नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

रक्तात दारू नव्हतीच ...
तो दारू पिऊन गाडी चालवत होता ... 
तो दारू पिऊन गाडी चालवत होता !!!
तो दारू पिऊन गाडी चालवत होता.
तो दारू पिऊन गाडी चालवत होता? असं ?
तो दारू पिऊन गाडी चालवत .. ?  नक्की ? 
तो दारू पिऊन गाडी ? काहीही
तो दारू पिऊन ? छे छे 
तो दारू ? अशक्य 
तो? देवमाणूस 
कोण म्हणतं  !!!... ? तो दारू पिऊन गाडी चालवत होता, 
पुरावा आहे ??
चला सदोष मनुष्यवधातून निर्दोष मोकाट फिरायला मुक्त 
लागला निक्काल
नेक्ष्ट
त्या  जान्हवीची  डिलिव्हरी काही होत नाही या वर्षात 
निदान  ती वडाळ्याची  फ्री वे वरची फाईल काढा
साहेब यांचं काळवीटीचं पण इन्टरेस्टिंग आहे   
काय वीट आहे रे ? बरं माझा  अंदाज  लिहून घे 
काळवीट स्वत: बंदुकीच्या नळकांडीतून आत बंदुकीत घुसलं
त्या काळवीटाकडूनच  अनावधाने चाप ओढला गेला
तिथे दुसरं कोणीही नव्हतं 
ती मानसिक नैराश्यातून केलेली शुद्ध आत्महत्या होती  
बाकी सारं म्यानेज होईल  
हळव्या मनाच्या वैचारिक लोकांसाठी काळवीटाच्या रक्तात अल्कोहोल दाखवू फार फार तर    
पाहिलंस बोलण्यात वेळ गेला 
आवरा  आता घरी चला 
आणि आज जंगी पार्टी असेल 
सहिष्णूतेचा विजयोत्सव 
तेव्हा फुटपाथवरनं सांभाळून चाला 
तुमचा कोणीही वाली नाही  

- प्रसाद साळुंखे

४ टिप्पण्या: