नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

गुरुवार, २ जुलै, २०२०

हद्दपार - श्री. ना. पेंडसे

श्री. ना. पेंडसे यांची ' हद्दपार' ही कादंबरी वाचली. लेखक प्रस्तावनेत म्हणतात आमच्या मास्तरांच्या विद्यार्थ्यांत बऱ्यापैकी लेखनकला असलेला मीच; यामुळे प्रस्तुत कथेच्या लेखनाची जबाबदारी माझ्यावर आली. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे मास्तरांचा जीवनप्रवास या कादंबरीतून हळूहळू उलगडत जातो. 

या मास्तरांच्या पूर्वजांनी त्यांच्या काळात पराक्रम केलेला, आणि त्यामुळे गावात त्या घराण्याला मानमरातब होता, वचक होता, श्रीमंती होती. अशा घराण्यात मास्तरांचा जन्म झाला, पण त्यांची जन्मपत्रिका पाहून सारे चक्रावले. हा कूळ बुडविल, शुद्रपणे अर्थार्जन करील, आणि मुख्य म्हणजे घराण्याचा निर्वंश करील असं चमत्कारिक त्यांच्या पत्रिकेत होतं. खरं तर लेकाने शानशौकिने इनामदारी करावी नि सुखासीन आयुष्य जगावं असं मास्तरांच्या वडिलांना वाटत राहिलं. पण मास्तर कुणब्यांच्या पोरांत मिसळून खेळले, नंतर मास्तरकीची इतरांदेखी शूद्र नोकरी धरली, इतकेच काय आंतरजातीय विवाह सुद्धा केला. 

वडील गेल्यानंतर काही दिवसांतच हा श्रीमंतीचा मुलामा वरवरचा आहे हे मास्तरांना कळलं, कर्जाचा डोंगर वाढला होता, परिस्थिती बेताची बनली होती. नोकरीमुळे ते कसाबसा तग धरून होते. मास्तरांना वडिलांना अपेक्षित राजेपण वठवणं जमलं नसलं तरी त्यांनी आपली नोकरी प्रामाणिकपणे केली. त्यांचा आपल्या विद्यार्थ्यांवर फार जीव. त्यांनी अर्थार्जन दुय्यम मानलं, पैसे कमावण्यापेक्षा माणसं कमावली. यशस्वी विद्यार्थी घडवले. एक वेगळा आदर गावात मिळवला. गाव म्हटल्यावर होतं ते जातीपातीचं राजकारण त्यांच्या वाट्यालाही आलं. प्रसंगी बायकोचे बोचरे बोल त्यांना परिस्थितीमुळे ऐकावे लागले. पण विद्यार्थ्यांच्या प्रगतीत ते सुख मानू लागले, कष्ट आणि दारिद्र्य भोगलेल्या आयुष्याला तेवढं एक समाधान पुरेसं होतं.

१९५० साली कादंबरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. पण यातलं शेवटचं प्रकरण दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी काढून टाकलं. अशी कबुली श्री. ना. पेंडसे प्रस्तावनेत देतात. ते शेवटचं प्रकरण काय असावं याची उत्सुकता मनाला लागते. वाचकांपैकी कोणाकडे मूळ आवृत्ती आणि शेवटचे प्रकरण असल्यास मला नक्की कळवा. अन्यथा ही कादंबरी राजेमास्तर दुर्गेश्र्वराला अखेरचं वंदन करतात इथे संपते अशी मी नाईलाजाने कशीबशी समजूत करून घेईन.

बाकी ही कादंबरी वाचताना आपल्या आवडत्या शिक्षकांची आठवण आल्याखेरीज राहत नाही. नक्की वाचावी अशी ही कादंबरी

- प्रसाद साळुंखे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा