नमस्कार दोस्तांनो,
चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.
तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...
पुन्हा भेटूच ...
मंगळवार, २३ जून, २०२०
'लस्ट फॉर लालबाग'
'लस्ट फॉर लालबाग' नावाचं पुस्तक वाचलं. लालबाग परेल भागात मी आधी केवळ गणपती समारंभात मौज म्हणून,छायाचित्रणाचा नाद म्हणून आणि हल्ली कामानिमित्त फिरलोय. या शहरातल्या काही जागा म्हणजे जिवंत थडगी आहेत, असं जाणवतं. इथल्या मॉल्समध्ये मन रमत नाही. इथल्या टोलेजंग टॉवर्स आणि स्कायस्केपर्सच्या भिंतीत असंख्य संसार चिणून पुरलेत असं वाटतं. ते सुतकी डोळे , खपाटीला गेलेली पोटं, भांडवलंदारांपुढे पिचलेल्या दुबळ्या कामगारांचे ओठातच विरून गेलेले आक्रोश मला सुन्न करतात. मी इथलाच या मातीतलाच. त्यामुळे अतिपरिचयात अवज्ञा असेल. पण नव्या पिढीतल्या कोणाला इथल्या मॉल्समधून , रेस्तराँट मधून खळखळून हसून बाहेर पडताना पाहतो तेव्हा भडभडून येतं. या भागाचे राजे म्हणून मिरवलेल्यांची पुढची पिढी थंड नजरेने लादी पुसतांना दिसते तेव्हा त्या वातानुकूलित थंड वातावरणात डोक्याचा भडका उडेल असं वाटतं. या शहराने रंकाचे राव होतांना पाहिलेत तसेच रावांचे रंक होतानाही पाहिलेत. चित्रपट, नाटक गिरणी संप या प्रश्नाला हवा तसा न्याय देऊ शकले नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे. या विषयावर काहीतरी सकस वाचायला मिळावं याच्या शोधात मी होतो आणि तेव्हाच 'लस्ट फॉर लालबाग' हे पुस्तक हाती पडलं. 'विश्वास पाटील' नाव वाचल्यावर पुस्तकाच्या दर्जाबद्दल शंका घेण्यास वाव नव्हता. या पुस्तकात एक काल्पनिक कथा आहे पण पार्श्वभूमी वास्तववादी ,घाम रक्त आणि अक्रोशाने लडबडलेल्या गिरणगावाची आहे. सन मिल, मफतलाल, फिनिक्स, दिपक सिनेमा, भारतमाता सारी ठिकाणं आपण पाहिलेली पण काळ १९८२ चा. कथानक बेमालूम वास्तवात गुंफलं आहे. बऱ्याच गोष्टींचा पुनर्विचार करण्यास हे पुस्तक भाग पाडतं. जसं की दत्ता सामंतांचं नेतृत्व खरंच इतकं पोकळ होतं का? बडेबडे भांडवलदार खरेच धुतल्या तांदळासारखे आहेत का? लोकशाही हे भांडवलदारांच्या हातचं बाहुलं आहे का? अडीज लाख संसार पत्त्यांच्या कागदी बंगल्यासारखे मोडकळीस आणणं या देशात शक्य आहे? न्यायदेवता आंधळी ठीक पण मिडिया तेव्हाही लोचटच होती का? जो राजकीय पक्ष मराठीच्या कार्डवर फोफावला, त्यांच्या सिंहगर्जना संपाच्या काळात आवंढा गिळल्यासारख्या दबून का गेल्या? लिजच्या जागा सरकारी की भांडवलदारांना हुंड्यात मिळालेल्या ज्या वाढीव एफ एस आयच्या एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा हजार करोडच्या व्यवहारांना भुलून बिनदिक्कत विकता येतात? मराठी माणूस या शहरातून हद्दपार करायला सुरुवात कोणी केली? मुळात एक सामान्य माणूस म्हणून आपली या व्यवस्थेत काय किंमत आहे? एवढा इतिहास घडूनही सारं या शहराने स्वीकारलं, मॉल आणि टॉवर संस्कृतीचा नवा चेहराही. या शहरानेच असं नाही तर ज्यांना पाण्यात बुडवून ठेवलं, ज्यांचे उंबरे झिजवले ते सिद्धिविनायक, महालक्ष्मी, हाजीआली, आणि लालबाग, गणेशगल्लीतले राजेही हतबल होऊन फक्त पहात राहिले कोसळलेले संसार, आणि महत्वाकांक्षा, आणि स्वार्थाच्या, न शमणाऱ्या पैशाच्या बकसुरी भुकेच्या, उंचचउंच गगनचुंबी इमारती.
लेबल:
गिरणी,
गिरणी कामगार,
ठाकरे,
दत्ता सामंत,
लस्ट फॉर लालबाग,
विश्वास पाटील,
शिवसेना
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा