नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

मंगळवार, १६ मार्च, २०२१

असा घडला - पं. ग. रा. सावंत

मालवणी भाषा म्हणजे कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय. या पुस्तकाच्या नावाखालीच 'मालवणी भाषेतील एक ज्वलंत सत्यकथा' असं लिहिलं आहे, त्यामुळे हे पुस्तक वाचण्याची फार उत्सुकता होती. 

ही पं. ग. रा. सावंत यांची आत्मकथा आहे, ज्यात ते त्यांच्या संघर्षाची यशोगाथा सांगतात. कणकवलीतल्या गरीब कुटुंबात लेखकाचा जन्म होतो. तिथून ते मुंबईला येऊन कसे तग धरतात याची ही सत्यकथा आहे. दारिद्र्य त्यांना आप्तस्वकीयांचे खरे चेहरे दाखवतं. मग ते गावच्या लोकांनी मोलकरणीचा लेक म्हणून हिनवणं असो, पैशाअभावी गावच्या दुकानदाराने दुकानातून शिव्या घालून हाकलून देणं असो, की मुंबईला काही पूर्वकल्पना न देता नातेवाईकांनी घरातून अपमानित करून हाकलून देणं असो. या कठीण प्रसंगातही लेखकाची देवावरची आणि मेहनतीवरची श्रद्धा ढळत नाही. याचंच फळ म्हणून की काय त्यांना कष्टाळू, सोशिक, स्वाभिमानी आणि धीट अशी सहचारिणी लाभते. हे दोघे मिळून लहान भावंडांच्या लग्नापर्यंतच्या जबाबदाऱ्या, आणि गरिबीत ओढवलेली कर्ज फेडायचा प्रयत्न करतात. हा संघर्ष वाचण्यासारखा आहे. पुस्तकाची भाषा फार अलंकारिक नसली तरी लेखकाला काय म्हणायचं ते आपल्याला कळतं. बरेचसे संवाद मालवणी भाषेत असल्यामुळे या पुस्तकातून  कोकणच्या लाल मातीचा गंध अनुभवायला मिळतो. 

जातीयवाद आजही आपल्याला जाणवतो, मग १९६५ च्या सुमारास तर चित्र किती कठीण असेल. पण लेखकाला या बाबतीत वेगळे अनुभव आलेत, लेखक पटेल समाजाचे पण त्यांना मुंबईत जाऊन नोकरीला लाव अशी विनवणी करायला आई जाते जातीने महार असलेल्या मानलेल्या भावाकडे. तोही आपल्या या भाच्याला न्यायला आनंदाने तयार होतो. नुसता सांगकाम्या किंवा जुलमाचा रामराम म्हणून नेत नाही तर सबंध प्रवासात लहान लेखकाची काळजी घेतो, त्याला चहा, जेवणखाण देतो, आणि मुंबईत आल्यावरही चड्डी, बॉडी, अंगावरचे एक जोडी कपडे, चादर लेखकाला विकत घेऊन देतो, आणि वर रुपयाचं नाणं लेखकाच्या खिशात टाकतो, सुरुवातीच्या काळात होणाऱ्या खर्चासाठी.  त्यामुळे लेखकाला या समाजाबद्दल खरोखर आदरभाव मनात आहे. हा प्रसंग वाचतांना, किंवा लेखकाला त्या काळी जे जे मदत करतात ते वाचतांना लेखकासोबत आपणही गहिवरून जातो. जगातल्या वाईटपणाचा जसा राग येतो, तसा या लेखकाच्या वाट्याला आलेल्या अपवादात्मक चांगुलपणाच्या गोष्टी आपलं मन प्रफुल्लित करतात, आणि माणसाच्या चांगुलपणावरचा विश्वास वाढतो.

गावावरून मुंबईत येणाऱ्या पहिल्या पिढीचा संघर्ष हा आताच्या पिढ्यांनी खरोखर समजून घ्यावा. खिशात दमडा नसलेल्या अवस्थेत आपण रहात असलेल्या ठिकाणापासून काही तासांच्या अंतरावर आपल्याला सोडलं तर घरी कसे परतू या विचाराने आपण पुरते कासावीस होतो. आणि ही मंडळी अशा कफल्लक अवस्थेत मुंबई गाठत, स्थिर आसरा नसे, उधार उसनवार करून मर मर कष्ट काढत, मुंबईत पुढच्या पिढीला हक्काचं राहतं घर करेपर्यंत यशस्वी वाटचाल ज्या आत्मविश्वासाने करत त्याला खरोखर सलाम. लेखकाचा संघर्ष वाचताना आपल्याला मुंबईत स्थायिक होऊ पाहणाऱ्या पहिल्या पिढीचा संघर्ष समजतो, आणि त्याबद्दल एक कृतकृत्य भाव मनात जागतो. 'हे मी मिळवलं' म्हणताना तीन पिढ्यांचा संघर्ष त्या मागे आहे याची जाणीव आपल्याला होते, अन्यथा विकासाची स्वप्न बघण्याऐवजी मूलभूत गरजांची पूर्तता करण्यातच जन्म संपला असता. 

हे पुस्तक जरूर वाचा, आणि घरातल्या थोरा मोठ्यांना ते मुंबईत स्थायिक झाले त्यावेळच्या आठवणी नक्की विचारा. अनुभव सांगताना म्हाताऱ्या डोळ्यात दैवाचं कौतुक, हसण्यात समाधान, सुरकुत्यांमध्ये संघर्ष, आणि रापलेल्या चेहऱ्यात करारी तारुण्य नक्की दिसेल. आलेले अनुभव प्रतिक्रियांमध्ये लिहायला विसरू मात्र नका.


- प्रसाद साळुंखे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा