नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

युगंधरा - डॉ. सुमति क्षेत्रमाडे

'युगंधरा' कादंबरी बद्दल पहिलं मत असं झालं की हा बहुतेक 'युगंधर' कादंबरीच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असावा. पण नंतर डॉ. सुमति क्षेत्रमाडे हे नाव वाचलं आणि निश्चिंतपणे पुस्तक वाचायला घेतलं.

ही कथा आहे युगंधरा म्हणजेच 'युगा'ची, तिच्या त्यागाची, तिच्या नितळ निर्व्याज्य प्रेमाची. अत्यंत हुशार असून सतत परिस्थितीशी जुळवून घेत, वेळप्रसंगी नमतं घेत जगणाऱ्या एका स्त्रीची. आपल्या वडिलांसाठी, कुटुंबासाठी ती सारं काही सोसते. या कुंडात पहिली आहुती पडते ती तिच्या प्रेमाची, मग स्वप्न होरपळतात, तिच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा या धगीने काळवंडतात. एवढं सारं होऊनही आयुष्यात काही विशेष साधत नाही, कारण तिचं आयुष्य हे तिच्यासाठी नसतंच मुळी, सतत दुसऱ्याची गैरसोय होणार नाही हे पाहताना, आपल्या सोयीने आयुष्य जगायची मुभा तिला नसते, तरीही बिनतक्रार हसतमुख राहून ती ते जग आपलं मानून समरसून जगते. पण तिचं नेमकं अस्तित्व काय, तिची मायेची माणसं नेमकी कोण हा प्रश्न वाचकांना पडल्याशिवाय राहत नाही.

कादंबरी वाचताना नायिकेचं जास्त सोशिक असणं कधी कधी खटकतं, पण हा काळ १९७० च्या आसपासचा आहे हे लक्षात ठेवावं लागतं.  आपल्या आजूबाजूला अशा अनेक 'युगा' आहेत ज्या स्वतःच्या कुटुंबाला प्राधान्य देतात, प्रसंगी आपली स्वप्नं, महत्वाकांक्षा पणाला लावतात. 

पुस्तक वाचून झाल्यावर अशा माहितीतल्या अनेक 'युगा' आपल्याला आठवतात, पण यावेळी मात्र बदल म्हणून आपण त्यांच्याकडे एका वेगळ्या कौतुकमिश्रीत नजरेने पाहू लागतो, म्हणूनच प्रत्येकाने वाचून, समजून घेतली पाहिजे अशी ही 'युगंधरा'.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा