नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

तत्वमसि - ध्रुव भट्ट

तत्वमसि 
मूळ गुजराथी कादंबरी लेखन - ध्रुव भट्ट
मराठी अनुवाद - अंजनी नरवणे

' तत्वमसि ' उपनिषदातलं खूप गहन अर्थ असलेलं, वरकरणी एक शब्द पण वास्तवात एक महावाक्य. नावापासूनच वेगळेपण जपणाऱ्या ध्रुव भट्ट लिखित या मूळ गुजराथी पुस्तकाचा अंजनी नरवणे यांनी फार उत्तम मराठी अनुवाद केला आहे. भारतीय संस्कृतीत नेमक्या कुठल्या धाग्याने विविध धर्माचे , पंथाचे, जातीचे, स्तरातले लोक बांधले गेले आहेत यावर सर्वांगाने विचार करायला हे पुस्तक भाग पाडतं. अध्यात्मिक विचार करायला लावणारं पुस्तक असूनही हे बोजड प्रवचनाने, वा चमत्काराने भारलेलं नाही. 

' सारं थोतांड आहे ' असा असंवेदनशील उद्धट पुरोगामी सूर नाही, वा असं मत मांडणाऱ्याना खोडून काढलं आहे असंही नाही. संस्कृतीचा प्रवाह काठावर बसून अभ्यासून त्यावर आपल्या बौद्धिक वकुबानुसार उथळ वरवरची मतं प्रदर्शित करण्यापेक्षा, त्या प्रवाहात उतरून तिची गुपितं जाणून घ्यायचा हा फार सुंदर प्रवास आहे.

यातला कथानायक हा परदेशातून 'मानव संसाधन विकास' या विषयावर काम करायला आदिवासी पाड्यात राहतो. आपली मतं घेऊन आलेला तो, आणि निसर्गाच्या सहवासात, अस्सल मातीतल्या रानावनात वाढलेल्या माणसांच्या सानिध्यात राहून हळूहळू बदलत चाललेला कथानायक हा फार भावतो. हा परदेशातून आलेला वगैरे उल्लेख केला म्हणून सरळसोट ' स्वदेश ' वगैरे सारखं थोडं फिल्मी कथानक आहे असा गैरसमज होऊ शकतो, पण पुस्तक जरा वेगळं आहे. चोखंदळ वाचकांना वाचायला आवडेल असं आहे. अडाणी मागासलेले समजल्या जाणाऱ्या आदिवासींना शिकवण्यासाठी शाळा जशी गरजेची आहे, तसंच त्यांचीही कौशल्य, समज, मेहनत, निसर्गाचा आदर, प्रामाणिकपणा, जगण्यातली सचोटी पुढारलेल्या समजणाऱ्या आपणही आत्मसाद करणं गरजेचं आहे, कारण त्यांना कदाचित या देशाला भारत म्हणतात हे माहीत नसेल, पण भारतीय संस्कृती तेही टिकवतात कदाचित आपल्यापेक्षा जास्त प्रमाणात टिकवतात. 

संस्कृती म्हटलं तर नद्यांना वगळून कसं चालेल. भारतीय संस्कृतीचा प्रवाह जणू नदीच्या प्रवाहापासून वेगळा होतच नाही. उत्तर आणि दक्षिण या दोन भागांत नर्मदा नदी आपल्या देशाला विभागते, वा लेखक म्हणतो त्याप्रमाणे वेगळा विचार करायला झाल्यास या दोन भागांना ही नदी बांधून ठेवते. एवढी माणसं , अनेक जीवजंतू, प्राणिमात्र, इतिहास , अनेकानेक स्थित्यंतरं जपणारी ही नदी निर्जीव तरी कशी म्हणावी. मूळात पाणी म्हणजे जीवन, आणि या जीवनाचा स्त्रोत म्हणजे आईच की. 

ही नर्मदा लेखकाला नानाविध रुपात प्रवासात, जंगलातल्या वास्तव्यात भेटते, आणि आकर्षित करते. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांची सुरुवातीला निरिच्छेने का होईना पण सेवा करायची संधी नायकाला गवसते, आणि या परिक्रमेतलं साहस, गूढ याने कथानायक अचंबित होतो. पृथ्वीवर नदीवर श्रद्धा असणारं दुसरं कुठलं उदाहरण त्याला आठवत नाही. 

वाजपेयीजी म्हणतात त्याप्रमाणे ,

'यह चन्दन की भूमि है, अभिनन्दन की भूमि है,
यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है।
इसका कंकर-कंकर शंकर है,
इसका बिन्दु-बिन्दु गंगाजल है।'

भारतीय संस्कृतीचा हा सामान्यातल्या सामान्य माणसात आढळणारा सर्वसमभाव, नर्मदेची निर्मळता, कडेकपारींची स्थितप्रज्ञता, सूर्याचं तेज, चांदण्याची शीतलता, झाडांपेडांची परोपकारी वृत्ती या साऱ्याचं सार असलेली आणि आपल्या खूप आत रुजलेली ही संस्कृती लेखक छोट्या छोट्या उदाहरणांनी खूप सुंदररित्या अगदी सहजतेने समजावून सांगतो.

यातल्या कथेतल्या कथानायकाचं 'मानवी संसाधन विकास ' या विषयावर लिहायचं काम संपतं, की भारत भेटीने काम संपलं वाटत असताना स्वत:तलं ब्रम्ह गवसून त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात होते, हे जाणण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. 
 

-प्रसाद साळुंखे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा