घरी आवारात चाळीत नसतील का गणपती? त्यांची पूजा आरती विसर्जन करायला यांना जायला मिळत असेल का?  म्हणजे ज्या भजनाच्या रात्री ते आम्हाला झापत होते. त्यावेळी त्यांचं कुटुंबही त्यांची वाट पाहत असेल.  आमच्या विसर्जनाच्या मिरवणूकीकडे कदाचित खुन्नसने पहात नसतीलही त्यांनाही आठवण येत असेल काही हरवत चाललेल्या क्षणांची.  सण साजरा करणारे आम्ही आणि कंप्लेंट करणारे सो कॉल्ड उच्चमध्यवर्गीय किंवा उपद्रवी सु(अति)शिक्षित यांच्या कात्रीत सापडले असतील. आता दोघांना कसं खूष ठेवणार म्हणून हळू आवाजात गाणी म्हणा टाळ वाजवू नका हा वे आऊट.  सरळ 'बंद करा ही थेरं' असं पोलिसी खाक्यात म्हणू शकले असते की? गर्दीच्या जोरावर वर्दीतल्या माणसाला आता अडवून दाखवा असा ऍटिड्यूड दाखवणं म्हणजे त्या रजा अकादमीतल्या मोर्च्यातल्या हिजड्यांसारखं नाही का? रागाला कारणं असतात आमच्याही होती.  पण वर्दीतला माणूसही आमचाच की.  हट जाम बेकार सगरी लफरी त्येच्याएला.  गणपती आला भाय आपला. ए आप .. आपला गनपती , ए बोला गणपती बाप्पा, घशाला घासून आलेला डोळ्यात गुलालाबरोबर उतरलेला पुसट अस्पष्ट  'मोरया' ... विसर्जन. तीनदा बुडवला. पहिल्यांदा बुडवला बाहेर काढला, दुसर्‍यांदा बुडवला बाहेर काढला, तिसर्‍यांदा बुडवला तेव्हा फक्त बुडबुडेच ...


- प्रसाद साळुंखे  

रविवार, १६ सप्टेंबर, २०१२

का ट्रेकींग करतो आम्ही?





















नेहमीप्रमाणे सगळ्यांच्या शेवटी पोहोचणारा मी, पण यावेळी कारणं वेगळी होती गळ्यातला कॅमेरा केव्हाच बॅगेत गेला होता, केळा वेफर्स, फरसाण टिश्यूज, गोळ्या, विडचीटर यात आणखी एकाची भर. छे बॅग खालीच ठेवून आलो असतो तर बरं झालं असतं. वाटलं इसापनितितल्या इसापसारखं खाण्याचं गाठोडं बाळगूया म्हणजे मग उतराना हात हलवत उतरलो. पण कसलं काय. धापा टाकत एकदाचा आलो. सगळ्यांचा ब्रेक चालू होता. "चला एव्हाना पोहोचायला हवे होतो, पावलं उचला" मी तर नुकताच पोहोचलेला आणि यांच्या उठायच्या वार्ता, मी जागेवरून ठिम्म हललो नाही. वाटलं "क्रॅंप क्रॅंप" म्हणून ओरडावं पण म्हटलं च्यायला कोणीतरी स्प्रे वगैरे मारायचा मग मुंग्या आलेला गरमागरम वाफाळता पाय घेऊन चालायला लागायचं. अनुभवी ट्रेकर वगैरे स्वत:च स्वत:ला लावलेली लेबल स्वत:हून काढून (काढण्याचा सोपस्कार फक्त ती लेबलं दिड किलोमीटर मागे कुठेतरी केव्हाच गळून पडली होती) बॅगेतलं सामान शिफ्ट केलं. वेफर्सची पुडकी,फरणातले शेंगदाणे सगळ्याचा मोह आवरता घेत पोटच्या नालायक मुलाला कॉलर धरून घराबाहेर काढावं तितक्याच तिरस्काराने मी ते ओझ दूर लोटलं. तरी विंडचीटर, कॅमेरा, तीन घोट पाणी एवढं वजन होतचं पण झेपेबल होतं (न झेपून सांगतोय कोणाला) ब्रेक घेतल्यानंतर थोडी तरतरी आली. पुन्हा अनुभवी ट्रेकर गप्पांमधून डोकावू लागला त्याला "माहितीय" असे लुक्सही मिळाले. समोरून चारपाच पोरं धापा टाकत येत होती "भाई ये मेरा लास्ट ट्रेक इसके बाद कभी नही, क्यो चढते है लोग? क्यो खुदको थकानेका बेकारमे? भोत लंबा है भाय" आमच्यातले काही हसले, काहींच्या कपाळाला आठ्या, आणि मी कुठेतरी वेफर्स, शेंगदाणे, मायोनिज, ब्रेडमध्ये. त्याचं निसटतं वाक्य कानावरून गेलं आणि "हो नं च्यायला उगाच" असं पुटपुटलो. दमछाक? कदाचित दमछाकीमुळे जा ना चं हो नं झालं असेल किंवा म्हटलंही असेल हो नं तितकसं आठवत नाही कारण फुल टू हालथ झालेली. डोक्यात निळी काळी वर्तुळं, मुंग्या, साखरं, लक्ष्मणरेषांचं ऍब्सट्रॅक्ट. मला चालवेना पाय ओढवेना थोडं थांबून पाणी प्यायलो, "हूश ... अजून किती बाकी आहे रे? छे अरे दमलो कुठे सहज अंदाजे?" लोकांचे अंदाज पंधरा मिनिटापासून दिड तासापर्यंत होते. अंदाज अपना अपना. मग काय? यांचे अंदाज ऐकून डोक्यात परत वर्तुळं वर्तुळं वर्तुळं मुंग्या मुंग्या मुंग्या साखर साखर साखर आणि आडव्यातिडव्या रेषा (हो मुंग्या मारायच्याच रेषा, पण बहुतेक ड्युप्लिकेट रेषा मारुन मारुन स्टेशनरीच्या दुकानात पेनं रिफिली निपा चेक करण्यासाठी ठेवलेलं एक पान झालं होतं माझं डोकं आणि मुंग्याही मरत नव्हता, दोघेही वाढतच होते) म्हटलं डोक्यात मेंदूबिंदू प्रकार असतो की नाही आपल्या का मुग्याबिंग्याच असतात? ही गोड वासची तेलं म्हणून लावू नयेत कधी. ते रुह अफजा आणि नवरत्न तेल एकसारखंचं दिसतं. बाकीही बरीचं द्रव्य रुह अफजासारखी दिसतात पण ती घरात असण्याचा चान्स नाही आणि आता तर अधिक भाद्रपद मानगुटीवर बसलाय बोंबच आहे. (हाय रे मेरी किस्मत बोंब वरून थेट बोंबिल आठवला,फ्राय बोंबिल,स्टफ्ड बोंबिल, लाल सुक्या चटणीतला फोडणी बोंबिल अहाहा असू दे असू दे .. समदुखींना सहानुभूति) पण वाईन तर द्रक्षापासून बनवतात ना? नको बडबडूस असं असंबंध वर्तुळाबरोबर द्राक्षही दिसतील द्राक्ष नाही पण वेल दिसत होते डिस्कोवेल एक दोन सेंकंदासाठीचं दिसायचे चमकते हिरवे वेल. अच्छा अच्छा म्हणजे इनशॉर्ट आय वॉज नॉट फिलींग वेल.

बस्स आता बस्स नाही पुरेच आम्ही असहकार पुकारला. पण नेमका कोणाशी? कारण आजूबाजूला तर कोणीच नव्हतं. हा तो काय समोर दूरवर दिसणार्‍या पिवळ्या टिशर्ट मधल्या ग्रुपलीडरशी (हो तोच पिवळा ठिपका) आणि त्याच्या लोंबत्यां .. (? काय रे?!!) .. लोंबत्या अन ओथंबत्या अन अजागळ (हुश निभावलं भाद्रपद मोडला असता .. काहीही) बॅगेला फॉलो करणार्‍या त्याच्या सहकार्‍यांशी. हे इतके लांब गेले तरी कधी आणि कसे? हरी कुंभाराची झाडू ढुंगणाखाली घेतलीय की काय यांनी? फोन? ... अरे ए नाय यार चिटिंग आहे यार मधल्यामध्ये फोनने असहकार पुकारावा? रेंज कुठून आणू? बरोबर तो पग एवढ्या वर कसला चालत येतोय. मरो शांतपणे बसलो , च्युइंगम चघळला, कॅमेरा काढला मस्त लॅंडस्केप्सस क्लिकले. एका फुलाचा मॅक्रो काढत होतो पण सालं सगळच धुरकट "जा काढणारच नाय फोटो" फुलाचा पोपट केला. डोंगर माथ्यापासून न्याहाळला तर वाट तशी कळत होती पण बेफिकीर होऊन चालणार नव्हतं आणि बरोबरचे तर .. च्यामारी पिवळा टिपका कुठे आहे? अरे लीडरा? चकवा? भुताटकी!!! चपे काढा च्युईंगम काढा लॅडस्केप्स काढा मेक्रो काढा. गप आता गप. डोक्याला मेंदूला मनाला फायनल वॉर्निंग पावलं उचला पटपट. हम्म बरंय वर्तुळं फुटली, मुंग्या उडाल्या, साखर विरघळली, लक्ष्मणरेषा पुसट झाली तशीही ती असून नसून सारखीच आम्ही (म्हणजे मी एकट्यानेच) चढाई सुरु केली. थोडं पुढे गेल्यावर हाकारे हुकारे ऐकू आले पिवळा ठिपका दूर शिडी वर चढत होता. म्हटलं ओ द्यायची नाही ओ दिली की अर्थ होतो की हा येतोय मग ते सगळे पुढे निघून जातात आणि आपली धांदल होते. त्यापेक्षा त्यांना आपल्याला हुडकण्यात दहा पंधरा मिनिटं जातात आणि आपल्याला निवांत सगळं बघत चालता येतं. हा अनुभवी ट्रेकर जे शिकू नये ते नेमकं शिकलाय. कोण म्हणतो अनुभवाने माणसं प्रगल्भ होतात आम्ही (इथे आम्ही म्हणजे सगळे अनुभवी अननुभवी पोरकट) पोरकट ते पोरकटच. वर जाऊन सांगू क्रॅंप वगैरे आलेला. क्रॅंप वगैरे हे कारण गांडिवासारखं एकदाच वापरता येतं कधी वापरायचं ते कळणं ही एक कला आहे. "चल ना ए पटपट काय करतो यार" कोणीतरी ओरडलं. माझी लागलीय (वाट) हे मी यथायोग्य हातवार्‍यांनी दाखवलं. माथ्याच्या जवळ जवळ पोहोचत होतो. आता कमीच अंतर उरलं होतं तसं अरे एव्हढाच होता हा तर ढ्यॅंगभरपण नाहीए ट्रेक अशा अर्भिभावात विसावलेल्या घोळक्यात जाऊन मिसळलो.

इसापाचं गाठोडं अखेर उघडलं. ब्रेड त्यावर मेहुणी (मायोनिजचं मराठीकरण) त्यावर चीज स्लाइस त्यावर केळा वेफर्स (काळीमिरीवाले .. याऐवजी सेजवान चकली किंवा टोमॅटो चकलीही टवका लागते) त्यावर ब्रेड त्यावर पुन्हा मेहुणी त्यावर सॉस असं हल्कफुल्क (?!!!) खाणं झालं. तीन घोट पाणी तर कधीच संपलेलं. पाणी आहे काय रे? पाणी आहे काय रे? असं विचारत पाणी मिळवलं. हा भरलेलं पोट, पाण्याचा घोट, किंचीत ठुसठुसता पाय आणि डोंगरमाथ्यावरचा फणफणणारा वारा मस्त पडून राहिलो. काही जण पनिया भरनको गेलो, काही कचरा आवरत होते, काही फोटो काढत होते, काही रेंज किती ते पाहत होते. थोड्या आरामाने मेंदू तरतरीत झाला तसं त्याने मघाचचा रिसायकल बिनमधला कचरा प्रश्न पुन्हा रिस्टोर केला "क्यो थकाने खुदको बेकारमे?" "का करतो ट्रेकींग आपण?" तुला काय करायचंय झोपू दे ना मला. खरं तर माझ्यासारख्याला "आपण करतो का ट्रेकींग?" (म्हणजे उत्साहापोटी रडतरडत जी काही थेरं करतो त्याला ट्रेकींग म्हणतात का अशा अर्थी) असं विचारायला हवं. पण खरंच यार जी काही झेपेबल दमछाक करतो ती का?

जरा पडूया म्हटलं तर नाही, आमचं मन तर तयारच असतं बिनातिकीट बिनापास बिनापरवाना सगळीकडे भटकायला फक्त त्याला जरा पिन मारायची. का करतो ट्रेकींग? अरे भाई सिंपल .. फोटो यार. फोटो काढायचे असतात ना आपल्याला. हे असं उंचावरून सही वाटतं फोटो काढायला मस्त डोंगररांगा दिसतात, लॅंडस्केप्स, पॅनोरामा 360 असे प्रयोग करता येतात. फुलांचे किड्यांचे मॅक्रो काढता येतात. सूर्याचा पार्श्वप्रकाश (बॅकलाईट) वापरता येतो. चिक्कार किडे करता येतात म्हणजे कधी सुळका हातात धरलाय, कधी सूर्य चिमटीत पकडलाय, कधी पाण्यावरचे परावर्तित झालेले सूर्यकिरण, साप सरडे, पानांच्या छटा, आसपासच्या लोकांचं रांगडं राहणीमान बरेच प्रकार हाताळता येतात.

बस्स फोटो एवढंच अरे जगात काही माहितीपर वगैरे असतं की नाही? असं म्हणतं आय ए एस, वैज्ञानिक, अर्थतज्ञ, हापिसातले हेडक्लार्क, बिल्डिंगचे सेक्रेटरी, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष वगैरे होता होता राहिलेले लोक या भिकारनादाचा धिक्कार करतील. पण खरंचं सनसनावळ्यांचं आणि माझा कसला तरी आकडा आहे, पहा ना आता कसला आकडा आहे तेही लक्षात नाही. आकड्यांचा आणि माझाही तसाच कसला तरी आकडा आहे तोही माझ्या लक्षात नाही. या न लक्षात राहिलेल्या आकड्याशीही माझा कसला तरी आकडा आहे (पुरे) थोडक्यात आकडे माझ्या लक्षात नाही राहत. म्हणजे "जरा सोचिये एक म्हैस नाही महेश नाही महेस आठ साल का छोटा बच्चा जो पढं नहीं पाता लिख नहीं पाता यहा तक की अपने रोजमराके मामुली काम नही कर सकता, जो उसके उम्र के बच्चे बडी आसानीसे करते है, जरा सोचिये क्या बितती होगी उस बच्चे पर? उसके सेल्फ कॉन्फिडन्सकी तो धज्जिया उडती होगी" अगदी एवढी दळभद्री परिस्थिती नसली तरी आकडाफोबिया आहे मला. हा जर एखादा रंजक पद्धतीने माहिती सांगत असेल तर मी जीवाचे कान करून फूल डॉल्बी डिजीटलमध्ये ऐकतो. उदाहरणार्थ किल्ल्यावर पाण्याचं नियोजन कसं होतं? तर बाबा पूर्वेला हा तलाव उत्तरेला तो तलाव असं मेनूकार्ड वाचल्यासारखं चार वाक्यात न संपवता, थोडं रंजक पद्धतीने सांगितलं म्हणजे तो तलाव ही गरज का होती? बांधताना काय अडचणी आल्या? तलावाला नाव कसं पडलं? असं सांगितलं की मस्तही वाटतं आणि लक्षातही राहतं. माहितीपर म्हणजे बोर मारलंच पाहिजे असं काही नाही. म्हणजे इतिहासाचं शालेय पुस्तक एकवेळ रटाळ वाटेल पण शाहिरांच्या पोवाड्याने अंगावर काटा येतो तसंच काहीसं.

वाटेत कितीही दर्‍या असल्या तरी ट्रेकींग हे एकंदरीत धाडसीच प्रकरण. तुमच्या 'चांदनी ओ मेरी चांदनी'ला शेकोटीच्या मंद मंद प्रकाशात बघणं धाडस, तिच्याशी ओळख वाढवणं धाडस, तिला तोल सावरताना हात देणं आणि ती सावरल्यावर पुढे सरळ वाटेवरही मोजून साडेतीन सेकंद जास्त वेळ हात हातात धरणं म्हणजे धाडस, मित्राला फोटोग्राफीचे धडे देत असतांना ग्रुप फोटोमध्ये तिच्या खांद्यावर हात ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न करणं म्हणजे केवळ धाडसच. पुढे फोन शेअर करणं फेसबुकाच्या 'मित्र'यादीत तिची बेरीज करणं ओघाने आलचं. धाडस सोप्प वाटायला, निदान धाडसाची सवय करायला ट्रेकींग करावंच. इतकंच काय चांदणी ट्रेकला आली नसताना तिच्या जवळच्या चांगल्यापैकी बर्‍या दिसणार्‍या मैत्रिणीला ... जाऊ दे वाक्य पूर्ण करायचं धाडस होत नाहीए, न जाणो चांदणीने वाचलं तर चांदणी वाचायची.
अजूनही अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्या हा ट्रेक शेवटचा असं म्हणू देत नाहीत. जसं की दमण्याचा अनुभव. तुम्ही शेवटचं स्वत:च स्वत:चं स्वत:शी आजूबाजूला लक्ष न देता कधी बोललात? स्वत:चे श्वास कधी ऐकलेत? दिवसभराच्या कोलाहलात स्वत:शी संवाद साधायला बर्‍याचदा वेळच मिळत नाही. जसं एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये कच्च्या मालाचं एका प्रोसेस मधून दुसर्‍या प्रोसेस मध्ये जाऊन सगळ्या प्रोसेस पार केल्यावर शेवटी फिनिश्ड प्रोडक्टमध्ये रुपांतर होतं, तसाच आपला दिवस जातो. सगळं सालं यांत्रिक संवादहीन, सतत कामाच्या फ्लोनेच जातो आपण, मनाला वाटेल तसं वहावत जायला मुभा नसते. हा फरक इतकाच की मॅन्युफॅक्चरींग युनिटमध्ये निदान फिनिश्ड प्रोडक्ट तरी मिळतं, तर इथं दिवस संपल्यावर कळतं की वी आर फिनिश्ड. सोमवारवर फुल्ली मंगळवारवर फुल्ली बुधवार फुल्ली .. शेवटी शनिवार रविवारला कृत्रिम स्माईली. पण ट्रेक्रींगला शेवटच्या टप्प्यात घामाने ओथंबलेले दमलेले असता तेव्हा स्वत:चे श्वास स्वत:ला ऐकायला येतात. स्वत:ला नव्याने आजमावतो नव्याने ओळखतो आपण. परतीच्या प्रवासात बसमध्ये ट्रेनमध्ये विचार करत असतो कुठल्या मार्गाने चाललंय आयुष्य दिवस अधिक सुंदर कसा करता येईल वगैरे वगैरे, ब्रेक हवाच.

नविन अनुभव येतात कुठे रस्ताच चुकलो, कुठे सापच आडवा आला, कुठे बॅगेवर किडेच चढले, किंवा मग बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, चुलीवरचं मॅगी, हुरडा असले खाबुगिरीचे अनुभव येतात.

डोंगरमाथ्यावर एकटे असता, वारा असतो, आभाळ भरून आलेलं असतं, डोळे मिटतात, वारा केसातून कानावरून जात असतो, कार्गो फडफड वाजतं असते, या निसर्गाचा आपण एक भाग आहोत असं नव्याने उमगू लागतं. मानव काहीतरी वेगळा हा आत्मविश्वास गळून पडतो. तो आजही दमतो, तो आजही पाण्यापाई तहानेने व्याकूळ होतो, त्याला आजही शारिरिक श्रम केल्यावर सपाटून भूक लागते, हिरवागार निसर्ग बघितल्यावर तो आजही प्रफुल्लित होतो, किड्यामुंगीत रमतो. मानवाने निसर्गाला आपलंसं केलं की नाही हा भाग अलाहिदा पण निसर्गाने माणसाला अजूनतरी पूर्णपणे दूर नक्कीच लोटलेलं नाही. पण निसर्ग डोळेझाक कुठवर करेल? अजून किती वेळ डोळे बंद ठेवून असं उभं रहायचं. आभाळ भरून येतं वारा हळवा होतो पान मुसमुसतात .. एक थेंब गालावर .. दुसरा कपाळावर त्यापाठोपाठ तिसरा पापणीखाली ... संततधार. समोरच्या बेफिकीर डोंगररांगा .. धुरकट सरींच्या पडद्याआडचं पर्दानशीं जग. दरीतल्या झाडाच्या पानांना शेंड्याला अवेगाने बिलगणारा पाऊस. निथळता निसर्ग. कानाच्या पाळीवरून एक थेंब उतरून मानेवरून ओघळत टिशर्टच्या राउंड कॉलरमध्ये विरतो. मित्रा अरे हा अनुभव घे कधीतरी आणि मग विचार "क्यो खुदको थकानेका बेकारमे?" यश चोप्रा स्टाईलीत मी 'खराखुरा' पाऊस झेलत उभा "आता जीव देतो का? चल ना यार आधीच चढतांना सतरा नाटकं तुझी" त्याच्या कपाळावर प्रश्नचिन्ह "का ट्रेकींगला येतो हा?"
















































































































































शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

मरीन ड्राईव्ह - एक हक्काचा कठडा









त्यादिवशी कितीतरी दिवसांनी वेळ काढून मरीन ड्राईव्हला गेलो. रटाळ दिनक्रम थोडा रंजक करायची लहर आली. कॅमेरा बॅगेत होताच ऑफिसमधल्या सरांच्या फेअर वेल चे फोटो काढायला घेतलेला. तीला फोन केला आणि सात वाजेपर्यंत चर्चगेट गाठण्याचं कबूल केलं.

संध्याकाळ होती आणि वातावरण ढगाळलेलं होतं. फणफणणारा वारा, उधाणलेला समुद्र आणि गच्च भरलेलं आभाळ. अशावेळी उगाचच आयुष्यातली खुसपटं काढून उगाळत बसायची बहुतेक जणांची सवय असते. पण सूर्योदयाच्या वेळी समोरचं सारं बघता बघता बदलतं. क्षणा क्षणाला समोरच्या नजार्‍यात आणि स्वत:च्या नजरेतही बदल होत जातात. सारं धुरकट, अस्पष्ट ... थोडं अंधुक होत जातं. तास दोन तास बसलात पण नक्की पाहिलत काय? असं कोणी विचारलं तर काहीच सांगता येणार नाही. "बसलो होतो .. मस्त वाटलं .. शांत वाटलं" असं तुटक तुटक काहीतरी सांगावं लागेल. म्हणून मी जराही वेळ न दवडता कठड्यावर बसायच्या आधीच या बदलांचे फोटो क्लिकायला सुरवात केली. या कठड्याचंही वेगळंच तंत्र. लांबच्या लांब आहे हा कठडा, माणसांनी फुललेला असतो संध्याकाळचा. या कठड्यावर समुद्राच्या दिशेने तोंड करून पाय मोकळे सोडून बसायचं आणि पाठ करायची मागच्या रस्त्याकडे, गोंगाटाकडे, घटनांकडे, दिवसांकडे, आठवड्यांकडे, महिन्यांकडे, वर्षांकडे, सार्‍या जगाकडे. फार प्रयत्न करावे लागत नाहीत, ह्या सलग एकसंध कठड्याने तुमच्यापुरता वेगळा भाग राखलेला असतो तुमच्यासाठी, मोठ्या मायेने. तुम्ही एकटेच असता मग कठड्यावर सगळ्यांपासून दूर. वार्‍याचा झोत केसांतून, चेहर्‍यावरून जात असतो. काहीही न बोलता मन हलकं होत असतं. दूरवरची कुठलीतरी एक लाट नजरेत पकडून ठेवावी, आणि नजरेनेच तिचा पाठलाग सुरू करावा, एका लयीत वरखाली होणार्‍या सळसळत्या पांढर्‍या फेसाळ तिने थेट डोळ्यासमोराच्या खडकाला घट्ट आलिंगन देईपर्यंत. मेडीटेशनच म्हणा ना एक प्रकारचं, पण ते डोळे बंद वगैरे करणं नाही, दिर्घ श्वास घेणं नाही की "कसलाही विचार नकोय, शांत .. हम्म ... शांत" असं मनाला कृत्रिमपणे बजावणंही नाही. पण इफेक्ट काहीसा तसाच.

सुरुवातीला इथे थोडं विचित्र वाटतं, अठरापगड जातीची माणसं बघून, प्रेमी युगुलांचे चाळे बघून, फेरीवाले, आणि मेणचट कपड्यातले भिकारी बघून, डोक्यावर हात ठेवणारे "बाबा/बेबी मा बाप का नाम रोशन करना" असं म्हणणारे छक्के बघून, पण नंतर या कठड्याचा लळा लागतोच. इतकी वाईट नसतात भोवतालची माणसं. कधी कुणी श्रीमंत तरूणी आपल्या राजबिंड्या कुत्र्याला फिरवत असते, एखादं मध्यमवर्गीय कुटुंब मोठ्या हौसेनं मरीन ड्राईव्ह बघायला आलेलं असतं, कॉलेजच्या पोराटोरांचा ग्रुप मनसोक्त बागडत असतो, कधीकधी आजी आजोबाही वॉक घेत असतात, आजोबांच्या जाड काचेच्या चष्म्यामागचं 'सुहास्य तुझे मनास मोही' माझा चष्मा चटकन टिपतो. थोडक्यात एक वेगळी संध्याकाळ अनुभवायला मिळते. थोडं मळभ असेल तर ही 'कठडा मैफल' तास दिड तास सहज रंगते. मग हळूहळू चमचमती चंदेरी रात्र या केशरीच्या कुशीत शिरु लागते, बेमालूम मिळते. मिणमिणत्या दिव्यांच्या नाजूकसा क्विन्स नेकलेस दिसू लागतो. मोठमोठ्या इमारती दिमाखात दिव्यांच्या रोषणाईचा साज लेवून समुद्राच्या थरथरणार्‍या आरशात आपलं प्रतिबिंब न्याहाळत, आपल्या उजव्या भुवईवरची एक अल्लड बटींची लड आपल्या चाफेकळी बोटांनी हलक्या लटक्या तोर्‍यात उलगडत उभ्या असतात. समुद्राच्या लाटा मंदावतात. आकाशही आवासून पाहत असतं. कुठेतरी पियानो वाजतो खरा आणि लाटांचा बॉलडान्स सुरु होतो. रात्र अधिक गडद होत जाते तसतसे नवनवे रंग मिसळत जातात. गर्दी तुरळक होत जाते शेवटी समुद्राला, रस्त्याला, आकाशाला, इमारतींना, दिव्यांना एकांत हवाच ना?

तीन किलोमीटर लांब समुद्रकिनारा असलेला हा मरीनड्राइव्हचा हा भाग जगातल्या महागड्या भागांपैकी एक आहे. इथल्या आर्ट डेको बिल्डिंगस या भागाची शोभा द्विगुणीत करतात. पारशांनी 1920 सालाच्या आसपास त्या बांधल्या आहेत आणि अमेरिकेच्या मियामी शहरानंतर इतक्या मोठ्या संख्येने आर्ट डेको बिल्डिंगस असण्याचं भाग्य या भागाला लाभतं. आणि अशा भागात माझ्यासारख्या चाकरमान्याची हक्काची जागा ... हक्काचा कठडा असण्याचं मला फार अप्रूप वाटतं.

तो चणेवाला आहे ना तिथेच कठड्यावर मी बसलो होतो. दुपारचे साडे अकरा झाले होते. या बाजूला काही काम निघालं की माझ बूड मरीन ड्राइव्हला टेकलंच समजायचं. साडे दहाचा इंटरव्हू होता. फार बेसिक प्रश्न विचारले त्यांनी ज्यांची मी धड उत्तरंही देऊ शकलो नाही. पुढच्या वेळी (?) नीट होईल सगळं असं मनाला बजावायचो. आतासा मनाला समाजावूनही वीट आला होता. "we will let you know" चा अर्थ माझ्यासाठी एकच होता. डोक्यातल्या गुंत्याप्रमाणेच टायची गाठही सुटता सुटत नव्हती. टाय जोर लावून ओढला गाठ लहान लहान होत गेली, टायचे दोन टाके तुटल्याचा कटकट असा आवाजही झाला. शेवटी वैतागून गळ्यातनं तो चुरगळलेला टाय काढून बॅगेत कोंबला. मला कॉलर नीट करायचंही भानही नव्हतं. मान आणि खांदे खाली गेलेल्या माणसाने कॉलर ताठ ठेवून चालणं फार विचित्र दिसतं. मणामणाची चार पावलं चालल्यावर कॉलर नीट केली. सगळं आतल्याआत दाबून चेहरा गर्दीतला एक करून घेतला, आणि या कठड्यावर येऊन बसलो. दुपारचे साडे अकरा वाजले होते. तो चणेवाला आहे ना तिथल्याच कठड्यावर भूतासारखा समुद्राकडे थंड नजरेने पाहत बसलो होतो. त्याने दखल घेतली नाही की विचारलंही नाही काय झालं? त्याने विचारलं नाही मग मीही सांगितलं नाही. मला हेच तर हवं होतं कोणी काही विचारू नये ना आता ना नंतर, ना इंटरव्हूबद्दल, ना नोकरीबद्दल, करियर किंवा फ्यूचर बद्दलही .. कशाबद्दलही. एक एक लाट माझ्याजवळ येऊ लागली, वारा चुचकारू लागला. "Sympathy दाखवतायत साले, गप गुमान तुमचं काम करा साल्यांनो, काय भिकेला लागणार नाहीए मी" असं काहीबाही मनातल्यामनात किंचित ओठांची थरथर करत पुटपुटलो. मात्र त्यांनी त्यांचं काम चोख केलं. माझा राग, निराशा सगळं कमी होत गेलं काही मिनिटांत. आयपॉडवर दोन एक गजल्स ऐकल्या बेफिकिरीच्या मूडमध्ये. घरी कॉल करून सांगितलं की " 'बरा गेला' नंतर कळवू म्हणतायत, दिड पर्यंत येईन जेवायला." पाकीट तपासलं. फाऊंटनला घासाघीस करून एक दोन पुस्तक घेण्याइतपत होते. निघायला हवं. त्या हरामखोरांना जाता जाता थॅंक्स म्हणालो. Sympathy दाखवत होते साले.

इथे आलं की आठवणींच्या लाटा मनाच्या दारावर आदळत राहतात, तसं दार उघडून जुनं उगाळत बसायची आपली सवय नाही :) पण लाटही किती हट्टी तेवेढ्यातल्या तेवढ्यात दाराखालच्या फटीतून येऊन हळूच पायाचे तळवे भिजवून जातेच, आता भिजलोच आहे तर येऊ देत दुसरी लाट. येण्यार्‍या लाटेची चाहूल जाणवतेय, पायाची बोटं लाट येण्याआधीच अंग मागे सारत हुळहुळण्याची पूर्वतयारी करताहेत, आक्रितच पाय लाटेच्या वाटेकडे डोळे लावून बसलेत जणू.

रविवार, ६ डिसेंबर, २००९

सुप्त इच्छांचं कलिंगड








आपल्या मनातल्या काही सुप्त इच्छा फार मजेशीर असतात. वाटतं असं प्रत्यक्षात झालं तर? मज्जा ... एकटं बसून असलो म्हणजे आपण नेहमी एखाद्या चिंतेतच असायला हवं असं काही नाही. एकटं असतांना भूतकाळातले मजेशीर किस्से आठवून हसतोच ना कधीकधी? तसंच आपल्या मनातल्या या सुप्त इच्छा आपल्यापुरत्या खर्‍या करून घेतो, कल्पनेची जादूई कांडी फिरते, काळ वेळ स्थळ सारं बदलतं आपल्याला हव्याहव्याशा रुपात, डोळ्यात वेगळीच उत्साहाची लकाकी येते, चेहरा आपोआप हसरा होतो, मन प्रसन्न होतं, त्याचे चोचले पुरवल्याचं त्याला अप्रूप असेल कदाचित.

हे असं एकटं असताना होणं बरं असतं, पण कधीकधी माणसांमध्ये वावरताना मनाच्या आगाऊ घोड्याचा लगाम सुटतो, कधी ट्रेनमध्ये बसमध्ये अचानक आपण हसतो, आणि मग मख्ख चेहर्‍याने इकडे तिकडे बघत, केसावरून हात फिरवत, जास्तीच हसायला आलं तर घाम टिपण्याचा बहाणा करून हास्यस्फोट दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, असे प्रयत्न करताना शिंक खोकला यांचा सूवर्णमध्य साधल्यासारखे अत्यंत दुर्मिळ असे ध्वनि लोकांना ऐकण्याचं भाग्य लाभतं, काय सालं मनमोकळं हसायची पण चोरी, लगेच वेडाची शंका घेतात लोक, हसणं आवरण्याचा प्रयत्न झाला तर त्यांची खात्रीच पटते. अर्थात मला अशा 'याला तज्ञांची गरज' आहे वाल्या नजरांची सवय आहे. मुळात मी आळशी. मला माझी झोप फार प्रिय. या ध्येयवाद्यांच्या युगात अशी इच्छा मनात निर्माण होणं म्हणजे शापच म्हटला पाहिजे. एखादा ओळखीतल्यापैकी तीशी पस्तिशीतला माणूस विचारतो "तुला कशात इंटरेस्ट आहे?" त्यावर मी " मला ... अं ... मला ना झोपायला आवडतं, ते डिस्कवरीत दाखवतात तसं कुठल्याशा नदी तलावाकाठी आळसावलेल्या अंगाने उन्ह शेकत काहीही न करता नुसतं दिवसभर पडून राहणार्‍या मगरीसुसरीसारखं नशिब हवं, कोणी उठ म्हणणारं नसतं त्यांना ... " असं सगळं एका दमात बोलून मी मोकळा होतो. तुम्ही मस्तपैकी बाहेर जेवायच्या मूडमध्ये असता, हॉटेलात जाता, बरीच चर्चा होते, सगळ्यांचे सुझाव हे जास्त तिखट असतं, हे फार गोड होईल, असं म्हणून निकालात काढले जातात, आणि तुम्ही मनात अगोदर ठरवलेलीच भाजी आणि रोटी ऑर्डर करता, वेटर नेहमीचा वेळखाऊपणा करून तुमचं चार ग्लास पाणी पिऊन झाल्यावर तुम्ही मागावलेला पदार्थ आणून गरमागरम सर्व्ह करतो, तुम्ही मग उसन्या उत्साहात (मी मागावलेलं छानच असतं, काय मागवावं ही एक कला आहे, रोजच्या हॉटेलात जाणार्‍यांना ती आत्मसात असते, या प्रकारचा) पहिला घास तोंडात घालता न घालता तोच तुमचं वेटरच्या तीन दिवस पाणी न लागलेल्या, घामट, मळक्या युनिफॉर्मकडे लक्ष जातं, अशावेळी तुमचा चेहरा जसा होत असेल तसाच काहीसा चेहरा या प्रश्न विचारणार्‍या इसमाचा होतो. आता मी हुशार, शांत, अबोल दिसतो यात माझी काय चूक? 'ते काय विचारताहेत आणि मगरीचं मध्येच काय बोलतोस?' असं माझ्या मनात येतंही पण तोपर्यंत शब्द तोंडातून निघालेले असतात. आता इतकं सगळं झाल्यानंतर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मी त्यांच्या समाधानासाठी मला सरकार दरबारी उच्चपदस्थ अधिकारी वगैरे व्हायचय असं म्हटलं तर त्यांना कितपत खरं वाटेल देव जाणो. काही सुचतच नाही अशावेळी, मग "आलोच हं" असं म्हणून मी काढता पाय घेतो. खरं तर स्वप्न, जिद्द, महत्वाकांक्षा, यशाची शिखरं वगैरे माझ्या गावीच नसतं, कशाला फुकाची दमछाक जीवाची, जे पटतं जे वाटतं ते करा. काय फरक पडतो म्हणा थांबला तो संपला, कुठे थांबता आणि कसं संपता यात खरी मजा आहे. आता तर मला वाटतं मी मगरीच्या कातडीचा होतोय हळूहळू.


माझ्या मनात मजेशीर अशा बर्‍याच इच्छा आहेत त्यातलीच एक म्हणजे प्रिती झिंटा ... कस्सल्ली गोड पोरगी ... मला वाटतं मी एकदम छोटं व्हावं (किंवा तिचा गाल झूम करावा) आणि तिच्या गोर्‍यागोबर्‍या गालाच्या उंचवट्यावर उभं राहून तिच्या खोल खळीमध्ये उडी मारून जीव द्यावा. आता तरी कळली का संपण्यातली मजा? असंलं अचाट काही मला आठवलं की खूप हसतो मी. तशा कॉलेजात बर्‍याच प्रति प्रिती झिंटा आसपास वावरल्या पण कुठलीच खळी मी खोलात शिरावं इतकी खोल नव्हती.

अजून एक सुप्त इच्छा मी कधीकाळी बाळगून होतो, ती म्हणजे कॉलेजात रोझ डे ला कोणाला तरी रोझ द्यावा, म्हणजे अगदीच कोणालातरी नाही, त्यातल्या त्यात खोल खळीला. तो एकच दिवस म्हणे सगळ्यांना वाव (wowwww!!!!) असतो रोझ रोज तर देऊ शकत नाही ना कारण रोज रोझ डे नसतो. पण हाय रे मेरी किस्मत, इकडे साधं रोजचं हाय बाय करायचे वांधे तर अख्खं रोझ देऊन काय डोंबल बोलणर मी? annuals च्या नाचाची प्रॅक्टिस चोरट्या नजरेने बघणारे आम्ही, त्यातही नजरानजर झालीच तिची तर "अरे बापरे कळलं की काय? आता लफडा, आता मॅटर" अशा विचारांनी छाती पुरती व्हाइब्रेट व्हायची, डोक्यात सायरन वाजायचे मग बॅक टू कॅंटिन. हे रोझ प्रकरण याच काय पुढच्या कितीतरी जन्मात शक्य नव्हतं. दुरून डोंगर साजरे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशा कितीतरी म्हणी त्या situation ला चपखल बसल्या असत्या. तसं अगदीच सॅंडल वगैरे काढून कुणी मारत नाही, अपमान करायचीही शक्यता कमीच, पण डोळ्यात sympathy वगैरे आणून, कृत्रिम हसून समजूतीच्या स्वरातलं काही बोलल्या की संपलच. मग ती हुरहूर, ते ताटकळत तिच्या दिसण्याची वाट पहाणं, तिच्या हसण्याने सुखावणं, पाहिलेली गोड गोड स्वप्न, डायरीतल्या रात्री गुपचूप केलेल्या पल्लेदार कविता, त्या आपल्याच कविता आपणच पुन्हा चोरून वाचनाचा आनंद या सगळ्याला एक गडद भरीव पूर्णविराम मिळण्याची भिती असायची. इथे कुठे थांबावं यातली मजा कळली. प्रवास करता करता एखाद्या छोटेखानी कौलारू मंदिरात थांबावसं वाटतं, एखाद्या नदीत पाय बुडवावेवेसे वाटतात, एखाद्या ठिकाणची डोंगरांची रांग डोळ्यात भरून घ्यावी असं वाटतं, अवखळ झर्‍याचं थंड पाणी चुंबायचा मोह होतो, एखाद्या अस्ताला जाणार्‍या सूर्यात मनातलं बरच काही उजळवण्याचं तेज अद्याप शाबूत असल्याची प्रचिती येते, मग ही सगळी ठिकाणं आपल्या अंतिम मुक्कामाचीच असतात असं नाही, पण तिकडे थोडावेळ थांबल्याने बरं वाटतं, आणि पुढचा प्रवासही चांगला होतो.


एकदा एक मैत्रिण मला म्हणाली मला ना कलिंगडात बसायचय, सही ना? कल्पना करा एक भल्लमोठ्ठं कलिंगड, त्याच्या काळ्या पाठीवर एक दरवाजा, दरवाजा हलकेच उघडून आत गेलात की थेट कलिंगडाच्या पोटात. लाल लाल गोडगोड वासाच्या रसाळ पाणीदार बर्फसदृश भिंती, पॉलिश केल्यासारखे काळ्या काळ्या बियांचे ठिपक्यांचे वॉलहॅंगिंगस, काळोखं काळोखं थंड कलिंगड आणि अंगाचं मुटकूळ करून बसलेले तुम्ही. तिचं ऐकलं आणि मलाही मग मनापासून वाटलं की कलिंगडात बसणं मस्ट आहे. पुढचा अर्धाअधिक दिवस मी कलिंगडातच होतो.

माझ्या मित्राला कोणी चपट्या (पाठून डोकं सपाट असणारे) दिसल्या की चमाट (चापट, टपली) मारायचा मोह होई, बरेचदा तो सुप्त इच्छा पूर्णही करे. मित्र सगळे असेच आक्रस्ताळी. मैत्रिणी त्यामानाने बर्‍यापैकी सौम्य. एकीला चिनी कम पाहिल्यावर अमिताभच्या पोनीला एकदा तरी हात लावायला मिळाला तर? असं झालं होतं. मित्रांनी बघितला नसावा चिनी कम नाहीतर त्यांना नक्कीच सूरपारंब्या खेळाव्याशा वाटल्या असत्या.

सुप्त इच्छा वेगळ्या आणि करियर वगैरेचे निर्णय वेगळे, असं बरेचदा दिसतं. माझा मित्र लहानपणी मोठेपणी कोण होणार? विचारल्यावर 'रिक्षा ड्रायव्हर होणार' म्हणायचा, का? तर दिवसभर रिक्षातून फिरायला मिळेल म्हणून. नंतर त्याचं मन बदललं त्याला कंडक्टर व्हावसं वाटलं. तिसरीत असताना एका मित्राने 'मी हॉस्पिटल टाकणार' पेपराचा स्टॉल टाकावा इतक्या सहजतेने म्हटलं होतं. आम्हाला त्याच्याबद्दल कोण आदर? आमच्या बॅकबेंचर्समध्ये कोणी मोठी कल्पना जरी केली तरी दाद द्याविशी वाटायची. भविष्यात आजारपणात सवलती मिळाव्यात म्हणून असेल कदाचित पण हेही फिस्कटलंच.

रस्त्याने चालताना नेहमी उजव्या बाजूने चाला, वगैरे नियम असतात ना तसेच नियम सुप्त इच्छांच्या जादूच्या प्रयोगांना असतात. उदाहरणार्थ,

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

हे गाणं ऐकल्यावर केवळ आणि केवळ चॉकलेटचा बंगलाच डोळ्यासमोर यायला हवा. मग चॉकलेटचा बंगला चिकट होईल, वितळेल, चॉकलेटला बुरशी धरेल असं काही मनात येत नाही आणि येऊही नये. पुढे 'बिस्किटांच्य गच्चीवर मोर छानछान' म्हणताना सोबतीला तुम्हाला बिस्किटांच्या पोटातून गेलेली मुंग्यांची रांग दिसली, किंवा ही उघड्यावरची बिस्किटांची गच्ची कालांतराने मऊ होईल का? असे प्रश्न आले की सगळी मजाच गेली. प्लॅटफॉर्मवर उभं असताना ट्रेनला गर्दी असणारच असं घरातूनच जे पक्कं करून निघतात त्यांना ट्रेन कितीही रिकामी मिळाली तरी कमीच वाटते, म्हणजे कसंबसं शिरायला मिळालं तरी त्रास, मोकळंढाकळं उभं रहायला मिळालं तर बसायचं कुठलं नशिबात? म्हणून त्रास, बसायला मिळालं तर आम्हाला नेमकी फोर्थसीटच मिळणार म्हणून त्रास, आणि चांगलं पाठ ठेकून बसायला मिळालं तर विंडोसीट मिळाली असती तर बरं झालं असतं म्हणून त्रास, आणि चुकूनकमाकून विंडोसीट मिळालीच तर रम्य झोपडपट्ट्या, नाले, टोलेजंग बिल्डिंगस, रस्ते दुकानं, झाडं, पक्षी बघायचं सोडून गजांवर कोणीतरी थुंकून ठेवलंय आणि त्या शिंतोड्यांवर सारखं लक्ष जातय म्हणून त्रास, म्हणजे परिस्थिती कशीही असो कपाळावरची आठी स्थितप्रज्ञ. ते अर्थशास्त्रात म्हणतात ना 'other things being equal' तसं कल्पनेच्या विश्वात रमताना काही भोचक शक्यतांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं आपल्याच सोईचं असतं.

पण कित्येकदा आजूबाजूचे तुम्हाला अशी डोळेझाक सहजासहजी करू देत नाहीत. मग एखाद्याच्या रंगाकडे किंवा प्रकृतीकडे बघून "तुला 'ही' पटणार?" असं तिरस्काराने बोलून त्या प्रेमवीराला वास्तवाची जाण करून दिली जाते. पण माझ्यासारखे फटकळ लोक लोकांचे हे मनसुबे तडीस जाऊ देत नाहीत. "रंग, प्रकृती, चेहर्‍याची हातापायाची ठेवण, आवाज हे सारं निसर्गाने दिलेलं मग अमूक एक म्हणजे सौंदर्याची खूण आणि अमूक एक म्हणजे कुरुपतेचं लक्षण हे माणूस का ठरवतो? अर्थात हा प्रश्न माणसांसाठी आहे तेव्हा कृपया तुम्ही विचार करायची तसदी घेऊ नका" असे शालजोडीतले देऊन माझ्या मुद्द्यावर (आणि मुलीवरही) मी ठाम राहतो, असं झालं की माझ्या तोंडावर उघडउघड बोलणं ही बर्‍याच जणांची सुप्त इच्छाच बनून राहते.

काही लोकांच्या काही सुप्त इच्छा ओळखायला फार प्रयत्न करावे लागत नाहीत. सलमानचे फोटो पाहून जिममध्ये तासनतास घाम गाळणारे त्यातलेच. तुम्ही कुठल्याही मैदानात जा (तशी उरलीत कितीशी? हा शोधाचा विषय आहे) आगरकर, हरभजन, झहीर यांच्या शैलीत गोलंदाजी करणारे आढळतात त्यातले मलिंगा, शोएबसारखे chucking करणारे (फेकाडे) बघताना मस्त वाटतं, जीव तोडून धावत येतात आणि बुंध्यात चेंडू मारतात, कमालीचे आक्रमक वाटतात पण वेग बेताचाच असतो. गाण्याच्या रिएलिटी शोजमध्ये सोनू निगम, सुरेश वाडकर, आशाताई, सुनिधी यांचे बरेच झेरॉक्स दिसतात, अर्थात ते कॅनॉन झेरॉक्स की साधे गिचमिडे काळपट झेरॉक्स हा भाग अलाहिदा. ह्या लोकांच्या सुप्त इच्छा लगेच ओळखता येतात, पण काही छुपे रुस्तुम असतात, जसा एखाद्याचा गाता गळा पिकनिकला भेंड्या खेळताना मंत्रमुग्ध करतो, एखाद्या जन्मजात अरसिकाच्या वहीत अचानक एके दिवशी सुंदरशी कविता सापडते, एखादी व्यक्तीचित्राची हुबेहूब काढलेली रांगोळी आपल्यासोबत चार-पाच वर्ष काम करणार्‍या मित्राने काढलीय हे पाहून आपण अचंबित होतो. असं लपवणं वाईट नव्हे खरं तर ते एक प्रकारे आपल्याला अनपेक्षित असा सुखद धक्काच देतात, आणि माणसं बघायला आपण किती चुकतो याचीही ठळक जाणीव करून देतात.

आता हे कोणीतरी वाचेल आणि वाईटबरी टिप्पणी देईल अशी सुप्त इच्छा आहे. नाही जरी दिलीत तरी वाचल्यावर कळलं असेलच की कल्पनेच्या विश्वात सगळंच मिळतं. पण कल्पनेच्या विश्वात जावं तरी कसं कल्पनाच विश्वात नसतांना?, हो ते गजनीत आमीरच्या छातीवर लिहिलय ना 'Kalpana was killed'.