त्याला माझ्या घराशेजारी घर बांधायचं होतं.
माझा नकार होता.
कारण विशेष नाही,
पण त्याच्याकडे बघूनच तिडीक जायची डोक्यात.
त्याचं बोलणं,
हाजीहाजी करणं,
अजागळ दिसणं,
मुळात नं विचारता सामान आणून घर बांधायला सुरुवात करणं.
मी त्याचे बेत उधळवून लावले.
त्याने चिकाटी सोडली नाही,
मी माझा हट्ट,
रोज भांडणं,
आई मध्ये पडायची वाद मिटवायला,
त्याच्या आगाऊपणाला तिचीच फूस होती.
वैताग झाला होता त्याच्या घराचं बांधकाम पाहून,
ब्लडप्रेशर वाढत होतं उगाच,
मरो त्याच्या कर्माने म्हणत सोडून दिलं.
आठवडा गेला,
बांधकाम पुढे सरकेना,
बहुतेक नसलेला स्वाभिमान जागृत बिगृत होऊन दुखावला,
काही का असेना,
हळूहळू त्याने सगळं सामान गोळा केलं,
आणि माझ्या घरापासून दूर घर बांधलं.
ब्याद टळली,
नाही म्हणायला कधीतरी भेटतो,
जुजबी गप्पा वगैरे होतात,
फार जवळचे मित्र बित्र बनवणाऱ्यातला मी नाही,
माझ्या स्पेसमध्ये ढवळाढवळ चालत नाही राव आपल्याला.
जाऊ दे त्या गोष्टीला बराच काळ लोटला.
त्यानंतर करोना आला,
lockdown आलं,
आणि आता हे चक्रीवादळ.
बाहेर सोसाट्याचा वारा सुटलेला,
घरांवराचे पत्रे उडत होते,
सगळे न्यूज चॅनेल चक्रीवादळावर तुटून पडलेले,
निसर्गाने करोनाला साइडलाइन केलेलं.
मी घरात गॅलरीत काही वाळत नाहीये ना,
याची खात्री केली आणि जेवणावर ताव मारला.
बाहेरचा सोसाट्याचा वारा शांत होत नव्हता,
झाडांच्या माना पिळवटून निघत होत्या,
मोडेन पण वाकणार नाही म्हणणारे उन्मळून पडले.
असंच एक पिंपळाचं झाडं या वादळाचा शर्थीने सामना करत होतं.
बाजूचा माड आपली एक एक झावळी पाडून हत्यार खाली ठेवण्याच्या तयारीत होता.
लोक धावत खाली आले,
आपल्या गाड्या झाडापासून सुरक्षित अंतरावर पार्क करायला,
आता त्यांना पिंपळाची सावलीसुद्धा गाडीवर नको होती.
तिकडे सायकलवाल्याच्या घराजवळ एक झाड पडलं.
सायकलवाला सोडून सगळ्यांचं कुतूहल कपडे उतरवलेल्या नग्न गॅलर्यांतून उतू जात होतं,
त्याने निर्विकार चेहऱ्याने तोंडातला माल थुंकून ते झाड फरफटत रस्त्याच्या कडेला नेलं.
माझ्या न होऊ शकलेल्या शेजाऱ्याचं घर तिथेच कुठेशी होतं,
पिंपळ अजूनही वादळात हलत होता,
कोणत्याही क्षणी तुटून पडेल आणि त्याचं नवं घर ...
छे! कल्पना करवेना,
झोप उडाली,
डोक्यात वादळ घुमू लागलं,
बांधलं असतं इथे घर तर काय बिघडणार होतं?
बांधकाम मजबूत आहे,
काही होणार नाही.
असं आई आत्मविश्वासाने म्हणत होती.
असाच आत्मविश्वास तिला प्रत्येक lockdown बाबत होता,
तिचा आत्मविश्वास म्हणजे वास्तवाशी फारकत घेतलेली तिची प्रबळ इच्छा.
माझं लक्ष होतं त्याच्या घराकडे,
उगाच अपराधी वाटत होतं,
वारंवार खिडकीतून डोकावून पाहिलं,
आजूबाजूच्या इमारतींच्या गच्च्यांचे पत्रे थाडथाड वाजत होते,
टिकाव न धरू शकलेले पत्रे अस्तित्वहीन कुठच्याकुठे फेकले जात होते,
पिंपळ मात्र चिवट होता.
पार्किंगवाल्या भूतांच्या रोजच्या शिवीगाळीने जणू कणखर बनला होता,
तरी वाचेल याची शाश्वती नव्हती,
कारण या केवळ तोंडाच्या वाफा नव्हत्या,
निसर्गाचं तांडव होतं,
त्यात पाऊस सुरू होता,
अगदी झिम्माड.
त्याचं घर सध्या तरी सुखरूप होतं.
पहिला पाऊस असून रस्ते शांत,
कुणाचंही बेलगाम कार्ट रस्त्यावर हुंदडत नव्हतं,
रस्त्यात जागोजागी पानांचा खच पडलेला,
विजेचे खांब निसर्गापुढे नतमस्तक झालेले,
पत्रे गलितगात्र झालेले,
कुंडीतल्या झाडांनीही वादळापुढे माना टाकलेल्या,
पिंपळ मात्र पुरून उरलेला.
अखेर वादळाने माघार घेतली.
तो लगबगीने पिंपळाच्या झाडाच्या शेंड्यावरच्या त्याच्या घरट्याकडे गेला,
मान वाकडी करून घरटं न्याहाळलं,
घरटं शाबूत होतं.
दोन चार काड्या आतबाहेर केल्या,
तारांचे खटके चोचीने घट्ट करून घेतले,
निसर्गाने त्याला बेघर नाही केलं.
मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले.
आईचा आत्मविश्वास कामी आला,
त्या वादळाचा तिच्या माझ्यापुरता सुखी शेवट झाला.
- प्रसाद साळुंखे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा