नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

त्या पूलावर

'त्या पूलावर ...'

ती आली होती,
डोळ्यात वादळ घेऊन,
मात्र होती निश्चल.
फिक्या चेहऱ्यावर होतं,
निश्चयी लालगडद लिपस्टिक.
विचारांचा पारवा घुमत होता,
तिच्यात भरलेल्या रीतेपणात,
तिथल्या कासावीस शांततेत.
मौनाच्या पूलावर उगाच रेंगाळलो,
मागेपुढे ..
अंदाज घेत ...
पण पावलं रेटली नाहीत,
तिच्या अवकाशापर्यंत.
राहू दे निदान हा पूल शाबूत,
तिच्यापर्यंत पोहोचण्याच्या शक्यतेचा.
उसवलं होतं काहीतरी आत,
माझ्या कोषानी सांधता न येणारं असं.
धग जाणवत होती,
श्वासाचे विस्तव धुमसण्याची,
ती निर्धोक होती तिथे,
तरी,
डोळ्यांचे पहारेकरी होते,
माझ्या हालचाली टिपत.
का वाटत होतं तिला?
मी सांगावा हक्क,
तिच्या बेनामी जखमांवर.
क्षितिजं ओसंडायच्या बेतात असतांना,
चलबिचल मनस्थितीत उठलो,
कॉफीचा वाफाळता कप,
ठेवला समोर निवण्यासाठी.
विषयांतर म्हणून रीचवलेही,
तिने कडूगोड घोट.
विषय नेमका नव्हता माहित,
पण प्रसंगाला संयमी बगल दिली,
नेहमीप्रमाणे.
सावरू दिलं तिचंच तिला.
कधीतरी मग,
तंद्रीतून बाहेर येत,
'येते मी' एवढंच म्हणाली.
मीही मान डोलावली.
कोणास ठावूक का,
जाता जाता,
मान वळवून,
फुललेल्या चाफ्यासारखं हसली.
जणू संपली परीक्षा,
सापडली निरुत्तरीत उत्तरं.
अतासा तो चाफा दरवळतो,
आठवणींच्या निर्माल्यात.
म्हणून टाळतो हल्ली कॉफी,
का रेंगाळणं त्या पूलावर,
जो पोहोचत नाही कुठेच ...

- प्रसाद साळुंखे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा