नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

वासूनाका - भाऊ पाध्ये

गावी जाणं ठरतं तेव्हा दोन तीन पुस्तकं बॅगेत असतातच. या वेळी सोबत घेतलेल्या पुस्तकांमध्ये हे भाऊ पाध्येंचं 'वासूनाका' होतं. छोटंसं पुस्तक पण नावाजलेलं. पहिली आवृत्ती १९६५ ची. पानं १४० च्या आसपास. वाटलं अस्सं उडवू वाचून. पुस्तकावरच्या लेखात आंतरजालावर पाहिलेलं की बोल्ड पुस्तक आहे, म्हणजे १९६५ च्या मापदंडाने बोल्ड असावं असं वाटलं, तेव्हा तर युगूल गीतांच्या वेळी फुलाला फुलं टेकवायचे, आता कुठलाही अवयव टेकवायचा शिल्लक ठेवत नाहीत. असेच माझे आडाखे बांधत पुस्तक वाचायला घेतलं. प्रामाणिकपणे सांगायचं माझं वाचन फार नाही, पण वाचलेलं कळतं असा माझा समज होता. पण अगदी सुरुवातीला मला ही शैली कळली नाही. नंतर कळलं की वासूनाक्याचा एक मेंबर 'पोक्या' हा निवेदक आहे आणि त्याच्या विचारांनी हे पुस्तक लिहिलं आहे. जिथे अत्रेंची गल्लत झाली तिथे माझी काय गत. असो मग मला कळलं हे वासूनाक्यावरचे किस्से आहेत, आणि त्यांना नाक्यावरच्या गप्पांइतकं महत्त्व द्यावं. मग आपसूक अरे हा असं कसं बोलू वागू शकतो, समोरच्याच्या मनाला काय वाटेल, यांचे संस्कार काय, समाज कुठे चालला आहे वगैरे पांढरपेशे प्रश्न मला पडेनासे झाले. तसंही जबरदस्ती नव्हती जणू ते मेंबर डोळ्यात डोळे घालून सांगत होते नाही आवडला तर नको येऊ नाक्यावर, झेपेल ते वाचावं. पाच मिनिटांनी घरी जाऊ, दहा मिनिटांनी घरी जाऊ, शेवटची सिगरेट ओढून जाऊ करत जसे आपण आपल्या कंपूत रेंगाळतो तसा मी एक एक किस्सा वाचत सुटलो. १४० पानांचं पुस्तक म्हणजे व्यक्तिरेखा उभी करायला फार वेळ होता असं नाही, पण तरीही जे व्यक्तिचित्रण केलं आहे भाऊ पाध्येंनी त्याला तोड नाही. पोक्या, मामू, लंगडी घूस, बकुळा, सू, चम्या, सोम्या, फोमण्या परसू, सुर्वे मामा, डाफ्या, अच्चा, केशरवडी, पबी असे बरेच जण डोळ्यासमोर आपल्या ओळखीतले वाटावेत असे पक्के उभे केलेत. ही हटके शैली भन्नाट आहे. प्रत्येकाला भावेल असं नाही. पण फार उहापोह न करता केवळ व्यक्तिरेखेची मानसिकता आणि पुस्तकाची विशिष्ट शैली, नाक्याची स्थित्यंतरं, व्यक्तिरेखांचा अचाट प्रवास मांडण्याची ढब समजून घेतलीत तर समजायला सोपं जाईल, आणि कदाचित शैलीच्या प्रामाणिकतेचं आणि सातत्याचं कौतुक वाटेल. १९६५ चं लिखाण आज २०२१ मध्येही बोल्ड आहे, साचेबद्ध मानसिकतेला बोल्ड करण्याइतकं बोल्ड, मला वाटतं यातच सारं आलं. बघा वाचून झेपतोय का वासूनाका?

- प्रसाद साळुंखे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा