माथेरान जवळजवळ प्रत्येकाने पहिलेलं, प्रत्येकाच्या ओळखीचं असं सहलीचं ठिकाण. प्रत्येकाच्या आवडीचं असं नाही म्हटलं कारण प्रत्येकाच्या आवडीची व्याख्या वेगळी, माथेरान एकच प्रत्येकाने अनुभवलेली सहल मात्र वेगळी. माझे अनुभव चांगले होते, अपेक्षेपेक्षा चांगले होते असंही म्हणू शकतो. हे अनुभव मी या सदरात मांडणार आहे, म्हणजे प्रवासवर्णन नाही पण थोडं खरं आणि थोडा मालमसाला वापरून केलेलं अनुभवकथन. मला मुळात वाटलंच नव्हतं की आम्हा मित्रमैत्रिणींचं टोळकं माथेरानला जाऊ शकेल, तेही रहायच्या सहलीला. पण मन्या, टॉवर, मी आणि एलफिस्टन आम्ही एका पायावर तयार झालो. पियू, नेहा, ऍन्ड्रू सायमंडस, फ्यूज या मुलींचं तळ्यात मळ्यात होतं. मग सहलीचे दिवस जवळजवळ येत गेले तस तसे सगळे तयार झाले. मन्या, टॉवर,पियू, नेहा, ऍन्ड्रू सायमंडस, फ्यूज या सहा मुली आणि मी, एलफिस्टन दोन मुलगे सॅक भरून तयार झालो. ही नावं विचित्रच आहेत नाही, असणारच टोपणनावं आहेत ती. तर मन्याच्या बाबांनी हॉटेल बुक केलं(म्हणजे हॉटेलमधल्या दोन रुमस बुक केल्या.) सगळ्यांना एक दिवस अगोदर सहलीच्या पहाटेच्या ट्रेन्सच्या वेळा सांगून झाल्या. तरी पियूचं तळ्यात मळ्यात होतचं, शेवटी तिचं न येणं पक्कं झालं. एरव्ही 11 वाजेपर्यंत लोळणारा मी पहाटे 5.20 च्या ट्रेनमध्ये आंघोळपांघोळ आटोपून ताजातवाना होऊन बसलो. वाशी वरून ठाण्याच्या फ्यूजला गाठून आम्हाला कर्जतची ट्रेन पकडायची होती. ती वेळेत पोहोचली होती आणि आम्ही एकदाची ट्रेन पकडली. मला जबाबदारी पार पाडल्यासारखं वाटत होतं. ट्रेनमध्ये पियूही होती, मस्कापॉलिशीत पोरी कोणाच्या बापाला ऐकायच्या नाहीत. बाबांना मस्का कसा लावला हे नंतर ती सांगत होती.
खूप दिवसांनी सहलीचा योग आला म्हणून आम्ही खूषीत होतो. नोकरी मिळेल का? मिळाल्यावर कितपत टिकेल? growth aspect काय असेल? या सार्या प्रश्नांवर माथेरानच्या दर्याखोर्यातलं धुकं दाटलं होतं. डोंगरातनं गेलेला वळणावळणाचा रस्ता, वाटेत भेटणारे मिनी ट्रेनचे रुळ, माथेरान जवळ आल्याची चाहूल देणारी वार्याची झुळूक यामुळे सुरुवातीचा नेरळ पासून दस्तुरी नाक्यापर्यंतचा टॅक्सीतला प्रवासच अखंड सुरू रहावा असं वाटत होतं. प्रत्येक गोष्टीत पिकनिकची नशा होती, मजा होती. टॅक्सीतून ढेरपोट्या बॅगा सांभाळत उतरताना, टॅक्सीचे भाडे चुकते करताना, दस्तुरी नाक्यावर तिकीटं काढतांना, रुळांवरून लहान मुलांसारखं तोल सावरत चालताना, कॅमेर्याचं बटण वारंवार दाबतांना सगळं करतांना मजा येत होती. फारच थोड्या वेळात माथेरानची हिरवाई नसनसांत भरुन राहिली होती. प्रत्येक श्वासागणिक माथेरानचा तजेला छातीत भरून रहात होता. मी फिदा झालो माथेरानवर, love at first sight आजवर नुसतच सिनेमात ऐकलं होतं, पण नेमका अर्थ आता कळला मला. इथल्या निसर्गसौंदर्यात एक नजाकत आहे, प्रत्येक गोष्टीत अदा आहे मग ती माकडाची एका फांदीवरून दुसरीवर मारलेली बेडर उडी असो, की साधं घोड्याचं उभ्याने पाय मुडपणं, किंवा मग नुसतं फुरफुरणं. आणि धुकं ... धुक्यात तर खरी जादू आहे, कधी ते प्रेयसीच्या अबोल्यासारखं गंभीर मनात काहूर माजवणारं, कधी लटक्या रागासारखं हवंहवंसं एकटक बघत रहाव असं. हे धुकं अंगभर ओढून घ्यावं आणि निश्चिंतपणे स्वतःचेच श्वास ऐकत रहावे असं वाटतं. या धुक्यात खोल कुठेतरी झाडाखाली अंगाचं मुटकुळं करून पडून रहावं.
आम्ही सारे मजलदरमजल करत दस्तूरी नाक्यापासून निघालो. आमच्यातले काही या आधीही बरेचदा आलेले असल्यामुळे त्यांना रस्ता बर्यापैकी ओळखीचा होता. मन्याही बरेचदा माथेरानला आलेली, आणि हॉटेलचा पत्ताही तिला माहित होता, त्यामुळे ती सगळ्यात पुढे चालली होती. आणि आम्ही तीला अजून किती लांब आहे? आणखी किती वेळ लागेल? असे प्रश्न वारंवार विचारून भंडावून सोडत होतो. हॉटेल शोधताना वाटेत एक भला थोरला खडक भेटला हो अगदी कडकडून. त्याच्या छिद्राछिद्राच्या पाठीचा स्पर्श अजून आठवतो. फार आपुलकी होती त्या स्पर्शात. पाषाणह्रदयी शब्द किती पोकळ आहे असं वाटायला लागलं, "राजे बघता काय आसनस्थ व्हा" खडकानं आमंत्रण दिलं, खरं तर त्या आधीच आम्ही आमच्या सॅक्स वर टाकल्या होत्या. त्या शाही आसनावर आसनस्थ व्हायला फार प्रयास करावे लागले नाहीत, कारण एव्हाना बहुतेकांच्या अंगात माकडं संचारली होती. तिकडून दिसणारं माथेरानचं रुप पाहून मला क्षणभर खडकाचा हेवा वाटला. इतक्यात आम्हा माकडांच्यात आणखी एकाची भर पडली, खरंखुरं शेपटीवालं माकड साळसूदपणाचा आव आणून आमच्या बॅगांकडे, आमच्याकडे बघत होतं. आमच्याबरोबरीने त्याचेही फोटो काढले, "हाऊ क्यूट नं" वगैरे बायकी कौतुकं झाली, आणि माकड चेकाळलच , मैत्रिणी इतक्या काही देखण्या नव्हत्या पण माकडांचा चॉईस तो काय. माकड एका उडीत खडकावर आलं, क्षणभर कोणालाच काही कळलं नाही, जेव्हा कळलं तेव्हा जिथून वाट मिळेलं तिथून कारंजाचे शिंतोडे उडावेत तशा खडकाच्या दाही दिशांना सगळ्यांनी उड्या मारल्या टॉवर, एलफिस्टन आणि काही सॅक्स एवढे फक्त खडकावर राहिले, पैकी एलफिस्टन आणि माकड एकाच बॅगेवर आपल क्लेम सांगत होते, आणि टॉवरने बाकी मुलींच्या सुरात सूर मिसळले. आमची बॅग अख्खीच्या अख्खी खाऊने भरली आहे असा माकडाचा बॅगेच्या आणि आमच्या तब्येतींकडे बघून गोड गैरसमज झाला. मुलींना काही क्षणापूर्वीचा हा 'हाऊ क्यूट नं' प्राणि आता किंगकॉंग वाटू लागला. मी धीर करून टॉवरला हात पुढे केला आणि तीला एकदाचं खाली उतरवलं. तसाच हात एलफिस्ट्नलाही द्यावासा वाटला पण तो आणि माकड इतक्या जवळ होते की न जाणो माकडाला वाटायचं की मी त्यालाच हात देतोय आणि मग माकडाने हात धरून मला माकडमिठीत घ्यावं असा भयानक विचार मनात आल्याने धीर नाही झाला. एलफिस्टन एकटा खिंड लढत होता. शेवटी माकडच कंटाळलं आणि मी नाही खेळत जा असा भाव चेहर्यावर ठेऊन आल्या पावली परत गेलं. खडक मात्र मान खाली घालून उभा होता. पर्यटकांच्या जीवावर माकडउड्या मारणारी कृतघ्न माकडं त्यांच्याच अंगावर कशी चालून येतात हेही सहलीच्या अगदी सुरुवातीलाच आम्ही अनुभवलं. एलफिस्टन म्हणाला "कसले डरपोक तुम्ही, मी बघा शूर योद्धा" माकडाच्या माघारीमुळे मलाही मूठभर मांस चढल्यासारखं झालं मी ही आवेगात म्हटलं "मग मीही योद्धाच आहे" मित्र काहीशा आश्चर्याने "ते कसं काय बुवा?" "अरे तू शूर योद्धा तर मी दूर योद्धा दुरुन युद्ध बघणारा" यावर सगळ्यांनी हसून दाद दिली. प्रसंगाचा ताण थोडावेळ निवला. खडक मात्र मान खाली घालून उभा होता, खडकाला आमच्याबद्दल वाटणारी काळजी लपवता येत नव्हती, आम्ही दृष्टीआड होईपर्यंत मान उंचावून तो आमच्याकडे बघत होता, पुढे पिकनिकभर प्रत्येकाच्या मनात मंकी फोबिया होताच.
दस्तूरी नाक्यापासूनचा सुरुवातीचा रस्ता
हॉर्स पॉवर
हे कुठल्या पक्षाचं चिन्हं नाहीए, की कुठला उमेदवार नाहीए नीट पहा
माथेरानमध्ये आपलं स्वागत आहे
मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू?
जाता येता दिसणारी माथेरानची झलक
आहे तर कोरडा ठणठणीत झरा, पण तरी दिसतोय बरा, फोटोसाठी पोझ देतोय काय तरी तोरा
सोबत 'चुरापाव' घेउन जायचा .. माकडाला तो द्यायचा ना रे ... :D बाकी माथेरान माझे सुद्धा आवडते ठिकाण. सर्व पोष्ट वाचतो आणि शेवटच्या पोष्टवर कमेंटतो रे.
उत्तर द्याहटवानमस्कार रोहनजी,
उत्तर द्याहटवाप्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद,
मला वाटतं नुसता पाव घेऊन जायला हवा होता, कारण चुर्याची सोय आम्ही केली होती, म्हणजे त्या माकडाला बघून मी जसा पळ काढला त्याने इज्जतचा पुरता चुराडा झालाच होता.