नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम - कविता महाजन

'ब्र' आणि 'भिन्न' वाचून आवडलं तरी माझ्या आवडत्या लेखिकेच्या या कादंबरीच्या वाट्याला जायला एवढा वेळ का लागला हे कळलं नाही. 'ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम' या कादंबरीत कविता महाजन कहाणी उलगडतात पद्मजा सप्रेची. बरीच कहाणी पद्मजा सप्रेच्या प्रथम पुरुषी निवेदनाच्या ढंगाने जाते. मग आपल्याला कळतं की पद्मजा ही सिनेमा - नाट्य क्षेत्रातली एक अभिनेत्री आहे,  व्यावसायिक नाटकं करून थोड्या अनुभवानंतर आता सिनेमातल्या दिखाऊ आईच्या वगैरे भूमिका करते. रीतसर पात्र परीचयाद्वारे पद्मजा सप्रेच्या आयुष्यातली माणसं कळतात. वाटतं पद्मजा सप्रे समजली आपल्याला. मग कादंबरीत तिने लिहिलेलं आत्मचरित्र वाचतो आपण, ज्याचं नाव 'कळसूत्र'. हो या कादंबरीत आपण पुस्तकाच्या आत पुस्तक वाचतो तेही अगदी कलात्मक मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावरच्या संक्षिप्त परिचयासकट. ही शैली मला अफलातून वाटली. तर हे 'कळसूत्र' नावाचं पद्मजा सप्रेचं आत्मवृत्त वाचून होतं, मग खात्रीशीर वाटतं आता पद्मजा पुरेपूर कळली. 

पद्मजा आईच्या मायेच्या दोन शब्दांसाठी कायम आसुसलेली राहिली. दोन लग्न आणि काही प्रियकर आयुष्यात येऊन गेले पण आयुष्याला स्थैर्य असं नाही. कदाचित मनसोक्त वाहत जाणं हा तिचा स्थायिभाव होता. हळूहळू नात्यांची एक्सपायरी डेट तिलाही कळू लागते. तिच्या आयुष्यात मर्यादेसकट आलेले सारे मर्यादित पुरुष, त्यांच्याबरोबर घालवलेल्या धुंद क्षणांची स्वप्निल वर्णनं, लैंगिक सुखाचे साक्षात्कार, वयाबरोबर बदलत चाललेली अभिरुची आणि तिची या प्रत्येक नात्याविषयीची, तिच्या भावनिक गरजांविषयीची स्पष्टता, त्याबद्दलचा दृष्टिकोन पाहतांना आपण नितीमत्ता, व्यभिचार वगैरेच्या पलीकडे जाऊन प्रेमाच्या नात्यांचा विचार करतो, कधी कधी तिच्या उत्स्फूर्त जगण्याला, वागण्याला दादही देऊन जातो. तिचं एकतरी नातं यशस्वी व्हावं असं आपल्याला मनोमन वाटू लागतं. तर एक मन म्हणतं कसलं होतंय नातं यशस्वी, बोलूनचालून फिल्मी माणसं ही, सदा चंचल, त्यांचंत्यांचं धूसर चंदेरी जग, कला, बदलणाऱ्या भूमिका, बेडगी प्रेमं, व्यसनं, लोकप्रियतेची नशा, यामुळे कल्पना आणि सत्याच्या धूसर क्षितिजावर रेंगळल्यागत आयुष्य जगणारी ही माणसं.

पात्र परिचय आणि 'कळसूत्र' वाचून आपल्या मनात कादंबरीच्या पात्रांचे चांगले आणि वाईट असे दोन गट पडतात. इथून पुढे सुरू होते खरी जादू.

आत्मचरित्र म्हटलं तर काही गोष्टी हाताच्या राखून लिहीणं आलं. स्वतःवर स्तुतिसुमनं वाहणं, काही प्रसंगात बापुडवाणं दाखवणं आलं. कित्येकदा वाटतं आत्मचरित्रा पलिकडचा सच्चा माणूस कळायला हवा. इथे ही संधी मिळते, ती पद्मजाने आत्मचरित्रात न लिहिलेल्या गोष्टी वाचून. पद्मजा कळतेय कळतेय असं वाटत असताना आपल्याला कळून चुकतं की नाण्याला दुसरी बाजू आहे, प्रत्येक जण त्याच्या जागी योग्य आहे किंवा जितका दाखवला आहे तितका वाईट नाही. पद्मजा सापडली सापडली म्हणता म्हणता ती निसटते आणि पुन्हा नव्याने भेटते, ही आहे या शैलीची जादू. प्रिझम सारखं, प्रत्येक ठिकाणाहून तोच घटनाक्रम वेगळ्या पद्धतीने पाहणं हाही जादुई अनुभव आहे.

मग म्हटलं आता आत्मचरित्र झालं, त्यात न लिहिलेल्या गोष्टी झाल्या आता पद्मजा काय करेल? सेलिब्रिटीज सारखी आयुष्याच्या उत्तरार्धात खचून व्यसनाच्या आहारी जाईल, निर्माती वगैरे बनण्याच्या नादात दिवाळखोर होईल, राजकीय पक्षात अपयश आजमावून बघेल, सारी इंडस्ट्री सोडून अध्यात्माची कास धरेल, का सौ चुहे खाकर सापडेल कोणीतरी सच्चा प्रियकर फिल्मी आयुष्याचा हॅपी एंड करायला या साऱ्या शक्यता मनात डोकावतात. आणि इथे तुमच्या कल्पनांना लेखिका सुरुंग लावते. तो नेमका काय धक्का असतो. पद्मजाचं पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी नक्की वाचा.

का कोण जाणे बऱ्याच वाचक ग्रुपस् मध्ये 'ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम' या कादंबरीविषयी फारसं काही लिहिलेलं आढळलं नाही. वाचकांनी वाचन अधिक समृध्द करण्यासाठी दर्जेदार लोकप्रिय पुस्तकांसोबत अशी वेगळ्या धाटणीची पुस्तकंही आवर्जून चाळावीत.

कादंबरीच्या तसंच पुस्तकातल्या पुस्तकाचं म्हणजे 'कळसूत्र'  च्या मुखपृष्ठावरील शुभा गोखले यांची चित्रं कादंबरीला वेगळं गहिरेपण देतात, कादंबरीत इतर ठिकाणीही शुभा गोखलेंची चित्रं दिसतात, ती रंगीत असती तर माहोल जाम भन्नाट झाला असता. म्हणून  मुखपृष्ठ म्हणजे  कादंबरीच्या अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कादंबरी मस्त पकड घेते. शैली वेगळी आहे पण अनाकलनीय नाही, त्यामुळे वाचतांना आपण भरकटत नाही. थोडी बोल्ड निश्चित आहे, पण पद्मजाचं जगणं अधोरेखित करायला ती तशी असण्याची गरज होती. एकेका पुरुष पात्राची ठराविक पानानंतर नायिकेशी शारीरिक झोंबाझोंबी इतका उथळ अर्थ कादंबरीच्या शीर्षकातून व्यक्त होण्याची शक्यता आहे, पण एक तर लेखिका कविता महाजन आहेत त्यामुळे कादंबरी दर्जा असणार यात शंका नाही आणि दुसरं कादंबरीचं शीर्षक ठकी आणि तिचे पुरुष असं न ठेवता, 'ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम' ठेवण्यामागे काही अर्थ जरूर आहे, जो आपल्याला कादंबरी वाचल्यावर नक्की सापडेल.


- प्रसाद साळुंखे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा