नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शुक्रवार, १२ जून, २०२०

स्वघोषित कवी आणि उत्स्फूर्त पाऊस

पावसाला कवितेत चोपावा,
असं त्या स्वघोषित कवीला वाटलं.
मग तो खिडकीबाहेर पाहत वाचकांवर कुठलं आभाळ कोसळेल याचा विचार करत बसला.
तसा तो दगडच होता,
त्याच्या कवितांनी वीट आणणारा.
त्याच्याजवळ विचार नव्हते,
भाव नव्हते,
वेदना नव्हत्या,
कल्पना नव्हती,
बरे शब्दही नव्हते,
व्याकरण, वृत्त, छंद, अलंकार वगैरे सोडा,
त्याचं शुध्दलेखन ही बेशुद्ध होतं.
मात्र त्याच्याजवळ नक्की होते प्रतिभेचे गोड गैरसमज,
आणि ते कुरवाळणारे शेजारी, 
नातेवाईक, 
मित्र परिवार आणि स्वघोषित रसिक.
तशा त्याला कविता स्फुरत नाहीत,
तो फक्त त्या असेंबल करतो.
म्हणजे आता त्याने काय केलं तर
खिशातून मोबाईल काढला,
दोन चार फॉरवर्डेड शायऱ्या वाचल्या,
थोडे शब्द घेतले, 
नेहमीच्या साच्यातले
मस्तीभरा, मदहोश, बेहोष, अदा, नजर,
गच्च का घट्ट? काय ती मिठी वगैरे वगैरे.
अपवादात्मक पावसाळी परिस्थितीत,
त्याने चंद्रावर दया केली.
चंद्राने पावसाचे उराउरी भेट घेऊन आभार मानले.
तिचा उल्लेख मात्र अपेक्षेप्रमाणे होताच.
याच्या कुठल्याही कवितेत ती हवीच,
मग ती नेहमीची कौतुकं,
नेहमीचे उमाळे,
तिचं अमुक तिचं ढमुक,
तिचं ह्यांव तिचं त्यांव,
करत करत
निम्म्याहून अधिक कवितेत
तिच्याच अवतीभोवती प्रेमाचा कंटाळवाणा पिंगा घालत लाळघोटं रेंगाळला.
नेहमीचा तोच तो पाणचटपणा येतोय का हे त्याने
त्याच्याच जुन्या काव्यकलेवरांबरोबर टॅली केलं.
हसणं ला पुसणं जोडलं,
झुरतो ला उरतो जोडलं,
हिरवळ, दरवळ, मरगळ, तळमळ,
ढग, वारा, सरी, ओलावा,
त्याने जमेल तसा पेरला,
मृद्गंध, पागोळ्या वैगेरेंच्या वाटेला गेला नाही.
शहारे लिहिले कळला नाही तरंग,
आतून काहीच नाही,
सारं वरवरचं उथळ आणि सवंग.
यमकाचं लंगडं शिंगरू 
रूपकांचे आसूड ओढून
अर्थहीन पानभर दामटंवलं.
थेंब, आसवं, ओठ, होडी, चहा, भजी आणली इथवर ठीक,
हद्द म्हणजे ,
पहिल्या पावसात त्याला गवसलं इंद्रधनू .
पुढच्याच कडव्यात इंद्रधनू समोर चपखल बसली त्याची जानू.
आमची माळ्यावरची छत्री काढण्याआधी
पठ्ठ्याने कविता प्रसवली.
नवी पालवी फुटण्याआधी
प्रतिभेची लक्तरं उसवली.
लिहिली,
पोस्टली,
वायरल झाली,
हाय काय नि नाय काय.
प्रतिक्रियांच्या पावसात त्याला आत्मसंतोषाचे कोवळे कोंब आले.
तो लाइक्स मोजण्यात व्यग्र असतांना,
नखशिखांत भिजलेला पाऊस त्याच्या दारावर टकटक करून गेला.
त्याला वाटलं हा नक्की झोपला,
हा अजूनही धुंदीत,
साला पावसाला काय मस्त चोपला.

ना पाऊस भेटला त्याला,
ना कविता तो जगला,
ना पाऊस त्याला कळला,
ना पावसाला तो उमगला.

तरी टुकार शब्दतुषारांनी चिंब झाली टाळकी,
पण प्रत्यक्षात मात्र,
पाऊस आणि तो सदाचे अनोळखी.


- प्रसाद साळुंखे

२ टिप्पण्या: