प्रभाकर पेंढारकरांनी लिहिलेलं 'रारंगढांग' वाचलं. नावापासूनच या पुस्तकाचं वेगळेपण जाणवतं. उंची पाहून तोल जावा असा अजस्त्र, बलदंड हिमालय, आणि त्याच्या तोडीस तोड जिगर असलेली सैनिकी खाक्या मिरवणारी बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन मधली माणसं यांच्यातल्या संघर्षाची ही कहाणी. हा संघर्षही वेगवेगळ्या पातळ्यांवरचा. कधी निसर्गाशी, कधी माणसांशी, कधी माणसाच्या आतल्या भावनांशी, मूल्यांशी. हे वैचारिक खटके कधी कधी हिमालय भेदणाऱ्या सुरुंगापेक्षाही स्फोटक आणि असहनीय. पहाडी इलाक्यात क्षणार्धात वातावरण बदलतं. एखाद्या निसर्गचित्रासारखी झुळझुळ वाहणारी सतलज आणि धुक्यात हरवलेली शांततेशी हितगूज करणारी हिमशिखरं, पापणी लवते न लवते तोच रौद्र रूप धारण करू शकतात, आणि इथलं निसर्गचित्रही लहरी कच्च्या ओल्या रंगाचं, कधी पुसलं जाईल आणि त्यातल्या कुठला फटकारा आयुष्याला कायमचा एक पक्का गडद गहिरा रंग देईल हे सारंच अनाकलनीय.
अशा या हिमालयाला तासून त्यात रस्ता तयार करण्याचं काम एका तरुणाला मिळतं. हिमालयात रस्ता करणं म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे. एकतर पहाडी भागातलं उंचावरचं काम, विरळ ऑक्सिजन, कच्चा माल, यंत्र सामुग्री यांची जुळवाजुळव करायची धडपड, मिनिटभर मागे पुढे होण्याची शक्यता नसलेली कामाची सैनिकी डेडलाइन, शिवाय भूस्खलनासारखी नैसर्गिक संकटं, त्यात नोकरी नवी, सैनिकी औपचारिकता आणि शिस्तीची ओळख नवी, हिमालय नवा, आव्हानं नवी. पण हा तरुण टिकेल हे आपल्याला जाणवतं कारण, या तरुणाचे विचारही नवे असतात, रुळलेल्या पायवाटेने जाणं त्याला अमान्य असतं. त्याला आणि त्याच्या कृतींना विचाराशी प्रामाणिक रहायला झगडावं लागतं. त्याची भोवताल पाहण्याची दृष्टीही नवी असते त्यामुळेच तो तरुण हाताखालच्या कामगारांना माणूस म्हणून पाहतो, आसपासच्या गावातील लोकांना त्यांच्या भावविश्वासकट समजून घेतो. असा हा हळवा माणूस आणि प्रसंगी निष्ठूर होणारा हिमालय आणि बॉर्डर रोडचे अधिकारी यांची ही कथा अत्यंत रंजक आहे.
प्रभाकर पेंढारकरांनी केलेली वर्णनं वाचली की खरोखरीच शब्दन् शब्द जिवंत झाल्यासारखे वाटतात, हिमालय, सतलज, सैनिकी शिस्तीचे करारी अधिकारी, कामगार, गावकरी सारे डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहतात. रोड कन्स्ट्रक्शन सारख्या विषयावर कहाणी असली तरी कुठे अकारण क्लिष्ट तपशील देऊन लांबवली नाहीये, त्यामुळे रंजकता अबाधित राहते. हिमालयाच्या पर्वतरांगांमधील आव्हानांचा अस्सल अनुभव पेलायला हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा