नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

मंगळवार, ९ मार्च, २०२१

माचीवरला बुधा - गो. नि. दांडेकर

'माचीवरला बुधा' हे पुस्तक वाचलं आणि वाटलं आपण किती गुंतून जातो व्यवहारिक जगात. शेवटच्या श्वासापर्यंत प्लॅन्स करत राहतो नानाविध, शरीरात नळ्या वगैरे खुपसून, औषधं, इंजेक्शन्स घेऊन जगायची खटपट. जगायचं कुठवर आणि कशासाठी याचे चुकलेले हिशोब आपण घेऊन बसतो. मग हा देह कुठल्याशा इस्पितळात वेदना भोगून चिंतातूर चेहऱ्याने मरण पावतो. वॉर्ड बाहेर सगळे आवराआवरीच्या तयारीला लागतात. केलेल्या इन्शुरन्सचं, रिटायरमेंट प्लॅनचं काय होतं माहीत नाही, करणारा त्या सगळ्याच्या पल्याड गेलेला असतो. वाडवडिलांच्या मातीपासून शेकडो किलोमीटर दूर कुठेतरी याला अग्नि देतात, आणि संपतं एकदाचं. आयुष्यात काय केलं तर अमुक एवढं तोळे सोनं, एवढ्या एफडीज, एखादा फ्लॅट, आणि निष्कारण वाहिलेल्या चिंता. हेच थोड्याफार फरकाने शहरी आयुष्याचं फलित.

पण तरी फार थोडे लोक आयुष्याचा वेगळा निर्णय घेतात. बऱ्याचदा ते वेडे ठरतात. काय साधलं? असा खोचक प्रश्नही त्यांना विचारला जातो. पण मूळात काही साधायचं नसतं त्यांना आयुष्याचे शेवटचे क्षण त्यांच्या मर्जीने निसर्गाच्या सानिध्यात घालवायचे असतात. 'आलो मातीत, जाणार मातीत' हा इतका साधा सोपा विषय, पण समजायला एक आयुष्य पुरं पडत नाही.

बुधा सारखा एखादा असा निर्णय घेऊ शकतो. म्हातारं शरीर, अधू दृष्टी पण वाडवडीलांच्या जमिनीच्या सेवेत, निर्सगाच्या सानिध्यात रहायची दुदर्म्य इच्छाशक्ती या जोरावर बुधा मुंबईची बजबजपुरी सोडून आपल्या गावी राजमाचीला जातो, आणि तिथे राहायचं निश्चित करतो. जागा निवडतो तेही राजमाचीवरून दिसणारं ट्येमलाईचं पठार. त्याच निर्मनुष्य पठारावर स्वतःच झोपडं बांधून तो राहायला सुरुवात करतो. तिथला निसर्ग न्याहाळत त्याचा दिवस मस्त जातो. साऱ्यापासून दूर पठारावर एकटं जगायचा निश्चय जरी असला तरी माणूस म्हटलं की गुंतणं आलं, गोतावळा आलाच. बुधाचे सोबती त्याच्या नकळत बनत जातात, जसं आवळीबाई, उंबर बाबा, खारुताईचं कुटुंब, चिमण्या, बकऱ्या, आणि सदैव सोबत असणारा त्याचा कुत्रा. या सगळ्यांसोबत एक नवा बंध निर्माण होतो एक नवं आयुष्य आकार घेतं. याचा एक अनोखा दिनक्रमही असतो. रोजच्या अनोख्या दिनक्रमातलं टेकाड्यावरल्या नांदुरकीच्या झाडावरून पायथ्याचं तळकोकण न्याहळणं, ठराविक वेळी पठारावरून जाणाऱ्या विमानाची वाट पाहणं, त्याच्या इतर सोबत्यांच्या खाण्यापिण्याची सोय लावणं, हे सारं तो हसतमुखाने करतो. त्याचे हे ट्येमलाईच्या पठारावरील अनुभव वाचताना आपण त्याच्या अधू डोळ्यांनी तो निसर्ग पाहू लागतो, आयुष्यात पहिल्यांदा आपल्यालाही आपला श्वास त्या शांततेत ऐकू येतो, आणि ह्रदयाची स्पंदनं कागदोपत्री नाही तर खरोखरीच जिवंत असल्याची अनुभूती आपल्याला देऊन जातात.

११२ पानांचं हे पुस्तक, आयुष्याचा पुन्हा विचार करायला भाग पाडतं. पुस्तक वाचल्यानंतर आयुष्य इतकं सोपं करून जगणं ही फार कठीण गोष्ट वाटायला लागते खरं तर. पुस्तक वाचतांना वाटतं की आयुष्यात एका अंतिम टप्प्यावर तुम्ही ज्याला पूर्णविराम समजता तो कदाचित स्वल्पविराम असेल आणि त्यानंतर जे काही स्फुरेल त्याने संपूर्ण आयुष्यरुपी वाक्याला नवा अर्थ प्राप्त होईल. पुस्तक नक्की वाचून बघा आणि सांगा की तुम्हालाही असा नवा अर्थ सापडतो का.

- प्रसाद साळुंखे

२ टिप्पण्या: