नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

कलाकाराची एक्झीट

हे जग हा रंगमंच आहे
रंगमंचच
प्रत्येकाची आपली संहिता
प्रत्येकाच्या भूमिका वाटून दिलेल्या
प्रत्येकाच्या संहितेत प्रत्येकाची भूमिका वेगळीच
चेहरे रंगतात
चेहरे मुखवटे धारण करतात
चेहरे खरे वाटतात
खऱ्यापेक्षा बरे वाटतात
एंट्री आणि एक्झीट ठरलेली
याच्यामध्ये नेमकं काय घडतं त्यावर सगळा खेळ
एंट्रीच्या भितीवर दामटून बसलेली बेभानी
संहितेच्या पानांना संवेदना द्यायचं भान
चेहऱ्यावर पडलेला प्रसिद्धीचा क्षणभंगुर झोत
अंधारासमोर स्वप्नांनी चोपलेलं निशब्द शब्दाचं स्वगत
सारं आठवतं एक्झीट झाल्यावर
टॅक्सी करू म्हणता म्हणता
हॉल्सच्या गोळीचा रस गिळत बसची वाट पाहत बसायचं
खिशातल्या नाईटचे पैसे पूर्ण शाबूत रहावेत म्हणून
त्यांच्यासाठी
ज्यांना वाटतं
तो काय कलाकार माणूस 
मजा मारत असतो नेहमी

- प्रसाद साळुंखे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा