मंदिरातून बाहेर पडल्यावर अखेर आम्ही एको पॉईंट बघितला. एको पॉईंटला एको ऐकू येतो का? याची प्रात्यक्षिकं चालू होती. काही जण नावं घेत होते (नाही लाजत घ्यायची नावं नव्हे) आपापली नावं उदा. अनिलऽऽऽ, सुनिलऽऽऽ, राजेशऽऽऽ इ., हे हजेरी घेतल्यासारखं वाटत असतानाच काही जण टोपणनावाने घसा मोकळा करत होते उदा. एऽऽ काळ्याऽऽऽ, एऽऽ वान्डर्याऽऽऽ, एऽऽ चपट्याऽऽऽ इ., काहींना बहुतेक हे ही पसंत नव्हतं ते नुसतेच आऽऽऽ, ओऊऽऽऽ, हेऽऽऽ असे किंचाळत होते, त्यातले सुद्धा काही गर्दीला लाजत बिचकत इकडेतिकडे पाहत किंचाळत होते. थोडं मनोरंजन झालं खरं पण सहनशीलतेच्या पलिकडे गेल्यावर मला "अरे गप्प बसा" असं जोरात ओरडावसं वाटलं, पण माझा आवाज जवळपासच्या पॉईंटसवर निनादेल आणि अर्ध माथेरान निष्कारण मौन पाळेल म्हणून मी मोह टाळला. एको पॉईंटस वरून माथेरानच्या डोंगररांगा दिसत होत्या. या डोंगरदर्यांकडे पाहिल्यावर वाटतं आपण किती लहान आहोत नाही? (अशी कुणाचीतरी वाचलेली वाक्य चपखल आपली म्हणून पेरली की वाटत आपण किती महान आहोत नाही?) तिथे एक टेलिस्कोपवाला बसला होता, तो वीस रुपये घेऊन दुर्बिणीतना सिंहाच्या आकाराचा कडा, पनवेल शहर, खालची छोटी गावं, जवळपासचे पॉईंटस, प्रबळगडाची तटबंदी दाखवत होता, आणि (वीस रुपये मोजले असल्यामुळे)पाहणार्याच्या चेहर्यावरही याचीसाठी केला होता अट्टाहास असे भाव दिसत होते. खालच्या गावतून इथल्या घोड्यांसाठी चारा येतो असं त्या टेलिस्कोपवाल्यानं सांगितलं. दोनचार फोटो काढून आम्ही तिथून निघालो. इतक्या कोलाहालातही तिकडे जाऊन बसल्यावर शांत वाटतं, कारण तुम्ही मुळात या गर्दीत नसताच तुम्ही एका क्षणी गवताच्या पात्यावर, दुसर्याक्षणी डोंगराच्या टोकावर, मग कधी ढगांच्या आड, कधी क्षितीजाच्या पार, कधी उन्हाची किरणं धरून खाली येता, कधी पुन्हा पक्षांचा थवा होता, तृष्णा काही भागत नाही निसर्ग साठवायला दोन डोळे अपुरे पडतात. पण निघावं लागलं ताटं वाट बघत होती. येताना माकडाचं अख्खं कुटुंब एका फांदीवर बसलं होतं, "फोटो घ्या की राव" असं सांगत होतं जणू, आम्ही त्याचं मन राखलं. आम्ही दिवसभर फ्यूजला रात्री झालेल्या वान्त्यांवरून 'वकार युनूस' चिडवत होतो. ऍन्ड्रू काहीशी शांत वाटत होती, चौकशीअंती कळलं की सकाळी आम्हाला उठवताना झालेल्या झटापटीत तिच्या नाकावर माझी लाथ बसली होती, मी झोपेत असल्यामुळे मला वाटलं ती कंटाळून झोपली म्हणून शांत आहे, लाथ बसल्याचं माझ्या गावीच नव्हतं. मी सॉरी म्हणून तिची पुडी खिशात टाकली. तिनंही फार लागलं नसल्याचं खोटच सांगितलं. मी तिच्याजागी असतो तर मागचा पुढचा विचार न करता लाथ मारणार्याचा जरासंध केला असता. येताना पुन्हा बाजारात एक चक्कर झालीच. चिक्क्या, सरबतं, टोप्या, चपला, बॅगा अशी थोडीफार खरेदी करुन आम्ही परत हॉटेलवर आलो. हॉटेलवर आल्यावर ओलेसुके कपडे बघितले आवराआवर करायची वेळ झाली होती, सामानाची बांधाबांध करायला सुरुवात केली. मध्ये थोडा वेळ जेवणातही गेला, जेवण नेहमीसारखं चविष्ट आणि बेलगाम होतं आणि आज तर स्वीट डीश म्हणून रसगुल्लेही होते तेही हवे तितके बेलगाम. रसगुल्ले डझनभर हानले आणि बडिशेप चघळत रुमवर परतलो. दोन दिवस मोबाईलचा संबंध नव्हता म्हणून काहींचे मोबाईल रिंग देऊन हुडकावे लागले. बॅग्स तयार झाल्या अजून निघायला बराच अवकाश होता, आवारातला झोपाळा आमची वाट बघत होता. झोपाळ्यावर झोके घेत असताना पुन्हा माकडं दिसली. एक माकडं कम्पाउंड वॉलवरनं चालत चालत काहीतरी खात होतं, मला तर तिकडे फळं, बिया असलं काहीच दिस नव्हतं, म्हणून नीट बघितल्यावर कळलं की हा मुंगळे खातोय, बरेचसे प्रोटिन्स मिळत असणार त्याला या मुंगळ्यांमधून.मागे वळून पाहिलं तर हॉटेलच्या पत्र्यांवर माकडांची गॅंग आली होती, बरीच छोटी माकडंही होती, हॉटेलच्या मागच्या बाजूच्या पायर्यांवरनं सरळ वर जाता येतं तिथनं हे सगळे पत्रे स्पष्ट दिसतात. गळ्यात कॅमेरा होताच मी लगबगीने पायर्या चढून वर गेलो आणि त्यांच्या माकडउड्या टिपल्या. गंमत म्हणजे ते आपापल्या मस्तीत इतके मग्न होते की माझ्या फोटो काढण्याकडे त्यांचं लक्षच गेलं नाही. मी मनसोक फोटो मारले. पत्र्यावरून झाडाची फांदी पकडताना एक माकडाच लहान पिलू अंदाज चुकून खालच्या पत्र्यावर धाडदिशी आदळलं, इकडे माझ्या छातीत धस्स झालं. पण पिलू उठून पुन्हा वरच्या पत्र्यांवर आपल्या लहान भावंडांत मिसळलं. ते गप्प होतं पण फारसं लागलय असं वाटत नव्हतं, हा दिवाणखान्यातला बाबांना परवाच कुणीतरी प्रेझेंट केलेला बास फोडल्यावर एखाद्या खेळकर मुलाच्या चेहर्यावर जसे बापुडवाणे भाव असतील तसं काहीसं ते माकड दिसत होतं. माझा अंदाज खरा ठरला त्या पिलाने पुन्हा माकडचाळे सुरु केले, तेव्हा कुठे मनाची चलबिचल कमी झाली.
सुळका
कोणीतरी येतय
माकडांचा फॅमिली फोटो
मी राखण करतोय दारं खिडक्या लावू नका, बॅगेतला खाऊ कोणी नेणार नाही
लटकूराम
'जय बजरंगबली' म्हणुन हातावर घेतला आहेस न तो कलावंतीण सुळका. आम्ही गेलो होतो त्यावर मागे. इकडे वाच तो लेख. सॉलिड आहे तो आणि तो 'सुळका' आहे ना तो इर्शाळगड़ आहे. मस्त आहे तो पण ट्रेक साठी.
उत्तर द्याहटवामाझ्या मधला भटक्या जागा झाला. http://mazisahyabhramanti.blogspot.com/
धन्यवाद रोहनजी,
उत्तर द्याहटवामी वाचलेलं मागे एकदा, पण आता पुन्हा नक्की वाचेन,
मी ट्रेक वगैरे कधी केलं नाही, आवड आहे, आमचा ग्रुप रडवा आहे. बाखरवड्या, लिमलेटच्या गोळ्या, टिश्यू पेपर, आणि पाण्याची बाटली ही यांची सहल. ट्रेक करणार्यांचा ग्रुप कधी मिळालाच नाही, गावी हौस भगवून घेतो, तिथल्या लोकल मुलांना जमवून आसपासच्या डोंगरांवर जातो 'कोकण रेल्वे' बघायला.