नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

कसे सरतील बये

हे आहे 'कसे सरतील सये' चं विडंबन.  संदीप खरे यांची 'कसे सरतील सये' ही प्रसिद्ध कविता एकाकी नवरा माहेरी गेलेल्या बायकोला उद्देशून कशी म्हणेल, हे विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आहे. कृपया याला केवळ एक मनोरंजक कलाप्रकार म्हणून गृहीत धरावे, संदीप खरे यांची थट्टा किंवा अपमान करण्याचा काहीही हेतू नाही. चला तर पाहूया काय म्हणताहेत एकाकी नवरोबा.



कसे सरतील बये
सरताना आणि हाल सोसतील ना
दोघांपाशी फोन दोन
रोज रात्री फोनवर
खुसुफुसू दोघेजण करतील ना
करतील ना

पहाटेचा हा पसारा
गिळताना चहा कोरा
उणेंधुणें मन तुझे काढे
पोट तर हालेडुले
व्याकुळून कसेनुसे
थोडंथोडं जाई फ्रिजपुढे

आता जरा दातखिळी
झाली माझी खिळखिळी
सोसवेना माहेरून निघशील ना
दोघांपाशी फोन दोन, रोज रात्री फोनवर
खुसुफुसू दोघेजण करतील ना, करतील ना

रोज नव्या शोधातून
उभे असे घामाघूम
तेल तूप कलंडला रवा
आता माज ढळेलच
भाजी पुन्हा आळेलंच
टोपातून भात रांधवा

बरण्यांचे कोटी कण
किचनचे झाले रण
रोज रोज ऍडवेंचर घडतील ना
दोघांपाशी फोन दोन, रोज रात्री फोनवर
खुसुफुसू दोघेजण करतील ना, करतील ना

लागे भूक जशी
माझ्या जुन्या टपरीच्या पाशी
सरे प्लेट गारढोण वडा
भूक भूक भूका भूका भूकी भूकी भूके भूके
सारा सारा भूभूचाच पाढा

धुणे आता काटेस्पून
भांडी मग मागाहून
धुतांना ही हात बसे चपखल ना
दोघांपाशी फोन दोन, रोज रात्री फोनवर
खुसुफुसू दोघेजण करतील ना, करतील ना

आता बाही दुडायाचे
जरा जरा शिकायाचे
चाळोनिया कुकरीचे धडे
लालसर होऊ देत
आचेवर शिजू देत
जुन्या नव्या जिन्नसांचे चुरे

मला माझं कळू दे ना
जरा गुदमरू दे ना
तेव्हाच हुकूमशाही डिवचेल ना
दोघांपाशी फोन दोन, रोज रात्री फोनवर
खुसुफुसू दोघेजण करतील ना, करतील ना

-प्रसाद साळुंखे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा