हॉटेल गाठलं, खोल्या ताब्यात घेतल्या, आमच्या खरंतर दोन खोल्या होत्या पण लागलीच ही तुमची ती आमची न करता आम्ही तात्पुरतं एका खोलीत जमलो तिथे दोन मोठे बेड्स होते त्यातल्या एकावर अर्ध्या भागात आम्ही सगळ्यांची बोचकी टाकली आणि दोन्ही बेड्सवर आम्ही मगरीसुसरीसारखे पडून रहिलो. आळीपाळीनं प्रत्येकाचं हात-पाय धुणं, फ्रेश होणं चाललं, तेवढ्यात वाफाळलेला चहा आला. चहाबरोबर बाखरवडी, वेफर्स, चकल्या अशी खादाडी झाली. चहाची तलफ भागली, पण खरी तलफ अद्याप बाकी होती, निसर्गाच्या कुशीत शिरण्याची तलफ. मार्केटपासून सुरुवात करून रितसर एकदोन पॉईंटस बघितले, त्यात माथेरान स्टेशन, त्याच्या आसपासचे रेसॉर्टस, माधवजी पॉईंट व त्याच्या जवळचं उद्यान, हुतात्मा कोतवालांचा पुतळा, खंडाळा पॉईंट बघितला. पण नंतर पॉईंटस वगैरे संकल्पनाच आम्ही धुडकावल्या, तेच ते डोंगर वेगवेगळ्या दिशेने बघायचे आणि त्यात लोकांची गर्दी, कुठे चणेदाणेवाले, सरबतवाले शांतपणे नीट काही पाहता येईना, मनासारखं मोकळंढाकळं वागता येईना. फोटोत डोंगर, झाडं कमी नि अनोळखी माणसंच जास्त यायची, नाही तर लेन्ससमोर त्यांच्या हातातली प्लॅस्टीकची चूरचूर वाजणारी, वार्याबरोबर हेलकावे घेणारी पिशवी, किंवा नेमका कोणाचा तरी केसाळ हात त्यावरचं चकाकतं घड्याळ , नाहीतर कोणाचातरी पाठमोरा घामेजलेला शर्ट असलं काहीतरी यायचं, अगदीच काहीनाही तर फोटो निघायच्या आत कॅमेरा आणि टार्गेट यांच्या मधनं बेमालूम चपळाईने जाऊ आणि आपल्यामुळे होणारा व्यत्यय टाळू अशी भलती आत्मप्रौढी बाळगणारे लोक, आणि नेमका त्यांच्या चपळाईचा क्लिक होणारा धुरकट पुरावा, असं व्हायला लागलं त्यामुळे पॉईंटस प्रकरण कंटाळवाणं वाटायला लागलं. आम्हाला या सार्या कोलाहालापासून दूर निवांतपणे फिरायचं होतं. त्यामुळे तांबड्या पायवाटेनं आम्ही नुसतं निर्धास्त भटकायचं असं ठरवलं. तरी अगदीच एकटे नव्हतो अधूनमधून घोडे, खेचरं, त्यांचे मालक, गावातले लोक, पर्यटक असे कोणकोण दिसत. खूप चाललो असं वाटलं की थांबायचो, फोटो काढायचो, काहींना खूप वेळा खूप चाललो असं वाटायचं, पाय ओढत ते चालत, मागे मागे राहत, शेवटी त्यांची चाललेली दमछाक पाहून आम्ही तिथल्याच एका सरबतवाल्याजवळ थांबलो, कोणी कोकम सरबत, कोणी लिंबू सरबत, कोणी ताक प्यालं. तिथल्या भटक्या कुत्र्याला नेहाने ग्लुकोज बिस्कीटं दिली, कुत्रा भुकेला वाटत होता शेपूट हलवत तो नेहाकडे आशाळभूत नजरेने पहात होता, त्याचे डोळे फार बोलके होते, आम्ही तिथून निघाल्यावर थोडं अंतर आमच्याबरोबर सोबतही आला तो, खरच फार इमानी जनावर.
इथले पर्यटक बहुतांशी पुण्या- मुंबईतले, त्यात तरुण मुलामुलींचा आणि चौकोनी कुटुंबांचाही भरणा जास्त. थोडं मनोरंजन हवं वाटलं की पर्यटकांकडे बघायचं, नाही मुलींकडे रोख नाहीये माझा, त्यांचे त्यांचे जस्ट फ्रेंडस त्याच्यासोबत असतात त्यामुळे बघूनही हळहळण्याव्यतिरिक्त काही होणार नाही. मी म्हणतोय ते पर्यटक म्हणजे पुस्तकी पर्यटक, पुस्तकी सहल करणारे. ठेवणीतली जीन्स, टि-शर्ट, गळ्यात कॅमेर्याचं नळकांडं, पायात ब्रॅंडेड शूज, हातात भिंतीला लावण्याइतपत मोठी बटबटीत घड्याळं, तोंडात कधीही न संपणारा च्यूईंगम, बॅगेत उपयोगी, बिनउपयोगी, दवादारू पासून सगळं अशी असतात ही माणसं. ओळखायला सोप्पी, मी तर सवयीने लगेच हेरतो की हा प्राणी पुस्तकी सहल करणार्यातला आहे. सतत गळ्यातल्या कॅमेर्यात light, exposure set करताना यांचं दरीतलं धुकं, खळखळणारे झरे वगैरे पहायचं राहूनच जातं निघतात ते निव्वळ फोटो. अतिउत्साही आणि अभ्यासूवृत्ती नको तितकी म्हणजे मक्याचं कणीसं खाताना "भैया ये किधरसे लाते हो?" पासून हजार चौकश्या. वाटेत कुठला दगड दिसला उचल, पिसं दिसलं उचलं असं यांचं चालू असतं आता एखादा दगड माथेरानमध्ये जितका चांगला दिसतो तितका दिवाणखाण्यातला पेपरवेट म्हणून चांगला दिसेल का? किंवा जन्मभर त्याने किचनमध्ये आलं-लसूण, सुंठ, जायफळ, वेलदोडे, ठेचायचे का? असे प्रश्न मला पडतात. मालक खूष दगड दगडासारखाच निर्विकार तरी मला उगाचच चूटपूट लागून राहते.
आयुष्य संपत आलं तरी एक कोपरा आशेच्या हिरवळीने वेढलेला असतो, तो हा असा ...
आयुष्य खूप सुंदर आहे
मला फ्लोरिष्टाच्या शापामधल्या फुलागत हुयाचं हे
काही फुलं फुलतातही चेहरा पाडून
माथेरानचे पक्षी विशेष म्हणजे फोटो काढताना उडत नाहीत
एका रिसोर्टच्या बाहेर पाहिली ही तोफ ... बहुतेक बील न भरणारे तोफेच्या तोंडी जात असावेत
थोडा आधी काढायला हवा होता नाहीतर थोडा नंतर, म्हणजे निदान मुलगी तरी नीट दिसली असती
केशवपन ठाऊक असेल हे आहे केशपवन ... काहीही हसा आता
जाम प्रसिद्ध आहे हा माथेरानवरच्या बर्याच ब्लॉगसवर पाहिलाय याला
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा