नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

गुरुवार, २० सप्टेंबर, २०१२

फ्रेममधला म्हातारा


ती रात्र आठवतेय क्षुल्लक कारणाने झोपमोड साली
जेव्हा चौथ्या माळ्यावरचा म्हातारा गेला
चाळीतल्या मुलांचा उत्साह दांडगा अशा बाबतीत
वेळ मोडणार बुर्जीपाव चापून यावा शिस्तीत
तयारी मसणघाईच्या जोशात सुरु
मावा,सिगरेटची देवाणघेवाण लोक लागले करु
"म्हातार्‍यान नेमका रविवार पकडलान"
"पनवेलहून कोणी नातेवाईक येताहेत फोन केलेला"
"एऽऽ अमितची शलाका वर्‍हांड्यात दिसत नाय रे"
"#$%^*नो हसू नका जोरात तात्या बघताहेत"
"पुढचा नंबर रम्याच्या बापाचा काय राहिलं नाही तब्येतीत"
"छे ते अख्ख्या चाळीला खांदा देतील"
"बापाने बांधलेली अशी आण इकडे"
काम, गप्पा, टिंगलटवाळी सारं काही रंगात होतं
असलं इव्हेंट मॅनेजमेंट प्रत्येकाच्या पक्कं भिनलं अंगात होतं
रडण्याच्या आवाज अचानक वाढायचा
रडगाण्याला नवा कोरस लाभायचा
अनुभवी कार्यकर्ते समजून जायचे
त्यांचे अंदाज बरेचदा खरे व्हायचे
पहा वर्षानुवर्षे न फिरकलेल्या भावाच्या ह्रदयाला पडलीय भेग
ही तर दिर्घ आजारपणातही न फिरकलेली बिझी बापडी शोकाकूल लेक
किळस वाटते, कठीण होतं रोजचं हगणंमुतणं काढणं
त्यापेक्षा हे बरं आपल्या सोईने हंबरडा फोडणं, आणि गळे काढणं
मध्यरात्र उलटली तरी कोणीतरी नातेवाईक यायचाच असतो
आणि कितीही नको म्हटलं तरी सिगरेट, तंबाखू, चा घ्यायचाच असतो
हारांच्या ऑर्डरीचं निमित्त वेळेला येत धावून
मग प्रत्येक टोळकं बाहेर पडत एकच निमित्त घेऊन
आंघोळ पांघोळ घालून पहाटे एकदाची कवटी फुटते
म्हातार्‍याला लाखोल्या वाहून कार्यकर्त्यांची जत्रा उठते
बिझी लेक सकाळीच ऑफिस गाठते
भावाभावांची तेराव्यालाच घरावरून जुंपते
हारापाठच्या फ्रेममधला म्हातारा खदाखदा हसतो,
म्हणतो एवढं मनोरंजन झालंच नसतं जर आज मी जिवंत असतो

-प्रसाद

८ टिप्पण्या:

 1. काय बोलायचं........
  म्हातारा गेला त्या निमित्ताने "चुरा-पाव"वाला परत आला म्हणायचं का??

  उत्तर द्याहटवा
 2. नमस्कार अपर्णा,

  नाही अग वेळ मिळाला की लिहिणं होतं जरा, कधीही परत यायला मी काय युवी आहे :)

  उत्तर द्याहटवा
 3. आयचा घो... भारिये हे.. :) प्रचंड आवडलय मला.

  उत्तर द्याहटवा
 4. प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद संतोष, मरण रोजच्या जगण्यातली गोष्ट आहे, म्हणून ही कविता आपल्या विश्वातली वाटते, असेच आमच्या चुरापावच्या गाडीला अधूनमधून भेट देत रहा, मस्त वाटतं :)

   हटवा