नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

माणसं आणि फटाके







माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं
तरी बरं
फटाक्यांवर सावधानतेच्या सूचना असतात माणसांवर तेही नसतं



काही माणसं सुरसुरी, 
बोलण्याची यांना जाम सुरसुरी
वेळ नाही 
काळ  नाही 
सदैव आपले हे सुरूच असतात 
बारसं ते तेरावं अशा कुठल्याही कार्यक्रमात 
एकाच उत्साहात 
अखंड बोलत सुटतात हे बडबड कांदे 
यांच्या गप्पिष्टपणामुळे  होतात भल्याभल्यांचे वांधे 
तरी  स्वत:त मश्गुल असे हे दिलखुलास बंदे
गांभीर्याची काशी करून  नुसते  उडवतात हे खांदे 
चटकदार गप्पांच्या साध्याशा ठिणगीचा  कधीतरी सुरुंग बनतो 
म्हणूनच मित्र आप्तेष्टांच्या नजरकैदेचा यांना वरचेवर तुरुंग घडतो 
नजरकैदेचे असले तुरुंग यांनी शिताफीने फोडले 
आजन्म  मौन पाळण्याचे नियमित मनसुबे सोडले 
बोलण्यावाचून यांना राहवत नाही 
मख्ख जगाला ते पहावत नाही 
स्वत:हून वाईट करण्याचं असं यांच्या मनात नसतं 
माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं



काही माणसं बाणासारखी
एक बाटली द्या 
बोलता बोलता जरा वात लावा
हे गेलेच हवेत .. पार ढगात 
स्वत:त दारू असूनही यांना सदैव दारू लागते
बिना बाटलीचे  जग यांना अर्थशून्य भासते 
हे शांत एका  बाजूने  गेले तरी लोकांना त्रास होतो 
हे नॉर्मल चालले तरी यांनी प्याराशूट लावल्याचा लोकांना भास होतो 
लोकांना असले बाण उगा उरी नको असतात  
पण हेच जर दूर आभाळात जाऊन फुटले तर लोक माना वरवर करकरून कुतूहलाने बघत बसतात 
यांच्या या अशा बेफिकीरीत काहीतरी अगम्य असतं 
माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं



काही माणसं म्हणजे भुईचक्रच
आपल्याआपल्या भोवतीच गोलगोल फिरणारी 
आपलं घर 
आपली बायको
आपली मुलं
आपलं ऑफिस          
आपल्याआपल्यातच फिरता फिरता आपल्याआपल्यातच आपलेपणाची आपली एक घेरी येउन हे आपले कोसळतात  
मग यांना कळतं
बायकोला किचन प्यारं
छोटं  भुईचक्र ऑफिस गेलेलं
आपल्या ऑफिसचं आपल्यावाचून काही अडत नाही 
ज्या वास्तुचे इमाने इतबारे आपण EMI भरले ती वास्तुसुद्धा आपल्यासाठी दोन अश्रू ढाळत नाही
दारावर बेल वाजते 
मुलगा आत येतो
मुलाला सांगावसं वाटतं सरतेशेवटी आयुष्य म्हणजे नुसती उर्जहीन सोनेरी चकती बनून राहील 
आज ना उद्या तीही कदाचित कचर्‍यात जमा होईल 
नुकत्याच फिरू लागलेल्या छोट्या भुइचक्राला उर्जाहीन ही केवळ काल्पनिक संकल्पना वाटते 
त्याला काही काही कळत नसतं 
मोठं भुइचक्र सांगून सांगून थकतं
की बाबा रे  माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं



काही माणसं असतात सापगोळीसारखी
जन्मा आलोय म्हणून काहीतरी कसंतरी आपलं फुरफुरायचं 
खरं तर यांचा फटाक्यांचा जन्म 
इतर फटाके कसे मस्त सोनेरी रंगीबेरंगी कागदातले, 
हे काडेपेटीसारख्या कागदी पेटीत दाटीवाटीने निरिच्छ  पडलेले      
आयुर्वेदिक गोळ्यांसारखं यांचा रूपड  
पण यांना काही आवाज नाही 
रंग नाही 
आकर्षक उजेड नाही 
नुसता आपला वास नि कुट्ट काळा धूर धूर धूर धूर
अशीच माणसं आपल्या अवतीभोवती दिसतात भरपूर
जन्माला आलोय म्हणून कसंतरी रडतखुडत आपल्या आयुष्य नामक अपघाताला मृत्युलोकापर्यंत एकदाच  पोहोचवणंच  यांना मान्य असतं
माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं



काही माणसं असतात आपटीबारसारखी 
आपल्या सोनेरी वेस्टनाने लोकांच्या अपेक्षा उंचावत 
एकदिवस तोंडघशी पडतात
आणि फुटतात 
पाकिस्तानचं आंतरराष्ट्रीय राजकारणात जे होतं यांचं अगदी तसं होतं 
रोज नव्या कारणाने अख्ख्या जगासमोर यांचं हसं होतं 
सोनेरी गैरसमजात जमिनीपासून दोन फूट वर अधांतरी तरंगायचं यांचं कौशल्य असामान्य असतं 
माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं



काही माणसं पावसासारखी
सदैव उत्साहाचा पाऊस
छोटा पाऊस
मोठा पाऊस
म्युझिकल संगीत पाऊस
स्वत:च्या अंगभूत गुणांनी लोकांना आपलंसं करायची यांना हौस 
पावसाळी ढगां सारखे स्वत:ला रिते करून घेतात 
मनात काही ठेवत नाहीत 
सदैव मित्रांच्या गराड्यात असतात एकटे कधी जेवत नाहीत
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे प्यारे असतात 
सदैव उत्साहाची  उंचच उंच कारंजी  फुलवताना ते दिसतात
यांच्या कसल्याच वागण्याला  स्वार्थी,  व्यावहारिक  तारतम्य नसतं
माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं



काही माणसं म्हणजे दणकाच 
यांच्या येण्याची वर्दी कोसोदूर पसरते 
अस्मान निनादून सोडतात 
वेडंवाकडं धाडस केलत तर तुमची खैर नाही 
हे तोवरच चांगले जोवर तुमचं यांच्याशी वैर नाही 
मात्र मैत्रीपुढे सारं जग यांना नगण्य असतं
माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं



काही लोक असतात फुलबाजीसारखे
अत्यंत सामान्य जगणारे
गर्दीत बेमालूम मिसळणारे 
नेहमी जितकं हवं तितकंच फुलणारे 
जास्त सौम्य नाही व जास्त प्रखरही नाही 
कोणावर हक्क नाही वा राग मत्सरही नाही
दिवाळीत पणतीवर लागणार्‍या पहिल्या फटाक्याचा मान यांचा
यांचं साधं समरसून जगणं खूप शिकवून जातं 
यांचं तृप्त विझणा देखील मनाला चटका लावून जातं
यांचं तोलूनमापून अदबशीर हळुवार नम्र आदरपूर्वक फुलणं मनोरम्य असतं
माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं



काही माणसं म्हणजे माळेत घुसडलेले रस्सी बॉम्ब
यांची असते वेगळीच बोंब
हे कसेबसे जेवायला उठतात झोप आले की निजतात 
जेवणं आणि झोपणं याउपर काही करू नये
आपण आपला वळकटी घेऊन निमूट निजावं
भलत्या भानगडीत पडू नये  
दुसर्‍याच्या निखार्‍याची उब कधी मिळेल याची वाट पहात बसतात   
यांना कधीही पहा हे झोपाळलेलेच दिसतात 
मग तो वात लावेल
मग ही माळ पेटेल 
मग ही अर्ध्यापर्यंत पेटत येईल
आणि मग मला अगदी नाईलाजाने पेटावं लागलंच तर मी पेटेन
तरी  पेटेनच याची शाश्वती नाही
सारी माळ पेटल्यावरही
मी एका कोपर्‍यात निष्क्रियतेच्या  कोशात माझी आळसाची शाल पांघरून अलिप्त राहू शकतो      
किंवा असा दणका देईन 
की ते अर्ध्या माळेचं  मढ शोधून सापडणार नाही  
माळ अर्धीच फुटेल 
आणि याला मध्ये घेतलं नसतं तर बरं असं माळेला वाटेल
स्वत:हून पेटण्याचे सारे गुण अंगी असून 
स्वत:हून स्वत:साठी पेटण यांना अमान्य असतं 
माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं



काही फटाके लोकांदेखी फुसके बार 
फटाक्याच्या जन्माला आलेले हे ओल्या वातीचे हळवे बार
आपापले धुमसत राहतात 
कोणी यांची दाखल घेत नाही 
हसून झाल्यावर लाथेने यांना भिरकावून देतात 
पण शेवटी आपले म्हणून कोणी यांना घरी नेत नाही 
सारे फटाके फुटले 
लोक घरी गेले
तरी कोपर्‍यात भिरकवलेला तो मंद मंद धुमसतच असतो
त्या एकांतात आत असल्या नसल्या उर्जेसकट एकदाचा व्यक्त होतो
त्या कोपर्‍यात एक अंधुक प्रकाश हळू हळू प्रखर होत जातो
आणि कोणालाही आवाजाचा फार त्रास न देता हा तेजस्वी प्रकाश धूर बनून राहतो 
कदाचित याला मायेचं उन्ह लागलं असतं तर पेटलाही असता 
पण फुसक्या बाराची किंमतीचं  उत्तर नेहमी   शून्य असतं
माणसं आणि फटाके यांत अतोनात साम्य असतं



प्रसाद साळुंखे 


२ टिप्पण्या:

  1. माझा कविता वाचण्याचा पेशन्स कमी आहे भावा पण तू वाचलेली काम करताना ऐकली गेली आहे. छान आहे इतकचं म्हनेन. लिहिता राहा. तुला कधी तरी निसर्ग ओरबाडणाऱ्या माणसांबद्दल लिहावस वाटलं तर नक्की लिही.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद तायडे, खास तुझ्यासारख्या पेशन्स कमी असणार्‍या लोकांसाठी पुरवलेली ती खास सोय आहे, माझ्या गिन्याचुन्या वाचकांची मला फार काळजी आहे :) हम्म्म्म तू सुचवलेला विषय चांगला आहे, नक्की लिहिन मी

      हटवा