नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

रविवार, ३१ मे, २०२०

'जागते रहो' १९५६



"जागते रहो" अशी आरोळी पूर्वी रात्रीच्या वेळी दिली जायची. लोकांनी भुरट्या चोरांपासून सतर्क रहावं यासाठी. पण चोराची नेमकी व्याख्या काय? आणि लोक समाजातल्या सगळ्याच चोरांवर दंडुका उगरतात की केवळ प्रतिकाराची अपेक्षा कमी असलेल्यावर दमदाटी, मारहाण करणं सोपं जातं. नेमके हेच विचार आले 'जागते रहो' हा सिनेमा पाहून.

कथा-पटकथा-दिग्दर्शन शंभू मित्रा, अमित मित्रा या जोडगोळीची. कथा या सिनेमाचा प्राण आहे. एक गरीब खेडूत तरुण कामाच्या शोधात मुंबई गाठतो. रात्रीच्या वेळी या तरुणाला तहान लागते, इथपासून ते त्याला पाणी मिळण्याच्या पर्यंतच्या प्रवासावर हा सिनेमा आहे. ही गोष्ट आहे फक्त त्या एका रात्रीची. हा तरुण राज कपूर यांनी अप्रतिम साकारला आहे. विरलेला कोट आणि धोतर परिधान करणारा भाबडा गरीब माणूस साकारावा केवळ राज कपूर यांनीच, एवढी निरागसता, निर्व्याज भाव चेहऱ्यावर आणणारे अभिनेते हिंदी सिनेइंडस्ट्रीत फार कमी आहेत. तर या गरीब तरुणाला एक दोघांकडून दमदाटी झाल्यावर त्याचा पाण्याचा शोध त्याला सज्जनांच्या पांढरपेशा वस्तीत आणतो. पण त्याचवेळी त्याला इमारतीत शिरताना पाहून बाहेर आवई उठते की इमारतीत चोर शिरला आहे. मग हा कधी लपतो, कधी पळतो, या गडबडीत या सज्जंनाच्या मुखवट्यापल्याडच्या बऱ्याच गोष्टी, बरीच काळी गुपितं त्याला कळतात. बघायला गेलं तर तसा गंभीर विषय पण मांडलाय मात्र नम्र विनोदी पद्धतीने, सिनेमाच्या रंजकतेला जराही धक्का न लावता. यातल्या विनोदाला सौम्यशी कारुण्याची झालर आहे. दिग्दर्शकाने सगळी आव्हानं लीलया पेलली आहेत. मग ते दोन भिन्न जगातला विरोधाभास दाखवणं असो, की इमारतीला नाना तऱ्हेच्या माणसांचा गोंधळ आणि गमतीजमती, सारे प्रसंग मस्त रंगवले आहेत, आणि त्याच वेळेला दिग्दर्शनाने गाण्यांना शब्द-सूरांचं भान राखत पडद्यावर सुंदर पद्धतीने जीवंत केलंय. काही काही फ्रेम्स तर कमाल सुंदर वाटतात, विशेष करून 'जागो मोहन प्यारे' आणि 'जिंदगी ख़्वाब   है' या गाण्यातल्या.

चित्रपटाचे संवाद आहेत के अब्बास यांचे, फार शब्दबंबाळ संवादाच्या प्रेमात न पडता परिस्थितीला साजेसे संवाद लिहिले आहेत. त्यामुळे सिनेमाचे प्रसंग बटबटीत किंवा कृत्रिम वाटत नाहीत, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी वाटतात. राज कपूर यांच्या वाट्याला मोजके संवाद आहेत, ज्यात सिनेमाचं सार सामावलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.  म्हणूनच असे संवाद जास्त सांभाळून लिहिणं महत्वाचं.

राज कपूर व्यतिरिक्त लक्षात राहतात ते सहकलाकार म्हणजे मोतीलाल ज्यांनी अट्टल दारूड्याची व्यक्तिरेखा मस्त साकारलीय, आणि मुकेश यांच्या 'जिंदगी ख़्वाब है' या गाण्याला त्यांनी न्याय दिलाय. डेसी इराणी यांनी धिटुकल्या लहान मुलीची व्यक्तिरेखा मस्त साकारलीय. इतर सहकलाकार प्रदीप, प्राण, नेमो, नाना पळशीकर, सुमित्रा देवी, सुलोचना चॅटर्जी यांनीही आपापल्या भूमिका मस्त साकारल्या आहेत. चित्रपटाच्या शेवटी नर्गिस यांची छोटी भूमिका आहे.  नर्गिसनी राज कपूर बॅनर खाली केलेला हा शेवटचा सिनेमा. 'जागो मोहन प्यारे' सारखं एक सुरेख गाणं नर्गिसवर चित्रित झालंय, ज्याने सिनेमाचं सौंदर्य अजून खुललं आहे. या गाण्याच्या शेवटचे नर्गिस आणि राज कपूर यांचे चेहऱ्यावरचे भाव मनाला शांत समाधानी करतात. प्रेक्षकांना एज ऑफ द सीट आणणं हे जसं कठीण तसंच भोवतालच्या जगाचा विसर पाडून आपल्या सीटवर रेलून अभिनयात शांत गुंग करून ठेवणं, टाळ्या शिट्यांचा विसर पाडून पडद्यावरचं क्षणिक सौंदर्य केवळ डोळ्यांनी अधाशासारखं टिपायला भाग पाडणंही कठीणच. म्हणून या सिनेमाचं, या सर्व कलाकारांचं विशेष कौतुक वाटतं.

या चित्रपटाची गाणी सुंदर आहेत. सलील चौधरी यांनी मस्त संगीतबद्ध केलीत. सिनेमाच्या सुरुवातीलाच मुकेशजींच्या आवाजातलं 'जिंदगी ख़्वाब है' कानातून थेट मनात झिरपतं. या गाण्यात शैलेंद्र यांनी शब्दांची जादू केली आहे. हा अंतरा पहा.

एक प्याली भर के मैने
गम के मारे दिल को दी
जहर ने मारा जहर को
मुर्दे में फिर जान आ गयी
ज़िन्दगी ख़्वाब है
ख़्वाब में झूठ क्या
 
असले जादुई शब्द मुकेशजीं शिवाय कुठला जादूगार गाऊ शकतो. दारूवर गाणं आहे म्हणून आवाजात उगाच कसला बोजडपणाचा खोटा आव नाही, नाटकी उचक्या वैगेरे नाहीत. हवेत कापसाची म्हातारी उडत जावी अगदी तसं सहज, बेफिकीरी मूड मध्ये गायलेलं हे गाणं ऐकत रहावंसं वाटतं. हे गाणं आधी मन्नाडेंच्या आवाजात रेकॉर्ड झालेलं. राज कपूर यांनी मुकेशजींच्या आवाजात ते रेकॉर्ड करायला भाग पाडलं. मन्ना डेंच्या आवजातलं गाणं you tube वर आहे. मन्ना डे सूरांचे पक्के आहेत, पण या गाण्याला रियाजापेक्षा सहजता, मूड पकडणं अपेक्षित असल्यामुळे, आणि राज कपूर यांच्या मुकेशच्या आवाजावरील प्रेमापोटी केलेल्या हस्तक्षेपामुळे मुकेशजींनी गायलेलं गाणं सिनेमात ठेवण्यात आलं.

त्या शिवाय राग तिलक कामोद मधलं शैलेंद्र लिखित आशा ताईंनी गायलेलं 'थंडी थंडी सावन की पुहार' असो की, अस्सल पंजाबी उडत्या ढंगातलं प्रेम धवन यांनी लिहिलेलं रफी आणि बलबीर यांनी गायलेलं 'तें की मैं झूठ बोलया कोई ना' असो सारीच गाणी केवळ अप्रतिम.  या पंजाबी गाण्यातली रफी साहेबांची वरच्या पट्टीतली गायकी पायाचा ठेका घ्यायला भाग पाडते. संध्या मुखर्जी यांनी गायलेलं, शैलेंद्रजींनी शब्दबद्ध केलेलं उडत्या चालीचं मस्तीभरं 'मैने जो ली अंगडाई' गाणंही मस्त आहे.

एवढं पुरे की काय उरलासुरला प्राण घालवायला शेवटचं राखीव स्वर्गीय रेशमी अस्त्र म्हणजे शैलेंद्र यांनी लिहिलेलं आणि लता दिदींचा परीसस्पर्श लाभलेलं भैरव रागामधलं 'जागो मोहन प्यारे', हे गाणं सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. प्रेक्षकांच्या मनावर या गाण्याचं गारूड सिनेमा संपल्यानंतर ही बराच काळ राहतं. पण दुर्दैव सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेला हा राज कपूर बॅनरचा एकमेव सिनेमा आहे. शंकर-जयकिशन हे राज कपूर यांचे आवडते संगीतकार. सलील चौधरी स्वतः एका मुलाखतीत म्हणाले की राज कपूर यांच्यासोबत आणखी एक सिनेमा करायची योजना होती पण कदाचित राज कपूर यांना शंकर-जयकिशन यांच्याकडून दडपण आल्यामुळे ती सफल झाली नाही. सलील चौधरी म्हणतात आधी एक बंगाली अभिनेता हा सिनेमा करणार होता आणि राज कपूर फक्त दिग्दर्शन करणार होते, त्याच सुमारास शंभू मित्रा यांनी राज कपूर यांच्याबरोबर माझी ओळख करून दिली, मी त्यांना माझ्याकडे असलेल्या चाली ऐकवल्या आणि त्यांनी लगेच मला या सिनेमासाठी साईन केलं. पुढे शंभू मित्राने सिनेमा दिग्दर्शित केला आणि राज कपूर यांनी नायकाची भूमिका साकारली. याच बंगाली संगीतकाराने वर उल्लेखलेला अस्सल पंजाबी ढंगातला भांगडा या सिनेमात राज कपूर यांच्या सांगण्यावरून आणला, ते या पंजाबी गाण्याचं बरचसं श्रेय मात्र नि:संकोच त्यांचा मित्र गीतकार प्रेम धवन यांना देतात. 

हा सिनेमा हिंदी आणि बंगाली या दोन्ही भाषेत बनला. बंगाली सिनेमाचं नाव होतं 'एक दिन रात्रे'.  दोन्ही भाषेत कथानक सारखं होतं. या सिनेमाला कार्लोवी वरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये क्रिस्टल ग्लोब ग्रँड प्रिक्स अवॉर्ड मिळाला होता. राज कपूर यांना फिल्मफेअरचं नामांकन मिळालं होतं. रशियात राज कपूर यांच्या लोकप्रियतेमुळे हा सिनेमा तुफान चालला. भारतात चवथ्या नॅशनल अवॉर्ड मध्ये मेरिट सर्टिफिकेट या सिनेमाला मिळालं होतं. 

अवॉर्डसनी होतं ते कौतुक, पण सिनेमा क्लासिक बनतो तो कलाकारांच्या जमून आलेल्या उत्तम भट्टीमुळे. ही माहिती आणि मतं या सिनेमाबाबत. आता कथानकातला हा तरुण त्या इमारतीत रात्रभर कसा टिकाव धरतो? त्याला पाणी मिळतं का? लोक त्याला चोपतात का? पोलिस त्याला पकडतात का? वगैरे माहितीसाठी हा सिनेमा नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर लिहा. तुमचा सिनेमा पाहून पूर्ण होत नाही तोपर्यंत.


जागते रहो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा