नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

रविवार, ७ जून, २००९

धूळ ...

अशी सरली वर्षे जसा उडावा कापूर ...
फडफडली काही पाने झटकली धूळ ...

आज सुका चाफा तरारला पुरेपूर
सुरुवात होते अशी नष्ट म्हणता समूळ

हा रुमाल फुलांचा नेतो तिथे दूर
ते भातुकलीचे घर .. शेंगदाणा थोडा गूळ

काही लिहायचे मीही, थोडे छेडायचे सूर
तेव्हा भरायचा ऊर .. आता वाटे सारे खूळ

होता नजरेत माझ्याही नव्या आशांचा पूर
आता उरले फक्त हे डबके गढूळ ...

केव्हा? कधी ? कसा? सारा पालटला नूर
दृष्ट लागली अशी की झाले आयुष्य मचूळ ...

तुझ्यामाझ्यामध्ये होता भकास तो धूर,
भरधाव सुटली ती ... मागे डायरीची धूळ . . .

-प्रसाद 

४ टिप्पण्या:

  1. kharach khup chhan ahe
    junya athavani athavalya ki asach kahise vatate.
    mala evade kavitet kahi kalat nahi, tarihi kavitetalya bhavana olakhu shakate.

    उत्तर द्याहटवा
  2. खरं म्हणजे मलाही तितकसं कळत नाही कवितेतलं. भावना कळतात तेवढं पुरे. शेवटी कविता म्हणजे भावनांची वैशिष्टपूर्ण मांडणी. सध्या भावना कळताहेत मला भविष्यात कविताही कळतील अशी आशा बाळगूयात आपण.

    प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  3. काही लिहायचे मीही, थोडे छेडायचे सूर
    तेव्हा भरायचा ऊर .. आता वाटे सारे खूळ

    होता नजरेत माझ्याही नव्या आशांचा पूर
    आता उरले फक्त हे डबके गढूळ ...

    केव्हा? कधी ? कसा? सारा पालटला नूर
    दृष्ट लागली अशी की झाले आयुष्य मचूळ ...

    Nice...one can relate even if his or her context may be different. Good work.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. फार वर्षांपूर्वी लिहिलेली कविता आहे ही, इथे पोस्ट केली २००९ साली, मला वाटलं या कवितेवरही 'धूळ' बसली असेल, पण अचानक तुमची प्रतिक्रिया आली आणि मस्त वाटलं, चुरापावच्या गाडीला भेट दिल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद aJp

      हटवा