नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

पोहरा - ह. मो. मराठे

हे 'पोहरा' नावाचं पुस्तक आईने आणलं होतं कुठल्याशा पुस्तक प्रदर्शनातून अत्यल्प दरात. लेखक ह.मो. मराठे यांची आत्मकथा आहे. पहिला भाग 'बालकाण्ड' आणि दुसरा 'पोहरा'. माझ्याकडे पहिला भाग नव्हता म्हणून जे आहे ते वाचून बघू कळलं, मूड लागला तर पुढे वाचू म्हणत वाचन सुरू केलं. तसंही प्रस्तावनेत म्हटलेलं होतंच की ही स्वतंत्र आत्मकहाणी म्हणून वाचू शकता, आणि 'बालकाण्ड' ची शेवटची काही पानं वाचकांच्या सोयीसाठी प्रस्तावनेखाली छापली होती आणि काय हवं.

मग काय पुस्तकातल्या १३ वर्षांच्या हनूचं इवलंसं बोट धरून माझा प्रवास सुरू झाला. या हनूची दिनचर्या काय, खातो काय, शाळेत जातो का वगैरे प्रश्नांची उत्तरे मिळू लागली. शाळेत जाणे, मधल्या सुट्टीत डबा फस्त करणे, घरी येणे कपडे बदलून खाऊ खाऊन पुन्हा खेळायला जाणे इतका साधा सोपा दिनक्रम हनूच्या नशिबी नव्हता. घरी बाईमाणूस नसल्याने रांधणं तेही चूलीवर हनूच्या नशिबी आलं. अगदी चूलीसाठी लाकडं फोडण्यापासून, जमिन सारवेपर्यंत सारं. परिस्थिती बेताची असल्याने भटपणाची कामं शिकणं त्याला भाग होतो. या सोबत कसरत होती मागे पडलेलं शिक्षण घ्यायची. या सगळ्याला साथ होती ती मोठ्या भावाची. ही धडपड हा जिद्दीचा प्रवास अनुभवण्यासाठी ही आत्मकथा जरूर वाचावी. अजून एका गोष्टीसाठी हे पुस्तक वाचवं ते लेखकाचा लेखक म्हणून प्रवास कसा होतो ते पाहण्यासाठी.  शाळेत जाऊ लागल्यावर हनूला अवांतर वाचनाची ओढ लागते, पुढे कधीतरी अरे मलाही हे जमेल की असं वाटतं, मग त्याला कधी कवितेची ओळ स्फुरते कधी नाटकाचे संवाद. आणि हे आपल्याला कसं सुचलं याने हनूही अचंबित होतो. हे असं कष्टाचं बालपण आणि दिवसभराच्या कामाच्या रामरगाड्यात कुठे जोपासली असेल त्याने ही रसिकता, सर्जनशीलता. का जे मुरलं ते झिरपलं या न्यायाने लहानपणापासून मुक्याने सहन केलेले हुंदके, फावल्या वेळातलं अवांतर वाचन आणि भटपणाच्या कामामुळे मंत्रोच्चारामुळे अवचित कानावर घडणारे संस्कार याची सरमिसळ होऊन हनूतला संवेदनशील लेखक उमलत गेला.

पुस्तकाची भाषाही मस्त आहे, जास्त करून मालवणी आणि काही प्रमाणात चितपावनी वाचतांना हनूच्या बालपणाशी, मालवणच्या मातीशी आपण अजून घट्ट जोडले जातो. वाक्यावाक्याला आवशीन खाव, शिरा पडली म्हटलं कीच अस्सल मालवणी संवाद तयार होतो हा अपसमजही दूर होतो. वाचताना पुढे पुढे आपण बऱ्यापैकी गुंतत जातो, हनूला होणाऱ्या त्रासांनी आपण हळवे होतो आणि  हनूच्या एकेका यशागणिक आपली छाती फुलू लागते, ही खरंच या लेखनशैलीची कमाल आहे.

आईने जेव्हा पुस्तकाची स्वस्त किंमत सांगितली त्याच्या दुसऱ्या मिनिटाला मी मनातल्या मनात पुस्तकाचा दर्जा ठरवला होता. माझे अंदाज साफ चुकले याचा मला आनंद आहे. पुस्तक निश्चित दर्जेदार आहे. आता पुस्तकाचा पहिला भाग वाचायची कमाल उत्सुकता आहे. लिहीन कधीतरी त्यावरही पुढेमागे.

- प्रसाद साळुंखे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा