गच्चीतला संध्याकाळचा एकांत ...
मी क्वचित उभा राहतो असा एकटा,
टेकून हाताचे कोपरे.
बुडता सूर्य,
आणि लगबगीने घरी परतती पावले.
मध्येच मंद वारा वाहून जातो,
मला एकटा पाहून जातो,
बॅकग्राऊंडला ट्रेनचा आवाज ...
शांतता किंचित भंग करणारा.
पण वातावरणात बेमालूम मिसळणारा.
म्हणूनच थोडा हवाहवासा.
मग पुसट होत जाणारी ट्रेन आणि मंद होत जाणारा आवाज ..
पाववाल्याच्या सायकलचा नाद,
रेडिओचे धूसर स्वर,
दर्ग्यातून बाहेर पडणारे आलाप,
अगरबत्तीचा सुवास, निरंजनाची ज्योत, शुभंकरोती ..
या सगळ्याचा मिलाप हवाच.
टाकीच्या पाइपातून ठिबकणाऱ्या पाण्याने कावळ्याची तहान भागतेय.
सूर्याच्या डोळ्यावर मात्र हळूहळू अंधारी साचतेय.
कुठे चहाचे झुरके घेत रंगवलेले किस्से,
तर कुठे कोंडलेल्या मुलांचे दमलेल्या पालकांशी हितगुज ..
आणि बऱ्याच आजीआजोबांचा नेहमीचा ठरलेला संध्याकाळचा देवळापर्यंतचा फेरफटका.
अमक्याअमक्याचा तो आणि तमक्यातमक्याची ती आहेतच,
नेहमीच्या ठिकाणी,
आणि अगदी ठरलेल्या वेळेवर.
फटकळ काका आणि चोंबड्या काकूंची नजर चुकवून.
कोणी ट्रॅफिकमध्ये पेंगुळतोय,
कोणी बसस्टोपवर रेंगाळतोय, मिस्ड कॉल्सचा मारा करत.
मोबाईल मधले काही मेसेज मीही मुद्दाम चारचौघात पाहत नाही,
पण असा एकटा असलो की ते वाचल्याशिवाय राहत नाही.
माझ्यासारखे बरेच तिकडे खाली दिसताहेत,
बऱ्याच सिगारेटी आता मख्ख चेहऱ्याने विझताहेत ..
मुलं खेळून दमली बहुतेक.
मैदान शांत दिसतंय.
जवळच कुठेतरी खमंग काहीतरी शिजतंय.
संध्येच्या पापण्या हळुवार मिटताहेत,
मोजक्याच चांदण्या नभातून हळूच डोकावून बघताहेत,
जशा पलीकडच्या बाल्कनीतल्या शंकेखोर काकू मघापासून आतबाहेर करताहेत.
रातराणी मस्त दरवळतेय ..
मन जुन्या आठवणींत घुटमळतंय.
इतक्यात पाठीत ओळखीची थाप,
मी माझ्या जगात परत आपोआप,
"मग काय चाललंय आज काल?"
माझ्या सो कॉल्ड मित्राचा प्रश्न.
त्याचंच तर उत्तर शोधत होतो इतका वेळ,
तरीही आता घरी परततो,
अनुत्तरीत ...
- प्रसाद साळुंखे