नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

कितीदा ...

कितीदा बोलतो मी
माझ्या अंतरीचे
कितीदा सांगतो मी
गूढ हे मनीचे

कितीदा आसमंत
चांदण्यात न्हाले
कितीदा रेशमाचे
गंधमग्न वारे

कितीदा पाण्यावरी
शहारला तरंग
कितीदा श्वासातही
थरारला मृदंग

कितीदा मृत्तिकेचे
पायावरी ओले ठसे
कितीदा पश्चिमेचे
नशिल्या सांजेचे पिसे

कितीदा वेल्हाळ पक्षी
गुणगुणे गाणे नवे
कितीदा डोळ्यामध्ये
अभाळगच्चसे थवे

कितीदा अबोलसा
काळोख मी घुमटातला
कितीदा कल्लोळसा
मनातल्या डोहातला

कितीदा हास्यातला
मोकळा बिनधास्त मी
कितीदा मौनातला
कोरडा नि रुक्ष मी

कितीदा मी कसाकसा
विखुरल्या तुकड्यातला
कितीदा मी असातसा
पूर्ण शाबूत आतला

- प्रसाद साळुंखे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा