नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

अनुत्तरीत ...


गच्चीतला संध्याकाळचा एकांत ... 
मी क्वचित उभा राहतो असा एकटा, 
टेकून हाताचे कोपरे.  
बुडता सूर्य, 
आणि  लगबगीने घरी परतती पावले.  

मध्येच मंद वारा वाहून जातो, 
मला एकटा पाहून जातो,
बॅकग्राऊंडला ट्रेनचा आवाज ... 
शांतता किंचित भंग करणारा.  
पण वातावरणात बेमालूम मिसळणारा.  
म्हणूनच थोडा हवाहवासा. 

मग पुसट होत जाणारी ट्रेन आणि मंद होत जाणारा आवाज ..

पाववाल्याच्या सायकलचा नाद, 
रेडिओचे धूसर स्वर,
दर्ग्यातून बाहेर पडणारे आलाप,  
अगरबत्तीचा सुवास, निरंजनाची ज्योत, शुभंकरोती ..   
या सगळ्याचा मिलाप हवाच.  

टाकीच्या पाइपातून ठिबकणाऱ्या पाण्याने कावळ्याची तहान भागतेय.  
सूर्याच्या डोळ्यावर मात्र हळूहळू अंधारी साचतेय. 
कुठे चहाचे झुरके घेत रंगवलेले किस्से,
तर कुठे कोंडलेल्या मुलांचे दमलेल्या पालकांशी हितगुज ..  
आणि बऱ्याच आजीआजोबांचा नेहमीचा ठरलेला संध्याकाळचा देवळापर्यंतचा फेरफटका.  
अमक्याअमक्याचा तो आणि तमक्यातमक्याची ती आहेतच,
नेहमीच्या ठिकाणी, 
आणि अगदी ठरलेल्या वेळेवर.  
फटकळ काका आणि चोंबड्या काकूंची नजर चुकवून.  

कोणी ट्रॅफिकमध्ये पेंगुळतोय,  
कोणी बसस्टोपवर रेंगाळतोय, मिस्ड कॉल्सचा मारा करत.  
मोबाईल मधले काही मेसेज मीही मुद्दाम चारचौघात पाहत नाही, 
पण असा एकटा असलो की ते वाचल्याशिवाय राहत नाही.  

माझ्यासारखे बरेच तिकडे खाली दिसताहेत, 
बऱ्याच सिगारेटी आता मख्ख चेहऱ्याने विझताहेत ..  
मुलं खेळून दमली बहुतेक.  
मैदान शांत दिसतंय.  
जवळच  कुठेतरी  खमंग काहीतरी शिजतंय.   
संध्येच्या पापण्या हळुवार मिटताहेत,  
मोजक्याच चांदण्या नभातून हळूच डोकावून बघताहेत, 
जशा पलीकडच्या बाल्कनीतल्या शंकेखोर काकू मघापासून आतबाहेर करताहेत.  

रातराणी मस्त दरवळतेय ..   
मन जुन्या आठवणींत घुटमळतंय. 
इतक्यात पाठीत ओळखीची थाप,  
मी माझ्या जगात परत आपोआप,  
"मग काय चाललंय आज काल?"
माझ्या सो कॉल्ड मित्राचा प्रश्न.  
त्याचंच तर उत्तर शोधत होतो इतका वेळ, 
तरीही आता घरी परततो,    
अनुत्तरीत ...


- प्रसाद साळुंखे 



४ टिप्पण्या:

  1. I am not a poet, so I cant put my observations into words like you; but the experience of an evening spent on the terrace; each and every line; so common; so related and experienced in the same way; the sights the sounds and thoughts; its unreal, amazing! Salute!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, जवळपास दहा वर्षांपूर्वी लिहिलेली कविता आहे ही, अशीच त्या दिवशी खणात सापडली तर म्हटलं पोस्ट करून तर बघूया :)

      हटवा
  2. खूप छान कवीता आहे,तुमची कविता वाचून मला संध्याकाळ पूर्वीपेक्षा जास्त आवडत आहे,जरी कवीतेचा आशय वेगळ। असला तरी.

    उत्तर द्याहटवा