पमा - अरे ती दिसली होती
दुमा - कोण ती?
पमा - अरे ती रे ती (डोळा मिचकावत )
दुमा - आयवा काय बोलतो, ती तीच होती ? तीच ती होती ?
पमा - मला वाटलंच तू पागल होशील, हो तीच ती तीच ती, ती तीच
दुमा - ती तीच आणि तीच ती ते कळलं , आता तिचं पुढे काय ते सांग ना
पमा - सांगतो रे असा मस्तपैकी शनिवार होता, सुंदर ऊन पडलं होतं, थोडा गारवा .. थोडं ऊन. म्हटलं एक रपेट मारून येऊया. मस्त वातावरण "सुहाना सफर और ये मौसम हसी, हमे डर है हम खो ना जाए कही" गुणगुणत ...
दुमा - एक मिनिट मला हे सगळं ऐकावं लागणार आहे का गाणं वगैरे ?
पमा - अर्थात (हसत हसत )
दुमा - माझी मानसिक तयारी नाही, तेव्हा तू टु द पॉईंट बोल, डायरेक्ट विषयाला हात घाल
पमा - अरे पण जरा वातावरण निर्मिती
दुमा - बोडक्याची वातावरणनिर्मिती, तू काही "सुहाना सफर" वगैरे गात नाहीस, तू ते 'अंदमान' असं लिहिलेलं फिकट झालेलं गुलाबी ढगळ टीशर्ट, आणि प्रत्येक सहलीला वापरतोस ती थ्री फोर्थ फार फार तर रविवारी धुवायची असेल तर काल हापिसात घातलेली जीनची पॅन्ट घालून, ती बाटाची गुळगुळीत वर्षानुवर्षांची स्लीपर घालून घालून पचाक पचाक आवाज काढून पायऱ्या उतरला असशील. आणि काही रपेट बिपेट नाही "हला जागचे" म्हणत बायकोने साखर किंवा दळण टाकायला पिटाळलं असेल. तेव्हा मूळ विषय घे
पमा - ती दिसली
दुमा - हा पुढे
पमा - ओळखलं म्हणजे, हसली
दुमा - हास्यास्पदच आहेस तू त्यात तिचा काय दोष म्हणा
पमा - ए चल मी जातो
दुमा - अरे असं काय करतो, काय दिसते, कशी दिसते, कुठे दिसली ते सांग ना दिसली हसली हे असं सांगतात का ?
पमा - मार्केटात दिसली, मी म्हणालो काय वाहिनी ओळखलंत का? लास्ट बेंचवर बसायचो तुमच्या ह्यांना खेटून, माझा अर्धा पॉकेटमनी तुमच्या खादाडीवर, फ्रेंडशिप बँडस, ग्रीटिंग्स आणि गिफ्ट्स वर जायचा. त्या आर्चिज वाल्याने माझ्याच पैशात बाजूचा गाळा विकत घेतला होतं त्या काळी.
दुमा - गप रे , तुझं ना नेहमी हे टोक नाही तर ते टोक, नीट सांग ना भाई
पमा - मी सांगेन तसं ऐकायचं असेल तर मी सांगतो
दुमा - ओका काय ते तुमच्या शैलीत
पमा - आता कस्स, तर असं मस्त वातावरण , मी रपेट मारायला जातो. बंटीच्या टपरीवर डनहिल घेतली आणि मस्त झुरका घेतला "मैन जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं मै उडाता चला गया "
दुमा - परत गाणं च्यायला, आता पुढे? (रागात)
पमा - पुढे मला प्रेशर आलं
दुमा - कसलं प्रेशर ?
पमा - डनहिल ओढल्यावर मला प्रेशर येतं, नाही मला डनहिल ओढल्यावरच प्रेशर येतं, माझी संपली होती म्हणून सकाळ सकाळ बंटीकडे गेलो
दुमा - शी
पमा - हो आधी डनहिल, मग प्रेशर, मग शी, मग फ्लश ... निवांत
दुमा - हागऱ्या फिरकी घेतोय ना माझी तू? नीट सांग दिसली होती कि नाही?
पमा - सांगतोय ना, तू मध्ये मध्ये डिस्टर्ब् केलंस तर असाच मी कुठून कुठेही जाईन
दुमा - च्च ... बोल
पमा - तर असा झुरके घेत उभा होतो, धुरांचे एक एक ढग हवेत सोडत, आजूबाजूला धुकं धुकं वाटत होतं. तेवढ्यात समोरून कोणीतरी येत असल्याचं मला दिसलं. ती व्यक्ती जसजशी जवळ येत होती तसतसं धुकं विरळ होत होतं. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझी पहिली होती. थोडी सुटली होती, पण अदा त्याच, मार्केटमध्ये नाकाला रुमाल लावून तिचं चालणं पाहून खात्रीच पटली तीच ती.
दुमा - ओह हो, जिगरी है भाई तू मेरा, पुढे बोल
पमा - ती चकचकीत गेली
दुमा - ए
पमा - ती चक्क चक्कीत गेली, पिठाच्या
दुमा - अच्छा
पमा - सगळं पीठ पीठ भरून राहिलं होतं, त्यात ती अधिकच गोरी दिसत होती. हाफपॅण्ट घातली होती.
दुमा - मॉड झाली रे
पमा - नाही, भैय्याने हाफ पॅन्ट घातलेली, खांद्यावर गमजा आणि चक्की बरोबर त्याच्या तोंडाचा पट्टा चालू होता. मग ती तणतणत निघून गेली
दुमा - हॅट साला, या भैयाला ना एकदा कानफटवला पाहिजे, लय बोलतो साला. आता ती पुन्हा कधी दिसेल?
पमा - अरे नाही ती तिथेच होती, आधीची बाई तणतणत निघून गेली तिला वाटलं भैय्याने पीठ मारलं म्हणून आता हिच्या दीड किलो दळणात भैय्या या काय मारणार डोंबल
दुमा - ती बाई मरो, तिच्याबद्दल सांग ना ?
पमा - हो हो धीर धर, मस्त दिसत होती ती, अगदी त्या पावडरीच्या आणि साबणातल्या जाहिरातीतल्या मॉडेलसारखी फ्रेश फ्रेश. पायजमा आणि टीशर्ट, केसात चॉपस्टिक घुसडलेली, केसांना बांधायचा बॅण्ड उजव्या हातात घातलेला, अधनंमधनं फोनशी चाळा सुरु होता. रात्रीची झोप ओसरलेले तिचे नितळ डोळे, भूवयांची कोरीव कमान, पापण्यांची लाडिक उघडझाप आणि कोणाचं लक्ष नाही पाहून मध्येच तिने तोंडाचा चंबू ...
दुमा - अरे ए, अरे काय चुंबनदृश्य ऐकवतोय, तोंडाचा चंबू काय?
पमा - नाही तसं नाही तोंडाचा चंबू करून पिठाच्या चक्कीवर एक सेल्फी घेण्याचा निरागस प्रयत्न केला
दुमा - सेल्फी वा, हिचा व्हॉट्सअप नंबर मिळवला पाहिजे
पमा - बाजूच्या न्हाव्याला रेडिओ गाणं गुणगुणत होता
दुमा - "चेहरा है या चांद खिला है जुल्फ घनेरी छांव है क्या, सागर जैसी आँखोंवली ये तो बता तेरा नाम है क्या"
पमा - नाही हे नव्हतं "तुने मुझे बुलाया शेरावालिये , मैंने आया मैंने आया शेरावालिये, ओह जोता वालिये , ओह लट्टा वालिये , ओह मेहरा वालिये , तुने मुझे भुलाया शेरावालिये , मैंने आया मैंने आया शेरावालिये" हे लागलेलं मस्त
दुमा - हे असं असतं काय कधी? हे गाणं कसं असेल ?
पमा - त्या न्हाव्याला काय तुझं कॉलेजमधला झंगाट माहितीये, जे रेडियो ऐकवेल ते तो सगळ्या मार्केटला ऐकवायचं काम करतो बिचारा
दुमा - आता बरी नाही करत वातावरणनिर्मिती, मघापासून थापा ठोकतोयस, डनहिल ओढतो म्हणे डनहिल, गोल्ड फ्लॅक सुपरस्टार फुंकणारे तुम्ही ते पण उधारीवर, तरी ऐकलं ना तुझं? वातावरण निर्मितीसाठी खपलं ना ? तसं काहीतरी सिच्युएशनल बोल ना
पमा - भाई सिच्युएशनलच आहे, शेरावलीएचं गाणं का लागावं? त्या शेरावलीएचा आशीर्वाद आहे तुला मर्दा, आता सुसाट जा तू , कोजागिरीला मंडळाच्या वतीने गच्चीत गरबा घेतल्याचं पुण्य आहे रे आपल्या गाठीशी दुसरं काही नाही
दुमा - तुझं कॉउंटरी बाकी आहे कोजागिरीचं
पमा - ह्म्म्म देतो रे, कोणाचं दिलंय ते तुझं ठेवेन, तू ऐक ना, एव्हाना त्या पिठाच्या चक्कीचं व्यासपीठ झालं होत, पिठाची चक्की हा त्या मार्केटचा केंद्रबिंदू झाला होता. ती पाच सात मिनिटं काय उभी राहिली असेल, तर चहाच्या टपरीवाल्याच्या च्या प्यायला आलेल्या गर्दीचं लक्ष तिच्याकडे, न्हाव्याच्या गिऱ्हाईकांच्या माना वस्तऱ्याला न जुमानता चक्कीच्या दिशेने वळत होत्या, सायकलवाला अस्लम गेली पंधरा मिनिटं टायर बुचकळून तिच्याकडे पाहत पंक्चर काढत होता, आता त्या टायरला मोड येतील कि काय असं झालं होतं, मॊर्निंगवोक करून आलेले जेष्ठ नागरिक वृत्तपत्राच्या आडूनआडून ते नयनसुख मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेल्या डोळ्यात साठवत होते, येणारे जाणारे कधी नव्हे ते भैयाला "क्या कैसा हय?" वगैरे विचारपूस करून जात होते, तेवढ्यात तिचे गुलाबाच्या पाकळ्यांचे नाजूक ओठ अलगद विलग होऊन एक रेशमी ठसक्याचा आवाज बाहेर आला "भैया हुआ क्या?" हाय हाय तेच मार्दव. भैय्याच्या तर सर्वांगाला कंप सुटला, चक्कीच्या पट्ट्याच्या बाजूला उभा असल्यामुळे फार कोणाला जाणवला नाही इतकंच, "बस पांच मिनटं, आपहिका डाला हू" हे नेहमीचं वाक्य त्याने फेकलं, पण नेहमीची सहजता त्यात नव्हती. संधी हेरून चारपाच जण भैयाला झापून आले "रोजका है तेरा पटपट हात चलाव" वगैरे दम देऊन तिच्याकडे ओझरतं पाहत निघून गेले
दुमा - कॉलेजलाही असंच व्हायचं, रोझ क्वीन आहे बाबा आपल्या काळातली. तशी अवतीभवती बागडणारी फुलपाखरं बरीच होती, पण म्हणतात ना फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज पर्मनंट
पमा - मग काय, सौंदर्य ते सौंदर्य
दुमा - किती वेळ होती उभी?
पमा - एक सात आठ मिनिटं होती, मग भैय्याने ती दळणाची पिशवी तिच्या स्वाधीन केली तिनेही वीस रुपये भैयाला टेकवले आणि दळण तोलून मापून सांभाळत ती तोल सावरत, खड्डे चुकवत चालू लागली, ती निघून गेली आणि अख्ख मार्केट चुकचुकलं, न्हाव्याकडे वेटिंगला बसलेले निषेध म्हणून दाढी न करता निघून गेले, चहाच्या टपरीवर शुकशुकाट झाला, जेष्ठ नागरिकांचे बसून बसून गुडघे अचानक दुखू लागले त्यांनीही काढता पाय घेतला, अस्लमला पंक्चर सापडलं एकदाचं
दुमा - याच एरियात राहते तर?
पमा - नाही तीन स्टॉप पुढे राहते फक्त दळण इथे टाकते
दुमा - बरोबर तिथे चक्की नसणार
पमा - मूर्ख आहेस का, अरे याच एरियात राहते
दुमा - बरं पुढचा प्लॅन सांग, आगेकूच कशी करायची ?
पमा - सिम्पल रे चक्कीवाल्याकडे जायचं आणि विचारायचं शलाका परब कुठे राहते ?
दुमा - का ?
पमा - का म्हणजे ?
दुमा - शलाका परब का विचारायचं ? तुला रोझ क्वीन ऋतुजा म्हात्रे दिसली होती ना?
पमा - नाही शलाकाच दिसली होती, तुला म्हटलं ना ती दिसली होती
दुमा - ती ती काय मग ऋतुजा म्हात्रे काय तो आहे का? (रागात )
पमा - अरे तुला शलाका आवडायची ना?
दुमा - आवडायच्या सगळ्याच रे पण ऋतुजा म्हात्रे खास
पमा - खास पण हमखास नव्हती
दुमा - थोडक्यात तू हगला आहेस, तेही डनहिल न ओढता
पमा - तू शलाका बरोबर फिरायचास ना? सगळे तुला चिडवायचेही
दुमा - फिरायचो म्हणजे मैत्रिण होती माझी , मी दर वेळी सांगायचो तसं काही नाही, तर तुम्हाला वाटायचं मी मस्करी करतोय आणि खरंच काहीतरी लपवतोय, एवढा रोझ क्वीन, रोझ क्वीन म्हणतोय तरी त्या उसाचं चिपाड शलाकाची स्टोरी सांगत बसलास
पमा - आपली आपली प्रत्येकाला रोझ क्वीनचं वाटते मला वाटलं तसंच असेल तुझंही
दुमा - नशीब अजून काही घोळ नाही घातलेत
पमा - घोळ वरून आठवलं, ऋतुजाने एकदा मला विचारलेलं तुझ्याबद्दल
दुमा - म्हणजे?
पमा - म्हणजे हेच जनरल तुझ्या आवडी-निवडी, तुझं कोणी आहे का वगैरे ?
दुमा - म्हणजे तिला माझ्याशी? माझ्यावर ? आय न्यू इट. पण हिंमत का नाही केली वेडीने
पमा - कारण मी सांगितलं
दुमा - काय ?
पमा - कि मला वाटलं कि यु अँड शलाका आर सिंग इच अदर
दुमा - काय?
पमा - मला तेव्हा तसं वाटायचं
दुमा - शलाकात नि तिच्यात, विस्तव का जायचा नाही, याचं वास्तव आता समोर येतंय. मला तेव्हा का नाही सांगितलं हे
पमा - सांगणार होतो तो पर्यंत महेश आणि ती क्लोज आले होते
दुमा - महेश कुठनं आला मध्ये ?
पमा - तिला तुझं कळलं नि तिचं भांडण झालं शलाकाशी, मग ती शांत राहायला लागली, मग महेश नि मी तिला चियर अप करायला जायचो, महेशने डाव साधला. मग पुढे पुढे तो एकटाच तिला चियर अप करायला जायला लागला
दुमा - धन्यवाद माझ्या पहिल्या वहिल्या प्रेमप्रकरणात माझ्या प्रिय मित्राने अशी महत्वाची भूमिका बजावली तर, मंडळ आभारी आहे
पमा - सोड ना तुझं काय वाईट झालं, वहिनी बँकेत चांगल्या पोस्टवर आहेत, जेवणही रुचकर बनवतात अजून काय हवं
दुमा - ती सध्या काय करत असेल रे?
पमा - काही तुझ्या आठवणींनी हळवी वगैरे होतं नसेल, तिला तिची कामं आहेत आणि तुला तुझी. वहिनींनी येताना दळणाचा डबा चक्कीतुंन आणायला सांगितलाय, नाहीतर त्या काय करतील याचा नेम नाही
दुमा - बरी आठवण केलीस ती सध्या तेल लावत जावो, सध्या मला दळण नेणं महत्वाचं, जातो लगेच नाहीतर पाच मिनिटात फोन घुरघुरेल. तू भेट सवडीने संध्याकाळी हिशेब करायचाय जरा तुझा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा