नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

गुरुवार, २५ जून, २०२०

गावनवरी

'गावनवरी' नावाच्या कवितासंग्रहाबद्दल खूप वाचलं होतं. काहीतरी चाकोरीबाहेरचं वाचायला मिळेल म्हणून हा कवितासंग्रह वाचला. वेदिका कुमारस्वामी ने लिहिलेल्या या कविता आहेत. वेदिका कुमारस्वामी मराठी, कन्नड, तेलगू, इंग्रजी, हिंदी मनाला येईल त्या भाषेत व्यक्त व्हायच्या. अगदी शाळेत असल्यापासून, पण रसिकांच्या दुर्दैवाने जुन्या वह्या हरवल्या. पण त्यांनी हार न मानता पुन्हा सलग लिहायला सुरुवात केली, ज्याचं श्रेय त्या अश्विनी दासगौडा-देशपांडे आणि कविता महाजन यांना देतात. त्यांनी आपल्या सगळ्या डायऱ्या कविता महाजन यांच्याकडे सुपूर्त केल्या, मग पॉप्युलर प्रकाशनच्या साहाय्याने हा कवितासंग्रह तयार झाला.

वेदिका ही एका देवदासीची मुलगी. आई आणि आजी यांच्या सोबत राहणारी. आईचं रखेली बनून राहणं, तिच्या आजारपणामुळे लहान वयात वासनेने बालपण पोळणं वेदिकाच्या वाट्याला आलं. तिचं आयुष्य, आणि त्या आयुष्याला मिळालेली कलाटणी हा सारा प्रवास तिच्या कवितांमधून घडतो. या कविता तिच्या आयुष्यावर प्रकाश टाकतात, पण तो प्रकाशझोत फार प्रखर आहे, प्रसंगी नागव्या डोळ्यांना सहन न होण्याइतका प्रखर. या कवितांच्या माध्यमातून तिच्या आयुष्याकडे पाहताना आपण कादंबरी वाचतोय की काय असा भास आपल्याला होतो. बरं नाव आणि मुखपृष्ठ पाहिल्यावर हे ग्रामीण वगैरे काहीतरी असेल, म्हणजे आम्ही कसे मैलमैल अंतर कापत असू, परिस्थिती कशी बेताची होती वैगैरे गरिबीची वर्णनं, किंवा चाकोरीबाहेरचं म्हणतात त्या ठराविक चाकोरीतलं असेल, पण तसं नाहीये. कवितेत बंडखोरीचा विस्तव आहे, समाजाचं प्रतिबिंब आहेच पण  आत्मशोधही आहे. वेदिका लैंगिक हिंसाचार अधोरेखित करते पण त्याचवेळेला लैंगिक सुखाबद्दल, गरजांबद्दल स्पष्टवक्तेपणा ठेवते. संपूर्ण पुरुषजातीला सरळ काट देत नाही. या कविता तिला नेमक्या कशा परिस्थितीत सुचल्या असतील, आपण कवितेतून व्यक्त व्हावं असं तिला का वाटलं असेल, लोकांना तिच्या कविता निश्चितपणे आवडतात, कुठे शिकली असेल ही कवितेचे ठोकताळे. का कुठे शिकली नाही म्हणून जे अस्सल ते व्यक्त झालं कुठल्याही भेसळीशिवाय. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा