नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शुक्रवार, ५ मार्च, २०२१

राडा - भाऊ पाध्ये

वासूनाका आवडल्यामुळे, अधाशासारखं राडा वाचलं. यातलं कथानक मस्त आहे, आणि भाऊ पाध्यांच्या लेखनशैलीच्या चरचरीत फोडणीमुळे कादंबरीची लज्जत अजून वाढली आहे. बदलत्या महानगराचा एका पिढीवर होणारा परिणाम, राडेबाजी मध्ये मिसळत चाललेला फोलपणा, होतकरू तरुणांची वाढती व्यसनाधीनता या साऱ्यावर हे पुस्तक भाष्य करते. 

शिवसेनेच्या काही नेत्यांचा या पुस्तकात उघड नामोल्लेख आहे त्यामुळे या पुस्तकावरून एकेकाळी शिवसेनेने बराच राडा घातल्याचं कळतं. राजकीय पक्षाच्या सोयीस्कर मराठी कार्ड खेळायच्या भूमिकेतला फोलपणा या कादंबरीत अधोरेखित केला आहे, जे त्याकाळी अधिक चिथावणी देणारं ठरलं, म्हणून हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरही दुकानांमधून गायब होतं.

राड्याची परिमाणं बदलली तरी आजही राडा राजकीय खेळीचा भाग आहे, राड्यात परिमाणापेक्षा परिणामांना अधिक महत्त्व असतं.

ही कथा आहे मंदार अण्णेगिरीची. बड्या उद्योगपतीचा बिगडा बेटा. पथभ्रष्ट, धीट, शीघ्रकोपी राडा करण्यात पटाईत पण मायेचा भुकेला. लोकल गुंडांपासून, शिवसेना शाखाप्रमुख वगैरे कोणालाही न जुमानणारा. स्वत:च्या वडिलांवर, त्यांच्या इभ्रतीवर जणू काही सूड उगवायचा आहे असे मंदारचे एकेक कारनामे. न्याय्य, अन्याय्य सारं मंदार ठरवतो, यात गल्लत करत एखाद्या मुलीला भर रस्त्यात अडवणं, शिवी घालणं, दारू पिऊन मारामाऱ्या करणं सारं त्याच्या दृष्टीने न्याय्यही ठरतं. संवेदनशीलतेची एक पुसट छटा आहे त्याच्या स्वभावाला पण स्वभावाच्या इतर पैलूंचा भडकपणाच जास्त असल्यामुळे ही पुसट छटा दुर्लक्षिली जाते. नायकाची ही बंडखोरी काय काय वळणं घेते, शिवसेना त्याच्या श्रीमुखात लगावून तडफदार बाणा दाखवते का बड्या उद्योगपतीचा लेक म्हणून त्यातून सवलत असते? आणि शेवटी सुबह का भूला परत घरी जातो का? हे सगळं कळण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.

- प्रसाद साळुंखे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा