नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

पडघवली - गो. नी. दाण्डेकर

प्रत्येक गावखेड्याला एक इतिहास असतो. काही अख्यायिका असतात. गावचं रक्षण करणारे राखणदार असतात. ग्रामदेवता असतेच पण इतरही देव असतात, मग तो एखादा जुनाट वृक्ष असेल, जलाशय असेल, किंवा नुसतं वळण असेल. गाव म्हटलं की जसं गावात राहणाऱ्या माणसांची मन राखणं आलं, तसंच या जागांबद्दल आदरभाव वा भितीभाव बाळगणं आलंच. बऱ्याचदा आपल्याला त्या त्या जागांमागची कथाही धड माहीत नसते पण पिढ्यानपिढ्या लोक श्रद्धेनं नमस्कार करत आले म्हणून आपणही या श्रद्धेचा मान राखतो. अशी कथा सांगणारं कोणी म्हातारं माणूस भेटलं तर आपण जीवाचे कान करून ऐकतो. विश्वास अविश्वास या पलीकडे त्यांना या जागांबाबत असणारा पूज्यभाव, पूर्वजांच्या पराक्रमाचा अभिमान, त्याचरोबर त्यांच्या चूकांची प्रांजळ कबूली सारं आपल्याला त्या डोळ्यात दिसतं. हेच तर गावाचं सार, हे सारं काढलं तर उरतं काय?

पडघवली ही अशाच एका दाभोळ जवळच्या कोकणी खेड्याची कथा. सुरुवात होते ते अंबावहिनीच्या लग्नाच्या गृहप्रवेशाच्या आठवणीपासून. ही खोतांची मोठी सून. लहान वय असल्यामुळे कधी माहेर कधी सासर असा तिचा खुशालचेंडू कारभार. मग ती सासऱ्यांच्या आजारपणात सासरी येते. सासरे निवर्तल्यावर सासरीच राहते, आणि हा डोलारा सांभाळायचा प्रयत्न करते. ती पडघवली बद्दल, पूर्वजांबद्दल थोरा मोठ्यांकडून ऐकते. पडघवली सारखं शांत, सुखकर, निसर्गाने नटलेलं छोटं खेडं कसं वसवलं गेलं आणि तिने पाहिलेल्या नारळी, पोफळी, कलमं आणि बागेत अखंड खेळणारं पाणी या वैभवापर्यंतचा अनेक पिढ्यांचा प्रवास याची कहाणी अंबावहिनीच्या तोंडून उलगडत जाते. भरल्या घरांचं नि ओल्या मनांचं पडघवली ती पाहते, पण पुढे याच पडघवलीच्या बदलत्या रूपाचाही ती साक्षीदार होते, प्रसंगी मूक साक्षीदार तर प्रसंगी मोठ्या खोतीणीच्या करारीपणे ठाम उभी राहून विरोधही दर्शवते. ही कादंबरी म्हणजे तिनेच सांगितलेल्या पडघवलीच्या बदलत्या रुपाची कहाणी, कारण तिची पिढीच तर असते पडघवलीच्या या बदलत्या दोन रूपांना जोडणारा दुवा.

ही फार रंजक कादंबरी आहे. फक्त २५६ पानांची असल्यामुळे कधी संपते कळत नाही. अंबावहिनीकडून आपण कथा ऐकतोय अशा शैलीत लिहिल्यामुळे कंटाळवाणी होत नाही. ही शैली फार सुंदर आहे, म्हणजे अंबुवहिनी एखाद्या पात्राचा उल्लेख करेल, आणि त्याच्यामुळे भविष्यात असं होईल याची कल्पनाही नव्हती अशा आशयाचं काहीतरी सांगेल, ज्यामुळे आपली उत्सुकता अधिक ताणली जाते. बायकांच्या मानसिकतेचा मस्त वापर कादंबरी लिहिताना केला आहे, त्यामुळे प्रसंगी आपल्याला वाटतं की आपण बायकी स्टाईलने हळू आवाजात खुसपूस करत खिदळत गॉसिप ऐकतोय, तर कधी वाटतं वहिनी खरोखरीच मनाचा हळवा कोपरा विश्वासाने उलगडून दाखवताहेत. कादंबरीचा वेग उत्तम ठेवण्यासाठी ही शैली मस्त वापरली आहे. एकाच गावातल्या माणसांच्या वेगवेगळ्या भाषा या कादंबरीत वापरल्या आहेत म्हणजे खोतांची ब्राम्हणी हेल असलेली बोली वेगळी, कुळवाड्यांची रांगडी बोली वेगळी, मुस्लिम हैदरचिच्याच्या भाषेचा लहेजा वेगळा. या भाषेतल्या वेगळेपणामुळे कादंबरीची पात्र पक्की लक्षात राहतात, आणि नाट्य चांगलं रंगतं. पात्रांचा अभ्यास करतांना कोकणी खेडेगावात दिसणाऱ्या माणसांचा अभ्यास उत्तम केला आहे, मग ते स्वार्थी गोडबोले गावगुंड असतील, गतिमंद तरुण असेल, सोशिक गृहिणी असतील, घरासाठी झटणारे कुटुंबाचा भाग असणारे घरगडी असतील, जातिभेदाचा पातळ पडदा असला तरी माणुसकीचा बंध जपणारे गावकरी असतील सारं कुठेतरी कोकणात पाहिलेलं त्यामुळे सवयीचं आपलंस वाटतं.

गाव म्हटलं की मी दोन प्रकारचे लोक पाहिलेत, एक म्हणजे गावाबद्दल भरभरून बोलणारे, दुसरे विकून टाका संपवून टाका विषय म्हणणारे व्यवहारी, पिढ्यानपिढ्या जपलेला ऋणानुबंध एका पिढीत आधुनिकतेची व्यावहारिक धार चढलेल्या कात्रीने तोडणारे. या दोघांनाही हे पुस्तक आवडेल. एकाला आपण काय जपलं, का जपलं ते कळेल, दुसऱ्याला आपण काय लोटलं ते कळेल.

पुस्तक १९५५ च आहे. त्यावेळी चित्र इतकं अंतर्मुख करणारं असेल तर आताची ती काय गत. वाडीत साताठ घरं आणि त्यातही बहुतेक म्हातारी कोतारी माणसं, २०२१ पर्यंत हे चित्र अजून भयाण होत गेलं यात शंका नाही. आता कोकण कात टाकतोय खरा पण मुख्यत्वे हमरस्ता आणि समुद्रकिनाऱ्यालगतचा. तरीही मूळ घराला सेकंड होम म्हणत हफ्ताभर यायचं आणि परक्या शहरातला सुखसोयीयुक्त फ्लॅट आपला म्हणत आयुष्यभर हफ्ते फेडत रहायचे, असा विरोधाभास सगळा. कधी कधी वाटतं ही पुस्तकं वाचणारी, त्याबद्दल भरभरून बोलणारी, लिहिणारी ही आपली शेवटची पिढी बहुतेक.

बदलत्या खेड्याचं वर्णन करणारी ही कादंबरी नक्की वाचा आणि तुमचे गावाबद्दल त्याच्या बदलत्या रुपाबद्दल, या पुस्तकाबद्दलचे अनुभव नक्की प्रतिक्रियेत लिहा.


- प्रसाद साळुंखे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा