नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

रविवार, ६ डिसेंबर, २०१५

माझिया ब्लॉगाचिये कवतिके

नमस्कार मंडळी,   



आज जरा मी आनंदी आहे,  कारण रविवार तसा आरामाचा दिवस म्हणूनही आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे, आज  'मी मराठी लाइव्ह' या मुंबईहून प्रसिद्ध होणार्‍या वर्तमानपत्रातील 'सप्तमी'  या पुरवणीतील 'ब्लॉगांश' या सदरात माझा एक लेख प्रसिद्ध झाला आहे, आपण त्या लेखाचा नक्की आस्वाद घ्या  आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा.  माझं ब्लॉगवरचं  लिखाण हे प्रसिद्धीसाठी म्हणून केलेलं लिखाण असं कधीच नव्हतं.  लोकांना रुचेल, आवडेल न आवडेल याचा फार विचार न करता, स्वत:शी प्रामाणिक राहून मनातलं काहीतरी ब्लॉगवर प्रकाशित करत राहिलो.  तरी २००९ पासून सुरु असलेल्या या विरंगुळ्याची, अनौपचारिक अघळपघळ लिखाणाची दखल ध्यानीमनी नसताना अचानक 'मी मराठी लाइव्ह' सारख्या नव्या दमाच्या वृत्तपत्रात घेतली गेली ते पाहून समाधान वाटलं. समाधान या गोष्टीचं की ते लिखाण आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. त्याबद्दल 'मी मराठी लाइव्ह' या वृत्तपत्राचे आभार आणि धन्यवाद.



धन्यवाद, 
प्रसाद साळुंखे 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा