नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

एकदा निसर्गाला साद घाल


एकदा निसर्गाला साद घाल
ट्रेन्स सुटल्या सुटू देत
फायली मिटल्या मिटू देत
गळ्यातला टाय सैल करून श्वास घे जरा
धावपळीतून तू थोडासा पॉज घे जरा
उद्या येऊन हवं तर पुन्हा स्टाफशी वाद घाल
पण आता चल एकदा निसर्गाला साद घाल

पांढरा झालाय पाय सॉक्स मध्ये राहून
निवांतपणे बघ त्याला वाहत्या पाण्यात ठेवून
रोजचं आहे काम कसला म्हणून चेंज नाही
डोंगरदर्‍यात जाऊ जिकडे मोबाईलची रेंज नाही
सारखी कॉफी पिऊन तुझी जीभ झालीय कडू
पिठलं भाकर अन् रानमेवा, मस्त मेजवानी झाडू
तुंबलेल्या कामांना सरळ उभी काट घाल
आता चल एकदा निसर्गाला साद घाल

डोंगरमाथ्यावरचा सोसाट्याचा वारा कानी तुझ्या शिरेल
मग एवढी शिदोरी पुढे तुला वर्षभर पुरेल
पुढल्या वर्षी सुट्टी घेऊन हमखास येशील परत
म्हणशील इथे आल्याशिवाय आता वर्ष नाही सरत
तीही बघ कशी कधीची घरी बसलीय झुरत
रोजची भांडणं तिच्यासाठी वेळ नाही उरत
तिथे गप्पा मारता मारता अलगद हातामध्ये हात घाल
निदान आता तरी चल एकदा निसर्गाला साद घाल


-  प्रसाद साळुंखे

1 टिप्पणी:

  1. Namaskar,

    I got your contact from Bloggers network
    I would like to invite you to send any related article for this edition . we give proper credit to all writers , you can also mention about your blog. check out the guidelines and let me know if you are interested. Sending you the link to our last year's Diwali Edition as well for your reference.


    link to guidelines: http://www.marathicultureandfestivals.com/diwali-e-edition-rules

    LInk to Diwali Edition 2015

    Please let me know if interested.

    Thanks

    उत्तर द्याहटवा