नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २००९

26 नोव्हेंबर आणि एक नावडती कविता

26 नोव्हेंबरचा तो दिवस आजही आठवतो. ते दिवस खरोखरच आम्हाला बदलून टाकणारे. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये फिरणारे, सिनेमे पाहणारे, थट्टामस्करी करणारे, वडापाव ते पिझ्झा काहीही अरबट चरबट खाणारे, बोलणारे आम्ही, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला पेढा खायला मिळतो म्हणून शांत उभे रहाणारे, (काहींना ही साखर महत्वाची तर काहींना त्यांची साखरझोप) आम्हाला राजकारणाची माहिती नाही, करियर निवडण्यातही गोंधळलेले, बस्स धम्माल करायची, बॅगा खांद्यावर टाकून घरातून बाहेर पडायचं, ठरल्या जागी जमायचं, हसायचं खिदळायचं बस्स एवढच आमचं जगणं.

पण त्या दिवशी पाहिलं ना सारं टि.व्ही. वर तेव्हा कळलं किती पोरकट आहोत आम्ही. तेव्हा आतून जाणवलं आम्ही भारतीय आहोत, ते रक्तात माखलेले भारतीय आहेत, कर्तव्य बजावताना शहिद झालेले भारतीय आहेत. सिनेमातल्या नटनट्या, कॉलेज ह्यापलिकडेही जग आहे ... हाडामासाच्या माणसांचं जग. वृत्तपत्र पुन्हापुन्हा वाचत सुटलो, टि.व्ही.ला खिळून राहिलो, सगळं एका दमात माहित करून घ्यायचं होतं की, हे कोण कुठले आणि आमच्या देशात ही कत्तल का सुरु आहे? रडलो, चिडलो, शिवीही हासडली पण कशानेही समाधान होईना, काही प्रश्न अनुत्तरीतच राहिले.

माझी आई छ.शि.ट. जवळच काम करते तिने जाऊ नये काही दिवस ऑफिसला असं वाटत होतं, त्यात उसळलेल्या अफवांची भर, दुपारी आईचा फोन आला की जीव भांड्यात पडे, मग पोटात काहीतरी ढकलायचो. आईने मला समजावलं मनात भिती बाळगणं, भितीची दहशत माजू देणं म्हणजेच नकळत दहशतवाद्यांची मोहिम यशस्वी करणं. मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो पण आई तिला करायचं तेच करत राहिली. पोहोचल्याचा फोन मात्र आवर्जून करे. माझी काळजी तिला कळत होती पण मला थोडा निर्भीड बनवण्याचा विचार असावा तिचा.

बर्‍याच विचारांची वादळं मनात घोंघावत होती माझ्या मनात जे जे येत गेलं ते मी कवितेत गुंफत गेलो. माझी मतं किती चुकीची किती बरोबर महत्वाचं नव्हतं, मांडणं महत्वाचं होतं, नाहीतर फुटलं असतं डोकं माझं ... विचारांचे, भावनांचे स्फोट झाले असते. एक एका बातमीने कवितेत भर पडत गेली, (अजूनही पडतेच आहे) आकार घेऊ लागली माझी सगळ्यात नावडती कविता. माझ्यावर पुन्हा अशी कविता करण्यासारखी वेळ येऊ नये असं वाटतं मला. सगळं मांडायला मी अपयशीच ठरलोय. पण त्या दिवसापासून मी निश्चित थोडा बदललोय.

असो कविता वाचा आताएक गोळी आपलीही वाट बघते आहे
एक टोळी आपलीही वाट बघते आहे

कोंडले ते अन सार्‍यांचा कोंडमारा
नासक्या या आठवणींची साय धरते आहे

का असे झालोत पैदा गोळी खाण्या या इथे
माणुसकीही माणसांचे पाय धरते आहे

जगणे चैन झाले आणि अपेक्षा कोणती
मूक गर्दी भावनांची काय करते आहे

छाताडात घुसल्या गोळ्या वास्तूही आक्रंदली
कुणी यशस्वी मोहिमेचा नाज करते आहे

सिंह गेले अन कसा तो गडही ढासळू लागला
शांतताही बंदूकीचे आवाज करते आहे

रोजचेच आहे आम्हा नवल का वाटणे?
हे मैत्रीचे प्रयत्नही उगाच करते आहे

अशातही त्यांनी हवा तो घेतलाच चावा
तेज असल्याचा कुणी माज करते आहे
(news bites आणि प्रसारमाध्यमांची हाताळणी)

चार पाने चाळली पोरे मनसोक्त खेळली
कुठे सुट्टीही झोपेचा साज धरते आहे
(काही घरातील महाभागांनी उपभोगलेली सुट्टी)

त्याच रस्त्यावरूनी जाणे लाज वाटू लागले
टोळी शंढतेचा क्रूरतेचा माज करते आहे

माणसे मरणार होती पाच हजारावरी
पडली कमी किती? मोजदाद चलते आहे
(हे कोणाचे उदगार आहेत हे आपण जाणताच)

नेत्यांनी कैसे ताळतंत्र सोडले
शहिदांचे कतृत्वही बरबाद करते आहे
(मग ते शहिदांच्या घरी जाऊन तोंड सैल सोडणं, असो की एका संवेदनशील सिनेदिग्दर्शकाला घेऊन केलेला घटनास्थळाचा फेरफटका)

मुक्त संचाराला घटनेचा हवाला दिला
झिंगल्या गालावरी चपराक ठरते आहे
(हे राष्ट्रीय एकात्मतेविरोधात नाहीये, लक्ष देण्यासारखे बरेच मुद्दे आहेत, लोंढे रहायला हवेत मग त्यांच्या सुरक्षेचं पहायला नको का? किंवा कोण कुठून आणि का येतय? हे पहायला नको का?)(ह्या हल्ली नव्याने लिहिलेल्या ओळी)

स्वर्ग मिळणार होता मारूनी माणसे
कुणी खर्च कसाबावरी वारेमाप करते आहे

जाकीट हरविले म्हणती कचर्‍यात गेले
सारे ठरल्यापरी विनसायास घडते आहे

चुकले कुणाकुणाचे आणिक शिकले किती
भर नव्या तारखेची इतिहास करते आहे

-प्रसाद४ टिप्पण्या:

 1. चुकले कुणाकुणाचे आणिक शिकले.....खरे आहे रे...आपल्या सा~यांची घालमेल तुझ्या कवितेत जाणवतेय.भापो. ही अशी वेळ पुन्हा कधीही न यावी ह्याचा धावा किती वर्षे आपण करतो आहोत याचाही विसर पडत चालला आहे.नित्यनेमाने फक्त भरच पडतेय...:(

  उत्तर द्याहटवा
 2. हो फक्त भरच पडत चालली आहे

  शवांची ...
  आक्रोशाची ...
  अश्रूंची ...
  मेणबत्त्यांची ...
  फुलांची ...

  मला वाटतं अशी वेळ पुन्हा येणार नाही, कारण सवय झालेली असेल आपल्याला या सगळ्याची, कोडगे होऊ आपण, नव्हे व्हायलाच लागेल, आताही मुंबई स्पीरीट नावाचं गोंडस नाव देऊन अपमान विसरत चाललोच आहोत की

  प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 3. त्या दिवसापासून बराच काही बदलले .. शाळा-कोलेजमध्ये जाणारी पिढी अधिक प्रगल्भ बनली (मी तसे १९९२-३ला अनुभवले होते.) देशप्रेम जागृत व्हायला 'तो दिवस' कारणीभूत ठरला. सगळेच थोड़े थोड़े बदलले...

  कविता छान आहे. तुझ्या मनातील भावना पोचल्या मित्रा... :)

  उत्तर द्याहटवा
 4. धन्यवाद रोहनजी

  थोडं थोडं बदललंय पण बाकी सगळं पूर्ववत
  तितकेच टक्के मतदान, तेच मंत्री

  उत्तर द्याहटवा