नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

माथेरान 9 (शेवट)

माझी बॅग आता भाजीवाल्याच्या पोत्यासारखी बेढब झाली होती, शिवाय मोठ्या परीघाच्या हॅटस बॅगेत रहात नव्हत्या. सगळं आवरताना नाकीनऊ आले. शेवटी सगळ्यांच्या बॅगस तयार झाल्या. आम्ही गप्पा मारत होतो, निघावं लागणार हे माहित असूनही पाय निघत नव्हते. इथल्या झाडापेडांना, खडकाला, माकडांना, डोंगरदर्‍यांना, पावसाला, गारव्याला, राधा-कृष्णाला, भुट्ट्याला, गोळ्याला, झोपाळ्याला, लाल मातीला निरोप द्यावा असं वाटत नव्हतं. पण नाईलाज होता. निघावं लागणार होतं. पडलेल्या खांद्यावर जड हातांनी बॅग अडकवली आणि हे घेतलं का? ते घेतलं का? असं जुजबी विचारत आम्ही बाहेर पडलो. मिनी ट्रेनच्या रुळावरून जाताना पाऊस सुरु झाला, "नीट जा रे पोरांनो" असं सांगत होता. पावसामुळे सगळं निसरडं झालं होतं, त्यात रुळावरून पियू चालण्याचा सराव करत होती, माझा हात तिने घट्ट धरला होता, कधी हात सोडून मला जमतय असं भासवे तर कधी तोल जाताना हात घट्ट धरुन ठेवे. आजूबाजूचे आमच्याकडे बघत होते, तरूण पोरांचे बोलके चेहरे मजा आहे बाबा एका मुलाची असं सांगत होते. पण रुळावरून चालणे या प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर काहीतरी पदक मिळवायचच आणि मी तिला ट्रेन करायचं (मिनी ट्रेन नव्हे) असं आम्ही मनाशी पक्क केल्यामुळे आजूबाजूच्या नतद्रष्ट लोकांकडे आम्ही साफ दुर्लक्ष केलं. आता तर वेलकम टू माथेरान लिहिलेला बोर्डही मागे पडला. दस्तूरी नाक्यावर आलो टॅक्सीत बसलो. तसं आम्हाला चालत नेरळ गाठायच होतं पण मुलींच्या पायात सिंड्रेलाचे काचेचे बूट होते, म्हणजे बूट लागायचं टेन्शन म्हणजे नवे म्हणूनही टेन्शन आणि वाटेत कुठे दगडधोंड्याला ठेचाळल्यावर तुटून त्याची काच लागण्याचंही टेन्शन, शिवाय वेळेत बूट परीला देण्याचंही टेन्शन, या सार्‍या टेन्शन्सपायी आम्ही पायी जाण्याचं टाळलं आणि सरळ टॅक्सी केली. टॅक्सीचा प्रवासही काही तितकासा वाईट नव्हता, धुक्यात बुडलेली डोंगरांची शिखरं मस्त दिसत होती, आपण ढगांमध्ये, धुक्यामध्ये अधांतरी उडतो आहोत असा भास होत होता. 'धुके दाटलेले उदास उदास' थोडं आणखी थांबता आलं असतं तर? असे प्रश्न पडत होते. टॅक्सी नेरळला पोहोचली ट्रेन थोडी उशिराची होती आणि थोडी गर्दी वाटत होती.

ट्रेन आली ती अनेक प्रश्न घेऊनच. आता नोकरीचं काय? times, monster, naukri वर resumes upload केलेत ना? KT लागेल का यंदा? कोण टॉपर असेल? बाईकला कव्हर घ्यायला झालय? तिकीट आहे नं खिशात? किचनच्या लिकेजचं काहीतरी करायला हवं, गावचं घर पूरं होईल का यंदा? पैसे जास्त तर नाही ना गेले सहलीला? counter-strike ची सीडी सापडेल का? घरी पोहोचेन ना वेळेत? सरबताची बाटली आत चेपून सरबत बाहेर आलं नसेल ना? जीन्स जाम मळलीय लाल मातीत आईला त्रास .. जसजशी ट्रेनमधली गर्दी वाढत गेली माझे प्रश्नही वाढत गेले, वाढता वाढता त्यांचं दाट धुकं तयार झालं मग डोळे उघडले आणि सारंच धूसर दिसायला लागलं.समाप्त

२ टिप्पण्या:

  1. जसजशी ट्रेनमधली गर्दी वाढत गेली माझे प्रश्नही वाढत गेले ...

    वा शेवट मस्तच केलास. इतके लयबद्ध लिहिले आहेस की एका दिवसात सर्व भाग कुठेही न थांबता वाचून काढावेसे वाटले. खुप आठवणी जाग्या झाल्या. आता परत सुट्टीवर आलो की 'प्लान माथेरान' पक्का... हाहा...

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद रोहनजी,

    हो नाईलाज होतो, धुक्यात राहणं कितीही आवडलं तरी शेवटी वास्तवात यावचं लागतं, प्रश्नांना भूल देऊन थोडावेळ बेशुद्ध करता येतं गळा आवळून मारून टाकता येत नाही.

    उत्तर द्याहटवा