शितू पुस्तक म्हणावं की प्रस्तावनेत लेखक म्हणतात तशी गो.नी.दांडेकर यांची मानसकन्या. ही एक अनोखी प्रेमकथा आहे. विसू आणि शितू या दोघांची. यातला विसू हा अप्पा खोतांचा महाव्रात्य मुलगा आणि त्यांच्या गावातलीच विसूची समवयस्क पण समजदार, जबाबदार, सगळ्यांची काळजी घेणारी पण दोन नवरे गिळल्याचा ठपका असलेली निरागस मैत्रिण शितू. या दोघांमध्ये हळूवार खुलणारी ही प्रेमकहाणी. हे निर्मळ प्रेम नितीमूल्यांवर जोखता न येणारं, समाजमान्य नसणारं असं. विसू व्रात्य असला तरी प्रेमळ आहे, हे तो शितूला मार खाण्यापासून वाचवतो या प्रसंगापासून कळतं. मग हळूहळू खोडसाळ विसूमध्ये कोणीही न अपेक्षिलेले घडत जाणारे बदल अनुभवायला मस्त वाटतं. एक गावावरून ओवाळून टाकलेला विसू ते जीव ओवाळून टाकावा असं वाटायला लावणारा विसू हा प्रवास हेच शितूच्या प्रेमाचं यश. या प्रवासाला साथ द्यायला आहे नयनरम्य कोकण. मग ती कोकणी वाड्यांची, खाड्यांची केलेली वर्णनं केवळ अफलातून. हा कोकणी साज या कथेला वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवतो. प्रस्तावनेत म्हटलंय तसं शुद्ध प्रेम फलस्वरुप आहे, जशी चंदनाची झाडे. फळे न येताही जीवन कृतार्थ झालेली. नक्की वाचावी अशी ही प्रेमकहाणी.
- प्रसाद साळुंखे
खुप छान माहिती आहे.आमच्या ब्लॉग नक्की भेट द्या.
उत्तर द्याहटवाJIo Marathi
पाटीलजी प्रतिक्रियेसाठी धन्यवाद,ब्लॉगला जरूर भेट देऊ सवड काढून.
हटवा